Monday 3 September 2012

धर्माच्या मर्यादा समजून घेणे म्हणजे धर्मविरोधी असणं नव्हे!


डॉ.श्रीराम लागू हे आपल्या महाराष्ट्रातले प्रसिद्ध नट आहेत हे आपणा सर्वानाच माहीत आहे.पण ते केवळ नट नाहीत. एक विचारवंतही आहेत. भारतीय समाज नटाला विचारवंत म्हणून फारशी मान्यता देत नाही. नटाचं कर्तृत्व मात्र तो अलीकडे मान्य करू लागला आहे. डॉ. लागूंप्रमाणेच त्यांचे दुसरे समकालीन विचारवंत म्हणजे निळू फुले. आज निळू फुले हयात नाहीत; पण त्यांची मागे एकदा दूरदर्शनवर खूप मोठी मुलाखत येऊन गेली आहे. ज्यांनी ती पाहिली, ऐकली असेल त्यांना निळूभाऊ लोकशाही समाजवादी व्यवस्थेबद्दल किती जागरूकतेने बोलत होतेयाचा प्रत्यय आला असेल. राष्ट्रसेवा दलाच्या मंडळींना तर निळूभाऊ हे विचारवंत होते याची माहिती आहेच. आपण नटांना दुर्दैवाने चंगीभंगी मानतो. ही आणखी एक गैरसमजूत. या दोन्ही नटांच्या सहकार्याने डॉ. बाबा आढावांनी 'लग्नाची बेडी' हे आचार्य अत्रे यांचे प्रसिद्ध नाटक महाराष्ट्रभर सादर केले. या नाटकाचे सर्व उत्पन्न, सामाजिक कृतज्ञता निधी या संस्थेला देण्यात आला. या रकमेच्या व्याजातून महाराष्ट्रभरच्या थकलेल्या, निराधार सामाजिक कार्यकत्र्यांना काही रक्कम दिली जाते. नांदेडला हा प्रयोग घेताना ज्या कार्यकत्र्यांनी पुढाकार घेतलात्यात मीही एक होतो. ही आठवण मला धन्य करून जाते. असा काही निधी कोटय़वधी रुपये मिळवणार्‍या क्रिकेटर्सनी राष्ट्राला दिला त्याची मला मात्र माहिती नाही. अशा या दोन महान कलावंतांची 'लग्नाची बेडी'मुळे पुसटशी ओळख झाली. सुमारे 30-35 वर्षापूर्वी आणि ही ओळख त्या उभयतांनी मला नावासह ओळखावी इतकी दृढ झाली. याची मला स्वत:ला धन्यता वाटते.

या उभयतांची मला आज अचानक आठवण झाली. त्याचे कारण धर्माला विरोध आणि धर्माची मर्यादा यांतील फरक सामान्य वाचकांना समजावून सांगावा यासाठी. मागे एकदा केव्हातरी डॉ. लागूंनी विधान केले, 'देवाला रिटायर करायला हवे.' आणि आमचा बुद्धिप्रामाण्यवादी महाराष्ट्र खवळला. डॉ. लागूंचे कलेच्या क्षेत्रातील योगदान माहीत असूनही डॉ. लागूंचा निषेध झाला. अर्थात लागूंनी आपलं हे आवडतं मत टाकून दिलं नाही. आजही एखाद्या तरुण श्रोत्यांच्या कार्यक्रमाला गेले तर ते आपले मत ठणकावून सांगतात. त्यांचे मत ज्यांना मान्य आहे असे श्रोतेजोरदार टाळ्य़ा वाजवतात आणि त्यांचे मत अमान्य असणारी मंडळी 'जाऊ द्या, एवढं काय मनावर घ्यायचं. ते नट आहेत, दुर्लक्ष करा'असं परस्परांना सांगून मोकळे होतात.

