Monday, 13 August 2012

कल्पना व अंतर्मनाच्या सामर्थ्यावर भाषणशैलीची समृद्धी


कल्पनाचित्र निर्माण करण्याचे, तर्ळीरश्रळीश करण्याचं मनाचं अद्भुत सामर्थ्य आपण गेल्या शनिवारी समजून घेतलं. यात काही लोकांना करश्रश्र्रीलळपरींळेपी होतात. हे कल्पनेतील जिवंत अनुभव असतात. मनाला सत्य अनुभव आणि हे कल्पनेतील अनुभव असा फरक करता येत नाही. यामुळे दीर्घकाळापासून माणूस याला आधिभौतिक, पारलौकिक अनुभव मानत आला आहे. कळत नकळत यामुळं माणसाची फसवणूक झाली आहे.

पण आधुनिक काळात मात्र याच तर्ळीरश्रळीरींळेप सामर्थ्याचा उपयोग अनेक विधायक कामासाठी करण्याचं तंत्र माणसानं विकसित केलं आहे.

माणसाच्या मनाचे, चळपव चे दोन भाग मानले जातात. एक बाह्य मन, उेपीलर्ळेीी चळपव. हे विचार करण्याचं, तर्क, विश्लेषण, भाषा, लेखन, गणित करण्याचं सामर्थ्य असणारं मन. याविषयी आपल्याला पूर्ण जाणीव असते. सार्‍या शरीराचं जाणीवपूर्वक हे नियंत्रण करत असतं. साधारणत: आपल्या एकूण मनाच्या दहापैकी एकपट भाग या मनानं व्यापला असावा असं मानलं जातं.

दुसरं अंतर्मन, र्डीललेपलर्ळेीी चळपव यामध्ये कल्पना करण्याचं तर्ळीरश्रळीश करण्याचं, प्रतिमा पाहण्याचं, ओळखण्याचं सामर्थ्य असतं. एकूण मनाच्या दहापैकी नऊ भाग एवढा मोठा व्याप हा मनाचा आहे असं मानलं जातं. याच मनात लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार, नीतिमूल्य, अनुभूती, विचार करण्याची पद्धती प्रोग्राम झाली असते, रेकॉर्ड झाली असते. हे प्रोग्रामिंग म्हणजेच आपलं व्यक्तिमत्त्व. यातूनच आपला स्वभाव, कृती, भावना, अनुभव घेण्याची प्रक्रिया व विचार करण्याची (सवयीनं) प्रक्रिया निर्माण होत असते.

आता हे मन कुठं असतं? ''हाय मेरा दिल'' असं म्हणताना आपण हृदयावर हात ठेवतो व प्रेम तिथं आहे, 'तुम मेरे दिल मे बसी हो' असं दाखवतो. पण तिथे फक्त रक्ताभिसरण करणारं हृदय असतं. प्रेम वाटणारं, फील करणारं मन हे मेंदूत असतं. खरं म्हणजे माणसानं प्रेम दाखवताना डोक्यावर हात ठेवायला हवा, हृदयावर नव्हे.

मेंदूत चालणारी कार्यप्रणाली म्हणजे मनर्. ीपलींळेपळपस ेष ींहश इीरळप ळी उरश्रश्रशव चळपव ही मनाची वैज्ञानिक व्याख्या आहे. आणि या मनात जे जे रेकॉर्ड झालं आहे, जे जे प्रोग्राम झालं आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व. यातील काही गोष्टी आपल्या नकळत निर्माण होतात. काही गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक निर्माण करतो. एकूण व्यक्तिमत्त्व कसं निर्माण होतं ते आपण पुन्हा कधीतरी पाहू. आता अंतर्मनाच्या र्डीललेपीलर्ळेीी चळपव च्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करू.

आपण एखादी नवी कला, कौशल्य कसं प्राप्त करतो? भाषण कला शिकायची आहे. कसं शिकतो आपण? माझ्या अनुभवापासून सुरुवात करतो. आपल्यापैकी प्रत्येक जण बालवयात बोलणं सहजतेनं शिकतो. आई-वडील, लोकांकडून सहजतेनं वय वाढीसोबतच भाषा-बोलणं आत्मसात करतो. इतरांशी आपण बोलतो, भांडतो, गप्पा मारतो, अनुभव सांगतो. यात काही कठीण वाटत नाही.

पण पन्नास-शंभर लोकांसमोर माईकवर उभं राहून बोलायला सांगितलं तर?

मला वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत असं मोठय़ांपुढे बोलता येत नसे. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देण्याची हिंमत होत नसे. कधी प्रयत्न केला. तेव्हा हातपाय थरथर कापायचे. शब्द सुचायचे नाहीत. तोंडातून धड वाक्यच बाहेर पडायचे नाहीत. बहुतेकांची अशीच अवस्था होते.

वयाच्या 19 व्या वर्षी मी जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांतिसेना नामक, तरुणांच्या संघटनेत अपघातानं सामील झालो. त्यावेळी 'शिक्षणात क्रांती' नामक आमचं आंदोलन सुरू होतं. माझे ज्येष्ठ सहकारी, अशोक बंग, दीपमाला कुबडे वगैरे कॉलेजा कॉलेजात जाऊन भाषणं देत असत. मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत असे. गेली दोन वर्षे आचार्य दादा धर्माधिकारी, प्राचार्य राम शेवाळकर, नारायणभाई देसाई, आचार्य राममूर्ती असल्या दिग्गज माणसांची, वक्त्यांची भाषणं ऐकत होतो. आधीही बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्वती विष्णूजी क्षीरसागर, रामचंद्र घंगारे यांची भाषणं ऐकली होती. बालपणात आचार्य विनोबा भावेंची बरीच भाषणं ऐकली होती. पण मला बोलता येत नाही याची दु:खद जाणीव होती.

वध्र्याच्या सायन्स कॉलेजमध्ये असताना माझा वर्गमित्र शिरीष गोपाळ देशपांडे आणि पेंडसे सरांची मुलगी छान बोलायचे. वादविवाद स्पर्धेत बक्षीस मिळवायचे. मला सारखं वाटायचं यांच्यासारखं मला बोलता आलं पाहिजे.

एक दिवस आम्ही वध्र्याहून आर्वीला बसने जाताना अशोक बंगने आदेश दिला ''श्याम आज तुला प्रस्तावना करायची आहे. 24 मिनिट तरी बोलायचं आहे.''

माझा सारा प्रवास अतिशय टेन्शनमध्ये गेला. 'काय बोलायचं' याचीच तयारी प्रवासात मी करत होतो. आर्वीच्या आर्ट्स-कॉमर्स कॉलेजच्या दीडशे-दोनशे मुलांपुढे माझं पहिलं 5 मिनिटांचं भाषण झालं. छाती धडधडत होती, हातपाय थरथर कापत होते. पण काही तरी बोललो. ''छान! छान बोललास! पुढच्या वेळेस अधिक चांगली तयारी करून बोल.'' अशी शाबासकीची थाप अशोक बंगने दिली आणि मला बळ मिळालं. वक्तृत्व कसं शिकायचं? चांगली तयारी कशी करायची? माहीत नव्हतं. कुणी सांगितलं नव्हतं. कुणाला विचारण्याची हिंमतही झाली नाही. पण आमचे प्रशिक्षक आचार्य दादा धर्माधिकारी अतिशय उत्तम, अप्रतिम वक्ते होते. त्यांची अनेक भाषणं ऐकली. ते नेहमी बोलताना समोर चिटोरा ठेवत असत. मी त्यांना खूप प्रश्न विचारायचो. एवढे विद्वान गृहस्थ. पण कधीही माझा उत्साह त्यांनी भंग केला नाही. माझ्या बर्‍यावाईट प्रश्नांनाही ते मनापासून उत्तरं देत असत. ''तुम्हे एवढे मोठे वक्ते आहात तरी समोर चिठ्ठी कां ठेवता?'' माझा प्रश्न.

''दर भाषणाच्या आधी मी ठरवतो. काय बोलायचं, किती वेळ बोलायचं. कोणत्या मुद्यांना अधिक प्राधान्य द्यायचं. भाषणाला नीट शिस्त यावी याकरिता चिठ्ठी उपयोगी पडते,'' दादांचं उत्तर.

खरं म्हणजे तेव्हा जर मी हिंमत करून विचारलं असतं की भाषणाची तयारी कशी करावी? उत्तम वक्ता असं बनावं? तर.. दादांनी नीट मार्गदर्शन केलं असतं. कदाचित पुढे माझे प्रचंड परिश्रम वाचले असते.

