Wednesday, 5 September 2012

सद्गुनाची कलई करून घ्या लागते


मांगच्या हप्ती म्या तुमाले आर्केस्ट्राच्या काई आठोनी सांगतल्या. त्या आठोतानी हे आठोलं का तवा एस. टी. महामंडयाच्या गाडय़ा सुरू होऊन जुन्या परायवेट कंपन्याच्या गाडय़ा बंद झाल्या होत्या. हे याच्याच्यानं आठोल कां त्या बंद झालेल्या कंपनीतली एक गाडी दाते कालेजनं कालेजच्या पोरींना गावातून कालेजमंदी नेन्यासाठी इकत घेतली होती अन् तेच गाडी संध्याकायी दुसर्‍या शयरात कार्यकरम असला तं आमी ते गाडी भाडय़ानं घेऊन जावो. म्हून मले जवा या परायवेट गाडय़ा चालू होत्या तो काय आठोला. आमचं गाव हे आकोला आन् पुसद अस्या दोनी शयराले जाता येनारं गाव हाय. बोरीवून पुढं दारव्यापावतर एकच सडक आन् तिथून एक सिदी जानारी सडक अकोल्याले आन् डावीकडून जानारी सडक पुसदले. तिथून असे फाटे फुटत असल्याच्यानं माह्या गावापासून दोनी शयराकडं जाता येते. तवा आकोल्याले जाचं असन तं युनायटेड कंपनीची दुपारी दोनची बस एक टाईम. एक डाव ते गाडी हुकली का मंग गाडी नव्हती आन् तिकून येनारा दुपारी अकराचा टाईम बस. पुसदले जानारे जरा जादा टाईम होते पन तरी मोजकेच. दत्त सर्व्हिस, न्यू समर्थ, श्रीसमर्थ अस्या कंपन्यांच्या गाडय़ा.

सकायी साडेनव वाजता दत्त सर्व्हिसची कथ्थ्या रंगाची गाडी आमच्या घरासामोर सडकिले लागून असलेल्या निंबाच्या झाडापासी थांबे. तिले लोकं पोस्टाची गाडी म्हनत. गाडी थांबली का, तिचा डरायवर खाली उतरून बाजूले असलेल्या बापूरावच्या पानठेल्यावर जातानी अलीकडच्या नालीत यवतमायपासून तोंडात संभायून आनलेलं पान थुंकून टाके. मंग बापूरावच्या पानठेल्यापासी उभा होत नाई तं हा रोजचाच नेम असल्याच्यानं बापूरावनं हाटेलात आवाज देऊन सांगतलेला पाण्याचा काचाचा गिलास तयार राहे. तवा हाटेलात दोनतीनंच काचेचे मानवाईक गिर्‍हाइकांसाठी गिलास राहे. बाकी जनरल जरमलचे गिलास राहे. थो गिलास उचलून डरायवर पाण्याचा मोठा घोट घेऊन तोंडातल्या तोंडात गरारा करून थो गुराया बाजूच्या नालीत टाकून, राह्यलेलं पानी पिऊन टाकून खाली गिलास ठेवत नाई तं हाटेलातलं पोरगं गरम चहाची कपबशी आनून ठुवे आन् खाली गिलास घेऊन जाये. त्यायचं नाव काय होतं काय माईत, पन बापूराव त्याले आवो डरायवर साब म्हने. आलेल्या कपबशीतला कप दांडी धरून उचलून त्यातला चहा बसीत थोडा वतून बापूरावले दे आन् कपानं सोता फूक मारत च्या पेत. तिथंच उभा राहे ते कवा हाटेलात ना जाये. डरायवर सायबाचं बोलनं जसं इकत घ्या लागे आन् कंडक्टर जो होता त्याले बाबू म्हनत. तो बोलाले अघयपघय आन् आंगानयी तसाच. डरायवरचं च्या पेनं झालं का थे पानठेल्यावर आल्याबराबर बापूराव दोन मोठे कपुरी पानं पानी झटकून पह्यले चुन्याची दांडी फिरवे. मंग काथ्याची दांडी फिरवून पान हातातून सामोरच्या तबकात ठुवाच्या आंधी चुन्याच्या दांडीनं चुना झटके. थो काथावर उठून दिसे. च्या पिवूस्तर ते पान अखीनं कथ्थं झालेलं राहे. पानं लावताना बापूरावकडं पाह्यनं हा एक आनंदच राहे. त्यायचं पान लावून झालं का बापूराव सामोर ठेवलेलं पानदान उचलून त्यायच्या म्होर धरे आन् ते तीन बोटानं अलगद तोंडात सरकवे. ते पान बराबर गालाच्या खोबनीत ठुवाची आदत राहे. त्या वक्ती गाडीचा डरायवर, टुरिंग टाकीजचा आपरेटर हे खेडय़ातल्या साद्यासुद्या मानसासाठी व्हीआयपी राह्यते.

हे माह्या लहानपनच्या आठोनी. तवा आता नासुकल्या वाटनार्‍या गोष्ठीचं अप्रूप वाटे. ते गाडी आपल्या घरासमोर उभी राह्यते याचं अप्रूप. थो डरायवर आपल्याकडं पाहून ''कैसे हो मुन्ना?'' म्हंते म्हंजे आपल्याले ओयखते याचं अप्रूप. डरायवरच्या च्यावून हे आठोलं, का त्या वक्ती हाटेलात तीन परकारचा च्या राहे. एक चालू च्या. तो तवा गुयाचा राहत असावं तं दुसरा गोल्डन च्या आन् भारीवाला पेसल च्या. बरेचं दिवस हे चाल्लं आन् मंग काई दिसानं हे च्याचे पह्यले दोन परकार बंद झाले आन् मंग पेसल च्या आन् बादशाही च्या असं झालं. हे सारं लेयाचं यासाठी हाय का माह्या पिढीचे हायेत. त्यायले अखीन आठोनीची लपाछपी खेयाले भेट्टे आन् पुढच्या पिढीले ना पायलेलं वाचाले भेट्टे. आमच्या लहानपनी सेनिमाचं किती अप्रूप म्हनान. मले अजून आठोते, का त्या वक्ती राज कपूरचा 'संगम' ह्या सेनिमा उमरावतीच्या 'परभात' थेटरात पह्यल्यांदा लागनार म्हून तो सेनिमा पह्यल्या दिसीचा पह्यला शो पहाचा म्हून आमच्या बोरीवून चार जन आंदिल्या दिसी मुक्कामानं. आन् मुक्काम कुठी तं सेनिमाच्या टिकीटच्या खिडकीसामोर नंबर लावून. उमरावतीवून सेनिमा पाहून आल्यावर्त गावात यायचं मार्केट. ना जाऊ शकलेले पोरं मंग यायच्या मांग स्टोरी आयकासाठी. आता होते काय का ईस रुपयाची सिडी आनली तं अख्ख घर सेनिमा पाह्यते थोयी काल रिलीज झालेला नाई तं आमच्या लहानपनी माह्या गावाले बोरीले उन्हाया याच्या आंधी टुरिंग टाकीज ये. पडद्याची टाकीज. एका शेल्यावून मसनीचं केबिन. केबिनपासून अरध्या परीस जादा अंतरावर मंधात चारी बाजूनं काया रंगाच्या पट्टय़ा आन् मंधात पांढरा कपडा असलेला पडदा. अलीकडून मानसं आन् पलीकडून बायायले बसाले जागा. थोडय़ा अंतरावर टिकीट बुकिंगची लहान केबिन. आमच्या लहान पोट्टय़ायच्या चार चकरा कोन्ता सेनिमा लागते हे पाहासाठी.

आमच्या बोरीले जे माह्या आठोनीतली पह्यली टाकीज आठोते ते 'हिरा टुरिंग टाकीज'. तवा जादा धार्मिकच सेनिमे लागत. मी तवा तिसरी, चौथीत असल्यानं माहा नंबर मायच्या संग. माय सुना आन् लेकीयसंग मले ने. घरून जातानी कोनापासी तरी घडी केलेली सतरंजी राहे. थे आतनी गेलं का आथराची आन् बसाचं. या एकमेकीसंग बोलेत तं त्यायचा टाईमपास होये. पन मी एकला असल्याच्यानं सेनिमा चालू व्हाची वाट पाह्यनं जिवावर ये. मंग मी मायच्या मांग लागो, ''मा कवा होते वं चालू!'' त्याच्यावर थे म्हने, ''होते ना बाबू! जरा दम धर ना!'' आखरीले मी कुदकुद कराले लागलो का मंधातला जो पडदा होता थो वारा जिकून वाहे त्या टोकाकून दुसर्‍या टोकापावतर जसे नदीच्या थांबलेल्या पान्यावर तरंगा मागे तरंग येते तसे त्या पडद्यावर येत. ते दाखवत माय म्हने, ''बाबू, तुले पडद्यावर तरंगा मांग तरंग दिसून राह्यले ना थे तिथं सेनिमातले कलाकार भरनं चालू हाय. एकडाव सारे कलाकार भरले, का मंग सेनिमा चालू होते, समजलं?''

