असे अनेक प्रकारचे फोबिया आपल्या जीवनात असू शकतात. झू फोबिया प्राण्यांची भीती, क्लॅस्ट्रो फोबिया बंद जागांची भीती, उघडय़ा जागांची भीती, अनोळखी माणसांची भीती, रक्ताची भीती, अंधाराची भीती, भीती वाटण्याचीच भीती अशा कितीतरी प्रकारच्या भीती मानवी जीवनात असतात. या तार्किकदृष्टय़ा अप्रस्तुत असतात. चुकीच्या असतात. प्रमाणाबाहेर असतात म्हणून खोटय़ा असतात. तरी अंतर्मनासाठी मात्र 100 टक्के खर्या असतात. एक गृहस्थ गणपतराव एका जिल्हास्थळी राहतात. 20 मैलावर असणार्या एका गावातील शाळेत शिक्षक आहेत. रोज बसने जातात-येतात. बसस्टँडपासून त्यांचं घर केवळ 5-7 मिनिटं पायी अंतरावर आहे. पण ते कधीही पायी घरी जात नाहीत. जाऊ शकत नाही. रिक्षेवाला एवढय़ा कमी अंतरावर यायला तयार नसतो. पण रिक्षाला दुप्पट, कधी तिप्पट रक्कम मोजूनच ते घरी परततात. जातानाही हीच अवस्था. मुलांना बाबांसाठी रिक्षा पकडून आणावा लागतो. का? त्यांना कुर्त्यांची प्रचंड भीती वाटते. एकदा रिक्षांचा स्ट्राईक होता. गणपतरावांना नाइलाजानं स्टँडवरून पायी घरी यावं लागलं. मोठी हिंमत करून, जीव मुठीत घेऊन ते पायी निघाले. गल्लीबोळात भरपूर मोकाट कुत्री. कुत्री पाहताच गणपतराव घाबरले. पाय थबकले. कुर्त्यांनी बरोबर ओळखलं. ते जोरजोरानं भुंकू लागले. गणपतराव आणखीच घाबरले. थरथर कापू लागले. कुर्त्यांनी भुंकून भुंकून रान उठवलं. आपल्या भाईबंदांना निमंत्रण धाडलं. पाहता पाहता 20-25 कुर्त्यांनी थरथर कापणार्या, जागच्याजागी थांबलेल्या गणपतरावांना गराडा घातला. आजूबाजूच्या माणसांचं लक्ष गेलं. त्यांना ओळखणार्या एका दुकानदारानं धाव घेतली. इतरांच्या मदतीनं कुर्त्यांना पिटाळून लावलं. पण गणपतरावांचं ब्लडप्रेशर एवढं वाढलं होतं, की त्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं. नॉर्मल व्हायला 4-5 दिवस लागले. पण गणपतरावांचा फोबिया मात्र अधिक वाढला. ते अधिकच पंगू बनले. एरवी आपल्या जीवनात इतर कशालाही न घाबरणारा माणूस पण कुत्रा-फोबिया पायी अपंग झाला. घरी मोटारसायकल आहे. चालवता येते; पण चालवत नाही. कारण कुत्री मागे लागतात. त्यांना कितीही समजावून सांगा, ''अहो, कुत्रा नेहमीच चावत नाही. हजारो माणसं रस्त्यावरून चालतात. सगळ्य़ांनाच कुत्रा चावतो कां? बरं चावला तर चावला अँण्टिरेबिज इंजेक्शन घेतलं की झालं. आजकाल तीनंच घ्यावे लागतात. त्याचा फार त्रासही होत नाही.'' गणपतराव म्हणतात, ''हे सारं मला माहीत आहे. मी शाळेत शिकवतो हे सारं. पण मला भीती वाटते.'' या ठिकाणी गणपतरावांचं कॉन्शस माइंड, जागृत मन घाबरत नाही, तर त्यांचं सबकॉन्शस माइंड अंतर्मन घाबरतं आणि अंतर्मनाला तर्कशास्त्र पटत नाही. कळत नाही. ते आपल्या अनुभवाला महत्त्व देतं. गणपतराव 7 व्या वर्गात शिकत होते. तोवर तो एक नॉर्मल मुलगा होता. कुर्त्यांना फारसे घाबरत नसत. घरी ज्योतिषी आला. त्याने गणपतचा हात पाहिला. पत्रिका पाहिली. इतर भविष्य सांगताना सांगितलं, ''सावध राहा. चार पायांपासून सावध राहा. धोका संभवतो.'' आता ज्योतिष्यांचा धंदाच असा. असं सांगितल्याशिवाय चालणार कसं? गंडांतर टाळण्यासाठी ज्योतिष्यानं ताईत बनवून दिला. 500 रुपयांचा तो ताईत गणपतच्या गळ्यात बांधण्यात आला. त्या दिवसापासून घरातले सगळे, विशेषत: आजी त्याला 'चार पायांपासून सावध राहण्याची'सूचना वारंवार देऊ लागले. एक दिवस शाळेतून घरी एकटंच येताना गणपतवर कुत्रं भुंकू लागलं. एरवीही असं घडायचं. त्या वेळी गणपत थांबायचा. दगड उचलून कुर्त्याकडे भिरकावला, की ते पळून जायचं. आज मात्र गणपतला आठवलं, 'चार पायांपासून सावध' कुर्त्यालाही चार पाय आहेत आणि घाबरून आपलं जड दफ्तर घेऊन पळत सुटला. कुत्रं मागे लागलं. इतरही कुत्री मागे लागलीत. एका कुर्त्यानं गणपतच्या पायाचा चावा घेतला. तेवढय़ात इतर लोक धावून आले. कुर्त्यांना पिटाळलं. 14 इंजेक्शन घ्यावे लागलेत आणि गणपतच्या आयुष्यात कुत्रा-फोबिया सुरू झाला. अजूनही तो 500 रुपयांचा ताईत गणपतच्या गळ्यात आहे. पण त्याला काही कुत्रे घाबरत नाहीत. फक्त ज्योतिष्याच्या पोटाची सोय झाली. पण गणपतच्या बोकांडी कुत्रा-फोबिया बसला. अनेकांना आयुष्यात कुत्रे चावतात. सार्यांनाच कुत्रा-फोबिया होता कां? नाही ना? मग.. ज्योतिष्याच्या भाकितामुळं 'कुत्रा चावण्याचा अनुभव' गणपतच्या अंतर्मनावर अधिकच खोलवर परिणाम करून गेला आणि या भीतीला इतरांनीही अंधश्रद्धेपायी खतपाणी घातलं. गणपतरावांना ही भीती घालवता येईल? कशी? गेली 22 वर्षे मी 'व्यक्तिमत्त्वविकास' कार्यशाळा चालवतो आहे. त्या माध्यमातून अक्षरश: हजारो माणसांची भीती, फोबिया घालविण्यासाठी मदत करता आली आहे. हजारोंना भीतीमुक्त होताना मी अनुभवतो आहे. पण मी स्वत: वयाच्या 19-20 वर्षापर्यंत अतिशय भित्रा होतो. मंत्रतंत्र-जादूटोणा प्रकारांना प्रचंड घाबरत असे. पायामध्ये चप्पल घातल्याशिवाय चालण्याची प्रचंड भीती वाटायची. 'पायाखालची कुणी माती घेतली आणि त्याची जारणमारणाची बाहुली बनवली तर..! तिकडे त्या मांत्रिकानं त्या बाहुलीची मान मोडताच इकडे आपली मान ताडकन तुटून पडेल' याची मला प्रचंड भीती वाटत असे. रस्त्यात काही मंत्रवलेलं पडलं असेल तर तिथून माघारी फिरत असे. दुसर्या रस्त्यानं जात असे. वडिलांची प्रचंड भीती वाटायची. मुलींची भीती वाटायची. खरं म्हणजे त्या काळात मला सगळ्याच प्रकारांची भीती वाटायची. माझं वाचन प्रचंड होतं. माझा सर्वाधिक वेळ वाचन करण्यात जात असे. आपल्यात काही नाही. आपण नगण्य आहोत. आपल्याला विनोबा, आचार्य दादा धर्माधिकारी, जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारखं बनता यावं. थोडसं तरी त्यांच्यातलं काही आपल्याला साध्य करता यावं असं खूप तीव्रतेनं वाटत असे. तेवढय़ात एक वाक्य वाचनात आलं. 