मग माझी तयारी सुरू झाली. एखाद्या विषयावरचं भाषण तयार करताना भरपूर वाचायचं. त्याचे मुद्दे निवडायचे. जेवढा वेळ भाषण द्यायचं तेवढय़ा वेळेचं अख्खं भाषण लिहून काढायचं. ते बोलण्याच्या भाषेत लिहायचं. मोठमोठय़ानं वाचायचं. पुन्हा पुन्हा लिहिलेलं भाषण दुरुस्त करायचं. लिहिलेलं भाषण जमलं असं समाधान झालं की ते भाषण एका बंद खोलीत मोठमोठय़ानं म्हणायचं. जाहीर सभेत भाषण देतो आहे या आविर्भावानं खुल्या आवाजात भाषण द्यायचं. खुपदा सराव झाला की मग त्या भाषणाचे शॉर्ट पॉईन्ट्स काढायचे. ते समोर ठेवून असंच बंद खोलीत भाषण गायचं. मग पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे भाषण द्यायचं.

पुढचं काम माझ्यासाठी सोप होतं. तरुण शांतिसेनेची चळवळ सुरू होती. शिबिरांमध्ये, कॉलेजमध्ये भरपूर बोलण्याची संधी मिळत असे. पुढे मी वध्र्याच्या यशवंत महाविद्यालयात आर्ट्स विषयात दाखल झालो. डिबेटिंग सोसायटीचा अध्यक्ष या नात्यानं भरपूर कार्यक्रम आयोजिण्याची संधी मिळाली. स्वत:ही कष्टसाध्य पद्धतीनं वक्ता बनलो आणि इतर अनेक सहकार्‍यांमधून वक्ते घडवले. जोपर्यंत आपण 25-50 मोठय़ा सभांमधून यशस्वीपणे बोलत नाही तोपर्यंत आपण आत्मविश्वासानं छान बोलू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होत नाही. याला 'सभाधैर्य' प्राप्त करणं म्हणू या.

जेव्हा आपण प्रत्यक्ष 100-200 माणसांपुढे यशस्वीपणे, आत्मविश्वासानं बोलतो तेव्हा तो अनुभव आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होतो. या पद्धतीचे 25-50 वेळा भाषण देण्याचे अनुभव आपल्या अंतर्मनात प्रोग्राम झाले की ती आपली 'सवय' बनते. ''आपल्या अंतर्मनात एखादी गोष्ट वारंवार, वारंवार प्रोग्राम झाली की तिचं रूपांतर सवयीत होतं,'' हा एक आपल्या अंतर्मनाचा महत्त्वाचा नियम आहे. अशा आपल्या सवयी निर्माण होतात. कोणतंही कौशल्य आत्मसात करणं म्हणजे त्या कौशल्याची सवय अंतर्मनात निर्माण होईल एवढा वेळ त्या गोष्टीचा अचूक सराव करणं.

सराव अचूक असायला हवा. चुकीचा सराव प्रोग्राम झाला तर सवयही

डिफेक्टिव्ह निर्माण होईल.

मी आधी डिबेटर म्हणून कॉलेजमध्ये व्याख्यानाला जायचो. नंतर वक्ता म्हणून जायचो. त्या काळी 1974 ते 1990 या काळात कॉलेज विद्यार्थी कधीही भाषणं शांतपणे ऐकायचे नाहीत. येनकेनप्रकारे वक्त्यांना पळवून लावण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पण माझ्या आयुष्यात कधीही कुणाला माझं भाषण उधळता आलं नाही. उलट भाषण उधळण्यासाठी आलेल्यांनाच मी भाषणात गुंगवून टाकायचो. त्यातूनच अनेक कार्यकर्ते सापडले आहेत.

पण समजा अशा अशांत वातावरणात दोन-चार सभा जरी विद्यार्थ्यांना उधळता आल्या असत्या तर मनात भीती निर्माण झाली असती. या भयप्रद अनुभवाचा परिणाम असा झाला असता की वक्ता म्हणून पुन्हा उभं राहिलो नसतो वा चुकीचं प्रोग्रामिंग झाल्यामुळं वाईट, अर्धवट, घाबरट बनलो असतो.

आता मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं मला बोलण्याची सहज संधी मिळायची.

पण सामान्य माणसाला 25-50 भाषणं देण्याची संधी कधी मिळणार? किती वर्ष लागणार?

आज 200 माणसांसाठी भाषण आयोजित करायचं म्हटलं तरी हॉलभाडे, जाहिरात, इतर व्यवस्था खर्च असा मिळून किमान 15 ते 35 हजार रुपये खर्च येतो. पन्नास सभांसाठी 8-12 लाख रुपये खर्च शिवाय एवढा खर्च करून लोक भाषण ऐकायला येतीलच याची खात्री नाही. मग..

वक्ता कसं बनायचं?

मी सांगितलं त्याप्रमाणं सुरुवातीला भाषणाची तयारी करायची. एकदा भाषणाची पूर्वतयारी झाली, भाषण तयार झालं की सभाधैर्यासाठी नव्या तंत्राचा वापर करायचा.

संमोहनाचा वा मेडिटेशनचा वापर करून अल्फा रिदमच्या अवस्थेत जायचं. घरी बेडवर पडल्या, पडल्या कल्पना (तर्ळीरश्रळीश) करायची, ''आपण एका मोठय़ा नाटय़गृहात भाषण देतो आहोत. नाटय़गृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं आहे. आपण उत्तम बोलतो आहोत. प्रेक्षक तन्मयतेनं ऐकताहेत.. टाळ्या वाजवताहेत.. यशस्वीपणे, अचूकपणे भाषण देतो आहे.. असं नीट व्हिल्युअलाईज करायचं.''

या पद्धतीनं 5-10 भाषणं वेगवेगळ्या नाटय़गृहात. काही मोठय़ा मैदानात.. पन्नासावं भाषण मुंबईच्या शिवाजी पार्कात.. लाखभर लोकांसमोर.

हा पन्नास वेळा अंतर्मनाला झालेला काल्पनिक अनुभवसुद्धा अंतर्मनात प्रोग्राम होतो. त्याची सवय निर्माण होते. पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे बोलताना सहज जमतं. आत्मविश्वास वाढतो आणि कमी खर्चात, पण मनाचा सराव उत्तम करून चांगलं 'सभाधैर्य' निर्माण करता येतं. नवी सवय निर्माण होते. आत्मविश्वासानं बोलण्याची.

याप्रमाणं तर्ळीरश्रळीरींळेप तंत्राचा वापर करून काय काय करता येईल?

(लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

दुष्काळाशी दोन हात

  A A << Back to Headlines     
दुष्काळाची चर्चा सुरू झाली, की विरोधी पक्षांचे नेते म्हणतात, सरकारने रोजगार हमीची कामे काढावीत, गुरांच्या छावण्या उघडाव्यात, पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. फार फार तर कर्जाची वसुली थांबवावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावेत. सरकार म्हणते, दुष्काळ निवरणासाठी आम्ही इतकी रक्कम मंजूर केली, अमुक इतकी कामे सुरू केली, एवढय़ा छावण्यांना एवढी मदत केली, इतके टँकर सुरू केले, फीमाफ, कर्जवसुली स्थगित.. झाले. बघता बघता दिवस निघून जातात. पुन्हा दुष्काळाची परिस्थिती येते. विरोधी पक्षवाले पुन्हा मोर्चे काढतात. सत्ताधारी बैठका घेतात. पुन्हा त्याच मागण्या, पुन्हा त्याच उपाययोजना.. मला कळते तसे 1972 पासून पाहतोय. हाच रिवाज ठरलेला. त्यात तसूभरही फरक पडला नाही. मान्सून कोणत्या काळी नियमित येत होता कोणास ठाऊक? आम्ही पाहतोय तसा तो अनियमितच आहे. कधी धो धो बरसतो तर कधी तोंड दाखवीत नाही. कोणत्या वर्षी काय होईल सांगता येत नाही. दरवर्षी एका विलक्षण अनिश्चिततेच्या मानसिकतेत शेतकर्‍याला पेरणी करावी लागते. याला जुगारही म्हणता येत नाही. कारण जुगारात तुम्ही जिंकलात, तर मालामाल होता. येथे पाऊसमान चांगले झाले, पीक चांगले आले तरी मालामाल होण्याची शक्यता नाहीच. भारताचा शेतकरी दरवर्षी नव्याने हरणारी अडथळ्यांची शर्यत खेळत राहतो. सरकार दुष्काळावरच्या उपाययोजना करते ते केवळ तो या खेळात राहावा यासाठी. तो या चक्रव्यूहातून बाहेर पडावा यासाठी नव्हे.