अस्या एक एक जुन्या आठोनी माहा पिछा नाई सोडून राह्यल्या. आजकाल या पॉश लोकायच्या घरातलं त्यायचं सयपाकघर पाहावं आन् त्यायचे भांडे पाहावं तं मानूस पाह्यतच राह्यते. आमच्या लहानपनी लहानमोठय़ा गंजापासून ताटवाटय़ा पावतर कोनाकडं पितयीचे आन् कोनाकडं जरमलचे भांडे राहे. आंगधुनीत तांब्याचं गंगाय आन् वरन सिजवाले कास्याचा कसीला. जादा भांडय़ांचा पसारा नोता. कवा पाच, धा मानसं जेवाले असले तं उसन्याची माय कवाचं मरे नाई. सयपाकाच्या वट्टय़ासामोर आपल्या हातानं पितयी ताट घेऊन चुलीपासी बसलेल्या मायच्या सामोर धरलं का ते उस्यावरच्या कसील्यातून पितयीच्या पयीनं वरन ताटात वाढून अलीकून भाकर मोडून ठुवे. आपन खाली ताट ठेवून बसलो का, वरनाच्या पाण्याचा लोट ताटात सरकाले पाहे. तवा माय चुलीपासच्या गवरीचं खांड (तुकडा) फेके. ते वरतून ताटाखाली लावाचं. त्याले अडगन म्हनत. पितयीच्या ताटाले, वाटय़ाले, गंजायले आतून कलई करा लागे. नाईतं त्याच्यात आंबटचिंबट ठुलं तं कयकाचं भेव राहे. आता तं मानसाले कलई कराची वक्ता आली हाय? आजकाल लोकायची नियत इतकी खराब होत चाल्ली हाय का इचारू नोका. सारेच तसे नसले तरी कोनाचा भरोसा करावं हेच समजत नाई. मी तं म्हन्तो मानसानं अवगुन झाकासाठी सद्गुनाची कलई करून घ्यावं! पाहा तुमाले पटते कां?

(लेखक शंकर बडे  हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री

कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

कविता, गझल आणि मुक्त गझल!


कविता म्हणजे तसा अतिशय लोकप्रिय प्रकार. गझलच्या काव्यप्रकाराचे तर असंख्य चाहते आहेत. गझल तशी मराठीमध्ये चांगलीच रुळली. स्थिरावलीय.

कविता कशी होते, याचं कुतूहल रसिकांना असतं! गझल ही तंत्राच्या बाबतीत फार काटेकोर असते, पण कविता बरीच स्वतंत्र आहे त्यामानाने. ही गझल कशी होते, हे सांगणं तसं कठीणच आहे.

खरं तर मनाला आलेला पूर टेप घेऊन मोजायचा नसतो. मुक्तपणे व्यक्त होणं हाच कवीचा स्वभाव; मात्र कविता निर्मिती ही वेगळी प्रक्रिया आहे. वेदना-संवेदना आणि चिंतनाच्या घुसळणाचा योजनाबद्ध कलात्मक आविष्कार म्हणजे कविता होय. जसं घुसळण - तसेच परिणाम! घुसळणातून ताकही बाहेर पडणार. लोणीही हातात येणार! लोणी तापवलं की तूप-विरजण घातलं की दही आणि आणखीही बरंच काही! पण दूध मात्र असली हवं!

कविता कशी होते, कशी लिहावी याचे काही नियम नाहीत. असूही शकत नाहीत. कवितेची व्याख्या करणंही तसं कठीणच! धुक्याची वीण आणि ढगांचे आकार कुणाला सांगता येतील का? कवितेचंही तसंच आहे. आपण फक्त दिशानिर्देश करू शकतो. जुन्या वाटांचा आधार घेऊन काही ठोकताळे मांडू शकतो. एका मर्यादेपर्यंत ते मार्गदर्शकही ठरतात. पण त्यांचा अतिआग्रह बरा नाही. असल्या ठोकताळ्य़ांनाच 'ब्रम्हवाक्य' समजणं आणि येता जाता कुणावरही त्या चौकटी लादणं ही अतिरेकी कृती आहे. कवितेलाच नव्हे तर कुठल्याही सृजनाला ती मारकच आहे!

पूर्वी मुक्तछंदाच्या विरोधात असाच गदारोळ उठला होता. आता गझलेच्या प्रांतात तंत्राचा अतिरेकी आग्रह धरणारे काही अतिउत्साही लोक नवे प्रयोग करणार्‍याची शिकार करण्यासाठी टपून बसलेले असतात. बाबा आदमच्या जमान्यातील गंजलेली शस्त्रे घेऊन हे 'तंत्रपाळे' पंथाचे लोक सार्‍या गावाला शहाणपणा वाटत फिरतात! याचा त्रास सुरेश भटांनाही झाला. भीमराव पांचाळेंनाही झाला. शुद्ध, सात्त्विक हेतूने मार्गदर्शन करणं वेगळं आणि आगाऊपणा वेगळा!

वास्तविक कलाकृती आधी जन्माला येते नंतर त्याचा अभ्यास करून शास्त्राची मांडणी केली जाते. आधी नाचण्याचं शास्त्र तयार झालं आणि नंतर मोर नाचायला लागलेत. असं झालय का कधी? पण तंत्राचा थोडासा अभ्यास करून पिवळे झालेले पंडित जेव्हा 'असे नाचू नका-तसे लिहू नका?' अशी मुजोरी करत मोरांनाच नाच शिकवायला लागतात, तेव्हा कुणीतरी पुढे येऊन त्यांना समज देण्याची गरज निर्माण होते.

अशाच काही तक्रारी समोर आल्या. मलाही त्या असह्य झाल्या आणि म्हणूनच मागे मी गझलच्या प्रांतात 'मुक्त गझल'ची संकल्पना मांडली होती. तिच्यावर जरा खुलासेवार भाष्य करण्यासाठी ही योग्य जागा आहे, असं मला वाटते.

मुक्त गझल

'मुक्त गझल' ही सुद्धा परिपूर्ण गझलच आहे. गझल हे 'वृत्त' नसून 'वृत्ती' आहे. असा सर्वमान्य सिद्धांत आहे. तो मुक्त गझलालाही लागू आहेच. फक्त तंत्राच्या बाबतीत, इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करतानाच काही प्रमाणात योग्य तो बदल करण्याचं स्वातंर्त्य 'मुक्त गझल'मध्ये घेता येईल. कवीच्या अपुर्‍या क्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी किंवा पळवाट शोधण्यासाठी मुक्त गझलची संकल्पना नसून समर्थ प्रतिभा असलेल्या कवीने स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक घेतलेले स्वातंर्त्य आणि त्यानुसार केलेली रचना म्हणजे 'मुक्त गझल' होय.

कृपया ही 'मुक्त गझल' बघावी.

सोहळा हा खास होतो.. बारमाही

आगळा वनवास होतो.. बारमाही !

भेटलो का आठवेना.. बोललो का आठवेना

का तुझा आभास होतो.. बारमाही?

वादळाच्या सोबतीला पेरले का चांदणे तू

काळजाला त्रास होतो.. बारमाही!

या नदीला, त्या नदीला.. त्या नदीला पूर येतो

.. आणि मी मधुमास होतो.. बारमाही!

केवढा भन्नाट आहे.. सांडण्याचा खेळ सारा

जन्म होतो, र्‍हास होतो.. बारमाही!

आता मी यात कोणतं स्वातंर्त्य घेतलं? तर 'मतला' किंवा पहिल्या शेराच्या दोन्ही ओळी मधील मात्रा आणि लगावलीचा क्रम हा दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या शेराच्या दुसर्‍या ओळीत तंतोतंत पाळला. पण दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या शेराच्या पहिल्या ओळीत मात्र सात मात्रा जास्त घेतल्यात. सध्याच्या तंत्राप्रमाणे मी जर कमी असलेल्या ओळीत सात मात्रा वाढवल्या की हीच परिपूर्ण गझल तयार होते. त्यासाठी मला फार काही करावेही लागत नाही. आता बघा..

सोहळा हा खास होतो.. बारमाही बारमाही

आगळा वनवास होतो.. बारमाही बारमाही !

वादळाच्या सोबतीला.. पेरले का चांदणे तू

काळजाला त्रास होतो.. बारमाही बारमाही!

या नदीला, त्या नदीला.. त्या नदीला पूर येतो

.. आणि मी मधुमास होतो.. बारमाही बारमाही!

मग मी हे स्वातंर्त्य का घेतले? तर 'या नदीला, त्या नदीला, त्या नदीला पूर येतो' या ओळीत 'नदीला' या शब्दाच्या पुनरावृत्तीमुळे येणारी 'अथांगता' मला हवी होती. ती 'या नदीला, त्या नदीला पूर येतो' या ओळीमध्ये येत नाही. मग सार्‍याच ओळीमध्ये बारमाही शब्द दोनदा वापरून मी ती गझल का लिहिली नाही, तर 'काळजाला त्रास होतो बारमाही।' यातली आर्तता 'काळजाला त्रास होतो.. बारमाही बारमाही' या ओळीत राहत नाही ! 'बारमाही' या शब्दाची पुनरावृत्ती त्या आर्ततेला मारक आहे, असे मला वाटते. 'आर्तता' आणि 'अथांगता या बाबतीत मला कुठलीही तडजोड करायची नसल्यामुळे मी हा मार्ग निवडला आणि तयार झाली एक 'मुक्त गझल!'