'या जगात भीती घालविण्याचा एकच मार्ग आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीला मुद्दाम फेस करा. सामोरे जा. वारंवार ती गोष्ट करा. मेलो तरी चालेल या जिद्दीनं सामोरे जा.' हे वाक्य मनाला भिडलं. कुणाचं होतं ते आठवत नाही. पण माझे प्रयोग सुरू झाले. पहिला प्रयोग वडिलांबाबत. त्यांच्यासमोर मुद्दाम उभं राहायचो. त्यांचं लक्ष गेलं, की, ''काय रे, काय काम आहे?'' करडय़ा आवाजात ते विचारायचे. ''काही नाही,'' माझं उत्तर. चारपाचदा असं घडल्यावर त्यांचा स्वर खाली आला. मृदू आवाजात त्यांनी विचारलं, ''का रे, तुला काही हवं कां? काही बोलायचं आहे कां?'' त्यांचा तो मृदू आवाज ऐकताच मला वाटलं मी जिंकलो. ''काही नाही'' म्हणून निघून आलो. पण त्या दिवसापासून वडिलांविषयीची भीती मात्र कमी झाली. माझा उत्साह वाढला. मी वर्धेला सायन्स कॉलेजमध्ये शिकायचो. 1971-72 सालची गोष्ट. त्या काळात कॉलेजमध्ये मुलंमुली एकमेकांशी बोलत नसत. कॉलेज सुटलं, की मुलं मुलींना खूप त्रास देत. टॉण्टिंग करणं, फुलं, कागदी बाण फेकून मारणं, कधी सायकली आडव्या घालणं सर्रास चालायचं. सारे तरुण शम्मी कपूर वा जितेंद्रची अवलाद बनून वावरायचे. अशा वातावरणात मी एक शामळू, खादी घालणारा, मान खाली घालून चालणारा मुलगा म्हणून असेल कदाचित. पण एक दिवस आमचा वर्ग सुटल्यावर अचानक चारपाच मुलींचा घोळका समोर आला. मला म्हणाला, ''तुमची प्रॅक्टिकलची वही देता कां? आम्हांला काही प्रॅक्टिकल्स पूर्ण करायचे आहेत.'' मी घाबरलो. हडबडून ''हो'' म्हणाले. माझा गोंधळ उडाला. वही हातात घेतली; पण माझा हात एवढा थरथर कापू लागला, की मुलींच्या हातात ती जाण्याआधीच खाली पडली. सारे खो-खो हसू लागले. मुलीही हसल्या. मुलांनी खूप टिंगल केली. मला खूप वाईट वाटलं. मी फेस करण्याचा प्रयोग करायचं ठरवलं. पण जमेना. रोज ठरवायचो. 5-6 दिवस निघून गेले. एक दिवस एक मुलगी एकटी सापडली. वर्गातून बाहेर पडताना तिला म्हटलं, ''एक्स्क्यूज मी!'' ती थांबली. शांतपणे म्हणाली, ''काय काम आहे?'' मला सुचेना! आता काय म्हणावं? एवढं म्हणण्यासाठीच 5-6 दिवस लागले होते. मी म्हणालो, ''काही नाही, थॅक्स. जा.''आणखी दोनतीन मुलींबाबत हाच प्रयोग रिपीट केला. मुलींना कळेना काय प्रकार आहे. 'एक्स्क्यूज मी' म्हणतो, थांबवतो; जा म्हणतो.त्यांच्यात चर्चा सुरू झाली. पण तिथून दीडदोन वर्षानंतर मी जयप्रकाश नारायणांच्या तरुणशांती सेनेचा वर्धा जिल्हा संघटक होतो आणि मी मुलांबरोबरच मुलींशीही छान संवाद साधू शकत असे. मोकळेपणानं बोलू शकत असे. पुढे जयप्रकाशाजींचं आंदोलन प्रखर झालं. मीही देशभर हिंडू लागलो. आणीबाणी लागण्याच्या काही दिवस आधीची गोष्ट. मी बर्यापैकी निर्भय झालो होतो. 'हमला चाहे जैसा हो, हाथ हमारा नहीं उठेगा' असले नारे द्यायचो. संघटनेचं राज्यपातळीरचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पेलत होतो. एकदा खेडय़ावर जावं लागलं. ट्रेन उशिरा पोहोचली. त्यामुळं स्टँडवर उशिरा पोहोचलो. 4 कि.मी.पर्यंत पायी जायचं. रात्रीची वेळ. मधे आमराई. त्यात एक पडकी विहीर. तिथे खूप भुतं असतात असं ऐकलेलं. मला दहाव्या वर्गात असताना भूत लागलेलं - ते मांत्रिकानं उतरवलेलं - मी प्रचंड घाबरलेलो. स्वत:ला बजावलं 'कितीही भुतं लागली तरी घाबरून पळून जायचं नाही. मोठय़ा मांत्रिकाकडे जाऊ.सारी भुतं काढून घेऊ; पण पळून जायचं नाही..' अंधारी रात्र. निर्मनुष्य रस्ता. काळोख. रातकिडय़ांचा आवाज.. विहीर ओलांडता ओलांडता नकळत मी सुसाट पळत सुटलो. लक्षात आले आपण घाबरून पळतो आहे. थांबलो. परत आलो. विहिरीच्या कठडय़ावर बसलो. छाती धडधडत होती. भीतीनं शरीर थरथरत होतं. किती वेळ बसलो माहीत नाही. पण शरीराचं थरथरणं थांबलं. हृदयाची घरघर थांबली. भूतही लागलं नाही. (त्या वेळी या जगात भूत नसतं हे माहीत नव्हतं. कुणाच्या तोंडून ठामपणे तरी ऐकलंही नव्हतं) बस्स! तो भीतीचा शेवटचा दिवस. त्यानंतर कधीही भीती वाटली नाही. नाहीतर रोज हाणामारीचे जीवघेणे प्रसंग झेलत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम एवढय़ा निर्भयपणे उभारताच आलं नसतं. 'ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्ष करा. फेस करा' याचा वापर करत मी माझी सगळ्या प्रकारची भीती घालवली. पण सगळ्यांनाच असं फेस करणं जमत नाही. मग, गणपतरावांना मी काय शिकवलं.. बेडवर पडल्या पडल्या.. संमोहनात गेल्यावर.. कल्पना करा, डोळ्यासमोर व्हिज्युएलाईज करा.. मी (गणपतराव) बसमधून उतरतो आहे. स्टँडवरून निर्भयपणे पायी चालत घरी जातो आहे. आजूबाजूला कुत्री आहेत. पण त्यांच्या समोरून अतिशय आत्मविश्वासानं निर्भयपणे चालतो आहे. ती भुंकताहेत.. तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, निर्भयपणे कुर्त्यांकडे पाहत ठामपणे चालतो आहे. निर्भयपणे घरी पोहोचतो आहे. 0 मी नेहमी असाच निर्भयपणे, कुत्री असतील नसतील तरी, आत्मविश्वासानं चालत येतो-जातो. दिवसेंदिवस माझ्या मनातील कुर्त्यांची भीती निघून जाते आहे आणि मी अधिकाधिक निर्भय बनतो आहे. दृश्यमालिका पाहिल्यानंतर वरील दोन सूचना अनेकदा रिपीट करायच्या. रोज दिवसांतून दोनतीनदा सराव करायचा. दीड महिन्याच्या सरावात गणपतरावांना आतून वाटायला लागलं, आता आपण पूर्वीसारखं कुर्त्यांना घाबरत नाही. त्यांनी हिंमत केली. प्रत्यक्ष स्टँडवरून घरी पायी चालत आले. जमलं. त्यांना खूप आनंद झाला. मला फोन आला. ''सर, मी घरी पायी चालत आलो. कुत्रे भुंकले. थोडीशी भीती वाटली; पण जमलं.'' मी म्हणालो, ''रोज सराव सुरू ठेवा. पण प्रत्यक्ष पायी येत-जात जा!'' 15 दिवसांनी गणपतरावांचा पुन्हा फोन आला, ''सर, गेले 15 दिवस मी रोज पायी येतो-जातो. आज तर मोटारसायकलने शाळेवर गेलो-आलो.'' मी त्यांचं अभिनंदन केलं. ते पुढे म्हणाले, ''सर, मी गळ्यातला तो ज्योतिष्याचा ताईत काढून फेकला.'' मी पुन्हा अभिनंदन केलं. म्हणालो, ''आता तुम्ही खरे निर्भय झाला आहात!'' (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Saturday, 18 August 2012
ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला सामोरे जा!
Friday, 17 August 2012
त्यांचे जग वेगळे !
सास्तूर हे लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त गाव. दहाबारा हजार लोकवस्तीचे हे मोठे गाव आहे. पुनर्वसन झालेले असल्यामुळे मोकाळ्या चाकळ्या जागेत बांधलेली सिमेंट काँक्रीटची टापटीप घरे. घरांच्या परिसरात झाड.े इतर गावांत अभावानेच दिसतात अशा अनेक गोष्टी. पण माणसे? माणसे मात्र तशीच. सकाळी कडेवर लेकरू घेऊन, डोक्यावर टोपले सांभाळीत खुरपणीसाठी निघालेल्या बाया. दुकानाच्या कट्टय़ावर बसून गप्पा मारीत बसलेली माणसे. बाजारासाठी गच्च भरून येणारे ऑटोरिक्षे. इतर गावांत असते तसेच. 15 ऑगस्ट असल्याने सरकारी इमारतींवर झेंडावंदन झालेले आणि शाळकरी मुलामुलींनी गणवेश घातलेला.. बाकी सगळे रोजच्या सारखेच. 1947चा 15 ऑगस्ट 2012 लाही येथे उगवला नाही असे वातावरण. विलासरावांचा आज अंत्यसंस्कार. वर्तमानपत्रात भरभरून छापून आलेले. 'सारा महाराष्ट्र शोकाकुल' असे मथळे. टीव्ही चॅनल्सवर अखंड लाईव्ह चित्रण. धायमोकलून रडणार्या बाया.. आल्याचिंब आठवणी.. असे वाटायचे, की जणू सगळीकडे सन्नाटा छागया. वर्तमानपत्रांच्या चौकोनी कागदांच्या बाहेर पाहिले वा टीव्हीच्या चौकोनी डब्यावरची नजर बाजूला केली, की वेगळेच वास्तव समोर दिसायचे. या गावातील दैनंदिन व्यवहार काल जसे झाले तसे आज सुरू होते. ग्रामीण जीवनात जसा 15 ऑगस्टचा उत्साह नव्हता तसा विलासराव गेल्याचा शोकही नव्हता. त्यांचे जग वेगळे आणि आपले जग वेगळे एवढी तफावत दिसत होती. शहाजिंदे सरांना या दोन्ही जगांचा पुरता अनुभव. निवृत्तीनंतर ते शेती करू लागले. मराठीचा एक नामवंत कवी आता गावाकडे राहतो. शेती करतो. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच वाक्यात त्यांनी आम्हांला गार करून टाकले. ते म्हणाले, ''मी शेतीकडे फिरकत नाही आणि लिहिणेही बंद करून टाकले आहे.'' आम्ही विचारले, ''का?'' दोन्ही बाबींचे त्यांचे एकच उत्तर त्यांच्या प्रश्नाने दिले, ''काय उपयोग आहे?'' शहाजिंदे सरांचे शेतात घर आहे. सोयाबीन, ज्वारीची रोपे उगवलेली. खुरपणी सुरू आहे. अांबा, चिकू, पेरूची बाग आहे. दोन एकर केळीचे बन आहे. शहाजिंदे सर मात्र पार वैतागलेले. काय उपयोग आहे? या प्रश्नाचे आम्ही काय उत्तर देणार. पुढे तेच म्हणाले, ''मी गरिबीतून वर आलो. आमच्याकडे वडिलोपार्जित जमीन थोडी होती. मी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. प्राध्यापकाची नोकरी केली. नोकरी करताना पै-पै गोळा करून जमीन घेतली. त्या काळी लोकांनी मला चेंगट म्हणून नावे ठेवली. मी पर्वा केली नाही. आज एवढी जमीन आहे. पाणी आहे; पण करायला कोणी नाही. थोरला मुलगा नोकरीसाठी लातूरला राहतो. धाकटा लक्ष देत नाही. माझं वय आता सत्तरीच्या घरात आहे. एकटा माणूस काय काय करणार? कुठं कुठं लक्ष देणार?'' महारुद्र मंगनाळेंनी विचारले, ''बटईने करायला का देत नाहीत?'' शहाजिंदे सर उसळून म्हणाले, ''मी एका पायावर तयार आहे. बटाईदार मिळावाना.. करायलाच कोणी तयार नाही. मी भाडय़ाने करायला द्यायला तयार होतो. दीड लाख रुपयांनी बोलणी झाली; पण तो आला नाही.'' केळीला घडं लागलेली होती. मी म्हणालो, ''ही विकली तर लाख-दोन लाख रुपये मिळतील.'' केळीच्या विक्रीचा सौदा गेल्या पंधरवडय़ात केला होता. घेणारा पाचशे रुपये इसार देऊन गेला तो आलाच नाही. दुसराच व्यापारी आला. त्याच भावात त्याने मागितले. मागच्या व्यापार्याने या व्यापार्याकडून एक हजार रुपये कमिशन घेतले. दुसर्या व्यापार्याने माल उचलावा ना! आठ दिवस झाले, अजून तोही आला नाही. झाडाला लटकलेली केळी खराब झाली तर त्याला मातीमोलानेही कोणी विचारणार नाही. मधेच त्यांनी गेल्या वर्षी तुरीच्या बियाण्यात कशी फसवणूक झाली ते सांगितले. कुटुंबातला माणूस सोबत नाही. बटाईने, भाडय़ाने करायला कोणी तयार नाही. त्यात बियाणेविक्रेते असो की मालाचे खरेदीदार व्यापारी, यांच्याकडून फसवणुकीचा धोका कायम लटकता.असा हा शेतकरी. त्यात मजुरांमुळे जास्त त्रस्त झालेला. आम्ही शेतात पाऊल टाकले तसे सर खाली वाकले. त्यांनी पातीतील गवत उपटून फेकले. पुन्हा वाकले काँग्रेस गवताचे झाड उपटून टाकले. पुन्हा वाकले.. खुरपणी झालेल्या शेतातून आम्ही जात होतो आणि तेथे पातीत त्यांना हा प्रकार दिसत होता. सर पार वैतागले. ''झाडाच्या बुंध्याला सुटलं तर मी नजरचुकीने राहिलं असं म्हणेन; पण पातीच्या मध्यभागी राहिलंय.. वरवर खुरपं मारून पुढे गेल्यात बाया.'' तीन एकर खुरपायला त्यांनी सहा हजार सहाशे रुपये मोजले होते. शहाजिंदे सर म्हणाले, ''ते मजुरी जास्त घेतात याची मी तक्रार करणार नाही; पण जे काम अंगावर घेतले ते नीट करायला पाहिजे.'' साडेदहाला बाया आल्या होत्या. एक वाजता जेवल्या. तीन वाजता निघाल्या. शेवटी सरांनी त्यांना विनंती केली, ''चार तरी वाजू द्या.'' शेतीत मजूर मिळत नाहीत. शेतमजुरीचे दर जास्त मागतात, ही शेतकर्याची कोंडी समजून घेता येईल. त्याबद्दल मजुरांना कोणी दोष देणार नाही. परंतु आलेले मजूर आपले काम चोखपणे करीत नाहीत म्हणून शेतकरी जास्त वैतागले आहेत. अशीच तक्रार याच गावच्या वसंतराव पवार या अनुभवी शेतकर्याची होती. मुलं शेतीतून बाहेर पडत आहेत. शेतीचा भार जुन्या लोकांच्या अशक्त खांद्यावर पडतो आहे. जुनी माणसं शेती सोडून नवा व्यवसाय करू शकत नाहीत. अशा काळात मजुरांची अनुपलब्धता निर्माण झाल्यामुळे काहीसा कामचुकारपणा आलेला. आकाशाने डोळे वटारलेले. बाजारात शेतीमालाच्या भावाची दुर्दशा झालेली. अशा लोकांचे एक जग आहे. या जगात तुमच्या राष्ट्रीय सणांचा उत्साह आहे ना कोण्या मंत्र्यांच्या मृत्यूचा शोक आहे.. त्यांचे जगच जणू वेगळे आहे. आपले रुतलेले चाक बाहेर काढण्यात ते सगळे कसे गढून गेले आहेत. (लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.) भ्रमणध्वनी : 9422931986 |
भगतसिंगांची माय परवा भीक मागत होती!