माणसाने नैसर्गिक आपत्तींवर मात केली तेव्हा प्रगतीचे पहिले पाऊल पडले असे मानले जाते. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. ती कोसळली, की शेतकरी आजही देशोधळीला लागतो. म्हणजे प्रगतीची पहिली पायरी चढायची क्षमतादेखील शिल्लक राहिलेली नाही. भूकंप किंवा महापूरदेखील नैसर्गिक आपत्ती आहे. ती आपत्ती कोसळली तर सरसकट सर्वाच्या जीवनावर कमीजास्त प्रमाणात त्याचा परिणाम होतो. भारतात दुष्काळ ही अशी नैसर्गिक आपत्ती आहे, की त्याचा परिणाम फक्त शेतकर्‍यांना भोगावा लागतो. दुष्काळाचा चटका ना कोण्या कलेक्टरला बसतो ना चपराश्याला. ना मंर्त्याला ना सोसायटीच्या चेअरमनला. ना व्यापार्‍याला ना व्यावसायिकाला. दुष्काळ पडला आणि व्यापारी देशोधळीला लागले असे कधी आपण ऐकले नाही. दुष्काळ पडला आणि सरकारी नोकर खडी फोडायला गेले असे चित्रही आपण पाहिलेले नाही. या नैसर्गिक आपत्तीत सगळे सुरक्षित राहतात आणि फक्त भरडला जातो तो एकटा शेतकरी समाज. दुष्काळाची आपत्ती कोसळली. तुम्ही शेतकरी आहात. तुम्हांला भरडले जाणे भाग आहे. मराठा आहात म्हणून कोणी राज्यकर्ते तुम्हांला वाचवू शकत नाहीत. दलित आहात म्हणून कोणतेही घटनात्मक संरक्षण तुम्हांला वाचवू शकत नाही. शेतीवर ज्यांचे पोट आहे, शेतीचा उत्कर्ष आणि र्‍हासावर ज्यांचे जीवन डोलते ते सर्व शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यात हमखास सापडतात.

दुष्काळाचा पहिला फटका मुक्या जनावरांना बसतो. चारा महागतो. पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले तर जनावरे सांभाळणे कठीण बनते. जनावरे विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत खाटकांचे फावते. दुष्काळ ही जनावरांसाठी जीवघेणी आपत्ती ठरते. दुसरा फटका बसतो शेतकरी महिलांना. घर आणि शिवाराचे काम तर त्यांच्या पाचवीला पुजलेले. आता घर, शिवाराबरोबर रोजगाराची कामेही करावी लागतात. दुष्काळाच्या काळात स्थलांतर करावे लागले तर स्त्रियांच्या समस्यांना अंत राहत नाही. तिसरा फटका वृद्धांना बसतो. शेतकरी कुटुंबातील जख्ख म्हातार्‍या माणसांनाही ऐरवीसुद्धा कामे करावी लागतात. परंतु दुष्काळाला म्हातारपणाची दया नसते. एका दुष्काळी कामावर सत्तरी ओलांडलेली बाई काम करताना मी पाहिली. तिला विचारले तर म्हणाली, ''घरातली सगळी माणसं कामाला जातात. लहानगी नातही कामाला जाते. मी एकटीने आयते बसून खाणे बरे दिसत नाही.'' एक काडी तुटली तरी खोपा कोसळेल अशी ज्या संसाराची अवस्था असते तेथे म्हातार्‍यांनाही ही काळजी घ्यावी लागते. शरीराचे भान विसरून घाम गाळावा लागतो.

शेतीक्षेत्राबाहेर असणार्‍या जवळपास सर्वाना येनकेन प्रकारे दुष्काळाचा फायदा होतो. त्यातही सर्वांत जास्त फायदा उपटते सरकारी यंत्रणा. 'युद्धपातळी'वर मुकाबला करावा असे वरून आदेश सुटायचा अवकाश. बजेट आले व कामे सुरू झाली, की वाहत्या गंगेत सरकारी अधिकारी आपापले घोडे न्हाऊन घेतात. आपली सरकारी यंत्रणा कशी आहे हे सांगायची गरज नाही. जागतिक पातळीवर सर्वांत भ्रष्ट प्रशासनाच्या यादीत पहिल्या दहात आपली नोकरशाही आहे. दुष्काळ निवारणाची जबाबदारी या नोकरशाहीवर सोपविली जाते. अनेक अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात कामे निघावी म्हणून धडपडतात. कामासाठी नव्हे, तर त्यातून मिळणार्‍या मलिद्यासाठी. योजनांची अंमलबजावणी असो की अनुदानाचे वाटप, गरजवंतांच्या हातात कमी पडते. मध्यस्थांचे खिसे मात्र तुडुंब भरतात. अनेक सरकारी अधिकार्‍यांच्या बंगल्यांना 'दुष्काळ कृपा' असे नाव दिले तर ते समर्पक ठरेल. पुढार्‍यांसाठीदेखील हा सुवर्णकाळ असतो हे सर्वाना माहीत आहेच.

मुद्दा असा की, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची शक्ती शेतकर्‍यांमध्ये का राहिली नाही? शेती धंदा सतत तोटय़ात ठेवण्यात आल्यामुळे तो आपत्तीसमोर कोसळतो. यावर पहिला उपाय हाच आहे की, हा धंदा तोटय़ात ठेवू नका. दरवर्षी चार पैसे मागे पडतील एवढे उत्पन्न मिळाले पाहिजे अशी तजवीज करता येत नाही का? करता येते. पण करायची नियत नाही. कारण शेतकर्‍यांकडे चार पैसे खेळू लागले तर ते आपल्याला जुमानणार नाहीत अशी पुढार्‍यांना भीती वाटते. शेतकरी गरजवंत राहिला तरच तो आपली किंमत करतो म्हणून त्याला कायम गरजवंत ठेवले जाते. जोपर्यंत शेतीधंदा तोटय़ात राहील तोपर्यंत सरकारी मदतीची गरज राहणार आहे आणि जोपर्यंत ही गरज राहील तोपर्यंत पुढारी आणि अधिकार्‍यांचे प्रत्येक दुष्काळात उखळ पांढरे होत राहणार आहे.

1986च्या दुष्काळात फिरत असताना एका गावी पाहिले की, तेथील शेतकरी विहिरी खांदत होते. त्या कामावर बरेच मजूर काम करीत होते. मी एकाला विचारले, ''कोणत्या योजनेत ही विहीर घेतली?'' तर ते म्हणाले, ''ह्या विहिरी आम्ही आमच्या पैशाने पाडतोय.'' मला आश्चर्य वाटले. ते शेतकरी म्हणाले, ''गेल्यावर्षी आम्ही मिरचीचे पीक घेतले होते. त्यातून बरा पैसा मिळाला. यंदा दुष्काळ आहे. मजुरांना काही काम दिले नाहीतर ते निघून जातील. पुन्हा मिळणार नाहीत. आम्हांला विहिरीची गरज होती. मजुरांना कामाची गरज होती म्हणून आम्ही हे काम काढले. विहिरीही होतील आणि मजूरही टिकून राहतील.'' या अनुभवातून असे लक्षात आले, की शेतकरी स्वत: दुष्काळाचा मुकाबला करू शकतात. शेतकरी दुष्काळाशी दोन हात करू शकतो. त्या दोन हातात पैसे असतील तर.. सरकारने भाव पाडून त्यांचे दोन्ही हात कापून टाकले तर, तो कसा मुकाबला करेल?

(लेखक   अमर हबीब   हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9422931986

Wednesday, 8 August 2012

सण आनंदाचा की मरणाचा?


रक्षाबंधन होऊन गेले. पुढच्या आठवडय़ात पोळा. खरंतर सण म्हणजे आनंदाचा क्षण. पण आता शेतकर्‍यांची आर्थिक दुरवस्था इतकी विकोपाला गेली आहे की हे सणच त्याला संकटं वाटतात. हेच सण त्याच्या दु:खाचे व दहशतीचे कारण ठरतात. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहिली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. ती म्हणजे रक्षाबंधन व पोळा हा सण येण्यापूर्वी शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ होते. 2009 मध्ये तर पोळ्य़ाच्या दिवशीच विदर्भात 14 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तशी शेतकर्‍यांची आत्महत्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या विषयावर 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी कोडगी व निर्लज्ज अवस्थाही समाजाने धारण केली आहे. तरीदेखील पोळ्य़ाच्या आधी आत्महत्येची संख्या का वाढते? हे समजून घेतले तर कदाचित शेतकर्‍यांच्या आजच्या भयावह विदारक आर्थिक दुरवस्थेची कल्पना येऊ शकेल.