'देवाला रिटायर करा' असं विधान करणारे डॉ. लागू धर्मविरोधी आहेत अशी आपली सर्वाची समजूत आहे. मार्क्‍सने तर 'धर्म ही अफूची गोळी आहे' असे म्हटले. मार्क्‍स हा मूलत: विचारवंत होता. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे परिणाम जागतिक पातळीवर झाले. मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाचा जगावर एवढा परिणाम झाला की, त्यातून अनेक मार्क्‍सवादी देश निर्माण झाले. रशिया या नावाचे असेच एक बलाढय़ राष्ट्र त्यातून निर्माण झाले. सोव्हिएत रशिया संघ भंग पावला. साम्यवादी राष्ट्रांची शक्ती क्षीण झाली आणि धर्माला नकार देणारे राष्ट्र दीर्घकाळ टिकू शकत नाही अशा आशयाचे विचारही ऐकायला येऊ लागले. मार्क्‍सवादी असणं म्हणजे धर्मविरोधी असणं हे

समीकरण आज रूढ झालेलं आहे आणि त्याला कारणेही तशीच आहेत. पण मार्क्‍सवादी मंडळीही काही धर्मप्रणीत आचारांचे पालन करू लागली की, ते ढोंगी आहेत असे त्यांच्यावर आरोप होतात. त्याचे महत्त्वाचे कारण असे की, धर्म या संस्थेचा सर्वमान्य असा एकच एक अर्थ आहे असे आपण गृहीत धरतो.

जगातल्या सर्व संस्थांपैकी धर्म ही प्राचीनतम संस्था आहे. इस्लाम धर्माचा इतिहास दीड हजार वर्षाचा आहे. ºिश्चन धर्माचा इतिहास दोन हजार वर्षाचा आहे. जनबुद्धांचा इतिहास अडीच हजार वर्षाचा तर वैदिक धर्माचा इतिहास किमान तीन हजार वर्षाचा आहे. पण या ज्ञात इतिहासाहूनही धर्म ही संस्था अधिक जुनी आहे. अधिक काटेकोरपणे सांगायचे तर जगातल्या भयप्रद आणि कल्याणकारी अशा अनेक घटनांचा कार्यकारणभाव न कळणार्‍या आदिम समाजाने 'यातू' शक्तीचा विचारही धर्म म्हणूनच केलेला आहे. 'यातू' याच शब्दाचा मराठी उच्चार 'जादू' असाही होतो. थोडक्यात, धर्म ही संस्था अत्यंत गुंतागुंतीची आणि अनेक घटकांनी मिळून तयार झालेली आहे. या संस्थेत देव, श्रद्धा, रूढी, आचार, नीती आणि कर्मकांड या सर्वच घटकांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांपैकी कोणत्याही एका घटकाला विरोध केला, की तो माणूस धर्मविरोधी आहे असे आपण समजतो. डॉ.लागूंनी देव नाकारला म्हणून ते धर्मविरोधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वण्र्य नाकारले म्हणून ते धर्मविरोधी. आज आर्यसमाजी हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी 19व्या शतकात जात ही संस्था नाकारली म्हणून ते धर्मविरोधी मानले जात. स्वामी दयानंद सरस्वतींचा पुण्याच्या सनातनी ब्राह्मणांनी गाढवाची मिरवणूक काढून निषेध केला होता तर म. फुल्यांनी दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीला संरक्षण दिले होते. म. फुले यांनी पूजापाठातील ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध केला म्हणून ते ब्राह्मणी व सनातन धर्माच्या विरुद्ध होते असे मानले जात असे. सर्वसामान्य माणसे धर्मविरोध म्हणजे नैतिक वागण्याला विरोध असा अर्थ घेतात तो अत्यंत चुकीचा आहे. हिंदू धर्माचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे आणि चिवट आहे. इथे अनेक देव मानणारा हिंदू असतो तसा एकच देव मानणारा हिंदू असतो आणि देव ही संकल्पनाच न मानणारा (नास्तिक) हाही हिंदूच असतो. हा झाला श्रद्धेचा घटक. इथे एक पत्नी करणारा हिंदू असतो. बहुपतीत्व मान्य करणारी स्त्रीही हिंदूच असते. हा झाला आचरणाचा घटक. या घटकाच्या तळाशी नैतिकतेचेही संकेत असतात. परस्परविरोधी श्रद्धाकेंद्र, परस्परांना अमान्य असणारा आचारधर्म आणि नैतिक संकल्पना देव आणि विश्व यांच्या निर्मितीसंबंधी परस्परांना अमान्य असणारे सिद्धान्त असे कितीतरी घटक हिंदू धर्मात येतात. त्यामुळेच येथील धर्मविरोधाची लढाई फार लवकर संपुष्टात येते. कारण ही लढाई संपविण्यासाठी अनेक घटकांना एकत्रित असणारे युक्तिवाद करता येतात. तुम्ही देव नाकारला की, इथला माणूस लगेच म्हणू शकतो, त्यात काय नवीन आहे? बुद्ध, चार्वाकांनी दोनअडीच हजार वर्षापूर्वीच देव नाकारला आहे. म्हणून ही लढाई 'धर्मश्रद्ध विरुद्ध धर्मनिष्ठ' अशी लढताच कामा नये असे मला वाटते. पु. भा. भावे हे जसे 'कादंबरीकार' म्हणून प्रसिद्ध होते तसेच 'हिंदुत्ववादी' म्हणूनही प्रसिद्ध होते. ते अतिशय प्रभावी वक्ता होते. मी त्यांची भाषणे ऐकली आहेत.