अर्थात तंत्रामुळे कवी कधीही मोठा होत नसतो. कवीमुळे तंत्राचं महत्त्व वाढते. तुकारामांचे अभंग असो, बहिणाबाईंच्या ओव्या असोत की कबिराचे दोहे असो, त्यांच्या प्रतिभेमुळे अजरामर झालेत. तंत्रामुळे/वृत्तामुळे नव्हे.

याचा अर्थ तंत्र शिकूच नये असा नव्हे. माझा तंत्राला विरोध नाही. विरोध तंत्राच्या अतिरेकाला आहे.

मी तंत्रातला तज्ज्ञ नाही, पण म्हणून तंत्रशुद्ध लिहू शकत नाही असेही कृपया समजू नये. कवितेतल्या सुमारे 18-20 प्रकारांमध्ये मी लिखाण केलेले आहे. रसिकांची भरभरून दादही मिळालेली आहे.

अशाप्रकारे तंत्रात सूट घेऊन लिहिण्याचे प्रयोग फारसी आणि उर्दू भाषेत आधीही झालेले आहेत. त्याला 'मुस्तजाद गझल' असे म्हणतात. 'मुस्तजाद' हा अरबी भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ वाढवलेला / अतिरिक्त असा होतो. पण हा शब्द मला तितकासा बरोबर वाटत नाही. मराठीमध्ये अशा तंत्राच्या बाबतीत किरकोळ कमतरता राहून गेलेल्या रचनेला 'गझलसदृश रचना' असे म्हणतात, हाही आडवळणाचाच शब्द वाटतो. त्यापेक्षा 'मुक्त गझल' हा शब्द मला स्वत:ला जास्त योग्य वाटतो.

अर्थात हे माझं मत आहे. मी अतिशय नम्रपणे ते व्यक्त केले आहे. माझा कुठलाही आग्रह नाही. मराठी भाषेत असा प्रकार नाही. असेही कुणी म्हणतील, पण गझलही मराठीत बाहेरूनच आली ना? मग अशी सूट घेणारी गझलही येऊ द्या. त्या प्रकाराला 'मुक्त गझल' हे नाव मात्र मी दिलेलं आहे. पटलं तर घ्याव. रसिकांचा निर्णय अंतिम!

अर्थात यावर आणखी चर्चेला वाव आहे. गरजही आहे. शिकत शिकतच पुढे जायचं आहे. कुणीही परिपूर्ण नसतो. मीही नाही. काळाच्या ओघात मौलिक असेल तेच टिकेल. कामाचं असेल ते मातीत पडलं असलं तरी आपण उचलून घेतो, हाच जगाचा नियम आहे.

त्यामुळे तंत्राच्या अतिरेकी आहारी जाऊन कुठलीही दुराग्रही भूमिका घेऊ नका. नव्या प्रयोगांची 'भ्रूणहत्या' करू नका. एवढच नम्रपणे सुचवावसं वाटतं! आपण सुज्ञ आहातच! गैरसमज नसावा!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

जॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली


बातम्यांच्या गर्दीत काही बातम्या त्यातील तपशिलामुळे लक्ष वेधून घेतात. एक लढवय्या नेता म्हणून ओळख असलेले देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस आणि समता पार्टीच्या माजी अध्यक्ष जया जेटली यांच्यासंदर्भातील ही बातमी आहे. सध्या अल्मायझर आणि पार्किन्सन या आजारामुळे स्मृती हरवून बसलेल्या फर्नाडिस यांना आपल्याला भेटू द्यावे, अशी याचिका जया जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने जेटली यांची विनंती मान्य करत 15 दिवसांतून एकदा 15 मिनिटांसाठी भेटण्याची त्यांना परवानगी दिली. मात्र या भेटीत फर्नाडिसांना त्यांनी स्पर्श करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. भेटीला जाण्यापूर्वी त्या भेटीची सूचना फर्नाडिस यांच्या पत्नी लैला कबीर यांना देणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. याअगोदर जया जेटली यांची यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने

फेटाळून लावल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 'डहश ळी पशळींहशी र ीिेशिी पेी र पशलशीरीू रिीूं ीें ींहश ीिशीशपीर्ं ीळीं रपव ीहश ळी पेीं ळप र ीशश्ररींळेप ुळींह ची.ऋशेीसश शीपरपवशी री ींहरीं ेष ींहश श्रिरळपींळषषी. ख रा ेष ींहश लेपीळवशीशर्व ीळशु ींहरीं ींहर्श ीळीळींळपस ीळसहींी रश्रीे लरपपेीं लश सीरपींशव' या शब्दात उच्च न्यायालयाने त्यांना भेटीचा अधिकार नाकारला होता. जया जेटली यांचे जॉर्ज फर्नाडिससोबत कुठलेही नाते नसल्याने अशी याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना भेटीचा अधिकारही देता येणार नाही, असे काहीसे उच्च न्यायालयाचे म्हणणे होते.

हे प्रकरण समजून घेण्यासाठी आधी जॉर्ज फर्नाडिस-लैला कबीर-जया जेटली हा प्रेमाचा त्रिकोण समजून घ्यावा लागतो. जार्ज फर्नाडिसांचं लग्न माजी केंद्रीय मंत्री, शिक्षणतज्ज्ञ हुमायून कबीर यांची मुलगी लैला कबीर यांच्यासोबत 1971 मध्ये झालं होतं. तो प्रेमविवाह होता. विमान प्रवासात या दोघांची भेट झाली होती. जवळपास दहा वर्षे त्यांचा संसार झाला. (त्यांना सुशांतो (सीन) फर्नाडिस नावाचा एक मुलगा आहे. तो सध्या अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट बॅंकर आहे.) 1984 मध्ये काही मतभेदांमुळे जॉर्ज फर्नाडिस आणि लैला कबीर या दोघांनी वेगळं राहणं सुरू केलं. त्याच सुमारास जया जेटली जार्जच्या आयुष्यात आल्या. आयएएस अधिकारी अशोक जेटली यांच्या पत्नी आणि क्रिकेटपटू अजय जडेजाच्या या सासू. (अशोक आणि जया जेटलींची मुलगी आदितीने अजयसोबत लग्न केले आहे.) महाविद्यालयीन जीवनात सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या राहिलेल्या जया जेटली जॉर्जच्या

व्यक्तिमत्त्वामुळे कमालीच्या प्रभावित झाल्या. त्यांनी त्यांच्यासोबत काम करणे सुरू केले. काही काळातच त्यांच्यात एक नातं विकसित झालं. आजच्या भाषेत ज्याला 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणता येईल, त्या पद्धतीने हे दोघे आतापर्यंत एकत्र राहिले. जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री असतानाही दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील शासकीय निवासस्थानात हे दोघे एकत्र राहत असत. जया जेटली तेव्हा समता पार्टीच्या अध्यक्ष होत्या. दिल्लीच्या राजकीय वतरुळात सार्‍यांना या दोघांच्या नात्याबद्दल कल्पना होती. एनडीए सरकारच्या काळात जया जेटलींच्या कथित तहलका दलाली प्रकरणामुळे जार्ज फर्नाडिस अडचणीत आले. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. मात्र तरीही त्यांचे संबंध कायम राहिले. हे नातं या दोघांनी कधी लपविलं नाही आणि कधी त्यावर जाहीर भाष्यही केलं नाही. एक अतिशय समंजस नातं या दोघांमध्ये विकसित झालं होतं. त्यामुळे या नात्याला कायद्याच्या वा समाजमान्य चौकटीत बसविण्याची गरज त्या दोघांनाही कधी वाटली नाही. मात्र नातं समाजमान्य नसणं हीच गोष्ट आज या दोघांनाही कमालीची मानसिक त्रास देणारी ठरत आहे. 2010 मध्ये जॉर्ज फर्नाडिस यांना अल्मायझर या आजाराने ग्रासले. सोबतच पार्किन्सनचाही त्रास असल्याने ते बिछान्याला खिळले गेले. तेथून या दोघांच्या नात्याला ग्रहण लागले. जॉर्ज आजारी पडल्यानंतर अनेक वर्षे परदेशात असलेल्या त्यांच्या पत्नी लैला कबीर भारतात परतल्या. त्यांनी लगेच जॉर्जला ताब्यात घेऊन पंचशील मार्गावरील आपल्या निवासस्थानी आणलं तेव्हापासून जॉर्ज त्यांच्या निगराणीत आहेत. जॉर्जला कोणाला भेटू द्यायचं वा नाही हे त्याच ठरवितात. दीड वर्षापूर्वी जॉर्जच्या भावांनीही न्यायालयात धाव घेऊन लैला आपल्या भावाची भेट घेऊ देत नाही, अशी तक्रार केली होती. आता तीच पाळी जया जेटलींवर आली आहे. जवळपास 30 वर्षे ज्या व्यक्तीसोबत त्यांनी घालविले त्याला भेटताही येत नाही हे माझ्यासाठी कमालीचं वेदनादायी आहे. किमान माणुसकीच्या नात्याने मला भेटू द्यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. आता 15 मिनिटांसाठी का होईना त्या भेटू शकणार आहेत.मात्र त्यांना जॉर्जचा साधा हातही हातात घेता येणार नाही. (जॉर्ज आज 82 वर्षाचे आहेत. लैला 80 च्या तर जया जेटली पंचाहत्तरीत आहेत. त्यामुळे जॉर्जला स्पर्श करता येणार नाही ही न्यायालयाची अट मनोरंजक वाटते. त्यासाठी न्यायालयाने इन्फेक्शनचं कारण दाखविलं आहे.)

ही अशी प्रकरणं मोठी नाजूक आणि संवेदनशील असतात. यात कोणाला नायक-खलनायक ठरविता येत नाही. आपण बाहेरची माणसं त्यावर टीकाटिप्पणी करून मोकळे होतो. पण त्या-त्या नात्यांतील गुंतागुंत, बारकावे, भावनिक आंदोलन संबंधितांनाच माहीत असतात. या अशा नात्यांना नैतिक-अनैतिकतेच्या पारडय़ात तोलनेही चुकीचे आहे.अलीकडे राजेश खन्नाचंही असंच प्रकरण बाहेर आलं होतं. शेवटच्या काही वर्षात त्याच्यासोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये असलेल्या प्रतिभा अडवाणी या त्याच्या मैत्रिणीला तो जाताच त्याच्या कुटुंबीयांनी घराबाहेर काढलं. तिला त्याच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ दिलं नाही. 'सुपरस्टार' अमिताभ बच्चनलाही हा अनुभव आला आहे. 1984 मध्ये 'कुली' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्यानंतर तो मरणाशी झुंज देत असताना रेखाला त्याच्या कुटुंबीयांनी तेव्हा भेटू दिलं नव्हतं. ही अशी उदाहरणं इतिहासातही भरपूर आढळतात. बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी अजरामर आहे. मात्र बाजीराव मृत्युशय्येला खिळला असताना मस्तानीला त्याला भेटू देण्यात आलं नव्हतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातही असे प्रकरणं घडत असतात. त्यामुळेच 'पती, पत्नी आणि वो' या थिमवर अनेक हिंदी चित्रपटही निघाले आहेत. या अशा प्रकरणात माणसं मानवी स्वभावानुसारच वागतात. आपल्या पतीच्या आयुष्यात आलेली दुसरी स्त्री ही कुठल्याही पत्नीला आवडत नसते. तिच्यामुळे तिला जे भोगावं लागते त्याची जखम ती आयुष्यभर विसरत नाही. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी पती मृत्युशय्येवर असतानाही त्याच्या प्रेयसी वा मैत्रिणीची जवळीक ती सहन करू शकत नाही. कदाचित त्या प्रेयसीच्या सानिध्याने त्याच्या शारीरिक, मानसिक अवस्थेत सुधारणा होऊ शकते. मात्र एखादादुसरा अपवाद वगळता कुठलीच पत्नी यासाठी परवानगी देत नाही. तिची ही खुन्नस जेवढी स्वाभाविक आहे तेवढीच त्या प्रेयसीची तगमगही सच्ची असते. ज्याच्यासोबत त्याच्या पत्नीपेक्षाही अधिक वर्षे घालविली,ज्याच्या सार्‍या सुख-दु:खात सोबत दिली त्याला साधं भेटताही येत नाही ही अवस्था तिला मानसिक उद्ध्वस्त करणारी असू शकते, हे सहसा कोणी समजून घेत नाही.अशा प्रकरणात सहानुभूती बायकोलाच असते. प्रेयसी, मैत्रीण ही शेवटी बाहेरचीच ठरते. अनेकदा प्रेयसी पैसा व मालमत्तेवर दावा करेल या भीतीतूनही तिला तिच्या प्रियकराला भेटू दिले जात नाही. कारणे काहीही असू द्या. त्या प्रकरणातील सत्यता त्या तिघांनाच माहीत असते. त्यामुळे बाहेरील कोणीही अशा प्रकरणाबाबत तर्क बांधणे चुकीचे ठरते. जॉर्ज फर्नाडिसांच्या प्रकरणात

नेमकं काय घडत आहे हे अल्मायझरमुळे त्यांना स्वत:ला तरी समजत आहे की नाही, कळायला मार्ग नाही. मात्र एका तडफदार, जिगरबाज नेत्याच्या आयुष्याचे अखेरचे दिवस कुठल्याही कारणामुळे वेदनादायी ठरू नये अशीच आपली सार्‍यांची इच्छा असेल.

(लेखक   शंकर बडे   दैनिक 'पुण्य नगरी'चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-8888744796

Monday, 3 September 2012

धर्माच्या मर्यादा समजून घेणे म्हणजे धर्मविरोधी असणं नव्हे!


डॉ.श्रीराम लागू हे आपल्या महाराष्ट्रातले प्रसिद्ध नट आहेत हे आपणा सर्वानाच माहीत आहे.पण ते केवळ नट नाहीत. एक विचारवंतही आहेत. भारतीय समाज नटाला विचारवंत म्हणून फारशी मान्यता देत नाही. नटाचं कर्तृत्व मात्र तो अलीकडे मान्य करू लागला आहे. डॉ. लागूंप्रमाणेच त्यांचे दुसरे समकालीन विचारवंत म्हणजे निळू फुले. आज निळू फुले हयात नाहीत; पण त्यांची मागे एकदा दूरदर्शनवर खूप मोठी मुलाखत येऊन गेली आहे. ज्यांनी ती पाहिली, ऐकली असेल त्यांना निळूभाऊ लोकशाही समाजवादी व्यवस्थेबद्दल किती जागरूकतेने बोलत होतेयाचा प्रत्यय आला असेल. राष्ट्रसेवा दलाच्या मंडळींना तर निळूभाऊ हे विचारवंत होते याची माहिती आहेच. आपण नटांना दुर्दैवाने चंगीभंगी मानतो. ही आणखी एक गैरसमजूत. या दोन्ही नटांच्या सहकार्याने डॉ. बाबा आढावांनी 'लग्नाची बेडी' हे आचार्य अत्रे यांचे प्रसिद्ध नाटक महाराष्ट्रभर सादर केले. या नाटकाचे सर्व उत्पन्न, सामाजिक कृतज्ञता निधी या संस्थेला देण्यात आला. या रकमेच्या व्याजातून महाराष्ट्रभरच्या थकलेल्या, निराधार सामाजिक कार्यकत्र्यांना काही रक्कम दिली जाते. नांदेडला हा प्रयोग घेताना ज्या कार्यकत्र्यांनी पुढाकार घेतलात्यात मीही एक होतो. ही आठवण मला धन्य करून जाते. असा काही निधी कोटय़वधी रुपये मिळवणार्‍या क्रिकेटर्सनी राष्ट्राला दिला त्याची मला मात्र माहिती नाही. अशा या दोन महान कलावंतांची 'लग्नाची बेडी'मुळे पुसटशी ओळख झाली. सुमारे 30-35 वर्षापूर्वी आणि ही ओळख त्या उभयतांनी मला नावासह ओळखावी इतकी दृढ झाली. याची मला स्वत:ला धन्यता वाटते.

या उभयतांची मला आज अचानक आठवण झाली. त्याचे कारण धर्माला विरोध आणि धर्माची मर्यादा यांतील फरक सामान्य वाचकांना समजावून सांगावा यासाठी. मागे एकदा केव्हातरी डॉ. लागूंनी विधान केले, 'देवाला रिटायर करायला हवे.' आणि आमचा बुद्धिप्रामाण्यवादी महाराष्ट्र खवळला. डॉ. लागूंचे कलेच्या क्षेत्रातील योगदान माहीत असूनही डॉ. लागूंचा निषेध झाला. अर्थात लागूंनी आपलं हे आवडतं मत टाकून दिलं नाही. आजही एखाद्या तरुण श्रोत्यांच्या कार्यक्रमाला गेले तर ते आपले मत ठणकावून सांगतात. त्यांचे मत ज्यांना मान्य आहे असे श्रोतेजोरदार टाळ्य़ा वाजवतात आणि त्यांचे मत अमान्य असणारी मंडळी 'जाऊ द्या, एवढं काय मनावर घ्यायचं. ते नट आहेत, दुर्लक्ष करा'असं परस्परांना सांगून मोकळे होतात.

'देवाला रिटायर करा' असं विधान करणारे डॉ. लागू धर्मविरोधी आहेत अशी आपली सर्वाची समजूत आहे. मार्क्‍सने तर 'धर्म ही अफूची गोळी आहे' असे म्हटले. मार्क्‍स हा मूलत: विचारवंत होता. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे परिणाम जागतिक पातळीवर झाले. मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाचा जगावर एवढा परिणाम झाला की, त्यातून अनेक मार्क्‍सवादी देश निर्माण झाले. रशिया या नावाचे असेच एक बलाढय़ राष्ट्र त्यातून निर्माण झाले. सोव्हिएत रशिया संघ भंग पावला. साम्यवादी राष्ट्रांची शक्ती क्षीण झाली आणि धर्माला नकार देणारे राष्ट्र दीर्घकाळ टिकू शकत नाही अशा आशयाचे विचारही ऐकायला येऊ लागले. मार्क्‍सवादी असणं म्हणजे धर्मविरोधी असणं हे

समीकरण आज रूढ झालेलं आहे आणि त्याला कारणेही तशीच आहेत. पण मार्क्‍सवादी मंडळीही काही धर्मप्रणीत आचारांचे पालन करू लागली की, ते ढोंगी आहेत असे त्यांच्यावर आरोप होतात. त्याचे महत्त्वाचे कारण असे की, धर्म या संस्थेचा सर्वमान्य असा एकच एक अर्थ आहे असे आपण गृहीत धरतो.