कोणताही सण साजरा करायचा म्हटला की, त्याच्या काही अतिरिक्त मागण्या असतात. सामाजिक दबाव असतो. सण साजराच केला नाही तर समाज काय म्हणेल? याचेही दडपण असते. काही कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदार्‍या असतात. घरी काही असो नसो. घरी गोडधोड करणे, सणानिमित्त काही कापडचोपड आणणे. रक्षाबंधनासाठी बहीण येणार असेल तर तिला ओवाळणीत काय टाकावे? पाहुणचारात काय करावे? असे प्रश्न आर्थिक दुरवस्थेमुळे शेतकर्‍यांना भेडसावणे सुरू होतात. पोळ्य़ाचा सण हा विशेषत: बैलांचा सण. आपण 21 व्या शतकात पदार्पण केले आहे अशी कितीही शेखी मिरविली, तंत्रज्ञानाने अवकाशात झेप घेतली याची वाखाणणी केली तरीही भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावर, मानवीय श्रमावर आणि बैलांच्या कष्टावर अवलंबून आहे. अजूनही ट्रॅक्टरसारखे यंत्र बैलाचा पर्याय बनू शकलेला नाही. शेतीमध्ये आजही बैलाला पर्याय नाही. त्यामुळे जो बैल शेतकरी, शेतमजुरांसोबतच शेतीमध्ये राबराब राबतो त्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचा सण म्हणजे पोळा. बैल हा शेतकर्‍याच्या जीवनातील अविभाज्य घटक.

या दिवशी बैलाला कष्टापासून मुक्ती व विश्रंती असते. त्याची नदीवर आंघोळ घातली जाते. पोळ्य़ाच्या आदल्या दिवशी त्याचे जू ठेवून ठेवून थकलेले, दुखलेले, सुजलेले खांदे तुपाने चोळून शेकले जातात. त्यालाच ग्रामीण भाषेत 'खांद शेकणी' म्हणतात. या 'खांद शेकणी'सोबतच गडी माणसांना पोळ्य़ाच्या दिवशी जेवणाचे 'आवतन' दिले जाते. बैल जसा शेतीचा अविभाज्य घटक तसाच शेतमजूरही. पोळ्य़ाच्या दिवशी मालकाने आपल्या बैलाला व गडी माणसांना पुरणपोळीचे जेवण द्यावे हे अभिप्रेत असते. बैलाची थोडी 'हौस-मौज' करावी. त्याचे शेतीत राबराब राबून दुखलेले खांदे तुपाने चोळावे. ते थोडे शेकावे. त्याला न्हाऊ-धुऊ घालावे. त्याच्या शिंगांना रंग द्यावा. बैलांच्या अंगावर झूल चढवावी. त्यांच्या शिंगांना बाशिंग बांधावे. त्याला हौसेने सजवावे. त्याला त्या दिवशी गोडधोड खाऊ घालावे. वाजतगाजत मिरवत बैलांना पोळ्य़ात न्यावे. तसेच शेतकर्‍यांसोबत राबणार्‍या गडी माणसांनाही त्या दिवशी पुरणपोळीचे जेवण द्यावे व त्यांच्या ऋणातून थोडेबहूत का होईना उतराई व्हावे असा हा सण.

शेतकर्‍यांसाठी भावोत्कट प्रसंग. पण जेव्हा आपण या साध्यासाध्या गोष्टीही करू शकत नाही याची दु:खद जाणीव शेतकर्‍याला होते. त्याची अगतिकता, असाहाय्यता त्याला तीव्रपणे टोचते, बोचते तेव्हा त्याची निराशा टोकाला जाऊन पोहोचते. जगाला पोसणारा शेतकरी, स्वत: अन्न उत्पादक असलेला अन्नदाता शेतकरी. त्याचीच अवस्था अन्नाला मौताद अशी या व्यवस्थेने केली आहे. अशा अवस्थेत त्याला पोळ्य़ासारखा सण संकट वाटत असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अन्नदात्याची ही अवस्था पोळ्य़ासारखा सण नसेल तर किमान झाकली तरी जाते. पण जेव्हा पोळ्य़ासारखा सण येतो तेव्हा त्याची अब्रू चव्हाटय़ावर पडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍यांच्या आत्महत्येची बातमी मोठय़ा प्रमाणात येते आणि जसजसा पोळा जवळ येतो तसतशी शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ होताना दिसते.

बैलांची साधी 'हौस-मौज' आपण करू शकत नाही. गडी माणसांना सणाच्या दिवशी साधे गोडधोडही खाऊ घालू शकत नाही ही कल्पनाच जमीन मालकाला असह्य होते. आपण एवढी शेती करतो. रात्रंदिवस राबराब राबतो. अन्नधान्याचे उत्पादन करतो. सार्‍या जगाला पोसतो. पण आपल्या शेतीवर राबणार्‍या आपल्या बैलांसाठी, रक्षाबंधनासाठी येणार्‍या बहिणीसाठी, आपल्या शेतात राबणार्‍या गडी माणसांसाठी, आपल्या शेतमजुरांसाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी आपण काहीही करू शकत नाही ही भावनाच त्याला जगण्यातील निर्थकता तीव्रपणे जाणवून देते. एवढे निर्थक आयुष्य असेल तर जगण्यात अर्थच काय? हा प्रश्न त्याला निराशेच्या टोकाला नेतो व त्यातूनच तो आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो. तो आत्महत्या करतो. तो मरण पत्करतो. तो मरतो. त्याचे मरण झालेच तर दोन ओळीच्या बातमीचा विषय बनतो आणि नंतर सारे शांत होते. संपून जाते. खरोखरच हा विषय इतका सहज घेण्यासारखा आहे? एकूणच शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा गंभीर चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. पण तो तसा होत नाही. शेती, शेतकर्‍यांची दुरवस्था, त्यातून होत असलेल्या आत्महत्या, सणासारखा आनंदाचा क्षणही त्याला संकटासारखा वाटणे हे सर्वच विषय गंभीर आहेत. कृषिप्रधान म्हणविल्या जाणार्‍या देशात तरी ते गंभीर मानले जायला हवे होते. पण तसे अजिबात होताना दिसत नाही.

सध्या सर्व वृत्तपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये चर्चा आहे ती कोण्यातरी हवाईसुंदरीच्या आत्महत्येची. चर्चा आहे ती कोण्यातरी अनुराधा बाली ऊर्फ फिजा हिच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची. हत्या की आत्महत्या या चर्चेची गुर्‍हाळं माध्यमांमध्ये 24 तास आहेत. पण शेतकर्‍यांच्या आत्महत्येला मात्र ना प्रिंट मीडियामध्ये कव्हरेज ना इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जागा.विकासासोबतच वाढती विषमता हा खरा चिंतेचा विषय आहे. एका बाजूला वाढती श्रीमंती तर दुसर्‍या बाजूला वाढती गरिबी. शहरी भागाचे दरडोई वाढणारे उत्पन्न तर ग्रामीण भागातील कमीकमी होत असलेले दरडोई उत्पन्न. त्यामुळेच शहरी भागांमध्ये आज नवनवीन सण उदयास येताना दिसताहेत. आहे ते सण त्यांच्या श्रीमंतीला कमी पडताहेत म्हणून ते 'व्हॅलेंटाईन डे', 'इयर एण्ड', 'मदर्स डे', 'फादर्स डे', फ्रेंडशिप डे', 'बर्थ डे' असे नवनवीन उत्सवांचे फंडे शोधताहेत. तर दुसर्‍या बाजूला ग्रामीण भागामध्ये आहे तेच सण आता जड जात आहेत आणि या सणांपासून तोंड लपविण्यासाठी शेतकरी आत्महत्या करीत आहे. ही विदारक अवस्था निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल. विकासाचा बडेजाव मिरवताना, महासत्तेचे ढोल वाजत असताना या विषमतेकडे लक्ष जात नाही हे खरे असले तरीही या वाढत्या विषमतेकडे दुर्लक्ष करणे परवडणारे निश्चितच नाही.