आज भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांना काय वाटत असेल? काय विचार करत असतील तेव्हाचे आमचे असंख्य देशभक्त आता स्वर्गातून.? खूश असतील का? लोक काही म्हणो चित्र नाही बरे पेटलेली मने अन् उपाशी घरे! का सुपारी तुही घेतली आरशा खाटकांचे दिसे सोवळे चेहरे! खरंतर आज खूपकाही लिहायचं होतं. परिस्थिती काहीही असली तरी आजही काही सैनिक घरदार, बायकोपोरं विसरून सीमेवरती देशाच्या रक्षणासाठी सज्ज असतील. पोलीस अंतर्गत सुरक्षेसाठी, तुमच्या आमच्या आनंदासाठी जीवाचं रान करत असतील! आजतरी आमचे नेते खरं बोलतील का? मेघांचे फसवे वादे.. हा फसवा फसवा वारा हा पाऊस खोटा खोटा.. ह्या फसव्या फसव्या धारा ही बंजर बंजर राने.. ही पंजर पंजर पाने मातीच्या गर्भामध्ये.. पाण्याविण कुजले दाणे सुकली धरणे, ठणठण विहिरी अजून फोडती टाहो.. पालींच्या मुतण्याला मी पाऊस म्हणावा काहो? ही संदूक संदूक सत्ता हे बंदूक बंदूक नेते द्यूत नाही खेळलो तरीही शकुनीच अजूनही जेते! मग अवतीभवती भिंती ह्या सवती सवती भिंती एखादी तुटता तुटता डझनांनी उगवती भिंती घरात भिंती, उरात भिंती, अंगण शाबूत राहो पालींच्या मुतण्याला मी, पाऊस म्हणावा काहो? देशात घडणार्या एक एक घटना पाहिल्या की मन सुन्न होतं, बधिर होऊन जातं. काय बोलावं हेही कळत नाही. कुणाला बोलावं हेही कळत नाही. इस गुल शनके आजादी की कैसे कहू कहानी पंछी पंछी दाना मांगे.. पौधा पानी पानी! क्या कहने सावन आने के वांधे है हसने गाने के गाए भी तो गाए कैसे? होठ जले है दिवाने के? बादल भी कैसे तरसाये बरसे तो ओले बरसाये छप्पर छप्पर टुटा हुआ है अंदर बाहर लुटा हुआ है बर्तन ही चावल खा जाये, यह कैसी बेमानी। अशी काही विदारक परिस्थिती पाहिली की आपलं स्वातंर्त्य खरंच कुणी पळवलं, असा प्रश्न पडतो! सर्वसामान्य माणसाला या स्वातंर्त्याची फळं चाखायला मिळालीच का? कुणी पळवलीत? हे माझ्या प्राणप्रिय स्वातंर्त्या, पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसलाच तू आमच्या देशात आलास पण आल्या आल्या कळलं नाही, कुठं गायब झालास? वाटलं होतं, लगेच तू आमच्याही वस्तीत येशील थोडा थोडा प्रकाश तुझा, प्रत्येकाला देशील प्रकाशाची आरास मांडू, तिरंगा उंचावर टांगू तू आमच्याही वस्तीत आलास, हे ओरडून ओरडून सांगू पण कुठे काय गडबड झाली, काहीच कळले नाही अजूनही आमच्या वस्तीतले दिवेच जळले नाहीत! दोस्ता! अरे, तुझी वाट पाहून थकलीत आमची जीर्ण, मोडकी दारे.. अन् स्वातंर्त्या, निदान या वर्षीतरी तू येणार आहेस कारे? ठीक आहे, आमच्याकडे नाही आलास आम्ही समजून घेऊ सवयीप्रमाणे पुन्हा आणखी अर्धपोटी राहू पण स्वातंर्त्या, तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी तोफेच्या तोंडासमोर छाती ज्यांनी तुझाच जयजयकार होता, मनी तुझा ध्यास होता अंगामध्ये मस्ती होती, गळ्य़ामध्ये फास होता मानेभोवती फासाची दोरी घट्ट पडत होती बायकापोरं केविलवाणी टाहो फोडून रडत होती पण तरीसुद्धा तुझ्याचसाठी जे शहीद झाले सारे, स्वातंर्त्या, निदान त्यांच्या घरी तू जाऊन आलास कारे? स्वातंर्त्या, माहीत नाही तुझी नक्की कोण लागत होती पण भगतसिंगांची माय परवा भीक मागत होती तिचाही पोरगा वेडा होता, तुझ्याचसाठी मेला मरता मरता आईला अनाथ करून गेला त्याच्याही कानात भरले होते, तुझ्याच प्रेमाचे वारे.. अन् स्वातंर्त्या, निदान त्याच्या घरी तू जायला नकोस कारे? स्वातंर्त्य सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोचलं नाही. नेत्यांनीही पोचू दिलं नाही. आपणही मुकाटय़ानं सहन करतो आहोत. ह्या भिजल्या भिजल्या मुंग्या ह्या विझल्या विझल्या मुंग्या पल्रयाच्या असल्या वेळी ह्या घोरत निजल्या मुंग्या ह्या टपल्या टपल्या पाली.. ह्या लपल्या लपल्या पाली भिंतीवर फोटोमधुनी ह्या आम्हीच जपल्या पाली मुंगी मुंगी चला जागवू, सोबत माझ्या याहो पालींच्या मुतण्याला मी पाऊस म्हणावा काहो? (लेखक हे नामवंत कवी, चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.) भ्रमणध्वनी - 9822278988 |
Tuesday, 14 August 2012
दोस्तीसाठी नुकसान करणारे दोस्तं!
| नागपंचमीच्या दिसी सकायीचं महा कालेजचा दोस्त जो आता जयगाव (खान्देश) लेचं राह्यते त्याचा फोन आला का,''तिकडे पाऊस आहे का बाबा?'' म्या म्हनलं, ''मस्त ! काल रातीपासून सुरू झाला तं आतायी चालूच हाय.'' तो म्हने, ''अरे, पावसाची आम्ही इतकी वाट पाहत होतो.'' ''चातकासारकी म्हन ना!'' त्याच्यावर्त तो म्हने, ''ते ओल्ड झालं आता. लावलेल्या मटक्याच्या आकडय़ासारखी किंवा तरुणपनात येतो म्हणून झुलवनार्या प्रेयसीसारखी.'' त्याचं बोलनं असचं राह्यते. तो सांगत होता, ''आज सकाळपासून इतका एकसारखा पाऊस बरसतो आहे की मन अगदी उल्हसित झालं आहे. अशा वेळी माणूस पार जुन्या आठवणीत रमायला लागतो. मला आठवायला लागलं, श्रवण सोमवारी मी आणि माझा एक दोस्त विन्या जगताप दोघं आपल्या शकुंतला रेल्वेच्या एका रुळावर तो आणि एका रुळावर मी एकमेकांचे हात पकडून एकमेकाला आधार देत धावायचो. मग रमतगमत चौसाळा टेकडीवर शंकराच्या दर्शनाला पैदल जायचं. जाताना कुणाच्या खिशात आणे, दोन आणे, असले तर किराणा दुकानातून शेंगदाणे घेऊन ते खात खात टेकडी चढायची. त्यावेळी त्या दाण्याला खूप चव असायची.'' त्याचा फोन ठेवत नाई का अखीन फोनची घंटी वाजली. उचलला तं नागपूरचा दोस्त सुभाष शर्माचा आवाज. म्हनलं आजचा दिस दोस्तायचा दिसून राह्यला. काऊन का मले सकायपासून बोरीच्या दोस्तायची सय सतावून राह्यली होती. माहे बोरीचे लहानपनचे जे दोस्त त्यायची आठोन मरूस्तर इसरनं शक्य हाय का? हे महाचं नाई तुमी तुमचं लहानपन आठवून पाहा. थो दोस्ताना काई न्याराचं अस्ते कानी? माहे लहानपनचे दोस्त राम तिवारी, वसंत बांडे, अरविंद लाला, रमेश बाजोरिया, शिव तिवारी, भरत तिवारी आता यांच्यातले वसंता आन् लाला हे दोघं गेले आमाले सोडून, पन माह्यात लय जीव त्यायचा. निरागसपनात झालेल्या दोस्तीची गोडी निल्खी आन् अधिकारयी निल्खा. अरे, हो माह्या एक दोस्त सांगाचा राहून गेला. जसं आपण सांगतानी सांगतो का हा माहा पह्यलीपासूनचा दोस्त हाय. पन हा राहून गेलेला जो दोस्त सुगन्या थो माहा पह्यलीपासूनचा नाई पह्यलीतला दोस्त होता. तुमी म्हनानं हे कसं? ते असं का तो माह्या आंधीच्या साली पह्यलीत होता. मंग पुढच्या साली मी पह्यलीत गेलो तवा तो नापास झाल्याच्यान पह्यलीतच होता. मंग त्या साली मी पास झालो तरी तो मातर पह्यलीतचं होता. गुर्जीले वाटलं याचा काई पुढं जाचा इचार दिसत नाई आन् झालयी तसचं का त्यानं अनखीन एक साल मुक्काम पह्यलीतच ठोकून आखरी शायेले रामराम ठोकला. म्हून म्या म्हनलं का तो माहा पह्यलीतला दोस्त आता सुगन्यायी राह्यला नाई आन् राम तिवारी इंदौरले चाल्ला गेला. म्हंजे बोरीच्या दोस्तायची वजाबाकी जादा आन् बेरीज कमी पडाले लागल्यानं गावले जाची वढ कमी व्हाले लागली. मी बोरीत असतानी कपडय़ाच्या दुकानात माह्या संग असलेला रामचंद्रा काकडे माही कविता छापून आली नाई तं कोनच्या कार्यकरमाची बातमी छापून आली का त्याचं कायन कापून ते एका मोठय़ा रजिस्टरात चिपकवून ठुवे. रमेशबाबू बाजोरिया त्याले पुस्तकं वाचाचा शौक. तवा यवतमायच्या दोन वाचनालयातून त्यायच्याकड पुस्तकं येत. त्यातून गुरुदत्त, गुलशन नंदा या लेखकायच्या हिंदी कादंबर्या मले आवड हाय म्हून वाचाले दे. शिव तिवारी सोता कवी तो हिंदीतून चांगल्या कविता लेये आन् हिंदीच्या मोठय़ा कवींच्या कविता त्याले पाट. त्याचा असा अभ्यास असल्यानं कवितेवर चर्चा कराले त्याचा आधार होता. माही एक असी अडचन होती का माहा संगीताचा काईचं अभ्यास नोता आन् चालीच्या ज्या कविता सुचायच्या त्या चालीसहितचं यायच्या. पन मंग चाली ध्यानात कस्या ठुवाच्या. तं कवा तवाचं जवयच्या सुतारी नावाच्या वावरात जाऊन तिथं मोकया मनानं वरच्यावर गाऊन चाल ध्यानात ठुवाची. नाईतं मंग राम तिवारी म्हून माहा दोस्त त्याले निरूप देऊन बलावून घेवो आन् तो आला का दुकानातलं पॅड घेऊन मी कविता गायले लागलो का पॅड वाजवून 'ठिंग टी डिटींगत ढिंग ढिंग ढिंग' असी साथ दे इतक्या लवकर त्याले सब्द पाट होने नोतं आन् त्याले त्याची गरजयी नोती. त्याले खल पकडून ठुवाची राहे. तो भजनवाला असल्याच्यानं त्याले ते आंग होत. हे हरहमेशा जमेचं असं नाई. काऊन का त्याचयी दुकान होत मंग गिर्हाईक असल्यावर त्याले थेडीचं येता ये मंग अस्या वक्ती दुकानाच्या बाजूले जे खोली होती त्याले आमी जवारीची खोली म्हनो तिथं जाऊन ते चाल पक्की गठे पावतर कविता म्हनत राहो. ज्यायचे मायबाप नवकरीवर असतेत त्यायच्या बदलीच्यान शाया बदलत राह्यते म्हून मंग दोस्तयी. माहे बावाजी शेतकरी होते म्हून त्यायची जरी बदली नोती पन होतं असं का त्यावक्ती माह्या गावाले आठवी पावतरचं शाया होती म्हून दारव्याच्या शिवाजी शायेत जा लागलं आन् तिथं दहावीच्या पुढची सोय नसल्यानं यवतमायले जा लागलं. दारव्याच्या शायेत जा साठी रोज चवदा मैल सायकलनं जानं आन् शाया सुटली का गावाले पयाची घाई त्याच्याच्यानं तिथं दोस्तायचा जमघट नाई जमला, पन यवतमायले दाते कालेजमंदी नाव टाकलं तवा पह्यल्या वर्साले 'प्रियुनिर्व्हरसिटी' म्हनत. माह्या संग दारव्याच्या शायेचा कोनी इथं नसल्यानं मले वर्गातले सारे नईन आन् त्यायच्यासाठी मी नवाडा. पह्यले हप्ताभर काईच गमे नाई. मंधातल्या सुट्टीतयी मी वर्गातच बसून राहो. आपणहून ओयख करून घ्याची आदतयी नोती आन् हिंमतयी. माही पह्यली ओयख झाली ते के.आर. देशमुख याच्याशी. तो घाटंजीवून आला होता. मंग अराअरामानं ओयखी होत गेल्या आन् त्याच्यातून दोस्त हाती लागत गेले. दिलीप सराफ, सुरेश कैपिल्यवार, भाजपचे माजी आमदार अरुण असरड, श्याम शर्मा, बाळू जयवंत असी कंपनी जमत गेली. कालेजच्या दोस्तान्याचं कसं होते, चार सालात कायी मांग राहून जाते तं कायी पुढं. पन आमच्या कंपनीचं तसं झालं नाई. कालेज सरलं तरी तवापासून आता पावतर तसाचं दोस्ताना कायम हाय. मी बी.कॉम. फायनलले असतानी दुसर्या कालेजचा 'फीवाढविरोधी' मोर्चा निंघनार हाय हे मले समजलं होतं. आमच्या प्राचार्याचा त्याले इरोध हाय हे माईत असल्यानं मी त्या दिसी कालेजात न जाता मोच्र्यात सामील झालो. काऊन का मी फी भरत होतो. आमच्या कालेजचे माह्या सारके दहा-बाराजन होते. त्यातनी माहा दोस्त श्याम शर्मायी होता. आमी सारे त्यातनी सामील झालो. रस्त्यानं घोषना देत सारा मोर्चा आझाद मैदानात आल्यावर्त तिथं सभा झाली. आमच्या कालेजच्या पोरायनं आग्रव करून मले भासन द्याले लावलं. त्यातनी श्याम शर्मायी होता. म्यायी जोसात येऊन भासन ठोकलं. खूप टाया पडल्या, भासन गाजलं पन त्याचा परिनाम असा झाला का प्राचार्यानी नियम तोडला म्हून मले रस्टिकेट कराचं जाहीर केलं. दिलीप सराफ म्हून माहा जो दोस्त होता तो मले उपप्राचार्य करंदीकर सरांक डं घेऊन गेला. माहं सिकन्याचं नुकसान झालं पन मी वाकलो नाई याचा मले तवायी पस्तावा नोता अन् आतायी नाई. पन पस्तावा या गोष्टीचा झाला का आपल्या आग्रवानं याचं नुकसान झालं असं समजून श्याम शर्मानं कालेज सोडलं ते पुढं ना सिकन्यासाठी याचा! ना आईकता दोस्तीसाठी आपलं नुकसान करून घेणार्या दोस्ताले काय म्हनावं! (लेखक शंकर बडे हे नामवंत वर्हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.) भ्रमणध्वनी - 9420551260 पेशवे प्लॉट, यवतमाळ |
'प्राण' हा प्राकृतिक पण अ-भौतिक घटक
ते कोणते तत्त्व आहे जे सजीवांना निर्जिवांपासून वेगळे करते? सामान्य भाषेत ते तत्त्व 'प्राण' या नावाने ओळखले जाते. परंतु प्राण हे एक स्वायत्त तत्त्व आहे की ती केवळ भौतिक देहात चालणारी 'प्रक्रिया' आहे, याबाबत विज्ञान निश्चित काही सांगत नाही. भौतिक देहात विशिष्ट प्रक्रिया (पोषण, धारणा व पुनरुत्पादन) सुरू होणे म्हणजे जीवन आणि ती प्रक्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू, अशी सध्यातरी विज्ञानाची बहुमान्य धारणा आहे. भौतिक देहात 'प्राण' नावाचा कोणी अभौतिक घटक प्रवेश करतो वा देहातून निघून जातो ही बाब विज्ञानमान्य नाही. परंतु जीवसृष्टी निर्माण करण्यात येत असलेल्या अपयशामुळे ब्रुक्ससारखे वैज्ञानिक त्या शक्यतेला एकदम नाकारतही नाहीत. आपण सामान्य माणसं मात्र हजारो वर्षापासून 'प्राण निघून गेला', 'निष्प्राण शरीर', ' प्राण कंठाशी आले' असे शब्दप्रयोग अनुभवांच्या आधारे करीत असतो. 'प्राणी' हा शब्दच प्राणाचा अस्तित्व-वाचक आहे. प्राण आणि मन वा बुद्धी यातील फरकही सामान्य माणसांना समजतो. मनाचा संबंध कल्पना व विचारांशी आहे, तर प्राणाचा संबंध देहाला जिवंत राखण्यासाठी करावयाच्या घडामोडींशी आहे. श्वासोच्छवास, तहान-भूक, निद्रा, भय, चापल्य, कामवासना इ. प्राणांशी निगडित बाबी आहेत. मनाशी अथवा बुद्धीशी नव्हेत. मानवी पातळीवर भय व कामवासनेसारख्या प्राणिक प्रेरणांमध्ये मनही मिसळते ही बाब वेगळी. निर्जीवातून उगवला असो वा निर्जीवांत अवतीर्ण झालेला असो. परंतु प्राण हा एक वेगळाच प्राकृतिक पण अ-भौतिक घटक असावा असे वाटते. सर्व सृष्टी ही केवळ भौतिक पदार्थाचीच बनलेली असून अ-भौतिक असे कोणतेही तत्त्व सृष्टीत नाही, अशी धारणा बाळगणार्यांना 'भौतिकवादी'(मटेरियालिस्ट) म्हणतात. 'भौतिकवाद म्हणजेच विज्ञानवाद' असा एक गैरसमज आहे. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जे गम्य व आकलनीय असेल तेच सत्य मानू अशी धारणा बाळगणे म्हणजे वैज्ञानिक मनोवृत्ती होय. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जर स्थिरचित शांत अवस्थेत एखादे अ-भौतिक तत्त्व सातत्याने अनुभवास आले तर तेही सत्यच मानले पाहिजे. सृष्टीत जे काही आहे त्या सर्वास 'प्राकृतिक' अथवा 'नैसर्गिक' अशी संज्ञा आहे. परंतु जे जे प्राकृतिक किंवा नैसर्गिक आहे ते सर्व भौतिकच असणे आवश्यक नाही. विज्ञान प्रकृतीचा शोध घेते; केवळ भौतिक पदार्थाचा नव्हे! भौतिक पदार्थाशी प्राणाचा संयोग झाल्यावर पृथ्वीवर लक्षावधी जीवजातींची निर्मिती झाली. भोवतालच्या वातावरणातून प्राणवायू(ऑक्सिजन), कर्बाम्ल (कार्बनिक अँसिड), पाणी, नत्रवायू (नायट्रोजन) व अमोनियम ऑक्साईड हे विपुल प्रमाणात व त्यांच्या प्राथमिक स्वरूपात उपलब्ध असलेले निर्जीव घटक शोषून वनस्पती त्यांचे विविध सेंद्रिय पदार्थात रूपांतर करतात. वनस्पतींना खाणारे प्राणी पुन्हा त्या क्लिष्ट रचना असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर कर्बाम्ल, पाणी, नत्र व अमोनियम ऑक्साईड या मूळ घटकांत करून वातावरणास ते मूळ घटक परत करतात. दुसर्या शब्दांत असे म्हणता येईल की काही सुटे-सुटे निर्जीव पदार्थ हवेतून शोषून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती त्या निर्जीव पदार्थाना संघटित करून एक क्लिष्ट सेंद्रिय रचना तयार करतात, प्राण्यांना मात्र ही पदार्थाची सेंद्रिय रचना वनस्पतींना खाऊन आयती प्राप्त होते. प्राण्यांमध्ये या सेंद्रिय घटकांना पचविण्याचे अथवा जाळण्याचे कार्य चालते, ज्यातून ऊर्जा निर्माण होते. उष्णता व हालचालींची शक्ती 'प्राणी'जगतास अशा प्रकारे प्राप्त करून देणारे 'वनस्पती'जगत हे खरे पाहता ज्वलनशील सेंद्रिय पदार्थाचे महाभंडारच आहे. वनस्पतींचा मुख्य उपयोग हवेच्या शुद्धीकरणासाठी नसून प्राण्यांना पोषक द्रव्य पुरविण्यासाठी होतो, जेणेकरून प्राणी अधिक शक्तिशाली हालचाली करू शकतील. आणखी वेगळ्या परिभाषेत असेही म्हणता येईल की, 'वनस्पती'जगतात बाल्यावस्थेत उगवलेला 'प्राण' प्राणीजगतात अधिकाधिक विकसित व सामर्थ्यशाली होत जातो. प्राणाची ऊर्जा ही भौतिक ऊर्जेपेक्षा वेगळी आहे. परंतु भौतिक ऊर्जा ही प्राणास बलवान करण्यात साहाय्यभूत निश्चितच ठरते. मरतुकडय़ा शरीराचा परंतु अत्यंत साहसी अथवा अत्यंत निर्भय अथवा अत्यंत कोपिष्ट मनुष्य असू शकतो. धाडस, साहस, निर्भयता, चपळपणा ही बलवान व विकसित प्राणाची लक्षणे आहेत. हे गुण बलवान देहाशी अथवा उच्च वैचारिक बुद्धीशी निगडित असतीलच असे नाही. लक्षावधी प्रकारांच्या प्राणी-देहांमध्ये प्राणांचा जो विविधांगी विकास उत्क्रांतीक्रमांत साधल्या गेला त्याचे चित्तथरारक व मनोहारी दर्शन नॅशनल जिऑग्राफिक अथवा डिस्कव्हरी चॅनेल्सच्या माध्यमांतून टीव्हीवर नित्य होत राहते. मुख्य म्हणजे या सर्व प्राणिक हालचाली देहाचे पोषण, रक्षण व प्रजनन या मूलभूत गरजांतून उद्भवतात व देहाच्या रचनेनुसार आणि भोवतालच्या पर्यावरणानुसार प्राणामध्ये भय, चपळपणा, चलाखी, साहस इ. गुणावगुण उमलतात व वाढतात. निर्जीव पदार्थाना वनस्पती खातात, वनस्पतींना शाकाहारी प्राणी तर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खाऊन पुन्हा मूळचे निर्जीव पदार्थ निसर्गास परत करतात. या अद्भुत सृष्टिचक्रात सूक्ष्मजीवाणूंची कामगिरीसुद्धा अतिशय मोलाची असते. ते सर्व काडीकचरा व निष्प्राण देहांना फस्त करून पृथ्वीची स्वच्छता कायम राखतात. (लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.) |
Monday, 13 August 2012
कथा : एका संवेदनशील चोराची
आणि अचानक एकेदिवशी फारफार तर 2 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर आकाराचा एक ग्रुप फोटो मला सापडला. त्यात मी, माझे वडील, आई, भाऊ आणि बहीण हे सगळेच होते. हा फोटो किती लहान होता याची आपण कल्पना करू शकाल. मी तो जीवाजतन केला. माझे वडील आयटीआयमध्ये वॉचमन होते. त्यावेळी तिथे शिक्षण घेताना एका शिकाऊ विद्यार्थ्याने तो फोटो काढला होता. तो फोटो मी पाहिला तेव्हा अतिशय हरखून गेलो होतो. आयुष्यातला पहिलाच फोटो होता तो. त्यावेळी मी पाचवी-सहावीत असेल. आज मी त्या शिकाऊ विद्यार्थ्याचे नावही विसरलो आहे आणि कुठे 56 वर्षानंतर असा कुणीतरी फोटो काढत होता हेही मी विसरून गेलो होतो; पण वडिलांच्या निधनानंतर वडिलांनी जपून ठेवलेली काही कागदपत्रं शोधताना मला तो फोटो मिळाला आणि माझ्या आनंदाला गगन ठेंगणे झाले होते. दरम्यान, मला कुणीतरी सांगितले की, या ग्रुप फोटोमधून वडिलांचा तेवढा फोटो वेगळा काढता येतो. तो एनलार्जही करता येतो; पण माझ्या लहानशा गावात मात्र अशी काही सोय नव्हती.माझा एक दूरचा नातलग मुंबई येथील प्रिमियर ऑटोमोबाईल कंपनीत टर्नर म्हणून नोकरीस होता. तो मॅट्रिकला नापास झाला म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तो कंधार तालुक्यातील कळंबचा. माधव जिंदे त्याचं नाव. वडील आयटीआयमध्ये नोकरीला असल्यापासून त्याला तंत्र शिक्षणाचं महत्त्व कळालं होतं. त्यावेळी नांदेडच्या आयटीआयमध्ये पुणे-जळगावहून विद्यार्थी शिकायला येत, पण आपल्या मराठवाडय़ातले विद्यार्थी मात्र तिथे शिकत नसत. माझ्या वडिलांनी माधवला टर्नरच्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. त्याची राहण्या जेवणाची सोयही आमच्याच घरी केली. त्यामुळे माधवचे आयुष्य पूर्ण बदलून गेले. शिक्षण पूर्ण करताच माधव मुंबईच्या प्रसिद्ध कंपनीत नोकरीस लागला. त्याला माझ्या वडिलांबद्दल अतिव आदर होता. म्हणून मी त्याला विचारलं. तो फोटोही त्याला दाखवला. माझ्या वडिलांचा फोटो पाहून त्याच्या डोळय़ांत अश्रू तरळले. त्याने तो फोटो मी सोबत नेतो, असे सांगितले. मुंबईच्या फोटो स्टुडिओमध्ये चौकशी करतो, असे सांगितले. मला तो फोटो देववत नव्हता; पण फोटो एनलार्ज करून मिळणार याचाही मला आनंद होत होता. मी तो फोटो माधवला दिला. माधव मुंबईला गेला. मी अधूनमधून त्याला पत्र पाठवत होतो. माधव मुंबईत पवईत राहायचा. त्याची कंपनी विद्याविहार ते कुर्ला या रस्त्यात होती. विद्याविहार स्टेशन नुकतेच सुरू झाले होते. त्याने तो फोटो आपल्या पाकिटात ठेवला होता. विक्रोळी ते विद्याविहार असा पास त्या पाकिटामध्ये असे. त्यामुळे पाकीट पाहिले की, त्याला फोटो एनलार्ज करण्याची आठवण होत असे. वेळ मिळाला की तो कुल्र्यात जायचा; पण कुठलाही स्टुडिओ त्याला मिळत नव्हता. पत्रातून तो मला कळवायचा. इथे फोटो मोठा करून मिळू शकतो. काळजी करू नकोस; पण योग्य असा स्टुडिओ मात्र त्यास सापडत नव्हता. अखेर त्याला एका स्टुडिओचा पत्ता कळाला. तेही मला त्यानं कळवलं. आता मला माझ्या वाडिलांचा फोटो मोठा करून मिळणार. तो मी भिंतीवर लावणार आणि रोज येताजाता माझे वडील मला आशीर्वाद देताहेत हे मला दिसणार असल्यामुळे मी हरखून गेलो होतो. पण काही दिवसांनंतर माधवने पत्रात लिहिले, मी फोटो स्टुडिओत दिला आहे; पण काम काहीसं वेळखाऊ असल्यामुळे काही दिवस थांबावं लागेल. महिना दोन महिने लोटले. मी मात्र फोटोसाठी अतिशय अधीर झालो होतो; पण माधव काही कळवत नव्हता. आणि अचानक त्याचं एका दिवशी पत्र आलं. त्यात त्यानं लिहिलं होतं, दिवाळीला येताना फोटो घेऊन येतो. आता मी दिवाळीची वाट पाहू लागलो. आणि एकेदिवशी माधव फोटो घेऊन आला. येतानाच त्याने तो फोटो फ्रे म करून आणला होता. संपूर्ण ग्रुप एनलार्ज केलेला फोटो आणि एक माझ्या वडिलांचा एनलार्ज केलेला फोटो आहे. दोन फोटो होते. ते दोन्ही फोटो माझ्याकडे देताना एका खूप मोठय़ा जबाबदारीला पूर्ण केल्याचा आनंद त्याच्या चेहर्यावर होता; पण त्या आनंदामध्ये त्याच्या मनात लपलेली त्याची गलबल मला त्या दिवशी मुळीच कळाली नाही. उन्हाळी सुट्टय़ा लागल्या आणि मी मुंबईला गेलो. प्रथमच मुंबई पाहात होतो. माझी छाती दडपून गेली होती; पण त्याने पत्रात तपशील इतका चांगला कळवला होता की, मी थेट सायंकाळी मार्केट गेटला रस्त्यावरील झोपडीवजा त्याच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. माधव डय़ुटीवर गेला होता. परत आल्यानंतर माझ्या गळय़ात पडला. आणि त्यानंतर त्याने जी हकिकत सांगितली ती ऐकून मी आश्चर्याने थक्क झालो. तो सांगू लागला, मी वेळ मिळेल तसा कुल्र्यात जाऊन एकेका स्टुडिओत शोध घेऊ लागलो. अखेर एका स्टुडिओचा पत्ता लागला आणि त्याच्या दुसर्या दिवशी मी जायचं ठरवलं; पण नेमके दुसर्या दिवशी कंपनीत जाताना माझं पाकीट मारलं गेलं. पाकिटात 20-21 रुपयेच होते; पण माझा पास आणि मामांचा तो दुर्मिळ फोटो होता. मी हादरून गेलो. तुला कसे कळवावे ते कळेना. मी कुर्ला स्टेशन, विद्याविहार स्टेशन आणि विक्रोळी स्टेशन या तिन्ही स्टेशनचे प्लॅटफॉर्म अक्षरश: पिंजून काढले. पण पाकीट सापडलं नाही. 'मग कुठं सापडलं?' कुठं सापडलं, सापडलंच नाही. एके दिवशी तर विक्रोळी ते विद्याविहार अशी रेल्वे ट्रॅकने पायपीट केली. पोलीस स्टेशनमध्ये नोंद करावी तर पाकिटात रक्कम एवढी किरकोळ की, त्यांनीही माझी दखल घेतली नसती. त्या पाकिटात लाखो रुपये देऊनही न मिळणारा फोटो होता; पण त्याची किंमत पोलिसांना कुठून? मी वेडापिसा होऊन 8-15 दिवसांत पुन्हा पुन्हा प्लॅटफॉर्मवर शोध घेत होतो; पण पाकीट मिळालं नाहीच. 'मग? हा फोटो कसा मिळवलास?' तेच तर सांगतोय. मी तुला खोटं पत्र लिहिलं. त्यावेळी मी फोटो पाकिटासकट हरवला होता. 15-20 दिवस उलटून गेले. मी बेचैनच झालो आणि एकेदिवशी माझ्या दारात चोरटाच उभा राहिला. त्याच्या हाती माझा पत्ता असलेलं एक बेरंग पाकीट होतं. दंड म्हणून पोस्टाचा स्टॅम्प न लावताच त्या पाकिटासाठी 5 रुपये भरून पाकीट सोडवून घ्यावं, असं कळवलं. मी ते पाकीट हाती घेतलं. पाठवणार्याचा पत्ता कुठेच नव्हता. पाच रुपयांची रक्कम जास्त नव्हती; पण हे कुणी पाठवलं आणि का पाठवलं यामुळे मात्र मी बेचैन झालो होतो. अखेर मी ते पाकीट पाच रुपये देऊन सोडवून घेतलं. आणि तुला सांगतो, ते पाकीट उघडताच मी आनंदाने वेडय़ासारखाच नाचू लागलो. त्या पाकिटात मामांचा फोटो होता आणि माझी रेल्वेची पास. रेल्वेच्या पासवरून पाकीट चोराने माझा पत्ता शोधून या दोन्ही गोष्टी माझ्याकडे परत पाठवल्या होत्या. तर त्या चोराने परत प्रत्यक्ष फोटो आणून दिला असता तर मी त्याला बक्षीस म्हणून 50 रुपयेही दिले असते. मी त्या चोराचे मनातल्या मनात आभार मानले. आजही माझ्या वडिलांचा तो एनलार्ज केलेला फोटो माझ्या घरात आहे. तो ग्रुप फोटोसुद्धा माझ्या घरात आहे. कृतज्ञतेनं भारावलेला माझा मित्र आज जगात नाही आणि माझ्यावर अकारण उपकार करणारा तो चोरही मला कधी सापडला नाही. एखाद्या कथा, कादंबरीत आढळणार नाही, असा स्तिमित करणारा हा प्रसंग मी अजून विसरलेलो नाही. मी नाटय़लेखक आहे. दुसर्याचं मन जाणून चित्रण करणारा एक लेखक आहे; पण चोरांविषयी मुळीच आपुलकी नसूनही हा चोर काय माझ्या मनात घर करून आहे. त्या चोरालासुद्धा त्या फोटोला पाहून तो कुणाचा तरी दुर्मिळ फोटो असावा, असे वाटले असेल काय? त्यामुळे ज्याचा तो असेल तो किती हैराण झाला असेल याचा विचार त्याने केला असेल काय? कदाचित असेच घडले असावे. चोर म्हणून जगण्यातला निब्बरपणा अजून स्वभावात आला नाही, असा तो चोर असावा. खरे तर त्याच्या स्वभावातल्या या कोवळेपणास खतपाणी घालता आले तर त्यातूनही चांगला माणूस घडू शकतो. शांताराम बापूंच्या 'दो ऑंखे बारा हात' या जुन्या सिनेमाची आठवण होते, पण चोरांचा बंदोबस्त करणार्या कुठल्याही करडय़ा व्यवस्थेजवळ हा असला उद्योग करायला ना वेळ असतो ना माणसांबद्दल असणारे मन. एखादाच कुणी त्याच्यासारखा महामानव असतो जो खून करायला आलेल्या माणसाचंही एका कार्यकर्त्यात रूपांतर करतो. जणू या महामानवासमोर तथागत गौतमांचा आदर्श असावा. अंगुलीमालालाही त्या सत्पुरुषाने धम्मसेवक केले. आपण तेवढे मोठे नक्कीच नाहीत; पण अशा प्रेरणेने कार्य करणार्या स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकत्र्यांकडे किमान आस्थेने पाहता यावं एवढं आपलं मन तरी संवेदनक्षम ठेवू शकतो ना? (लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.) भ्रमणध्वनी - 9881230084 |
गाडीचा हरिक!
'' तू कोन?''
''इतक्या लवकर वयख भुलला काय बे ससरीच्या ? मी तुहा जवाई आहोना''
''बाप्पू हायेत का?''
''तुले कोन वाटलं?''
''कुठून बोलून राह्यले?''
''चुलीपासून! कालच म्या बाराशाचा मोबाईल घेतला, चुलीपाशी बिळी ओढून राह्यलो अन् तुले फोन लावला''
''माहा नंबर सेव्ह करून ठेवा''
''मले इंग्रजी समजत नाही.. म्या म्हटलं आपल्याले रातीबेराती वावरात जा लागते.. पाह्यजे मानसाजोळ मोबाईल''
''बरा घेतला''
''त्यारोजी पिकाच्या विम्याचे पैसे भेटले.. बाराशात हा मोबाईल घेतला अन् चार हजारात जुनी गाडी घेतली''
''कोन्या कंपनीची?''
''काय मालूम कोन्या कंपनीची हाय.. पन लय जुनी आहे. म्या म्हटलं लेकराची हौस फिटते अन् तुह्या बईनले मांगून बसून नेता येते''
''जुन्यापेक्षा नवी घ्या लागत होती''
''आपल्याजोळ एवढे पैसे नाहीत.. हौस फिटली बस्स झालं''
''कितीचा अँव्हरेज देते?''
''एव्हरेज इचारू नको.. त्या गाडीनं पुरी थंडी केली माही''
''कशी काय?''
''फक्त तीसचा अँव्हरेज देऊन राह्यली.. पेट्रोल सत्याहत्तर रुपये झालं.. पेट्रोल टाकूटाकू माही चाटी लाल झाली''
''इकून टाका पटकन''
''आता तिले कोनी हजार रुपयात घेत नाही''
''मंग तुम्ही कशी घेतली?''
''मी फसलो.. पन सांगता कोनालं? या गाडीनं लळकोंडी आनलं मले''
''भंगारात द्या''
''भंगारात इकाले पुरते काय लेका? दारी उभी असली म्हनजे बस्स आहे.. लोकं हे म्हनतीन की नाजूकरावच्या घरी गाडी हाय एक!''
''बाईले नेत जा गाडीवर बसून''
''तुह्या बईनचं वजन जास्त आहे.. हमीदा बानूच दिसते''
''तोलत नाही काय तुमाले?''
''मले तोलते पन गाडीले तोलत नाही.. ते बसली की गाडीचं टायरच दबते''
''बाई बसली होती काय?''
''घरापाशी तिले घेऊन एक चक्कर मारला''
''मंग?''
''मागच्या चक्क्यातली हवाच निंगून गेली, तुही बईन बसली की गाडी जाग्याहून उचलत नाही, पुलावर चढत नाही''
''गाडीच बस्तर आहे तुमची''
''गाडी तशी चांगली हाय.. एकटय़ाले सपाटून ओढते पण तुही बईन सत्तर किलोची आहे ना.. तिले पाहूनच गाडी दम सोडते''
''त्यासाठी म्हनतो की नवी गाडी घ्या.. अशा बस्तर गाडीवर एक दिवस तिले पाडून टाकसान''
''नाई नाई.. मी तिले डबलसीट बसून नेतच नाही.. ते बसली की हॅंडल थरथर कापते.. मी लटलट कापतो.. काय करता वार्यावर वरात काढून? तिचा हातपाय मोडला तं माह्याच भोवती येइनं''
''बाई कुठं गेली?''
''इथंच हाय चुलीपाशी.. घेवं.. तुहा भाऊ बोलते..धर.. बह्याळे.. तोंडापाशी धरतं काय? कानापाशी धर''
''हॅलो.. पक्या हाय काय रे?''
''मीच हाव बाई.. काय करून राह्यली?''
''मी भाकरी टाकून राह्यली.. उळदाचं वरन केलं.. ये जेवाले''
''पिंटय़ा कुठं गेला?''
''इथंच हाय.. थयथय नाचून राह्यला.. मी मामासोबत बोलतो म्हनते.. थांबरे उसल्यावानाच्या.. हातचा मोबाईल हिसकून घेते.. बोलू दे मामासंगं.. ओ पक्या.. आता तिसर्या रोजी फोन करत जाय.. मोबाईल घेतल्यापासून तुह्या बाप्पूच्या खिशातच असते.. अन् फोन कोनाचाच येत नाही.. हे रोज फोनची वाट पाह्यतात.. रेंज नसली की न्हानीच्या खांडावर उभे राह्यतात.. काल खांडावर चढता चढता पाय घसरून न्हानीत आपटले''
''आता मजा आहे तुही.. गाडी घेतली म्हंतात बाप्पूनं''
''गाडीची तं नवाईच झाली तुह्या बाप्पूले.. चार खेप गाडीऊन आपटले.. पुढचे दोन दात पडले.. आता डबल दात येतात काय?''
''हे गोष्ट मले सांगतलीच नाही''
''काय सांगतीन भोबळे झाल्यावर? अदीक दोनचार दात पडले की दाताची कवळीच बसवा लागते, आता हिंडतात भोबळे..''
''बाप्पूले गाडी पाह्यजेच होती''
''फारच हरीक झाला त्याहिले जुन्या टपराचा.. दिवस निंगाला की गाडी धुतात.. घंटाभर पुसपास करतात.. सायकलच्या पंपानं त्याच्यात हवा भरतात''
''हरीक असते मानसाले गाडीचा''
''असा हरीक काय कामाचा? हरीक करता करता दोन दात गेले.. बरं झालं हातपाय मोडला नाही''
''कुठी आपटले बाप्पू गाडीहून?''
''घरापाशीच आपटले.. त्याहिले रोडवर चालवाचा भेव लागते, घरापाशी बेपटीत चालोतात, काल हे बेपटीत गाडी घेऊन घुसले अन् तिकून म्हैस आली..''
''मंग?''
''तुह्या जवायानं हातातली गाडी सोडून देली अन् सरके घरी पयत आले''
''शिकता शिकता चालोता येइन''
''पन मी म्हनते गाडीचं काही काम आहे काय? आफिसात जा लागते काय? पीक आलं की चार दिवस मजा मारतात अन् उन्हायात जांभोया देतात.. काय कामाचा असा फुकटचा मोठेपणा? तीन पैशाची गाडी ज्याले त्याले दाखोतात.. घरात एकापरी पावसायात कौलं गयतात.. काय म्हनाव या मनसाले? हिडग्याले देली गाय अन् धाऊ धाऊ गोठानावर जाय!''
(लेखक हे नामवंत वर्हाडी कथाकार आहेत.)
भ्रमणध्वनी : 9561226572
Subscribe to:
Posts (Atom)