जगातल्या सर्व संस्थांपैकी धर्म ही प्राचीनतम संस्था आहे. इस्लाम धर्माचा इतिहास दीड हजार वर्षाचा आहे. ºिश्चन धर्माचा इतिहास दोन हजार वर्षाचा आहे. जनबुद्धांचा इतिहास अडीच हजार वर्षाचा तर वैदिक धर्माचा इतिहास किमान तीन हजार वर्षाचा आहे. पण या ज्ञात इतिहासाहूनही धर्म ही संस्था अधिक जुनी आहे. अधिक काटेकोरपणे सांगायचे तर जगातल्या भयप्रद आणि कल्याणकारी अशा अनेक घटनांचा कार्यकारणभाव न कळणार्‍या आदिम समाजाने 'यातू' शक्तीचा विचारही धर्म म्हणूनच केलेला आहे. 'यातू' याच शब्दाचा मराठी उच्चार 'जादू' असाही होतो. थोडक्यात, धर्म ही संस्था अत्यंत गुंतागुंतीची आणि अनेक घटकांनी मिळून तयार झालेली आहे. या संस्थेत देव, श्रद्धा, रूढी, आचार, नीती आणि कर्मकांड या सर्वच घटकांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांपैकी कोणत्याही एका घटकाला विरोध केला, की तो माणूस धर्मविरोधी आहे असे आपण समजतो. डॉ.लागूंनी देव नाकारला म्हणून ते धर्मविरोधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वण्र्य नाकारले म्हणून ते धर्मविरोधी. आज आर्यसमाजी हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी 19व्या शतकात जात ही संस्था नाकारली म्हणून ते धर्मविरोधी मानले जात. स्वामी दयानंद सरस्वतींचा पुण्याच्या सनातनी ब्राह्मणांनी गाढवाची मिरवणूक काढून निषेध केला होता तर म. फुल्यांनी दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीला संरक्षण दिले होते. म. फुले यांनी पूजापाठातील ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध केला म्हणून ते ब्राह्मणी व सनातन धर्माच्या विरुद्ध होते असे मानले जात असे. सर्वसामान्य माणसे धर्मविरोध म्हणजे नैतिक वागण्याला विरोध असा अर्थ घेतात तो अत्यंत चुकीचा आहे. हिंदू धर्माचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे आणि चिवट आहे. इथे अनेक देव मानणारा हिंदू असतो तसा एकच देव मानणारा हिंदू असतो आणि देव ही संकल्पनाच न मानणारा (नास्तिक) हाही हिंदूच असतो. हा झाला श्रद्धेचा घटक. इथे एक पत्नी करणारा हिंदू असतो. बहुपतीत्व मान्य करणारी स्त्रीही हिंदूच असते. हा झाला आचरणाचा घटक. या घटकाच्या तळाशी नैतिकतेचेही संकेत असतात. परस्परविरोधी श्रद्धाकेंद्र, परस्परांना अमान्य असणारा आचारधर्म आणि नैतिक संकल्पना देव आणि विश्व यांच्या निर्मितीसंबंधी परस्परांना अमान्य असणारे सिद्धान्त असे कितीतरी घटक हिंदू धर्मात येतात. त्यामुळेच येथील धर्मविरोधाची लढाई फार लवकर संपुष्टात येते. कारण ही लढाई संपविण्यासाठी अनेक घटकांना एकत्रित असणारे युक्तिवाद करता येतात. तुम्ही देव नाकारला की, इथला माणूस लगेच म्हणू शकतो, त्यात काय नवीन आहे? बुद्ध, चार्वाकांनी दोनअडीच हजार वर्षापूर्वीच देव नाकारला आहे. म्हणून ही लढाई 'धर्मश्रद्ध विरुद्ध धर्मनिष्ठ' अशी लढताच कामा नये असे मला वाटते. पु. भा. भावे हे जसे 'कादंबरीकार' म्हणून प्रसिद्ध होते तसेच 'हिंदुत्ववादी' म्हणूनही प्रसिद्ध होते. ते अतिशय प्रभावी वक्ता होते. मी त्यांची भाषणे ऐकली आहेत.

'मी आस्तिक का आहे?' या विषयावर त्यांचे नांदेडच्या प्रतिभा निकेतनमध्ये अतिशय प्रभावी असे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर होते. तेही पट्टीचे वक्ता. त्यामुळे आज कशी वैचारिक जुगलबंदी ऐकायला मिळेल यासाठी श्रोत्यांनी तुडुंब गर्दी केली होती. आम्ही सर्व भावे यांच्या व्याख्यानाने अतिशय प्रभावित झालो होतो. पण गुरुवर्य कुरुंदकरांनी अवघ्या दोन मिनिटांत समारोप केला. भावे आपले सन्माननीय व निमंत्रित पाहुणे आहेत. आपण त्यांचा अनादर करता कामा नये. मी त्यांची मते आता मुळीच खोडून काढणार नाही. पण उद्या याचवेळी याच ठिकाणी 'मी आस्तिक का नाही?' या विषयावर बोलणार आहे. आपण अवश्य यावे. एवढे बोलून ते खाली बसले. दुसर्‍या दिवशी गुरुवर्य कुरुंदकरांचे सामर्थ्यशाली वक्तृत्व आम्हांला ऐकायला मिळाले. ते त्यांचे भाषण वाचकांना उपलब्ध आहे.

मुळात धर्मश्रद्ध नसणं म्हणजे अनैतिकतेचे समर्थन करणं नव्हे. मानवी सौहार्द नाकारणंही नव्हे आणि पुन:पुन: माणसांना पराभूत करणार्‍या निसर्गातील चमत्काराकडे दुर्लक्ष करणंही नव्हे. धर्म हा दैवी शक्तीचा आधार घेत माणसांच्या ठिकाणी असणार्‍या बुद्धिमत्तेचा, कर्तृत्वाचा आणि न्यायबुद्धीचा अपमान करतो ही खरी देव आणि धर्मविरोधी असणार्‍यांची तक्रार आहे. आज जो काही विकास आपणाला आढळून येतो तो केवळ दैवी नाही. दैवी वाटणार्‍या निसर्गशक्तीचे गूढ उकलत माणसांनी घडवून आणलेला तो विकास आहे. पटकी आणि देवीचा आजार जगात होतो तो केवळ दैवी प्रकोपामुळे असं समजणारा माणूस दोनअडीच हजार वर्षे पूजाअर्चा करून मरत होता. पण तो रोग

जंतूंमुळे होतो आणि ते जंतू मारता येतात इथपर्यंत वैज्ञानिकांनी आम्हांला आणले हे विसरता कामा नये. धर्मश्रद्धा मानवीशक्तीला दुबळी करते एवढे आपण लक्षात घ्यायला हवे. माणसे धर्माने कुणीही असोत, पण माणसाच्या निर्मितीचे रहस्य संशोधनानेच उलगडता येते. हे ठामपणे मानणार असतील तर ती माणसे स्वत:ला हिंदू म्हणवून घेवोत की ºिश्चन, आपण त्यांचा आदरच करायला हवा. डॉ. लागू जेव्हा देव नाकारतात तेव्हा माणसाच्या संशोधनशक्तीला मारक ठरणार्‍या प्रतीकाला नाकारत असतात एवढे आम्हांला कळले तरी पुरे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

मै सोला बरस की..


''मन्या, आहे काय रे खोलीत?''

''तुम्ही कसे आले बाबा?''

''मी इकडे तहसीलवर आलो होतो.. जाता जाता तुह्या खोलीवर चक्कर टाकावं म्हटलं.''

''पन तुम्ही अचानक आले?''

''अचानक म्हनजे?''

''काही फोन गीन केला नाही.''

''बापाले पोराच्या भेटीसाठी फोन कायले करा लागते? पानीगिनी आन.. कसा काय चालू आहे तुहा अभ्यास?''

''चांगला सुरू आहे.''

''यंदा फायनल आहे... चांगला अभ्यास कर.. गेल्यासाली गॅप घेतला होता.. गॅपागॅपात अर्धी उमर

गमावतं काय लेका?''

''पानी घ्या''

''कुठी गेला तुहा रूम पार्टनर?''

''टिवशनले गेला.''

''अन् हे कोनाचे फोटो लावले खोलीत?''

''पार्टनरनं लावले''

''कोन व्हय हे?''

''हे इकडची कॅटरिना कॅफ अन् तिकडची मल्लिका शेरावत''

''म्हनजे दोघाइच्या दोन हायेत वाटते?''

''तसं काही नाही.''

''काय करतात ह्या बाया?''

''पिच्चरमधे काम करतात.''

''असे फोटो साजरे दिसतात काय घरात? एकीनं बांडा फराक घातला... दुसरीले झांपराचा पत्ता नाही.. हे चांगले लक्षनं आहेत काय?''

''सहज लावले ते''

''तुह्या मावशा आहेत काय त्या?''

''नाही बुवा''

''मंग कसे लावले? आपल्याले शिक्षन घ्या लागते... चांगले देवाचे फोटो लावाव...अगरबत्ती लावाव...''

''मच्छर अगरबत्ती लावत असतो.''

''ते काय कामाची? मन प्रसन्न झालं पाह्यजे... कोनंही म्हटलं पाह्यजे, की धार्मिक पोरं आहेत... ह्या अशा नटय़ा पाहून काय वाटन लोकाइले?''

''चहा पेता काय?''

''चहा सोडला म्या''

''चांगलं केलं''

''किती जनं राह्यतात या खोलीत?''

''आम्ही दोघंच राह्यतो.''

''मग हे पलंगाखालचे सिगरेटचे थोटकं कोनाचे आहेत?''

''ते पार्टनरचे... म्हनजे काल त्याचा मामा आला होता.. मामानं सिगरेटा ओढल्या.''

''आज टिवशनले गेला नाहीस काय?''

''नाही.''

''काहून?''

''सायकल पंचर झाली.''

''मग पैदल जावं.''

''पैदल दूर जा लागते. बाकीचे पोट्टे गाळ्या घेऊन येतात.''

''गाळ्या पिटालनं आपलं काम नाही बाबू... तुहा बाप कास्तकार आहे... साठ हजार पगार आहे काय मले? बाकीचे पोट्टे रईस बापाचे लेकरं आहेत.''

''जुनी फराळी गावी चालते आपल्याले.''

''पन् गाळी कायले पाह्यजे तुले? आपली सायकलच बरी हाये... पेट्रोल महाग झालं... चांगला शीक .. नोकरीवर लाग... एक चारचाकी गाळी घे... हे गाळ्या फिरोनारे पोट्टे रिकामचोट असतात.''

''कशावरून?''

''अभ्यास सोडून रिकामेच पोरीच्या मागं गाळ्या पिटालतात.. बापाच्या पैशावर मजा मारतात.''

''सायकलनं लय तकलीब होते.''

''जीवनात तकलीब भोगल्याशिवाय काही भेटत नसते बाबू.. आगुदर हाताले चटके बसतात मंग भाकर खायाले भेटते... तुहा मोबाईल वाजून राह्यला.. रिंगटोन त मस्त लावली रे... मै सोला बरस की, तू सतरा बरस का..''

''हॅला.. पिंके .. नंतर बोलतो... नाई नाई... तू येऊ नको... माहे बाबा आले रूमवर.''

''कोनाचा फोन आहे?'' ''प.. प.. पिंकीचा''

''कोन पिंकी?''

''कॉलेजमधली आहे.''

''कोनाची कोन?''

''माह्या क्लासमधे शिकते.''

''जास्त पोरीच्या लफडय़ात पडू नको... गेल्या साली पोरीच्या नादात तू

फेल झाला.''

''तुमाले कसं ठाऊक?''

''मले सारे रिपोट समजतात... बह्याळा समजला काय? अन् काय म्हनते ते पोरगी?''

''काही नाही.''

''कोन्या पोरीले रूमवर बलाऊ नको.. मानसाचं क्रेडिट जाते. असे लफडे दिसले, की घरमालक हाकलून देत असते.''

''आमचं तसं काही नाही.''

''ते पोरगी लय खेप तुह्या रूमवर येते वाटते?''

''बायचान्स येते.''

''कायले येते?''

''ग्रामर विचाराले.''

''म्हनजे तू मास्तरपेक्षा हुशार आहेस काय? तूच त लेका इंग्रजीत तीन खेपा फेल झाला.''

''मले नाही.. पार्टनरले विचारते.''

''म्हनजे ते तुले भेटाले येते अन् पार्टनरले विचारते, लय चतरी दिसते? तिच्या बापाचं नाव काय आहे?''

''बापाचं नाव ठाऊक नाही.''

''डबल भेटली, की तिच्या बापाचं नाव विचारून ये.''

''कायले?''

''मी तिच्या बापाले सांगतो, की परीक्षा झाल्यावर पोरीचं लगन उरकून टाका..लय वाया चालली तुमची पोरगी.. एकाले भेटते अन् दुसर्‍याले इचारते... म्हनजे दोन्ही तबल्यावर हात ठेवते.''

''तिचा स्वभाव साधा आहे.''

''साधा नाही.. ती तुह्यापेक्षा हुशार आहे... आता हे लफडे बंद कर... चांगला अभ्यास कर... नोकरीले लाग.. मंग अशा लय पोरी चालून येतीन..रिकामा राह्यला, की माह्यासारखे डवरे दाबा लागतीन...अन् या जमान्यात डवरे दाबनाराचं खरं नाही बाबू...आलं काय ध्यानात?''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

ह्या नभाने ह्या भुईला.


.माणसाच्या जगण्याला आकार देण्यात भाषा आणि शब्दांचे योगदानच खरे महत्त्वाचे असते. एखादे वाक्य, एखादी ओळ, एखादा शब्द आपलं जीवन उभं करीत असतो. हे एखाद्या नव्हे, तर अनेक उदाहरणांद्वारे पटवून देता येईल. त्यासाठी 'हर हर महादेव' हे एकच घोषवाक्य पुरेसे आहे. अशाच शब्दांचा, वाक्याचा आधार घेऊन समूह संघटना, सैन्यदल, समाजमन, समाजजीवन उभं राहिलेलं आहे. असं जगभरातल्या विविध संघटना, पक्ष, उद्योगसमूह यावरून दिसून येईल. तेवढा एक शब्द किंवा विधान उच्चारले, की अर्थाची अनेक वलये उभे करणारे आशयविश्व आपल्यापुढे साकार होते.

जसे सामूहिक पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवरसुद्धा त्या दिशेने प्रेरित आयुष्य उभे करण्यात शब्दांचे फार मोठे योगदान असते. संपूर्णपणे शेतीवर राबणारे असे माझे 'शेती कसे' कुटुंब होते. शेतीवर घरातल्या लहानांपासून तर मोठय़ांपर्यंत आपापल्या कुवतीप्रमाणे कामाची विभागणी होऊन त्या-त्या पद्धतीचे काम आनंदाने करणारे, जे कुटुंब खेडय़ापाडय़ात सर्वदूर कार्यरत असते ते 'शेती कसे' कुटुंब. जे प्रत्यक्ष शेतावर राबत असते तर 'शेती पोसे' वर्गातील जे सधन, श्रीमंत शेतकरी असतात. जे केवळ बांधावर उभे राहून मजूरदारवर्गाकडून आपली शेती कसून घेऊन आपण होबासक्या करून जगत असतात ते 'शेती पोसे' शेतकरी असतात. अर्थात, शेतकरी नसणारे इतर उद्योग, व्यवसाय, नोकरी, धंदा करणारे लोकंसुद्धा याच वर्गात मोडत असतात.

अशा 'शेती कसे' कुटुंबात मला विद्यार्थिदशेपासूनच विविध कामे करावी लागायची. सकाळ-संध्याकाळ हंगामी पिकांवरची पाखरे हाणायला जाणे. खळ्य़ादळ्य़ाच्या वेळी, उन्हाळ्य़ात घरची गुरे राखणे, पाणी भरणे, शेण काढणे, नंतर हळूहळू वखर, कोळपे, तिफण, औतफाटे चालवणे असं कोणत्याही शेतकर्‍याच्या कुटुंबातील मुलाचं कामाच्या बाबतीत प्रमोशन होतं. तसं माझं सुरू होतं. कथा, कादंबरी किंवा ललितगद्य असं गद्य स्वरूपाचं वाचक एकदा वाचतो व त्यातून वेगळा होतो. पण कवी मात्र पुन्हापुन्हा वाचून त्यात गुरफटून जातो. याच काळात लोकगीते, लोककथा, रेडिओवर वाजणारी चित्रपटगीते हे मनोरंजनाचं साधन होत. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त काही वाचायलाही मिळायचं नाही आणि शालेय पुस्तकातही जे पाठ, कविता असायच्या त्याही काही आपल्या वाटायच्या नाहीत. कुठलं तरी दूरचं, अप्राप्य, आपलेपणा न वाटणारं ते विश्व होतं आणि याच काळात आपलं जीवन हे जिचं आशयविश्व आहे असं काही वाचायला, पाहायला कलाकृतीच्या माध्यमातून मिळतं तेव्हा आस्वाद पातळीवर होणारा आनंद खरोखर अवर्णनीय स्वरूपाचा असतो. याची जाणीव मला नवव्या वर्गातली 'ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे' ही कविता वाचून झाली.

माझ्या गावातील, माझ्याभोवतीचा समाज ह्या ओळींभोवती आयुष्यभर रुंजी घालून तर जगत होता. उन्हाळाभर नांगरणी, वखरणी करून तो मृगनक्षत्रातील पावसाची वाट पाहत होता आणि म्हणून मंदिरातल्या सगळ्य़ा आरत्या आणि प्रार्थनेपेक्षा मला ही प्रार्थना, ही आळवणी, ही विनवणी अधिक मानवी, अधिक उत्कट, जगण्याशी निगडित वाटत होती.

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्य़ाला चांदणे लखडून जावे..

एकाच वेळी सृजनाची प्रतीक्षा, अध्यात्मातील 'पुण्य' ही संकल्पना आणि मानवी पोटाच्या भुकेच्या पूर्तीसाठी आवश्यक असणारे जोंधळे, शेतकर्‍याचे प्राण भुईत गुंतलेले असणे, शेतावरची फाटकी झोपडी स्वत:च्या काळजाइतकीच जपणे आणि स्वत:च्या पोटापाण्याच्या इच्छेप्रमाणेच जगाच्या पोटाच्या भुकेची चिंता वाटणे. एवढे सगळे अर्थ -'बाळा, तू बोंबलू-बोंबलू, रानोमाळ उधळून जे गाणं म्हणतो त्या गाण्यात आहेत' असं माझी ही कविता ऐकून-ऐकून मायने जेव्हा असा अर्थाचा उलगडा करून दाखवला. तेव्हा तर आत्ताराकडून कमरेत बांधायला आणलेल्या लाल करदोडय़ाचा गुंता उलगडावा तसा मनस्वी आनंद मला झाला. नंतर ना. धो. महानोरांची 'सांजावताना' वार्‍याच्या गंधगर्भ लयीने आकाश कसं ओथंबून येतं ही कविता अकरावीत आणि -

पानांत छंद धुमसतात झाडे झिंगून जातात

पिवळ्य़ा बांबूच्या गीतगंगेत पक्षी बुडून जातात

ही कविता बारावीत वाचण्यात आली असावी. कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या किंवा मासिकाच्या मुलाखतीत, ग्रंथालयातून या कवीची आणखी एक कविता वाचण्यात आली. ती माझ्या शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाचे मनोगत बोलून दाखवत आहे. असंच कायम वाटत राहायचं.

ह्या शेताने लळा लाविला असा असा की

सुखदु:खाला परस्परांशी हसलो, रडलो

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..

शेतीचं आणि शेतकर्‍यांचं जन्मापासून तर मरणापर्यंतच नातं केवळ भुईतून उगवलेला माणूसच लिहू शकतो आणि भुईतून उगवून कायम भुईच्या अंगाखांद्यावर वावरणारा भुईनिष्ठ शेतकरीपुत्रच हे अद्भुत रसायन आपल्या मनाशी गोंदवून घेऊन जगू शकतो. कष्टतानाही भूमिपुत्राचा आनंद त्याच्या दैनंदिन कामातून त्याला कसा मिळत जातो. भुईवर कष्टत असतानाच त्याच्या मनात दाटून येणारी भुईनिष्ठ स्वप्नांची झुंबरं त्याला मानसिक पातळीवर किती समृद्ध, किती श्रीमंत करून जातात याची प्रचिती मला त्या कळत्या वयातच येऊन गेली आणि या शब्दांपायी चांगल्या अर्थाने मी खरोखर पागल झालो.

उन्हाळ्य़ात उघडय़ा पडलेल्या लपणीच्या जागा पाऊस पडल्यावर पुन्हा पूर्ववत होतात. कारण भुईतून उगवलेल्या अनेक वनस्पतींनी आता तिच्या अंगाखांद्यावर बागडायला सुरुवात केलेली असते. झेपावणार्‍या वेलींनी झाडांच्या खोडफाद्यांना विळखे मारून त्यांना झांजरून, मोहरून, गुदगुदून टाकलेलं असतं. सगळा निसर्ग विविधांगी रंगाकाराने, मस्त तालेवार झालेला असतो. हिरव्या रंगाने सृष्टीच्या अंगोपांगी आपलं अधिराज्य स्थापन केलेले असतं आणि तसाच आपल्या मनाचाही ताबा शब्दातल्या अर्थाच्या तालेवारपणाने घेतलेला असतो.

घराच्या कष्टासाठी, शेतावर राबणार्‍या हातांच्या गरजेपायी माझं बारावीनंतरचं शिक्षण थांबलं होतं. पण झाडाला वेलीने गुरफटून घ्यावं तसं या शब्दांचं वेढलेपण मनाभोवती होतं. म्हणून मग माझ्या आयुष्यातली मी पहिली पुस्तक खरेदी केली. पॉप्युलर प्रकाशनकडे मनिऑर्डर पाठवून 'रानातल्या कविता' आणि 'वही' हे दोन कवितासंग्रह विकत घेतले आणि त्यातल्या कवितांनी पुन्हा माझं जगणं शब्दांच्या माध्यमातून कलाकृतीच्या आकृतिबंधात अभिव्यक्त झाल्याचं पाहून मीही मग बांधावरचे वेलविळखा तोलणारे जडभारी झाड झालो.

शेतावर पेरणी करताना मधेच पावसाचा ठोक यायचा आणि औतं थांबवून पाऊस ओसरण्याची वाट पाहत मग आम्हीही जोरजोरात ओरडत हात उंचावून म्हणत राहायचे -

चिंब झाली पावसाने दूर राने

गर्दशी ओली निळाई डोंगराने

मुग्ध बेहोशीत आम्ही गीत गातो

वादकाचा देह आता झिंगल्याने..

कारण ती गर्दशी निळाई सभोवार असायची. पावसाने चिंब झालेलं रान सभोवार असायचं आणि भुईवर कष्टत असताना आपल्या ओठावर गाणं येणं हे तर त्या भुईचंच सृजन-अनुकरण असतं.

माणसाचं जगणं आणि लिहिणं जेव्हा असं सेंद्रिय पातळीवर एकजीव होतं तेव्हाच तो साहित्यबंध लाख लाख रसिकांच्या हृदयाचा ठाव घेऊन त्यांना आपलंसं करून घेत असतो. कारण या शब्दांचं स्वरूप थेट -

आषाढाला पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा

दु:ख भिरकावून येती शब्द माहेरपणाला..

अशा पद्धतीचं असतं !

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास','तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादबंर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ, ता.मेहकर, जि. बुलडाणा

Saturday, 1 September 2012

नशीब : नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट


'कुणीही ज्योतिषी बनू शकतो, भविष्य सांगू शकतो. त्याला काहीही माहीत नसताना त्याचं भविष्य 50 टक्क्यांपेक्षा अधिक बरोबर निघू शकतं' हे गेल्या शनिवारच्या अंकात लिहिलं होतं. याला म्हणतात,''लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी.'' शक्याशक्यतेचा नियम. गरोदर बाईबाबतचं आपलं भाकीत का व कसं खरं ठरू शकतं ते आपण पाहिलं.

समजा आपण सारे परीक्षेला बसलो आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'होय' अथवा 'नाही' असं टिकमार्क करायचं आहे. मीही तुमच्यासोबत परीक्षा देतो आहे. मी मुळीच अभ्यास केला नाही. 100 प्रश्नांपैकी मला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही. म्हणजे माझी लायकी भोपळा (शून्य) मिळण्याची आहे. पण मी जर थोडी अक्कल वापरली आणि सारीच्या सारी उत्तरं 'होय' अशी टिकमार्क केली, तर?

कदाचित शंभरपैकी पन्नास प्रश्नांची उत्तरं अचूक निघतील. मला 50 टक्के मार्क्‍स मिळतील. कदाचित 70 प्रश्न बरोबर ठरून 70 टक्के मार्क्‍स मिळतील. पण मला शून्य मार्क्‍स मिळतील का? शक्य नाही. कारण त्यासाठी मला सारे प्रश्न चुकवावे लागतील. खरी उत्तरं माहिती नसल्यामुळं ते मी चुकवू शकणार नाही. कमीतकमी 30 प्रश्न बरोबर निघतील आणि मला 30 टक्के मार्क्‍स मिळतील. म्हणजे माझी लायकी भोपळा मिळण्याची असतानासुद्धा मला 30 ते 70 टक्के यामधील कितीही मार्क्‍स मिळू शकतात. हा निसर्गातील चान्स फॅक्टर, शक्याशक्यतेचा नियम कळला आणि विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं व्हायला लागली. ज्यावेळी निसर्गात, कोणत्याही विषयात ही 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी' ओलांडणारी भाकितं वारंवार खरी ठरतात. म्हणजे 100 घटनांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक घटनांची भाकितं अचूक ठरतात. त्यात काही तथ्य आहे असं मानलं जातं. मग त्या विषयाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो. त्यात सातत्यानं हा शक्याशक्यतेचा नियम ओलांडणारे रिझल्टस् मिळत गेले तर त्या विषयाला विज्ञानाचा दर्जा मिळतो. त्या विषयात अधिक संशोधन करण्यास प्रोत्साहन दिलं जातं.