सुजेसारखी वाढणारी महानगरे एका बाजूला तर सुकत चाललेला ग्रामीण भाग दुसर्‍या बाजूला. ग्रामीण भागात आहे तेच सण संकटासारखे वाटावे तर शहरात हौस-मौज करायला आहे ते सण कमी पडावे. त्यासाठी नवनवीन सणांची त्यात भर पडावी हे चित्र भयावह आहे. एका बाजूला रोजचीच दिवाळी तर दुसर्‍या बाजूला कायमचाच गरिबी व उपासमारीचा शिमगा. हे असंच किती दिवस चालणार? पोळ्य़ाचा सण आनंदाचा की मरणाचा इतपत प्रश्न पडावा अशी सध्याची अवस्था आहे.

(लेखक
चंद्रकांत वानखडे शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

संवाद : एक साधणे



'याप्रसंगी उभयदेशांनी अंतर्गत संवाद वाढविण्यावर भर दिला पाहिजे असे संयुक्त निवेदनात म्हटले.' असं आपण अनेकदा वृत्तपत्रातून वाचतो किंवा रेडिओच्या बातम्यांमध्ये ऐकतो. (टीव्हीवर हल्ली साध्या बातम्यांऐवजी बातम्यांचे एपिसोड्स दाखवीत असल्यामुळे त्याचा उल्लेख टाळला आहे.) वरील वक्तव्य 'भारत-पाक'संदर्भात असलं की, एक मुजोरी करणारा अन् दुसरा कायम समजूतदारीने बोलणारा यांच्यातल्या कुरघोडीला संवाद म्हणतात का, असं आपल्या मनात येतं. हेच वाक्य अमेरिकेसंदर्भात असलं की, एक दादागिरी करणारा अन् दुसरा शेपूट घालणारा यांच्यातल्या शिवाशिवीला (वर्‍हाडीत शितनापानी) संवाद म्हणतात का, हा प्रश्न उपस्थित होईल. हाच संवाद- संवाद म्हणतात तो इजराएल अन् पॅलेस्टाइन यांच्यादरम्यान होतो तेव्हा एकमेकांच्या जीवावर उठलेल्यांनी थोडासा दम घेण्यासाठी केलेल्या 'टाईम प्लिज'ला संवाद म्हणता येईल का अशी शंका मनाला वाटून जाते. मध्यंतरी श्रीलंका सरकार अन् लिट्टे यांच्यामध्ये नार्वे सरकारच्या मध्यस्थीने संवाद सुरू होता. कालांतराने लिट्टेचा खात्मा झाला अन् संवाद (?) संपला.

तसं परंपरेनुसार नवरा-बायकोमधल्या लाथाळ्य़ांनाही संवाद म्हणायची पद्धत आहे व हा संवाद (?) साधारणत: पुढीलप्रमाणे होतो..

''अहो, तुमच्यासाठी आज भरीतच करू नं? आवडतं ना तुम्हाला?''

''मी काय म्हणते लग्नात तुम्ही हा गुलाबी शर्टच घालून जाल नं?''

''या उन्हाळ्य़ाच्या सुट्टीत मी पोरांच्या परीक्षा झाल्या की जाते अन् लगेच मेच्या शेवटीशेवटी परत येते, हो नं?''

''तुम्ही आज पाणी भरताय नं? की मी भरून ठेवू? मग म्हणाल कशाला भरलं?''

अधूनमधून जनतेचे सेवक (?) म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकप्रतिनिधींनाही जनतेशी संवाद साधण्याचा झटका येतो. ''त्यांनी जनतेत शिरून जनतेशी संवाद साधला.'' अशा बातम्याही येतात. 'संवाद' साधला म्हणजे नेमकं काय केलं याचं उत्तर ना करणार्‍याला देता ये, ना ज्यांच्याशी संवाद साधला त्यांना देता ये. पण 'संवाद' या शब्दाने धारण केली आहेत. आज हा संवाद आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे मला आठवलेला 'माझी मराठी आजी अन् एका मुसलमान आजीत होणारा संवाद.' माझी आजी, (आम्ही तिला 'माय' म्हणायचो) मधूनमधून आमच्याकडे यायची तेव्हा वडील गांधीग्रामला डॉक्टर होते. विरंगुळा म्हणून माय दुपारी मोठेकाळी जायची. तिथे तिची ती मुसलमान मैत्रीण भेटायची अन् त्यांच्यात संवाद होई..

हो या बाई खाना?

हो नावं बाई लावला एकदाचा पायना. आमच्या डाक्टरले भल्ला षौक आहे पायन्याचा. जिथं बदली होते तिथं काटरसमोर ठुन्या गाडून मायना बांधते. येल लावून त्याच्यावर येलाचा मंडप करते. लय वठ्ठम आहे त्याले. तुले काहून इतका उशीर झाला? शीर खुरमा? अब्बी थोडी रह्यता वं, वो तो रमजान मह्यने में रह्यता, अबी ईद कू टाईम हयना!

काय पायना-पायना घिवून बसली वं, लयच तुयं मन अशीन तं ये एखांद्या रोजी बसाले..

नई वं बई मय नही पिसती मसाले! अब उमर हो गई ना, मेरी बहूच करती सब, अब मेरे कहाँ हाथपैर चलते? खेलते? उधम करतेत उधम! डाक्टरचे लेकरं, त्याईचे दोस्त, कम्पाऊंडरचे लेकर ईभ्भर उधम करतेत पायन्यावर! अशा प्रकारे वाक्याचं शेंडा-बुडूख धरून त्याचा संवाद चाले. हे ऐकल्यानंतर मला जाणवलं की, माणसाला संवादासाठी ना भाषेची गरज लागते, ना विषयांची ना शब्दांची; गरज असते ती संवाद साधण्याच्या असोशीची, एकमेकांचे सुखदु:ख जाणून घेण्याच्या कळकळीची अन् मग कठीण प्रसंगी मित्राने पाठीवर ठेवलेला हात काही न बोलता खूपकाही बोलून जातो तर कधी एक नजर तुमच्या प्रियतमेला काही न सांगता खूपकाही सांगून जाते आणि या सगळ्य़ांसाठी ना संयुक्त निवेदनाची गरज भासते ना तिसर्‍या पक्षाची!

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत.

'गंमत जंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650
     

     << Back to Headlines          Next >>

Tuesday, 7 August 2012

मीच माहा गुरू झालो


मी आर्केस्टात असतानी आमच्या असं ध्यानात आलं का आपल्या ग्रुपमंदी मिमिक्रीवाला नसल्याच्यानं सिनिमाच्या गान्याच्या मंधामंधात लोकायले चेंज म्हणून काईतरी देल्लं पायजे. मंग मले आठोलं का कालेजमंदी नाईतं 'एनसीसी'च्या कॅम्पमंदी मी उमरावतीचे संगीतकार मा. मनोहर कवीश्वर आन् वध्रेचे प्रा. देवीदासजी सोटे यायच्या कविता म्हनो आन् पोरायले ते आवडे तं इथ त्याचा प्रयोग कराले काय हरकते हाय. आमच्या भाग्योदय कला मंडयाच्या मीटिंगमंदी मी हा इसय मंडला आन् सगयाले तो पटला. मंग दुसर्‍या साली गनपतीच्या कार्यकरमात त्यायची 'जव्वाईबुवा' हे कविता म्हनली. लोकायले आवडली. मंग सोटे सराच्या खूप कविता होत्या, पन त्यातली मले आवडनारी 'ए भाऊ सायेब जरा वाले व्हाना । कापसाचा गाडा माहा जाऊ दयाना' ही कवितातं लोकायनं डोस्क्यावर घेतली. तिची फरमाईस याले लागली. मी कालेजात सायकलनं जातानी 'ओड कापसाचा गाडा' असा आवाज द्याले लागले. टवायी म्हून नाई आपुलकीनं. हे दोनतीन साल पुरलं. मंग सुधाकर कदम, दीपक देशपांडे हे मंडय़ातले दोस्त माह्या मांग लागले का हे उसनवारी कुठ पावतर? आत तू कविता लिह. म्या म्हनलं राजा असी स्टेजवरून टाया घेनारी कविता लेयनं सोप काम हाय का? माह्यात तो गुन होताच, पन असी आग्रवाची कुदय त्या झर्‍याच्या जागी कानी मारली नोती. मंग झरा वाहनं कसा?