'मी आस्तिक का आहे?' या विषयावर त्यांचे नांदेडच्या प्रतिभा निकेतनमध्ये अतिशय प्रभावी असे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर होते. तेही पट्टीचे वक्ता. त्यामुळे आज कशी वैचारिक जुगलबंदी ऐकायला मिळेल यासाठी श्रोत्यांनी तुडुंब गर्दी केली होती. आम्ही सर्व भावे यांच्या व्याख्यानाने अतिशय प्रभावित झालो होतो. पण गुरुवर्य कुरुंदकरांनी अवघ्या दोन मिनिटांत समारोप केला. भावे आपले सन्माननीय व निमंत्रित पाहुणे आहेत. आपण त्यांचा अनादर करता कामा नये. मी त्यांची मते आता मुळीच खोडून काढणार नाही. पण उद्या याचवेळी याच ठिकाणी 'मी आस्तिक का नाही?' या विषयावर बोलणार आहे. आपण अवश्य यावे. एवढे बोलून ते खाली बसले. दुसर्‍या दिवशी गुरुवर्य कुरुंदकरांचे सामर्थ्यशाली वक्तृत्व आम्हांला ऐकायला मिळाले. ते त्यांचे भाषण वाचकांना उपलब्ध आहे.

मुळात धर्मश्रद्ध नसणं म्हणजे अनैतिकतेचे समर्थन करणं नव्हे. मानवी सौहार्द नाकारणंही नव्हे आणि पुन:पुन: माणसांना पराभूत करणार्‍या निसर्गातील चमत्काराकडे दुर्लक्ष करणंही नव्हे. धर्म हा दैवी शक्तीचा आधार घेत माणसांच्या ठिकाणी असणार्‍या बुद्धिमत्तेचा, कर्तृत्वाचा आणि न्यायबुद्धीचा अपमान करतो ही खरी देव आणि धर्मविरोधी असणार्‍यांची तक्रार आहे. आज जो काही विकास आपणाला आढळून येतो तो केवळ दैवी नाही. दैवी वाटणार्‍या निसर्गशक्तीचे गूढ उकलत माणसांनी घडवून आणलेला तो विकास आहे. पटकी आणि देवीचा आजार जगात होतो तो केवळ दैवी प्रकोपामुळे असं समजणारा माणूस दोनअडीच हजार वर्षे पूजाअर्चा करून मरत होता. पण तो रोग

जंतूंमुळे होतो आणि ते जंतू मारता येतात इथपर्यंत वैज्ञानिकांनी आम्हांला आणले हे विसरता कामा नये. धर्मश्रद्धा मानवीशक्तीला दुबळी करते एवढे आपण लक्षात घ्यायला हवे. माणसे धर्माने कुणीही असोत, पण माणसाच्या निर्मितीचे रहस्य संशोधनानेच उलगडता येते. हे ठामपणे मानणार असतील तर ती माणसे स्वत:ला हिंदू म्हणवून घेवोत की ºिश्चन, आपण त्यांचा आदरच करायला हवा. डॉ. लागू जेव्हा देव नाकारतात तेव्हा माणसाच्या संशोधनशक्तीला मारक ठरणार्‍या प्रतीकाला नाकारत असतात एवढे आम्हांला कळले तरी पुरे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment