सगळे राजे परस्परांशी सहकार्याने वागू लागले. वाद उद्भवले की, राजा भीमसेनाचा सल्ला घेऊ लागले. बाहेरच्या राज्यांचे अतिक्रमण थांबले. परस्परांशी लढून शक्ती खर्च करण्यापेक्षा आपल्या साम्राज्याचे उत्पन्न कसे वाढेल यावर ती शक्ती खर्च होऊ लागली. पण काही लोक स्वभावत: आळशी असतात तर काही लोभी. ग्रंथाआधारे न्यायनिवाडा होतो म्हणून काय झाले? अखेर न्यायनिवाडे देणारी माणसेच तर असतात! अशा जागेवर चुकूनमाकून एखादा लोभी माणूस न्यायनिवाडा करण्यासाठी बसला की, तो आपल्या स्थैर्यासाठी चार लोकांचे बळ वापरणारच. त्यांचे पाठबळ मिळावे म्हणून तो मोहबळाचे अस्त्र वापरणारच. राजा भीमसेन जसजसे वृद्ध होऊ लागले तसतसे त्यांना तशा मूठभर लोकांचे संख्याबळ वाढू नये म्हणून काय करता येईल, असा प्रश्न भेडसावू लागला. खरेतर यावर एकच उपाय होता. तो म्हणजे ग्रंथाविषयी जागरूकता वाढवणं. राजा भीमसेनांच्या देशात एक प्रथा होती. दसर्याच्या दिवशी राजा हत्तीवर बसून नगरप्रदक्षिणा करीत असे. यानिमित्ताने प्रजेला राजाचे दर्शन होत असे. लोकांचे राजाविषयीचे प्रेम वाढत असे. भीमसेन राजाने या प्रथेत बदल केला. एका दसर्याच्या दिवशी राजहत्तीच्या अंबारीत आपण सिद्ध केलेला ग्रंथ ठेवला. स्वत: राजा अश्वारूढ होऊन हत्तीच्या मागे निघाला. गर्दी कुतूहलाने हे दृश्य पाहू लागली. हत्तीचा डौल दिमाखदार वाटावा म्हणून हत्तीच्या मागेपुढे चार प्रशिक्षित श्वानांची योजना केली. आपण अश्वारूढ राजाच्या पुढे आहोत, राजहत्तीचे संरक्षक आहोत हे लक्षात आल्यामुळे ते श्वानही आता डौलात चालू लागले. एका दसर्याला सुरू झालेली ही प्रथा पुढे अधिकच वैभवसंपन्न झाली. ग्रंथाची प्रतिष्ठा वाढली. 'ग्रंथापेक्षा अन्य कुणी श्रेष्ठ असू शकत नाही' हा विचार रुजला. राजा भीमसेनाचे समाधान झाले आणि एके दिवशी राजा भीमसेनाचे निधन झाले. प्रजाजन व्याकूळ झाले. भीमसेन गेले पण ग्रंथरूपाने ते आता उरले या विचाराने प्रत्येक दसर्याची मिरवणूक आता अधिक वैभवसंपन्न होऊ लागली. आणि एके दिवशी प्रजेवर दुसरा आघात झाला. राजहत्ती मरण पावला. दसरा जसजसा जवळ येऊ लागला तसतसा प्रत्येकासमोर एकच प्रश्न पडला. ग्रंथाची मिरवणूक काढायची कशी? राजहत्तीची जागा अन्य कुण्या हत्तीला द्यायला कुणीच तयार नव्हते. म्हणून चार श्वानांनी बैठक घेतली. सल्लामसलत केली आणि ते प्रजेला म्हणाले, ''मित्रहो, काळजी करू नका. ग्रंथ याच अंबारीत ठेवला जाईल. या अंबारीला दोन दांडय़ा लावल्या जातील. त्या दांडय़ा आम्ही आमच्या पाठीवर घेऊ. मिरवणूक पूर्ववत निघेल.'' त्यांचा हा विचार लोकांना पटला. पण एकदोघांनी शंका व्यक्त केली. ''ग्रंथ अंबारीतच राहील हे ठीक; पण तो तुमच्या पाठीवर ठेवून प्रदक्षिणा घालताना ग्रंथाची उंची कमी होईल त्याचे काय?'' पण लगेच श्वानांनी सांगितले, ''ग्रंथाची उंची कशी कमी होईल? ग्रंथात फेरबदल केले तर त्याची उंची कमीजास्त होईल. आपण ग्रंथात कुठे फेरबदल करीत आहोत?'' हाही विचार लोकांना पटला. तेव्हा श्वान म्हणाले, ''ग्रंथाची उंची आहे तेवढीच राहणार आहे. फरक फक्त तुमच्या दृष्टीचा असणार आहे. ग्रंथ राजहत्तीवर होता तेव्हा तुम्ही माना उंचावून त्याकडे पाहत होते. आता तो आमच्या पाठीवर आला तर माना उंच न करताही तुम्ही पाहू शकता.'' अखेर सर्वानुमते श्वानांचा निर्णय मान्य झाला. श्वानांच्या पाठीवर अंबारी ठेवण्यात आली. नगरप्रदक्षिणा सुरू झाली. पुढच्या वर्षी नवा पेच निर्माण झाला. प्रजेने श्वानांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या वर्षावामुळे प्रत्येक श्वानाला वाटले, अंबारी फक्त आपल्यामुळेच पेलवली गेली. म्हणून प्रत्येक श्वानाने आग्रह धरला, आता ही अंबारी मी एकटाच वाहून नेणार. ती माझ्या पाठीवर ठेवा. प्रत्येक श्वानाने हाच आग्रह धरला. आता हे भांडण मिटवायचे कसे? एवढय़ात एक लबाड कोल्हा तिथे आला. तो म्हणाला, ''मित्रहो, असे भांडू नका. त्याऐवजी आपण या अंबारीचे समान चार भाग करू आणि प्रत्येकाच्या पाठीवर ते चार तुकडे ठेवू.'' ''हो, पण मग ग्रंथाचे काय करायचे?'' ''ग्रंथाचेही चार विभाग करू ना!'' कोल्हा म्हणाला. ग्रंथाचेही चार तुकडे करायचे! ही कल्पनाच प्रजेला सहन झाली नाही. प्रजाजनांनी टाहो फोडला. ''अरे, तुम्ही चौघे आहात. एकजुटीने अंबारी उचला म्हणजे ग्रंथही सुरक्षित राहील आणि अंबारीचेही तुकडे होणार नाहीत.'' पण प्रजेचा हा केविलवाणा आक्रोश कुणी ऐकलाच नाही. पाहता पाहता ही वार्ता विंध्याचल प्रदेशातल्या परिप्राजकांना लागली. त्यांच्या नेत्याने एक बलदंड हत्ती निवडला आणि थेट भीमसेन राज्याच्या प्रदेशात पोहोचले. ऐन दसर्याच्या दिवशी परस्परांत भांडणार्या श्वानांची पर्वा न करता त्यांनी ती अंबारी उचलली आणि आपल्यासोबत आणलेल्या हत्तीवर प्रतिष्ठापित केली. प्रजेने हत्ती पाहिला. त्यावरची अंबारी पाहिली आणि प्रजा हरखली. नगरप्रदक्षिणा सुरू झाली. सर्व मिरवणूक निर्विघ्न पार पडली. या हत्तीच्या अवतीभवती श्वानांऐवजी चार हुशार कोल्ह्यांची नियुक्ती केली. कोल्ह्यांनी चातुर्यपूर्ण संभाषण केले. त्यांनी प्रजाजनांची मने जिंकली. श्वानांची राजमान्यता संपुष्टात आली. राजा भीमसेनाचा पायंडा सुरू राहिला. बिसापाने गोष्ट संपवली. व्यास ती गोष्ट मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. गोष्ट संपल्यानंतर व्यास तंद्रीतून बाहेर आले आणि बिसापाला म्हणाले, ''पण बिसापा, मला एक कळले नाही. भीमसेन राजाच्या प्रजेने हा एवढा मोठा बदल मान्य कसा केला?'' ''एवढा मोठा बदल?'' ''नाहीतर काय? भीमसेनाच्या प्रदेशातून त्यांचा ग्रंथ थेट विंध्याचल पर्वताकडे गेला आणि तरी लोक गप्प?'' बिसाप हसला आणि म्हणाला, ''मुनिवर्य तुम्ही भारतवर्षात तरी आहात. मी मात्र गांधार देशातला. तेव्हा जी गोष्ट मला सहज कळली ती तुम्हांला मात्र कळू नये याचे मला आश्चर्य वाटले.'' ''म्हणजे काय?'' ''म्हणजे असं की, हत्तीला पर्याय हत्तीच असू शकतो हे त्या विंध्याचलच्या नेत्याला कळले. इथे खरा प्रश्न ग्रंथ परिशीलनाचा नसतो. तो असतो ग्रंथप्रदर्शनाचा. दर्शन हत्तीवरून झाले याचे समाधान प्रजेला झाले.'' ''पण मला ती श्वानाऐवजी कोल्ह्यांची योजना..?'' ''नुसता प्रामाणिकपणा काय कामाचा? कोल्हा प्रामाणिक असो नसो, तो चतुर असतो हे तुम्हांला माहीत आहेच ना?'' एवढे बोलून बिसाप निघून गेला. व्यास त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिला. इसाप सगळ्य़ांना माहितंय; पण बिसाप मात्र कमी लोकांना. मी ही बिसापाची गोष्ट वाचली आणि उगाच विंध्याचल, हत्ती, एकजुटीचा उपदेश आणि नियमांचा ग्रंथ या उल्लेखांमुळे मला आजच्याच वर्तमानातील वाटली. माझी शंका खरी की खोटी? अजून मला कळले नाही. (लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.) भ्रमणध्वनी : 9881230084 |
Monday, 23 July 2012
गोष्ट आजची की खरंच खूप वर्षापूर्वीची?
अजाबरावची ठसन
''सायकल होना भाडेसे'' 'क्या नाम है तुम्हारा?' ''अजाबराव'' ''कहां रहते?'' ''बोंदरखेड'' ''पहचान?'' ''म्हणजे?'' ''तुम्हारा कौन पहचान का है?'' ''भौत है.. आमदार, खासदार वयखते मेरेकू'' ''दर्यापूर में कौन पहचान का है?'' ''भौत है, डांगे मास्तर है.. हमारे गावके लालाकी अडत है दर्यापूर में'' ''उनको लाव यहा'' ''क्या बोलते राज्या.. टप्परशाप सायकल के वास्ते कोई आयेंगा क्या?'' ''बगर पहचान के सायकल नही मिलती'' ''म्हणजे मी चोट्टा दिसतो काय तुले?'' ''वैसी बात नही भय्या'' ''तीन पैशाच्या सायकलसाठी वयख मांगून राह्यला.. भरोसा नाही काय? फेक तिकडे तुही सायकल.. चाललो मी..'' ''काय झालं अजाबराव.. काहून काताहून राह्यले?'' ''मले वयख मांगून राह्यला ससरीचा'' ''कोन?'' ''तो सायकलवाला, मी भाडय़ानं सायकल मागाले गेलो.. तो म्हणते वयख सांगा? त्याले काय मालूम.. शरद पवारशी वयख हाय या पठ्ठय़ाची, अजाबराव म्हणता घंटा लागते'' ''सायकल कायले पाह्यजे तुमाले?'' ''अरे मी त्याले सांगून राह्यलोकी मी बोंदरखेडचा अजाबराव आहो, गावातून अँटोनं दर्यापुरात आलो, मले कमालपुरले जायाचं हाय.. नऊची एसटी हाय.. स्टॅण्डवर बसल्यापेक्षा मले वाटलं मेडिकलच्या दुकानातून गोया आनाव.. दुकान स्टॅण्डपासून दूर हाये म्हणून मी सायकल घेऊन चाललो होतो, पण तो म्हणते वरख सांगा?'' ''बरोबर हाय त्याचं.. वयख शिवाय सायकल भेटत नाही दर्यापुरात'' ''अबे पण मानसाले काही किंमत असते की नाही श्यामराव.. तीन पैशाच्या सायकलसाठी वयख कायले पाह्यजे? अशा डंगर्या सायकली माझ्या घरी खतावर पळेल हायेत, मले वयख मांगते ससरीचा.. मी सारी दुनिया हिंडलो, पण मले आजून कोनं वयख मागितली नाही.. आमदार, खासदार मले रामराम करतात.. अन् हा खोक्यातला मले वयख मागून राह्यला'' ''सायकल चोरी जातात म्हणून तो वयख मागते'' ''अबे मी चोट्टा दिसून राह्यलो काय? दुकानातून गोया आणत होतो अन् त्याची सायकल वापस करत होतो, तेवढा त्याले भरोसा नाही, अशा सतरा सायकली एका दिवसात इकत घेतो.. तो काय समजला मले? अजाबराव म्हणता घंटा लागते, तू काय वयख मागतं म्हणा.. खुद्द मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन गेले'' ''कधी हो?'' ''माह्य घर पुरात वाहून गेलं होतं त्यासाली सव्र्हे कराले आले होते.. अन् तो मले वयख..'' ''कुठं चालले तुम्ही?'' ''मी कमालपुरले चाललो, भासीचे फायनल हाये..'' ''इथून नऊची गाडी हाये'' ''मग इथी कायले बडबड करून राह्यले? एसटी पाहून घ्या'' ''एसटी कुठं लागते?'' ''चौकशी ऑफिसले विचारा'' ''चौकशी ऑफिसात विचारतो.. आपल्याले कोनाचा भेव हाय काय? ओ साहेब.. शुक शुक.. इकडे पाहा आगुदर'' ''बोला?'' ''कमालपूरची गाडी कधी लागते?'' ''आताच गेली पाच मिनिटे झाले'' ''ऑ?, अशी कशी गेली?'' ''नऊचा टाइम असते तिचा.. आज राइट टाइम गेली'' ''त्या रोजी एक घंटा लेट गेलती अन् आज कशी राइट गेली?'' ''आजकाल राइट टाइम सुटतात गाडय़ा'' ''अरे पण मी इथीच होतो ना.. मले आवाज द्या लागत होता.. प्रायव्हेट गाडय़ावाले कसे आवाज देतात? भोंग्यातून आऊट करा लागत होतं'' ''भोंगा बंद आहे'' ''दुसरी गाडी किती वाजता आहे?'' ''पाच वाजता'' ''घ्या दाबून.. आता आली किती घोये खोसी? मले अर्जट जायाचं हायं.. त्या गावात अँटो जात नाही'' ''त्याले मी काय करू?'' ''तुम्ही गाडी लवकर कशी सोडली?'' ''लवकर नाही.. राइट टाइम गेली'' ''अशी कशी गेली? नाही ताहा दोन दोन घंटे लेट करता.. अन् आज कशी राइट गेली?'' ''बोर्डावर नऊचा टाइम आहे.. वाचून घ्या..'' ''ते सांगू नका.. मले वाचता येत नाही काय? अळानी समजले काय?'' ''तुम्ही एवढे बॅलिस्टर आहात मंग मगापासून हुज्जत कायले करून राह्यले?'' ''हुज्जत कोन करून राह्यलं? मी तुमाले एवढेच इचारून राह्यलो की गाडी गेली कशी?'' ''राइट टाइम गेली'' ''काहून गेली?'' ''तुम्ही फुटा इथून.. डोकं खाऊ नका'' ''काहून फुटा? फुकटचा पगार घेता काय?'' ''हे पाहा.. जास्त बकबक करू नका.. मॅनेजरजवळ कम्पलेंड करा'' ''मी मंर्त्यालोक जातो, मले झांगो समजले काय? आता फोन करतो तं पाच गाडय़ा बलावतो.. अजाबराव म्हणता घंटा लागते.'' ''मंग बलावा.. तोंड कायले वासून राह्यले.. चला निघा इथून'' ''ओ साहेब.. शिल्लक बोलू नका'' ''जाय.. लय पाह्यले तुह्यासारखे'' ''म्याही लय पाह्यले.. फेक तुही एसटी.. तुह्या एसटीच्या भरोसावर नाई मी.. अशा सतरा एसटय़ा इकत घेतो.. तुले काय वाटते? ह्या पठ्ठय़ा पैदल जाईन कमालपुरले.. हा चाललो पैदल.. मले असा तसा समजला काय? अजाबराव म्हणता घंटा लागते'' (लेखक हे नामवंत वर्हाडी कथाकार आहेत.) भ्रमणध्वनी : 9561226572 |
वासनवेल
A A << Back to Headlines
जशा बांधबंधार्याने किंवा शेत बंधार्याने वेली वाढतात तशाच माणसाच्या मनावरही वेगवेगळ्या विचारांच्या वेली वाढतच असतात. कधी ती विचारवेल मनाला पार गुरफटून घेते. सुदबुद हरवते. दुसरं काही सुचूच देत नाही आणि आयुष्य मग एकारून जाते. त्यातल्या काही वेली ह्या अमरवेलीसारख्या असतात. अमरवेली जशा ज्या झाडावर चढल्या, वेली विळखा मारून बसल्या त्या झाडाला गुदमरून मारून टाकतात. तशाच ह्या अविचाराच्या वेली माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा र्हास करतात. दृष्टांतपाठामध्ये या 'जळमांडवी'चा मोठा समर्पक दृष्टांत आलेला आहे. तो ऐकून सगळ्या मानवजातीसाठी मोठा समर्पक वाटतो. जळमांडवी ही एक प्रकारची पानवेल असून ती पाणी स्वच्छ राखते असा समज आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष झाले आणि तिची नको तेवढी वाढ होऊ दिली तर मात्र, ती सगळा जलाशय, सगळी विहीर व्यापून टाकते. पाणीच दिसू देत नाही. मग पाण्याचे प्रदूषण वाढते. कारण वारा वाहतो, वाहत्या वार्याने तिच्या मुळावर, पानांवर रजधूळ बसते. तिथे आणखी बेंचळ उठतात. त्यामुळे थोडय़ाच दिवसात सगळी विहीर जळमांडवीने भरून जाते. तिथे उदक आहे. असा काहीच भाव त्या ठायी राहत नाही. मग ती जळमांडवी काढून टाकायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही. स्त्री असो अथवा पुरुष. मनावर वारंवार उगवणार्या अशा भाववेली काही क्षणापुरता आनंद देत असल्या, आल्हाददायक वाटत असल्या तरी अतिरेक झाला तर वाईटच. त्यातल्या त्यात ती वेल व्यसनाची असेल, वासनेची असले तर वाईटच वाईट. लोपाबाई आणि सखाराम पानझाडेच्या मनावर असाच आकर्षण. सखाराम लोपाबाईच्या कुणबिकीत कामासाठी होता. तिचं लग्न झालेलं, पण बापाच्या आजारात माहेरी आली आणि सखाराम पानझाडेच्या प्रेमात पडली. आपल्या तिकडच्या नवर्यापेक्षा तिला तोच खूप आवडू लागला. सासरी राहून जाच सोसणं, काम करणं, बंधनात राहणं यापेक्षा माहेरी राहून सखारामशी रत होणं यात ती रममाण झाली. सासरहून नवरा न्यायला आला, पण गेली नाही. मग नवर्याने सोबत माणसं आणून तिला ओढून न्यायचं ठरवलं. चहापत्ती आणायला किराणा दुकानावर गेली तेव्हा तिला धरून नवरा ओढू लागला. सोबतच्या ऑटोत टाकण्यासाठी धडपडू लागला. तर तिने नेसत्या लुगडय़ाचा पदर त्याच्या हाती तो तसाच राहू देऊन स्वत:भोवती गोल फिरून लुगडं त्याच्या हाती सोडून दिलं आणि नागडीच रस्त्यातून पळत निघाली. पळताना सगळ्या लोकांनी पाहिली. समाजात, गावात बापाची, भावाची पच्ची झाली. नवराही हबकला. अशा आब गमावू बायकोसोबत संसार केल्यापेक्षा दुसरी बायको केलेली बरी. म्हणताना परत गेला. थोडय़ाच दिवसात त्याने दुसरं लग्न केलं. लोपाबाईला ते बरं झालं. सखाराम पानझाडे सोबतचं तिचं प्रणयपर्व सुरूच होतं. एक दिवस आजारी बापाने दोघांना रंगेहाथ पकडलं. पोरीला मारझोड केली. सखारामला कामावरून हाकलून दिलं. मग त्यांच्या भेटीसाठी चोरून दुसर्याच्या शेतात, गावशिवारातल्या लपणीच्या जागा हेरून व्हायला लागल्या. चर्चा सगळीकडे पांगाळत गेली. तिच्या ह्या बदनामीमुळे भावाचं लग्न जुळणं कठीण झालं. सोयरिकी परत जायला लागल्या. मग भाऊ आपली रोजची कामधामं सोडून त्यांच्याच पाळतीवर राहू लागला. वढय़ाखडय़ात शोध घेऊन दिसतील तिथं त्यांना मारझोड करू लागला. हा घरचाच नवीनच अडथळा तयार झाला. भावाच्या जाचातून सुटण्यासाठी तिने नवाच आराखडा तयार केला. एक दिवस सकाळीच लोकांना लोपाबाईच्या घरामुळे तिच्या रडण्याचा गहबला ऐकायला आला. सगळं गाव दारात जमा झालं. ''भावानं रात्री जीव देला, महा जिवाभाचा भाऊ मले सोडून गेला,'' लोपाबाई आक्रोश करत रडत होती. कपाळावर झोडून झोडून घेत होती.'' महा जिवाभावाचा भाऊ मले सोडून गेला व माय, आता मी कोणाच्या भरोशावर जगू व माय? आता माह्या लखवा होयेल बापाले कोण पोसंल? बापाची पंधरा एकराची कुणबिक कोण पोसील?'' लोपाबाई आभाळाकडे पाहून रडत होती. आभाळतल्या देवाला प्रश्न विचारीत होती, पण तिच्या दारात चित्र मोठं विचित्र निर्माण झालं होतं. ती रडत होती, पण लोक तिच्या रडण्याला हसत होते. ती आभाळातल्या देवाला प्रश्न विचारीत होती, पण भोवती जमा झालेले टगेच तिच्या प्रश्नाला एकमेकांना ढोसलून उत्तर देत होते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं, 'सखाराम पानझाडे... सखाराम पानझाडे..' अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी, भावाच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी पंचनामा करायला पोलीस आले. गावात कुणकुण होतीच. दोनच दणक्यात सखाराम पानझाडे आणि लोपाबाई कबुलले. 'आमच्या भेटीगाठीत आडथळा आणत होता म्हणून म्याच रात्री भावाच्या मटणाच्या भाजीत थिमिट खाऊ घातलं..' यांच्या मनाला वेटाळून टाकलेल्या वासनवेलींनी असा अवसानघातकी विळखा घातला होता. तो ओरबडून बाजूला करण्याऐवजी सखाराम आणि लोपा दोघेही त्या वासनवेलीच्या विळख्यात झाकोळून गेले होते. आधी सगळं खूपच गोंडस, मधाळ वाटायचं. मनाला गुदगुल्या व्हायच्या आणि त्या होतचं असतात. कारण अनैतिक संबंधातलं, विवाहबाह्य संबंधातलं थ्रील मोठ मोहतुंकी असतं. सुखद अनुभूती देत असतं. कारण वास्तवातल्या घरसंसारी भनभनत्या विश्वापेक्षा अंतरंगी साकार होत असलेलं, ते भावविश्व खूपच आनंददायी वाटत असतं. परस्परांवर केल्या जाणार्या प्रेमात आनंद असतोच. कारण प्रेमासारखं चैतन्यशाली दुसरं काही नसतं. कारण प्रेमात मोठी शक्ती असते. म्हणून तर राधाकृष्णाची प्रेमकथा गाण्यांचा विषय होऊन प्रेमसंबंधातील नवेनवे कलांकृत निर्माण करीत असतो; पण या प्रेमशक्तीला मर्यादा असतात. योग्य प्रकारे तिचा वापर केला गेला नाही तर मग अशी लव्ह स्टोरीची 'क्राईम स्टोरी' होते. विहिरीतील पाणी स्वच्छ राहावं म्हणून जळमांडवीची कलम टाकली जाते; पण तिची निगा राखली नाही तर नवीन जुंबाड वाढीला लागतात. अख्ख्या विहिरीतलं पाणी प्रदूषित होतं. आपल्या जीवनाचा नितळ जलप्रवाहसुद्धा दूषित करण्यासाठी वेळोवेळी अशा विघातक गोष्टीचे आक्रमण सुरूच असते. मात्र, पिकातल्या तणकटाला वेळीच त्याची जागा दाखविली नाही तर मात्र, पीक दबते खाली आणि तणच येते वर. म्हणूनच म्हटलं जातं, ''चालताना गडय़ा असं जपून चालावं, निसरडी वाट तिथं, चालणं टाळावं.'' (सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या आहेत.) जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा |
सनातनी विचारांच्या विषाची जाणीवपूर्वक पेरणी
त्यांचा विरोध प्रामाणिक होता म्हणून त्यांचं समाधान झालं. मला खात्री आहे की, थोडीशीही समाजाविषयी कणव असणारा प्रत्येक प्रामाणिक माणूस या बिलाचं समर्थनच करेल. मग विरोध का? सनातन संस्थेच्या गोबेल्स, गणित, खोटय़ा प्रचाराविषयी मी मागच्या लेखात लिहिलं आहेच. त्यांच्या आक्रमक खोटय़ा प्रचाराला अनेक सरळ धर्मप्रेमी माणसं बळी पडतात आणि काही आपलं राजकारण सिद्ध करण्यासाठी वेड पांघरूण पेडगावला जातात. आळंदीच्या एका मोठय़ा कीर्तनकारांचे खूप फोन यायचे. मला ते खूप शिव्या घालायचे. आवाजावरनं ते वयस्क कीर्तनकार आहेत हे माझ्या लक्षात आल्यामुळं एरवी कुणाचीही धमकी मुळीच ऐकून न घेणारा मी शांतपणे त्यांचं बांलणं ऐकत असे. शांतपणे त्यांचं शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करत असे. ''तू हिंदूची औलाद नाही. मुसलमानाची औलाद आहे.'' अशी सुरुवात करणारे ते कीर्तनकार नंतर बरेच शांत होत असत. आळंदीला जाऊन मी त्यांच्यासोबतच चर्चा केली. बिलात काय आहे ते समजावून सांगितले. त्याची प्रत त्यांना दिली. त्यांचा एकच आग्रह मुसलमान.. मुसलमान.. मुसलमान. ते जे बोलत होते ते मी लिहिणं शक्य नाही. कुठलाही 'माणूस' त्याचा उच्चारही करू शकत नाही. म्हणून त्यांचे नाव जाहीर लिहीत नाही. शेवटी मी त्यांना म्हणलो, ''मी वारकरी संप्रदायाला खूप मानतो. तीन पिढय़ांपासून माझं घर वारकर्यांचं घर आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या संतपरंपरेचं धर्मातील अंधश्रद्घा दूर करण्याचं मोलाचं काम करण्यासाठीच मी अ. भा. अंनिसची स्थापना केली. गेली 30 वर्षे ते काम करतो आहे. फक्त कीर्तन माध्यमाचा वापर न करता भाषण माध्यमाचा वापर करतो आहे. मी तुम्हांला, वारकर्यांना बापासारखा समजतो. आपला समजतो. म्हणून माझ्यावतीनं मी खूप तळमळीनं तुम्हांला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण जोवर या देशात मुसलमान आहेत तोवर एकही समस्या सुटू शकत नाही. तोवर कोणताही बदल, सुधारणा करता कामा नये असंच तुमचं मत असेल तर आधी या देशातील 22 कोटी मुसलमान मारून टाका. मगच आपण धर्मसुधारणा - अंधश्रद्घा निर्मूलन या विषयासंबंधी बोलू..'' माणसाला सहिष्णुता शिकवणार्या वारकरी संप्रदायाचा एखादा समुदाय एवढय़ा विषारी विचारांचा असू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. पण हे सनातनी विचारांचं विष पेरण्याचं काम गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि त्यांच्या हाती 'ब्रेन वॉशिंग'सारखं प्रभावी, आधुनिक हत्यार आलं आहे. यासंबंधी नंतर विस्तारानं लिहीनच. पण या बिलासंबंधी मुद्दाम गैरसमज पसरविण्याचं राजकीय कौशल्य कुणाचं? मला पहिल्यांदाच जाहीररीत्या सांगून टाकलं पाहिजे, की भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा 'युवा स्तंभ' चालवत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करून टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी भाजपतर्फे अशोक मोडक या आमदारांना प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात मा.गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंगजी फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल, असं एक मतानं सांगितलं. मा. अशोक मोडक अतिशय आग्रही. पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळं आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळींना महत्त्वाचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळं या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात, ''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द, त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्याची जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2005 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितली. सुरुवातीस आ. लोढा माझ्याशी बोलण्यास तयारच होईना. सनातन्यांनी त्यांना एवढं भडकवलं होतं, की ते मला बहुधा राक्षस (मानव नाहीच) समजत असावेत. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले, ''मानव, हे तर फारच चांगलं बिल झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्ही धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठीच या बिलात काही तरी टाका. चांगल्या धार्मिक रूढी-परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी..'' मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले. म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. 'या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्या कोणत्याही चांगल्या रूढी-परंपरेचा समावेश नाही' अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्यांचं 13 वं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळे आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळं आम्ही गप्प बसलो. 2005 साली 26 डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात, विधानसभेत, बहुमतानं हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं. त्यावर काही भाषणं झाली. त्यात आ. देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. आणीबाणी काळातील व माझ्या नागपूर वास्तव्यातील आमचे एक जिंदादिल स्नेही गंगाधर फडणवीस यांचा तडफदार मुलगा म्हणून देवेंद्र फडणवीस हा आम्हा सगळ्यांचा कौतुकाचा व औत्सुक्याचा विषय. पुढच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी या 13व्या कलमाकडे माझं लक्ष वेधून घेतलं. ते वकीलही आहेत. मी ते 13 वं कलम खूप गांभीर्यानं घेतलं. काय आहे 'ते' कलम? 13. शंका दूर करण्यासाठी याद्वारे उसे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमात एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल (कारण या 12व्या कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही असं व्याख्येत 2 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणार नाही. चांगल्या रूढी-परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे 13 वं कलम समाविष्ट केलं आहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांच्याकडे गेलो. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे 13वं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. ''भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवतात. मग क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात ते योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा.'' एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत, तर अनेक तास माझ्यासोबत बसून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली. पण पुढे म्हणाले, ''पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्या रूढी-परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्या धार्मिक, विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो.'' सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना.चंद्रकांत हांडोरेही रिलॅक्स झाले. पण मग ''उद्या आम्ही, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल, शारीरिक नुकसान झालं. आम्हांला 6 महिने जेलमध्ये पाठवालं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करत असलो तर म्हणालं तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल.'' असं कोण म्हणालं? का म्हणालं? वृत्तपत्रात मोठमोठे मथळे बातम्या छापून आल्यानं. असं बिलात कुठेही नसतानाही सनातन्यांच्या खांद्याला खांदा लावून या बिलाच्या विरुद्ध असा गोबेल्सप्रणीत खोटा प्रचार करण्याची सुपारी कुणी घेतली आहे? का घेतली असावी? पाहू पुढच्या शनिवारी. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी : 9371014832 |
Thursday, 19 July 2012
शेतकरीविरोधी कायद्यांचा गळफास
A A << Back to Headlines
शेतीच्या क्षेत्रातील अनेक कायदे कालबाह्य झालेले आहेत. अनेक कायदे अडचणी निर्माण करीत आहेत. कोणीतरी त्याची तपशीलवार यादी करायला हवी. मात्र जे तीन कायदे आज शेतकर्यांच्या गळ्याचा फास बनले आहेत त्यांचा आपण विचार करू. जमीन अधिग्रहणाचा कायदा मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकार होता. म्हणून सरकारला शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहण करता येत नव्हत्या. नेहरूंच्या काळात जे अधिग्रहण करण्यात आले ते न्यायालयांनी बेकायदेशीर ठरविले. यावर नेहरू आणि त्यावेळच्या कायदेमंर्त्यांनी एक शक्कल काढली. घटनेत नवे परिशिष्ट जोडले व घटनेत अशी दुरुस्ती करून घेतली की या परिशिष्टात जे कायदे येतील त्याविरुद्ध कोर्टात जाता येणार नाही. मूळ घटनेत नसलेले हे परिशिष्ट मुळात शेतकर्यांचा जीव घेण्यासाठी अस्तित्वात आले. जमीन अधिग्रहणाचा कायदा या परिशिष्टात घालण्यात आला. शेतकर्यांचे हातपाय बांधून त्याची जमीन काढून घेण्याची व्यवस्था करण्यात आली. हा कायदा आजही तसाच आहे व तो घटनेच्या नवव्या परिशिष्टात आहे. गंमत अशी की, त्या काळात जमीन अधिग्रहणाचा कायदा व्हावा यासाठी कोणाचा विरोध झाला नाही. डाव्या पक्षांनी तर त्यासाठी आग्रह धरला होता. आज तेच डावे 'सेझ'साठी होणार्या अधिग्रहणाचा विरोध करीत आहेत. कुर्हाडीला दांडा आपणच द्यायचा आणि जेव्हा ती झाड तोडायला लागली तेव्हा आपणच थयथयाट करायचा असा हा प्रकार आहे. जमीन अधिग्रहणाचा जुनाच कायदा आजही तसाच आहे. या सरकारने नवा कायदा तयार केला आहे; परंतु जनलोकपालच्या गदारोळात तो मागे पडला. आता केव्हा येईल कोणास ठाऊक? शेतकर्यांची जमीन काढून घेण्याचा अमर्यादित अधिकार सरकारकडे असेल तर तेथे खुली व्यवस्था आहे असे कसे म्हणता येईल? सिलिंगचा कायदा स्वातंर्त्याची पहाट होत असताना तेलंगणात जमीनदारीविरुद्ध सशस्त्र लढा उभा राहिला. जमिनीचे फेरवाटप करा, अशी त्यांची मागणी होती. विनोबा भावे गांधीजींचे शिष्य. त्यांनी अहिंसक पद्धतीने जमिनीच्या फेरवाटपाला सुरुवात केली. भूदान आंदोलन सुरू झाले. तिकडे पंडित नेहरूंनी सिलिंगचा कायदा आणला. कोरडवाहू 54 एकर, बागायत 18 एकर. यापेक्षा जास्त जमीन ठेवता येणार नाही. कायदा आला. कोणी कोर्टात आव्हान देऊ नये म्हणून तो घटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्यात आला. महाराष्ट्रात वसंतराव नाईक व शंकरराव चव्हाण यांच्या काळात या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली. अनेकांची जादा जमीन काढून ती भूमिहिनांमध्ये वाटप करण्यात आली. खरेतर जमीनधारणेचा हा कायदा पक्षपाती होता. उद्योगासाठी तशी कोणतीही मर्यादा लागू केलेली नाही. मग शेतीलाच का? असा प्रश्न शेतकर्यांच्या तथाकथित सुपुत्रांना पडला नाही. दिल्लीची ताबेदारी करण्यात त्यांनी धन्यता मानली. परिणाम काय झाला? चौपन्न एकरवाल्या शेतकर्याला चार मुले झाली. त्यांच्या वाटण्या झाल्या. प्रत्येकी तेरा एकर आले. दुसर्या पिढीत त्यांना चार मुले झाली. त्यांच्यात वाटण्या झाल्या व ते अल्पभूधारक झाले. शेतीच्या बाहेर रोजगार निघाले नाहीत. शेतीवर भार वाढत गेला व शेतीचे लहान-लहान तुकडे पडत गेले. आज 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. बरे, ज्यांना जमिनी मिळाल्या त्यांचे तरी कल्याण झाले का? तेही नाही. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. त्यात सिलिंगमध्ये ज्यांना जमिनी मिळाल्या त्या शेतकर्यांची संख्या कमी नाही. या उलट ज्यांना जमिनी नाहीत म्हणून ज्यांनी गाव सोडले, शहरात जाऊन मोलमजुरी केली त्यांची परिस्थिती सुधारली. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे हाल झाले, ज्यांना मिळाल्या त्यांचीही वाताहत झाली. असा कायदा आजही जसाचा तसा लागू असताना कोण म्हणेल की खुली व्यवस्था आली आहे? जीवनावश्यक वस्तूंचा कायदा एकदा दुष्काळ पडला. व्यापारी चढय़ा भावाने धान्य विकू लागले. तेव्हा काही लोक महम्मद पैगंबरांकडे गेले. म्हणाले, ''तुम्ही राजे आहात. गरिबांना स्वस्त धान्य मिळेल यासाठी त्या व्यापार्यांना कमी भावात माल विकायला सांगा.'' महम्मद पैगंबरांनी ऐकून घेतले. त्यानंतर ते म्हणाले, ''मी बाजारात हस्तक्षेप करणार नाही. आपण बाजारातून माल विकत घेऊ व गरिबांना ते देऊ.'' महम्मद पैगंबरांनी बाजाराबद्दल जी भूमिका घेतली ती जर आमच्या सरकारला घेता आली असती तर त्यात खरोखरच गरिबांचे भले झाले असते. आमच्या सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा कायदा केला. गरिबांना वस्तू स्वस्त मिळाव्यात म्हणून शेतीमालाच्या बाजारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला मिळाला. माकडाच्या हातात कोलीत गेल्यावर माकड काय करणार? सरकारने जीवनावश्यक वस्तूंची यादी केली. त्यात साखर आणि कांदा यांसारख्या वस्तूही समाविष्ट केल्या. परिणाम असा झाला की, जेव्हा कांदा दहा रुपये किलोने विकला जाऊ लागला तेव्हा सरकारने निर्यातबंदी लागू केली. कांदा कोसळला. दहा पैसे किलोने विकावा लागला. तेव्हा सरकारला दाद ना फिर्याद. साखरेवर लेव्ही लावण्याचा अधिकार याच कायद्याने दिला. हाही कायदा घटनेच्या नवव्या परिशिष्टात टाकण्यात आला. म्हणजे याविरुद्ध कोर्टात जाता येत नाही. बाजारात हस्तक्षेप करण्याचे अमर्याद अधिकार सरकारला देणारे कायदे अस्तित्वात असतील तर त्या देशात खुलीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण आले असे कसे म्हणता येईल? (लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत) भ्रमणध्वनी - 9422931986 |
जिंदगी, एक सफर, था सुहाना..