माह्या मनात ते बी पडलं ते कवा ना कवा उगवनारतं होतचं ना! तवा पावसायात बंम पाऊस राहे. पाच-पाच, सात-सात दिसाची झड. मंग अखीन बंबाट, धुवाधार पाऊस त्याच्याच्यान आमच्या गावापासी असलेल्या अडान नदीले वरच्यावर पूर ये. इकडच्या एसटय़ा इकडं आन् तिकडच्या तिकडं. हटेलवाल्यायची चांदी आन् पह्यल्या पुरात वाहून जानारे खोडं, एखांदा कडब्याचा गुड, कोनाच्या थडीकाठच्या वावरातलं इरलं नाईतं लहानसी झोपडी, कवा कवा एखांदा मुडदायी. हे पाहासाठी आमी थडीशेजी पाहले गर्दी करो. झडीच्या नं घरात बसू बसू लोक आंबून जायेत आन् बोलता बोलता बुढा-बुढी भांडनावर येत. हे सारं मनात झिरपता, झिरपता कागदावर्त कविता झिरपली.

पावसानं इचिन कहरचं केला

नागो बुढा काल वाहूनचं गेला

बुढीसंग त्याचं भांडन झालं जमून

सकायीचं रागानं वावरत गेला निंघून

झाकं पली तरी घरी नाई आला.

लोक म्हने बुढा वाहूनचं गेला

गनपतीच्या पह्यल्या कार्यकरमात हे कविता म्हनतानी माह्यावर लय टेंशन. काऊन का सामोर नजरीच्या पलीकडं पावतर आयकाले आलेले लोकं त्यायच्या सामोर आता पावतर दुसर्‍यायच्या कविता म्हनो ते निल्ख आन् आता आपली कविता म्हणाची तं टेंशन तं येनारचं. तेयी आयुक्शातली पह्यली कविता? कविता सुरू केली आन् जस्या पह्यल्या दोन ओयी झाल्याबराबर टाया पडल्या. टेन्शन गायब. कविता सरल्यावरतं ज्या बंबाट टाया पडल्यात तं माह्या डोयातं आसूचं आले, पन खुसीचे आर्केस्ट्रात वर्‍हाडी कविता म्हनून लोकायपावतर कविता पोचवनारा मले वाट्टे वर्‍हाडातला मी पह्यलाचं असीनं. हेच कविता पुढे नागपूर आकाशवानीवर कसी गेली तोयी किस्सा सांगन्यासारकाचं हाय, पन पुढे कवातरी जरूर सांगीन.

लोकायच्या टायायनं इतका हुरूप आला आन् खात्री पटली का आपल्याले कविता जमते. तवा मी बोरीसारक्या खेडय़ात राहत होतो. तितच्या लहान-लहान गोठीवर कविता सुचाले लागल्या आन् मी लेयाले लागलो. हे चायीस वर्सा पह्यलची गोठ हाय. तवाचं सलून कसं होतं ते सांगनारी कविता..

झाडाखाली डोस्की

खुर्चीवर बसून तुमी डोस्की केली असनं

पन झाडाखाली बसून त्याची मजा पाह्यली नसनं।

एक फाटकं पोतं आन्

एक वाकडी धोपटी

वस्तर्‍याची धार राह्यते

नुसतीचं चोपडी

त्यावक्ती खेडय़ातून शयरात येनार्‍या मानसाले कायचं अप्रूप राह्ये ते सिनेमा पाहाचं. एक शेतकरी शयरात येते अन् काम अटपून टाकीजवर जाते..

गंमत झाली कसी रामा खेडुताची

आयकून घ्याना तुमी गोठ गमतीची ।

त्या कवितेचा शेवट असा हाय. थे टिकीटवाला बाबू म्हंते..

बाबू म्हने त्याले बालकनी नाई

हाऊसफुल हाय

रामा आला जोयात

म्हने किती पयसे घ्या

पन एक हाऊसफुल द्या!

असं कवितांच पीक येत गेलं आन् योगायोगानं त्याचवक्ती एका पेपरात वर्‍हाडी कविताचं सदर प्रा. देवीदास सोटेच्या निवडीखाली सुरू झालं. त्यातनी या कविता छापून याले लागल्यानं माहा हुरूप वाढीले लागला. नाईतं कविता लेयली का माहे दोस्त राम तिवारी, रामचंद्रा काकडे, शिव तिवारी यायले वाचून दाखवो आन् त्याबास्ता (नंतर) मी माहीचं कविता सात-आठ खेपा वाचून पाहो. काई दिसानं माहा मलेचं ध्यानात आलं का आपन तं सोटे सराचं अनुकरनं करून राह्यलो. याच्यावर त्यायाचीचं छाप हाय. मंग एकल्याव्यावानी मीच माहा गुरू झालो आन् ठरोलंका आपन याच्यातून भाहेर पडलो पायजे. आपन याच्यात अडकून राह्यलो का आपली कविता असूनयी सोटे सरची हाय असं लेबलं लागलं. याच्यातून निसटून आपली ओयख सांगनारी कविता लेयली पायजे आन् मंग कविता बदलाले लागली..

माया कोप (दुकायावर्त)

झाली नाक दिवायी आता धरतरी दिसे

नाई आली न्यायाले कसी सांज व सकाय

बइन मेली का जीती जसं इधवा बाईचं

नाई आला पाहाले वाटे पांढर कपाय

मंग त्यावक्ती खूप गाजलेली सासरी जानार्‍या लेकीवरची लेक कविता, 'लाडा कौतुकाची लेक आज सासरी घालली। जसी किसन देवाची कोनं बासरी चोरली.' खेडय़ातल्या जवान पोराले पह्यल्यांदा बायकोले दिवस गेल्याचे समजते तवाच्या त्याच्या भावना. . . 'भारी झाला पाय. . .', 'खाली गवताची सेज तुहा मखमली पाय।', 'तुह्या कुसीत वाढते माह्या मनाची सकाय. आता आरामान चालं, जरा अरामान चालं' या कवितायवर कोनाची सावली नोती ते माही कविता होती. मंग हा परवास थांबला नाई चालतचं राह्यला आन् मंग 'सगुना पाहू काय बाईवं। तुले गमतं काऊन नाईवं', 'हिव्र्या पिकात डोलाले, डोई आभाय झेलाले। सांग सगुना आता बल्लावू कोनाले' अस्या नाजूकसाजूक कविता लेयत असतानी सोता शेती करतानी तिचे रट्टेघट्टे बसाले लागले आन् कविताच्या इसयाचा ट्रॅक बदलला. 'किती कर कर करा किती मर मर मरा पयसाले पानं तीनच, किती ढीग उपसा, किती नागर खुपसा आमच्या नसिबी कर्ज इनचं', 'म्हसी वांझोटय़ा निंघाल्या झाले गरभार हले! घाम गायनारे इथं दुख सवतीचं झेले.'

शेतकर्‍याच्या सोसन्याच्या, भोगन्याच्या कविता लेयत गेलो. शेतकर्‍याच्या तीन पिढय़ाची 'मुगुट' या कवितेने मले महाराष्ट्रभर फिरोलं. बनावट असंनं तं त्याचं पितय उघडं पडाले उसिर नाई लागतं आन् दुखान इमानदारी असंनं तंथे सामोरच्याच्या कायजात झिरपल्या सिवाय राहतं नाई.

(लेखक शंकर बडे    हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

पेशवे प्लॉट, यवतमाळ

भ्रमणध्वनी - 9420551260

Monday, 6 August 2012

धर्मनिरपेक्षता : निदान जाणीव तरी रुजावी!


मी एका महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात प्रश्नपत्रिका काढण्याचं काम करत होतो. एका भल्या मोठय़ा दालनात मी एकटाच होतो आणि गोपनीयतेच्या हेतूने त्या दालनाच्या दारावर एक सेवकही बसलेला होता. तेव्हा एक गृहस्थ अचानकपणे माझ्यासमोर येऊन उभा राहिला. शांततेचा भंग होऊ नये याची काळजी घेत तो माझ्याजवळ येऊन अत्यंत अदबीनं उभा राहिला. मी लगेच सावध होऊन त्याच्याकडं पाहिलं. खुणेनंच त्याला काय आहे? असा प्रश्न विचारला. त्याच्या हाती एक तबक होतं. त्यात प्रसाद होता आणि तो देण्यासाठी तो अदबीनं उभा होता. मी प्रसाद घेतला आणि विचारलं, ''कशाचा?'' तेव्हा त्यानं सांगितलं, ''सत्यनारायणाचा.'' ''तुमच्या घरी होता का?'' तो शासकीय अधिकारी होता हेही माझ्या लक्षात आलं होतं. तेव्हा तो म्हणाला, ''नाही हो! आज आपल्या कार्यालयात होती सत्यनारायणाची महापूजा!''