मानवजातीला, विज्ञान जगताला, शक्याशक्यतेचा नियम गवसला आणि मग विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं झाली. शारीरिक विज्ञानात सजेशनचं सामर्थ्य (मनावर होणारा सूचनांचा परिणाम) कळलं आणि मेडिकल सायन्समधील मेडिसीनची प्रगती झपाटय़ानं झाली. सार्‍या मानवजातीचं आयुर्मान आश्चर्यकारकरीत्या वाढलं. औषधांच्या चाचण्या घेताना 'प्लासिबो' इफेक्ट तपासला जातो. एकाच प्रकारचं दिसणारं औषध दोन वेगवेगळ्या ग्रुपला दिलं जातं. त्या औषधाचे परिणाम होणार आहेत, हे दोन्ही ग्रुपला सांगितलं जातं. एका ग्रुपला खरं औषध दिलं जातं. दुसर्‍या ग्रुपला मात्र तशाच वेष्टणात औषधी गुणधर्म नसलेली नुसतीच पावडर (वा गोळी) दिली जाते. आता दुसर्‍या ग्रुपला औषध दिलेलं नसतानाही काही लोकांबाबत परिणाम मिळतात. हे औषधासोबत सांगितलेल्या सजेशनचे (असे असे परिणाम होणार आहेत) परिणाम असतात. पहिल्या ग्रुपला 'ज्याला खरं औषध दिलं असतं.' जर दुसर्‍या ग्रुपपेक्षा अधिक प्रमाणावर परिणाम मिळाले तरच त्यात काही औषधी गुणधर्म आहेत असं मानलं जातं. या चाचण्यांचे वारंवार असेच परिणाम मिळाले तर त्या औषधाला मान्यता मिळते. हे औषध सजेशनचं सामर्थ्य ओलांडून रिझल्टस् देऊ शकत असल्यामुळं औषधांच्या क्षेत्रात प्रगती साधता आली. त्याचप्रमाणं शक्याशक्यतेचा नियम ओलांडून तपासणी करण्याच्या पद्धती विकसित झाल्यानं विज्ञानाची प्रगती झाली.

माणसाच्या दहा लाख वर्षाच्या आयुष्यात मानवजातीनं गेल्या 150 वर्षात उरलेल्या 9 लाख 99 हजार 850 वर्षापेक्षा अधिक प्रगती केली. त्यामागचं हे कारण आहे. आपल्याला सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती, सायंटिफिक मेथड सापडली आहे. या वैज्ञानिक पद्धतीचा काटेकोर वापर करून आज प्रत्येक क्षेत्रातलं सत्य तपासलं जातं. या फुटपट्टीवर जे खरं ठरत नाही., वैज्ञानिक पद्धतीच्या कसोटीवर जे खरं उतरत नाही त्याला कचरा, पालापाचोळा समजून फेकून दिलं जातं. सोळावं ते विसावं या चार शतकांमध्ये फलज्योतिषाला वारंवार वैज्ञानिक कसोटय़ांवर तपासण्यात आलं. ते कधीच 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी'ची शक्याशक्यतेची कसोटी ओलांडू शकलं नाही. म्हणून वैज्ञानिक जगतातून त्याला हद्दपार करण्यात आलं आहे. आता फलज्योतिष हे केवळ आपल्या अंधश्रद्धाळू मनांमुळं जिवंत आहे आणि काही अंधश्रद्धा जोपासण्याचा विडा उचललेल्या कालिदास संस्कृत विद्यापीठांसारख्या विद्यापीठात जिवंत आहे. पण या अभ्यासक्रमांना वैज्ञानिक मान्यता नाही.

पंचांगामध्ये दोन भाग असतात. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रहण हा ग्रहगोल, गती, स्थान यासंबंधित अभ्यास खरा असतो. त्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो. तो आजच्या काळात 100 टक्के अचूक सांगता येतो. पंचांगामधला दुसरा भाग शुभ, अशुभ मुहूर्त, राहू, केतू, काळ, भविष्य, राशिभविष्य हे सारं निर्थक असतं. त्याला कोणताही आधार नसतो.

सारी भारतीय माणसं शुभमुहूर्तावर लग्न करतात. शुभकार्याला सुरुवात करतात तरी अनेकांची लग्न फसतात. अनेकांचे व्यवसाय, कार्य बुडतात. तरी आपला विश्वास मात्र कायम असतो.

हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या सावरकरांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, ''आमचे पेशवे प्रत्येक काम मुहूर्त पाहून करीत असत. संकट आलं तर गणपती पाण्यामध्ये बुडवून ठेवत असत.पण कधीही मुहूर्त न पाहणार्‍या इंग्रजांनी कधीही सूर्य मावळत नाही एवढय़ा मोठय़ा पृथ्वीच्या भूभागावर आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्त पाहणार्‍या आमच्या पेशव्यांची पेशवाई मात्र गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.'' किंवा स्वामी विवेकानंद म्हणत असतात, ''जोवर या देशातला तरुण नशिबावर विश्वास ठेवतो, नशिबात असेल तसंच घडतं यावर विश्वास ठेवतो तोवर या भारत देशाला भवितव्य नाही.'' तुमचं माझं नशीब आधी ठरलं असेल तरच ज्योतिष्याला कुंडलीच्या आधारे ते सांगता येईल. पण ते आधीच ठरलं असतं? जर ते आधीचं ठरलं असेल तर तुम्हाला मला करण्यासारखं काही उरतं काय? खरंच कुणाचा नशिबावर 100 टक्के विश्वास असतो? मी माझ्या दर भाषणात जाहीररीत्या विचारतो, ''नशिबावर कुणाचा 100 टक्के विश्वास आहे का? जो 'हो' म्हणेल, त्याच्याजवळ मी येतो. एक जोरदार थापड मुस्काटात मारतो. म्हणतो बाबारे, तुझ्या नशिबात होतं तू झापड खाल्लीस, माझ्या नशिबात होतं मी मारली, चालेल का?''

आपल्यापैकी एकालाही हे मान्य होणार नाही. जोपर्यंत मानव आपल्या मेंदूनं झापड मारण्याचं ठरवत नाही तोवर ते झापड मारणार नाहीत. म्हणून झापड मारणार्‍याचा तो निर्णय असल्यामुळं त्या कृत्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे, परिणामस्वरूप शिक्षा भोगली पाहिजे. ज्योतिष्याचा आधारच 'नशीब ठरलं आहे' हा आहे. आणि आपलं नशीब वगैरे काहीही ठरलेलं नसतं. ही निव्वळ नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट आहे. आपण भारतीय माणसं हजारो वर्षापासून या नशिबाच्या पळवाटीनं पळतो आहोत.म्हणूनच हजारो वर्षापासून आपल्या देशात जात व्यवस्था टिकली, अस्पृश्यता टिकली. गाईवर प्रेम करणारी, गाईची पूजा करणारी माणसं हजारो वर्षे इतर माणसांना शूद्र लेखून ढोरापेक्षाही वाईट जीवन जगायला मजबूर करू लागली.

आपला समाज कधीच एकसंघ नव्हता. तो जातीजातींमध्ये विखुरला होता. म्हणून 500 वर्षे लुटालुटीची आणि आठशे वर्षे गुलामगिरीची या भारताला भोगावी लागली. अब्राहम लिंकनचं एक प्रसिद्ध वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी उच्चारत असत, ''गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामगिरीविरुद्ध बंड करून उठेल.'' भारतात जाती-अस्पृश्यतेच्या नावावर गुलामगिरीसोबतच दोन हजार वर्षापेक्षा अधिक काळ वेठबिगारी लादली गेली, पण त्याविरुद्ध कधीच बंड झालं नाही. कारण कर्मविपाक सिद्धांताचं अद्भुत रसायन.''बाबारे, तू अस्पृश्य का? शुद्ध का? तर गेल्या जन्मात पाप केल्यामुळं. बाबारे, हा ब्राह्मण का? तर गेल्या जन्मात पुण्य केल्यामुळं. त्यामुळं या जन्मात तुझ्या नशिबात जे आलंय ते निमूटपणे भोग. मुकाटय़ानं सहन कर. कदाचित असा वागलास तर पुढच्या

जन्मात, या जन्मातील पुण्यसंचयामुळं चांगला जन्म मिळेल.'' भारतीय माणसं फक्त गेल्या जन्माचं पापच फेडत आलीत. डोकचं पार गुलाम करून टाकलं होतं या संकल्पनेनं. म्हणून भारतात कधीच जातिव्यवस्थेविरुद्ध बंड झालं नाही. ज्योतिष्यावरचा विश्वास म्हणजे भविष्यावरचा विश्वास. आपली कुंडली मांडली जाते, ती खरी असते? त्याला काही शास्त्रीय आधार आहे? त्यातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो? हो जाता जाता, गेल्या शनिवारच्या लेखानंतर एकाचा मला चिडून 'एसएमएस' आला. 08275948967 या फोनवरून 'तुम्ही उद्या मरणार आहात.'25 तारखेला दुपारी 2.05 वाजता आलेला हा 'एसएमएस' बहुधा एखाद्या चिडलेल्या ज्योतिषाचा असावा. पोलिसांत तक्रार करण्यापेक्षा मी वाचकांनाच कळविलं. मी अजून जिवंत आहे. काय म्हणाल तुम्ही? ''कावळ्याच्या शापानं..''

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832