आणि आज राजेश खन्ना गेल्याची बातमी ऐकली. बायको म्हणाली, अहो राजेश खन्नाबद्दल रेडिओवर काहीतरी चुकीचं ऐकलं, टीव्ही लावा बरं. मुळात तिने बरोबरच ऐकलं होतं पण ते बरोबर आहे हे मानायची तिची तयारी नव्हती. ज्याचे गाणे गुणगुणल्याबरोबरच, ज्यांच्या खांद्यावर शाल घेण्याच्या स्टाईलची आम्ही टिंगल केली तो अनंताच्या सफरला निघून गेला होता. त्याचा सुपरस्टारवाला काळ मी अनुभवला नव्हता, पण त्याच्यासाठी वेडय़ा झालेल्या प्रेक्षकांचे किस्से मात्र भरपूर वाचले-ऐकले होते. यश तुझ्या डोक्यात गेलं होतं हे तू मान्य करतोस की नाही या एका पत्रकाराच्या प्रश्नावर तो म्हणाला होता 'मुली मला रक्ताने पत्र लिहायच्या, जिथे मी जाईन तिथे तरुण-तरुणी माझ्या पायावर लोळण घ्यायच्या. माझ्या ओझरतं व्हावं म्हणून काहीही करायचे, इतकं झाल्यावरही मी जमिनीवर राहिलो असतो तरच नवल! हे खोटंही नव्हतं. एका कॉलेजच्या गॅदरिंगच्या उद्घाटनाला राजेश खन्ना गेला असता तो कारमधून उतरताच कारपासून ते स्टेजपर्यंत तरुण-तरुणी झोपले आणि त्याला म्हणाले, तू राजेश खन्ना आहेस, तू जमिनीवर पाय ठेवायचा नाही. तू आमच्या अंगावरून चालत जा. हा किस्सा मी वाचला होता. त्याने कधीच दाढी-मिशा लावून म्हातार्याचा रोल केल्याचं आठवत नाही व झुपकेदार मिशी लावून डाकू बनून तो घोडय़ावर बसल्याचंही आठवत नाही. आपला रोमॅंटिक लूक त्याने कायम जपला. त्याने घातलेल्या गुरुशर्टची फॅशन अगदी दहा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत होती. आज तुम्ही गुरुशर्ट घातला तर लोकं तुम्हाला म्हणतात, 'दादा, शार्ट कुर्ती पहने क्या? दस्तुरखुद्द अमिताभ म्हणाला होता, 'माझ्या संघर्षाच्या काळात राजेश खन्नाच्या सिनेमांना असणार्या लांबच लांब रांगा पाहून मी आश्चर्यचकित व्हायचो. प्रेक्षकांचं इतकं वेड पाहून मी विस्मित होत असे. कालांतराने त्याच अमिताभने त्याचा सुपरस्टारपदाचा किताब हिरावून घेतला ही बाब अलाहीदा. अमिताभ बच्चन हिरो असणार्या 'बॉम्बे टू गोवा' सिनेमात ड्रायव्हर व कंडक्टरचं नाव अनुक्रमे राजेश व खन्ना असं होतं. त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च काळात त्याने राजेश खन्ना मॅनिया निर्माण केला होता. मॅनिया या शब्दाचा नेमका अर्थ विशद करणारा तो काळ होता. आपल्या सिनेमात त्याने काम करावे म्हणून नोटांची बंडलं घेऊन निर्मात्यांच्या गाडय़ांच्या रांगा त्याच्या घरासमोर उभ्या असायच्या. आपल्या संघर्षाच्या काळात अक्षयकुमारने ज्या बंगल्यासमोर उभे राहून फोटो काढले होते तो बंगला राजेश खन्नाचा होता. कालांतराने अक्षयकुमारने तोच बंगला विकत घेतला आणि राजेश खन्नाच्याच मुलीशी लग्न केले, हाही एक योगायोग. राजेश खन्ना आणि किशोरकुमार 'आराधना' या चित्रपटापासून फार्मात आले. राजेश खन्नाला किशोरकुमारचा आवाज असा काही मॅच झाला की पडद्यावर राजेश खन्नाच गातोय असा भास होत असे. किशोरकुमारला निर्मार्त्यांनी एकदा सांगितले की, एका नवीन नटासाठी तुम्हाला पाश्र्वगायन करायचंय. त्यावर किशोरकुमारने त्या नटाला माझ्या घरी पाठवा, मला त्याची मुलाखत घ्यायचीय असे सांगितले. ठरल्यावेळी तो नट किशोरकुमारकडे हजर झाला. किशोरकुमारने त्याला अनेक वेडेवाकडे प्रश्न विचारून भंडावून सोडले आणि शेवटी आता तुम्ही निघा करून परत पाठविले. त्या नटाने निर्मात्याकडे जाऊन किशोरकुमारबद्दल बरीच आगपाखड केली, पण जेव्हा त्या नटावर चित्रीत झालेलं गाणं त्यानं पाहिलं तेव्हा मात्र तो वेडावला आणि म्हणाला 'ये आवाज तो मेरी लगती है' तेव्हा किशोरकुमार त्याला म्हणाला, मला तुझी मुलाखत घ्यायची नव्हती तर तुझ्या बोलण्याची लकब, तुझ्या अदा बघायच्या होत्या. ज्यांचा अभ्यास करून मी तुझ्यासाठी गाणे म्हटले, तो नट राजेश खन्ना होता. पुढे किशोरकुमार गेल्यानंतर त्यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात बोलताना राजेश खन्ना म्हणाला - 'आज मैने अपनी आवाज खो दी है' 69 ते 72 या चार वर्षांत सतत 15 सुपरहिट देणारा तो एकमेव सुपरस्टार आहे. हा एक रेकॉर्ड आहे. सिनेसृष्टीच्या रोमॅंटिक युगाचा तो शेवटचा शिलेदार होता. दुश्मन सिनेमात स्वत:सोबतच्या लहानग्याला मुमताजच्या बायोस्कोपवर फुकटात सिनेमा दाखविणार्या राजेश खन्नाला मुमताज म्हणते, ओ बाबू अपना नाम तो बताते जा त्यावर राजेश खन्ना उद्गारतो सुना नही बच्चेने क्या कहा 'दुश्मन चाचा! चाचा बच्चेका तेरा नही! हे तो त्याच्या जगप्रसिद्ध डोळे मिचकावून, मान तिरपी करत म्हणण्याच्या स्टाईलने म्हणतो. ते इतकं मस्त वाटतं की रंगा खुश हो जाता. असे अनेक क्षण आता तुमच्या-माझ्या भोवती रुंजा घालतील. 'आनंद'मध्ये ज्या दारासिंगला तो गुरू म्हणतो तो त्याच्या तीन-चार दिवस आधीच निघून गेला. आपलं भावविश्व व्यापून टाकणारे, आनंदाचे चार क्षण आपल्या ओंजळीत टाकणारे एक-एक करून आपल्यातून निघून जात आहेत. आणि आपण 'कारवा गुजर गया गुबार देखते रहे' असे म्हणत हतबल उभे आहोत असं मला अनेकदा वाटतं. शेवटी 'आनंद'मधलाच संवाद मदतीला येतो 'जिंदगी और मौत उपरवालेके हाथमें है जहापनाह! हम सब तो रंगमंच की कठपुतलीया है जिसकी डोर उपरवालेके हाथ में बंधी है कब, कौन, कैसे उठेगा कोई नही जानता. हाù हाù हाùù (लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.) भ्रमणध्वनी - 9823087650 |
इस्रायली शेतीचे खूळ व खुळखुळा
| इस्रायली शेतीचे 'खूळ' तसे नवीन नाही. काँग्रेस संस्कृतीने हे खूळ जाणीवपूर्वक जोपासत त्याचा खुळखुळा म्हणून वापर केला. रडणार्या मुलाची वेदना समजून न घेता त्याचे लक्ष अन्यत्र वेधून घेण्यासाठी त्याला आपण काऊ आला, चिऊ आली म्हणत समजावतो. तरीही मुलगा रडण्याचं थांबवीत नसेल तर वेळप्रसंगी 'बागुलबुवा'ही दाखवितो. वेगवेगळे खुळखुळेही त्याच्यासमोर वाजवतो व त्याचं दुखणं जरी थांबविता येत नसले तरी त्याचं रडणं तात्पुरतं का होईना थांबविण्यात आपण यशस्वी होतो. स्वातंर्त्यानंतरच्या 64 वर्षांत शेतकर्यांच्या 'दुखण्या'बाबत आपण यापेक्षा काही वेगळे केले नाही. त्यामुळे त्याचे दुखणेही थांबले नाही., रडणेही थांबले नाही. आतातर त्याने रडणे बंद करून सरळ सरळ 'मरणे' सुरू केले आहे. तरीही आमचे खुळखुळे वाजविणे सुरूच आहे. फरक फक्त एवढाच आहे की यावेळेस हा इस्रायली शेतीचा खुळखुळा काँग्रेसऐवजी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी वाजविला म्हणून त्याची विशेष दखल घेणे भाग पडले. गेल्या महिन्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन गडकरींच्या नेतृत्वात पन्नास जणांचे शिष्टमंडळ इस्रायलला जाऊन आले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपल्याकडे 'मावंद' करण्याची प्रथा आहे. त्यामुळे इस्रायल शेतीची तीर्थयात्रा करून आलेल्या गडकरींनी नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहात गेल्या आठवडय़ात धूमधडाक्यात मावंद केले. भाषणाचे भोजन दिले आणि शेतकर्यांना उपदेशाचा तीर्थप्रसादही दिला. या कार्यक्रमात व्यासपीठावरच पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकरही होते. खरेतर युती सरकारच्या काळात ज्या वेळेस मा. मनोहरराव जोशी मुख्यमंत्री होते. त्यांच्याच मंत्रिमंडळात खुद्द मा. नितीन गडकरी मंत्री होते. त्या वेळेस इस्रायलला जाण्यापेक्षा इस्रायली शेतीची गंगा विदर्भातील अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठात आणण्याचा 'भगीरथ' प्रयत्न झाला होता. याचे कदाचित गडकरींना स्मरण नसावे. ती गंगा येथे अवतरण्यापूर्वीच ती प्रत्यक्ष अवतरल्याच्या बोंबाही ठोकल्या गेल्या होत्या. त्या गंगा दर्शनासाठी महाराष्ट्रातील शेतकरी मोठय़ा संख्येने आणून 'कुंभमेळा'ही कृषी विद्यापीठाच्या 'अंगणी' भरला होता. इस्रायल शेतीची गंगा 'आली रे अंगणी' म्हणता म्हणता ती गंगा कधी व कशी आटली? कोठे लुप्त झाली कळलेच नाही. या विषयावर ना कधी सरकार बोलले ना विद्यापीठ. नापंजाबराव कृषी विद्यापीठाचे आजी, माजी कुलगुरू बोलले. इस्रायल शेतीचा प्रयोग यशस्वी झाला की अयशस्वी, कोणी या विषयावर चकार शब्दाने बोलले नाही. 'मावंदा'च्या कार्यक्रमात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर हे किमान या प्रसंगी 'मौन' सोडतील असे वाटले होते. पण त्यांनीही कृषी विद्यापीठातील इस्रायल शेतीप्रयोग करोडो रुपयांचा चुराडा केल्यानंतरसुद्धा अल्पावधीतच का गुंडाळला यावर तोंड उघडले नाही. आपल्या देशातील शेतकर्यांचे दु:ख समजून घेण्यापेक्षा त्याला दूषणं देण्यात व हिणविण्यातच आपला सगळा पुरुषार्थ खर्ची पडला आहे. तो अडाणीच आहे., आळशी आहे, मूर्ख आहे, त्याला अक्कलच नाही, तो दारूच पितो, मुलामुलींच्या लग्नात खर्चच अधिक करतो, अशी नावे ठेवण्यातच 'विचारवंतांनी' आपली अक्कल पाजळली आहे. त्यामागची मानसिकता खरेतर वेगळी आहे. 1 जुलै 1879 च्या पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकामध्ये ती प्रतिबिंबित होते. ते म्हणतात, 'पुणे येथील सार्वजनिक सभेला शेतकरी-कष्टकरी यांच्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच नव्हे, तर नैसर्गिक आहे असे वाटते!' पुढे जाऊन ते म्हणतात, 'सांस्कृतिकदृष्टय़ा श्रेष्ठ असलेल्या अल्पसंख्याकांचीच सत्ता समाजावर चालत असते, किंबहुना ती चालत राहणे स्वाभाविकच आहे.' शेती न करणारा श्रेष्ठ व शेती करणारा शेतकरी कनिष्ठ हे एक वेळा निश्चित झाल्यावर 'श्रेष्ठांनी' शेतकर्यांना कायम हिणवावे यात नवल नाही. चातुर्वर्णाच्या उतरंडीमध्ये शेतकरी 'क्षुद्र' ठरत असेल तर शेतकर्याने त्याच्या पायरीनेच राहिले पाहिजे. फक्त आता तसे उघडपणे म्हणता येत नाही. इस्रायल शेतीचा गवगवा उगाच होत नाही. उघडपणे जोरात म्हणता येते, 'इस्रायलचा शेतकरी पाहा वाळवंटातसुद्धा नंदनवन फुलवितो. दोन-अडीच इंचसुद्धा येथे पाऊस पडत नाही तरीही विपरीत परिस्थितीत तो हे करतो.' हे म्हणत असताना अप्रत्यक्षपणे येथील शेतकर्यांना हिणविण्यासाठी 'स्वगत' म्हटले जाते. 'पण गध्या तू. सुपीक जमीन आहे, हवामान अनुकूल आहे. पावसाचे पाणीही मुबलक आहे. तरीही तू आपला रडतोच.' हेच 'स्वगत' पुढे निष्कर्षावर येते. 