मी थक्क झालो. शुक्रवारी दुपारी नमाजची वेळ झाली की, आपल्या अधिकार्‍यांची परवानगी घेत मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी जाणारे अनेक कर्मचारी माझ्या विभागात असत. त्यांच्या अशा जाण्याबद्दल त्यांच्यावर टीका करणारे अनेक हिंदू कर्मचारी मला माहीत होते. आता इथे हिंदू कर्मचारी भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा घालीत होते. माझ्या लक्षात आले बॅरि. अंतुले साहेबांनी याच देवघेवीला 'सेक्युलॅरिझम' असे संबोधून 'सर्वधर्मसमभाव' हा मराठी शब्द प्रचलित केला असावा. वैयक्तिक पातळीवर प्रत्येकालाच उपासनेचं स्वातंर्त्य आमच्या राज्यघटनेनं दिलं आहे. पण आपापल्या धर्मश्रद्धेसाठी शासकीय वेळेचा अपव्यय करणं, शासकीय स्थळाचा धर्मकार्यासाठी वापर करणं अथवा कुठल्याही धार्मिक कार्यासाठी शासकीय कोषातून खर्च करणं या गोष्टी सेक्युलॅरिझममध्ये बसत नाहीत. सेक्युलॅरिझम म्हणजे धर्मश्रद्धेला विरोध असाही अर्थ नाही की, ज्याने-त्याने आपापल्या श्रद्धेप्रमाणे शासकीय कोषाचा, वेळेचा अथवा स्थळाचा वापर करावा आणि यासाठी कुणीच कुणाला विरोध करू नये असाही अर्थ नाही. महाराष्ट्र राज्याच्या एमपीएससी कार्यालयातल्या त्या प्रसंगाने मी काहीसा अस्वस्थ झालो. दुपारी चहा घेताना त्या कार्यालयातील संचालकपदावरील व्यक्तीला मी माझी अस्वस्थता सांगून मन मोकळं केलं. पण त्याच्या उत्तराने हसावं की रडावं हेच मला कळत नव्हतं. तो अधिकारी म्हणाला, ''भगत साहेब, सत्यनारायणाची पूजा हा धार्मिक कार्यक्रम आहे असं कसं समजता तुम्ही?'' त्यांच्या मते, समूह सौहार्द निर्माण करायची ती साधी कृती आहे आणि या कृतीत मुस्लिम, बौद्ध, ºिश्चन सगळेच सहभागी झालेले असतात.

आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, सत्तेत असणार्‍या बहुसंख्याकांचे सांस्कृतिक वर्चस्व निमूटपणे मान्य करणे यातच खरी सुरक्षितता असते. मराठवाडय़ात निजामाचे राज्य होते. तेव्हा गणेशोत्सवाच्या मिरवणुकी मशिदीजवळून जायला लागल्या की, सर्व जण कमालीची शांतता पाळत. 10 टक्के लोक वगळता 90 टक्के जनतेला उर्दू लिहिता-वाचता येत नव्हते. पण कारभार उर्दूतून निमूटपणे चालत होता. कारण त्या 90 टक्के जनतेला जसे उर्दू लिहिता-वाचता येत नव्हते तसे मराठीही लिहिता-वाचता येत नव्हते. मग इंग्रजी जाणणारा वर्ग सत्तास्थानी आला. प्रतिष्ठेची भाषा इंग्रजी. त्यामुळे शासकीय कारभार इंग्रजी माध्यमातून सुरू झाला हेही आता आपल्या अंगवळणी पडले आहे. तेव्हा खरा प्रश्न सत्ताकेंद्रावर असणारे मूठभर असोत की बहुसंख्याक? त्यांचे सांस्कृतिक वर्चस्व निमूटपणे मान्य करायचे की नाही हा आहे. उदाहरणार्थ लक्ष्मी ही संपत्ती आणि वैभवाची देवता आहे. म्हणून प्रत्येक बँकेत लक्ष्मीची प्रतिमा असावी हे स्वाभाविक आहे हे आपण मान्य करावे की नाही? महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले. तेव्हा सर्व कार्यालये, शाळा आणि कॉलेजेसमध्ये गणपती बसवावा की नाही? हैदराबादेतील शाळांमधून जुन्या काळी 'निजामाचे राज्य यावच्चंद्र दिवाकरौ राहो' या आशयाची प्रार्थना होत असे आणि सगळे जण कदाचित आनंदाने नाही, पण सवयीने ती प्रार्थना म्हणत होते. मराठवाडय़ात महालक्ष्मीचा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कलेक्टर त्या दिवशी आपल्या अधिकारातली सुटी देतात. औरंगाबादला नाथषष्ठी महत्त्वाची म्हणून जिल्हाधिकारी त्या दिवशी सुटी देतात. आता जागरूक मुस्लिम बांधवांनी कुरकुर केली तर काय करावे? परभणी जिल्ह्यात उरुसाची सुटी द्यावी म्हणजे सर्वाना न्याय मिळाल्यासारखे होईल. आता शीख, जैन, बौद्ध अशा अल्पसंख्याकांनी मागणी केली तर? पण त्यांची संख्या अल्प असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल.

राज्यघटनेने सांगितलेला दृष्टिकोन आणि पारंपरिक 'संस्कृती समन्वयाची' दृष्टी यात मूल्यात्मक फरक आहे हेच आपण विसरून गेलो आहोत. भारतीय मानसिकता, सर्वधर्मसमभावाचा आदर करणारी आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव असा अर्थ घेताना इथे आपल्याकडं हिंदुत्ववादी अथवा तालिबानी मनोवृत्तीचे मुस्लिम यांचा अपवाद सोडला तर कुणीच विरोध करीत नाहीत. इथले राजेमहाराजे धर्माने कुणीही असोत, देवळांना आणि दग्र्यांना मुक्तहस्ते देगण्या देतात. साधू आणि फकिरांचा आदर करतात. असा जो राजा वागतो तो न्यायी आहे अशीच आपली धारणा असते. म्हणून औरंगजेबाऐवजी अकबर आणि पेशव्यांऐवजी शिवाजी महाराज न्यायी आहेत अशी आपली धारणा असते. आपला भारतीय समाज प्लुरल आहे. विविधता असणारा आहे. या विविधतेची फारशी हानी होता कामा नये हे आपले राजकीय धोरण असते. म्हणूनच हिंदुत्वाचा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी वापरायचा आणि सत्ता मिळाली, की बाबरीच्या मुद्याकडे दुर्लक्ष करायचे. निवडणुका आल्या, की ब्राह्मणीपणावर आणि ब्राह्मणांवर हल्ला करायचा आणि सत्ता मिळाली, की ब्राह्मणांचे सहकार्य घ्यायचे आणि त्यांनी ब्राह्मणीपणाचा आग्रह धरला तर त्याकडे दुर्लक्ष करायचे ही स्वातंर्त्यानंतरची सर्वच पक्षांची सदासर्वकाळची न्यारी नीती आहे. काँग्रेस पक्षाला हे आधी कळते आणि भाजपला सत्तेत येऊन गेल्यानंतर हे लक्षात आले. म्हणून इथे सत्तेत कोणताही पक्ष येवो, कुठलाही पक्ष स्वत:हून राज्यघटनेचा पायाभूत असणारा धर्मनिरपेक्षतावादी दृष्टिकोन स्वीकारणार नाही. त्याऐवजी तो विविधतेतला समन्वय धोका निर्माण करीत नाही तोपर्यंत तोच दृष्टिकोन पत्करेल. 'हिंमत असे तर मुंबईत येऊन छटपूजा करून तर पाहा! अशी गर्जना झाल्याबरोबर अनेक जण हादरून गेले. पण घडले काहीच नाही. कारण पडद्याआड जे घडते ते आपल्याला कळलेच नाही. बिहारचे मुख्यमंत्री मुंबईत आले आणि छटपूजा करून गेले. निवडणुका आल्या, की पेशवाईला शिव्या घालायच्या; पण धरण बांधायचे तर भूमिपूजनासाठी ब्राह्मणाला, भटजीला बोलवायचे. आपल्या जनतेचे वैशिष्टय़ असे, की पेशवाईचा इतिहास पुढे करून नेते ब्राह्मणांना शिव्या घालू लागले, की आपली जनता जोरदार टाळ्य़ा वाजवते आणि भटजीने भूमिपूजन आटोपले, की तिथेही टाळ्य़ांचा गजर करते. यात काही विसंगती आहे हेच मुळी आपल्या जनतेला वाटत नाही. पुरस्कार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने द्यायचा; पण समारंभाच्या सुरुवातीला सावित्रीबाई आणि शारदा या दोन्ही प्रतिमांचे पूजन करायचे. यात काही विसंगती आहे हेच मुळी आपल्या जनतेला पटत नसते. नटेश्वराच्या पूजनाशिवाय अ. भा. नाटय़संमेलन सुरू होऊ शकत नाही आणि गणपतीच्या स्तुतिगायनाखेरीज साहित्यसंमेलन सुरू होऊ शकत नाही. भारतभरच्या किती शहरांतून शिर्डीसाठी रेल्वे सोडली जाते याची आपल्याला माहिती आहे का? आता उगीच कुणी ओरडायला नको म्हणून आठवडय़ातून एकदा दीक्षाभूमी एक्स्प्रेसही सोडावी म्हणजे लोकांचे समाधान होते.

जी वस्तुस्थिती आहे तीच मी विस्ताराने सांगितली आहे आणि ती आपल्या एवढी अंगवळणी पडली आहे, की मी वर नमूद केलेल्या कोणत्याही उदाहरणात काही विसंगती आहे हेच कुणाच्या लक्षात येणे शक्य नाही. आपल्या राज्यघटनेला धर्म आणि परंपरेला विरोध करायचा नव्हता. आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंर्त्य आहे. उपासनास्वातंर्त्य आहे. त्याप्रमाणे आचरण करण्याचा हक्क आहे आणि हा हक्क अबाधित राहावा यासाठी संरक्षण देणे हेही आपल्या सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे. पण हे कर्तव्य करण्यासाठी सरकारी आदेश न काढता, सरकारी यंत्रणा न राबवता आणि सरकारी कोषाचा वापर न करता सार्वजनिक जीवन धर्म आणि परंपरामुक्त कसे होईल ही जाणीव आपण रुजवायला हवी. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण समारंभात कुठलेही प्रतिमापूजन अथवा पसायदान नसते. तरी तिथे जमलेल्या गर्दीला काहीच खटकत नाही. हा आदर्श साहित्यसंमेलनांनी का उचलू नये? सत्यनारायणाची पूजा घरी करावी. त्यासाठी शासकीय कार्यालय का निवडावे? घरातल्या भिंती आपल्याला हव्या त्या देवदेवतांच्या प्रतिमांनी सजवाव्यात. त्यासाठी बँकांच्या भिंती कशाला हव्यात? ही जाणीव रुजवणे अवघड असले तरी धर्मनिरपेक्ष न्यायालाही सुसंगत आहे ही किमान जाणीव तरी शेदोनशे वर्षात रुजवली जावी असे मला वाटते.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

इंग्रजीत बोला बे..


''गुड मॉर्निग सर..''
'सीट डाऊन.. आज बुधवार आहे.. आज सगळ्या पोरांनी इंग्रजीत बोलायचं आहे''

''काहून सर?''

''आपल्या हेडमास्तरनं नियम काढला की बुधवारी इंग्रजीत बोलत जा.. सगळ्यांना इंग्रजीत बोलता आलं पाह्यजे.. कारण की इंग्रजी जागतिक भाषा आहे''

''एस सर''

'उभा राह्य.. सचिन.. काल शाळेत का आला नाहीस?''

''माह्या बाबाच्या पायाले कुरुप..''

''सेमी इंग्रजीत सांग''

''माय डॅडी हॅज कुरुप ऑन हीज लेग.. सो आय वाज गॉन ऑन दी बकर्‍या चाराले''

''हासू नका बे.. तुमचाही नंबर आहे.. बाबू अभिषेक.''

स्टॅंडअप.. शंकरचं स्पेलिंग सांग?''

''एस एच ए शंकर..''

''अहमदाबाद''

''ए एम डी ए बाद''

''चूक! आठवीत गेला ना घोडय़ा''

'सर, हा रुतीक्या मले चकोन्या दाखोते''

''इंग्रजीत सांग''

''रुतिक्या इज दाखोइंग चकोन्या टू मी''

''उभा राह्य बाबू रुतिक.. कालचं होमवर्क केलं काय?''

''नो सर.. काल मी शाळेत आलो नोतो''

''काहून?''

''बिकॉज माय ड्रेस वाज कयकला''

''सर, हे पुनी मले झिपरी म्हनते''

''काहून बाई पूनम?''

''या सुमीनं आगुदर मले लिचोंडा घेतला सर''

''इंग्रजीत..''

''सुमी गीव्ह मी लिचोंडा''

''जास्त शानपना करू नका.. इंग्रजीचा पिरेड आहे.. सीट डाऊन.. तू उभा राह्य..''

''मी काय सर?''

''तू नाही.. तो बाजूचा.. पोरीकडे पाहून हासून राह्यला.. उभा राह्य बाबू अमोल्या.. निबंध सांग.. माय फेवराइट हिरो..''

''सलमान खान इज माय फेवराइट हिरो.. आय हेवसीन हीज पिच्चर वीर एस्टरड.े. इन वीर ही जंप ऑन घोडा अँन्ड पिटालिंग''

''अबे गाढवा.. फेवराइट हिरो म्हनजे सिनिमातला हिरो नाही''

''मग कोनता सर?''

''थोर पुरुष! उदारनार्थ महात्मा गांधी!''

''गांधीजी इज माय फेवराइट हिरो.. गांधीजी नेसिंग धोतर.. बिकॉज ही फील सिंपल लिव्हिंग अँंड हाय थिंकिंग.. ही ड्रिंक मीस्क ऑफ बकरी.. ही टोष्ट इंग्रज.. चले जाव.. इंग्रज आर गोइंग अँंड इंडिया इज शायनिंग''

''बस्स झालं.. तू उभी राह्य शिल्पा.. गाईचा निबंध सांग''

''काऊ हॅज फॉर लेग.. टू शिंग.. वन शेपूट''

''शेपटाले इंग्रजीत काय म्हंतात सर?''

''टेल''

''अन् ते बांडं असलं तर?''

''बांडं असलं तर बांडं टेल.. पुढे सांग''

''काऊ इट कडबाकुटार.. शी गिव्ह अस मिल्क.. शी गिव्ह अस कारोळ''

''कारोळले इंग्रजीत काय म्हंतात सर?''

''लिटील काऊ''

''सर, धोतराले इंग्रजीत काय म्हंतात?''

''धोताड''

''अन् लुगडय़ाले?''

''लुगाड''

''अन् लुगडय़ाच्या घोयाले?''

''अबे इंग्रजी विदेशातली भाषा आहे.. तिकडे लुगडे नेसत नाहीत''

''सांगाना सर.. लुगडय़ाच्या घोयाले काय म्हंता?''

''घोया ऑफ लुगाड''

''सर, हा बंडय़ा माह्याकडे पाहून डोये वासते''

''बंडय़ा, स्टॅंडअप.. तुह्या डोयाले काय झालं?''

''मांजोई झाली''

''सेमी इंग्रजीत सांग''

''आय हॅव मांजोई ऑन माय आय''

''व्हाय यू आर मांजोई?''

''आय हॅव डसिंग तेलमुंगी''

''आता सांग बाबू संत्या.. फाइव्ह इनटू सेवन किती?''

''फिप्टीसेवन''

''मॅट झाला काय? हुशार आहेस ना बाबू तू?''

''सर, हा संत्या हुशार आहे म्हनून फिप्टीसेवन सांगून राह्यला.. बाकीचे पोट्टे शंभर-दीडशे सांगतात''

''घरी पाढे पाठ करत जा''

''हा दिवसभर टीव्ही पाह्यते सर''

''इंग्रजीत सांग''

''ही लुक्स दिवसभर टीव्ही.. ही लुक्स उलाला उलाला..''

''उलाला पाहून काय भेटते बाबू? जनरल नॉलेज वाढते का? टीव्ही इज इडिएट बॉक्स''

''सर..''

''आता काय झालं बोंबलाले?''

''ह्या पक्यानं माही शेंडी..''

''इंग्रजीत''

''पक्या इज पुलिंग माय शेंडी..''

''पक्या.. लय मज्जावला काय? चाल पुढे ये.. घोडीकर''

''मे आय गो आऊट सर?''

''कायले?''

''लगवी आली''

''इंग्रजीत..'

''आय हॅव कमिंग लगवी''

''थोडा वेळ थांब.. पिरेड होऊ दे''

''नाईना सर. देअर इज सो फोर्स..''

''बस खाली.. कायले आला बे शाळेत?''

''जमत नाई सर.. फोर्स इज ग्रोइंग.. इफ आय नॉट गो देअर वील बी धिंगाना..''

''गेट आऊट.. तुमाले इंग्रजी शिकोनं म्हनजे डोकं मॅट करनं आहे लेकहो.. त्याच्यापेक्षा आपला मराठीचाच धडा काढा''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9561226572