'तूच नालायक, आळशी, अडाणी, व्यसनी, तुझ्यातच दोष. त्याला आम्ही काय करणार?' आज तारीख आठवत नाही; पण चार-पाच वर्षांपूर्वीच्या शेतकर्यांसाठी असलेल्या 'अँग्रोवन' या दैनिकात ठसठसीत मथळाच होता, 'आळशी शेतकरीच आत्महत्या करतात,' असं म्हणायला कोणाला लाज, शरम वाटत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी एक प्रश्न सातत्याने विचारतो आहे. त्याचे उत्तर अजूनपावेतो कोणी देत नाही. आज पुन्हा तोच प्रश्न विचारतो, 'इस्रायलच्या शेतकर्यांना त्यांच्या सरकारकडून कोणती व कशी मदत मिळते? त्यांना मिळणारे उघड अनुदान किती? व छुपी अनुदान कशी, किती व कोणत्या स्वरूपात दिल्या जातात? याचे उत्तर आधी द्या व नंतरच भारतीय शेतकर्यांना नाव ठेवा. परंतु दुर्दैवाने प्रश्नाचे उत्तर कोणी देत नाही. तरीही भारतीय शेतकर्यांच्या नावाने बोटे मोडणे थांबत नाही. पाश्चात्त्य शेतकर्यांचे कोडकौतुक करण्याआधी त्यांना अनुदानाच्या स्वरूपात दिल्या जाणार्या मदतीचे आकडे जरा भारतीय शेतकर्यांसमोर ठेवा. तेही होत नाही. कारण तसे केले तर भारतीय शेतकर्यांना आळशी म्हणणार्यांची पोल खुलते ना. प्रत्येक शेतकर्याला दरवर्षी लाखो रुपये अनुदान देणार्या राष्ट्रांच्या शेतकर्यांची टीचभरही मदत न मिळणार्या भारतीय शेतकर्यांशी तुलना कशी करता? लाज वाटायला पाहिजे, पण ती वाटत नाही. हे पुनश्च इस्रायल शेतीच्या निमित्ताने स्पष्ट झाले. विकसित देशात 2 ते 3 टक्के दराने व चीनमध्ये शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा शेतकर्यांना केला जातो. हे आम्ही सांगणार नाही,पण भारतीय शेतकर्यांना दूषणं मात्र देत राहणार. भारतात एकूण शेती उत्पादनाच्या फक्त .32 टक्के खर्च शेती संशोधनावर सरकार करणार. हाच खर्च विकसनशील देशात आपल्यापेक्षा चार ते पाचपटीने केला जातो. तर विकसित देशात 7 टक्क्यांपर्यंत हा खर्च केला जातो हे कधी सांगणार नाही,बोलणार नाही. सरकारवर ठपका न ठेवता दोषांचं सारं खापर फोडणार शेतकर्यांच्याच डोक्यावर. शेतकरी आज पूर्णत: कोलमडून पडला आहे. त्याला सावरण्याऐवजी त्याच्याच मोडक्या कुपावर लाथ मारणे अजूनही सुरू आहे. पण का? कामाचे तास वाढले, पण पगार कमी झाला असे कधी होत नाही. कारखान्याचे उत्पादन वाढत आहे आणि कारखानदाराचे 'उत्पन्न' कमी होत आहे असेही होत नाही. व्यापार्यांचा व्यापार वाढतो आहे, पण त्याचे उत्पन्न मात्र कमी कमी होत आहे असे कधी होणेच शक्य नाही. पण शेतीमध्ये मात्र एका बाजूला 'उत्पादन' वाढतेच आहे, पण ही उत्पादन वाढ करणार्या उत्पादक शेतकर्यांचे 'उत्पन्न' मात्र कमी कमी होत आहे. हा 'चमत्कार' फक्त शेतकर्यांच्याच बाबतीत कसा काय होत आहे? हेही इस्रायली शेतीचा खुळखुळा वाजविणार्यांनी जरा समजून सांगितले पाहिजे. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे माजी सदस्य डॉ. रमाकांत पितळे यांचे 'रिच अँग्रीकल्चर अँन्ड पुअर फार्म्स' या पुस्तकात दिलेल्या आकडेवारीनुसार 1990-91 मध्ये शेतकर्यांचे दरडोई वार्षिक उत्पन्न 3802 रु. म्हणजेच महिना 318 रुपये होते. तेच उत्पन्न 2002-2003 मध्ये 3732 रुपयांपर्यंत म्हणजेच महिना 311 रु.पर्यंत खाली आला. हरितक्रांतीनंतर काही वर्षे शेतीचे उत्पादन वाढले तसेच शेतकर्यांचे उत्पन्नही वाढले, पण नंतर 'उत्पादन' वाढत गेले पण शेतकर्यांचे 'उत्पन्न' मात्र कमी कमी होत गेले. शेतकर्यांनी उत्पादनवाढ केल्यानंतर त्याला शाब्बासकी किंवा बक्षीस मिळायला हवे होते; परंतु शेतकर्यांना उत्पादन वाढविल्याची 'शिक्षा' मिळाली. त्याचे 'उत्पन्न' कमी झाले. हेच जर कामगारांच्या, कारखानदारांच्या किंवा व्यापार्यांच्या बाबतीत झाले असते तर? व्यापार वाढविल्याने उत्पन्न घटले असते तर व्यापार्याने व्यापारच बंद केला असता. कारखान्याचे उत्पादन वाढविल्यानंतर 'उत्पन्न' कमी झाले असते तर त्याने उत्पादन कमी केले असते किंवा कारखानाच बंद केला असता. परंतु शेतीचे उत्पादन वाढत असतानाही शेतकर्यांचे 'उत्पन्न' का कमी होत आहे? हा चमत्कार का व कसा घडतो आहे याची उकल न करता परत त्याला 'उत्पादन' वाढवायला सांगणे म्हणजे शेतकर्यांनी आपल्याच हाताने आपल्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे नाही का? इस्रायली शेतीचा खुळखुळा शेतकर्यांसमोर वाजवताना मा. नितीन गडकरींचा हेतू प्रामाणिकही असेल, पण परिणाम मात्र काय होणार? आधीच उत्पादनवाढीमुळे संकटात सापडलेला शेतकरी अधिकच कर्जाच्या दलदलीत फसणार व त्यातच मरणार. कुपोषणामुळे एखाद्या स्त्रीचा चेहरा खप्पड झाला आहे, पोट खपाटी गेले आहे, शरीरावरचे मांस झडून शरीर म्हणजे केवळ हाडाचा सापळा बनले आहे. अशा स्त्रीच्या पोषणाची व्यवस्था न करता तिला जर कोणी 'ब्युटी पार्लर'मध्ये जा, असा सल्ला दिला तर कसे वाटेल? गेल्या आठवडय़ात नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात मा. नितीन गडकरींनी जेव्हा इस्रायली शेती शेतकर्यांना सांगितली तेव्हा मला नेमका 'ब्युटी पार्लर'मध्ये जा, असा सल्ला देणारा माणूस आठवला. (लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.) भ्रमणध्वनी - 9822587842 |
Subscribe to:
Posts (Atom)