Friday 7 September 2012

ये तो सच है के भगवान है..


सध्या पंच्याहत्तर चालू आहे बेटा, पुढच्या वर्षी पंच्याऐंशी.. वडिलांचे कोणी मित्र भेटले की साधारणपणे अशा स्वरूपाचं बोलणं होतं. कोणी पंच्याऐंशी असतं तर कोणी पंच्याहत्तरवाले असतात. मी लवून त्यांच्या पाया पडतो. उगाच मनाला वाटून जातं की नमस्कार केला नाही तर बाबांना वाटेल 'पोट्टं शहाणं झालं का?' इतके दीर्घायुषी म्हातारे पाहिले की वाटतं आपल्याही बापाने थोडंसं थांबायचं असतं. काय एवढी घाई होती? परवा दौलताबादचा किल्ला चढता-चढता थकून एका दगडावर बसलो. तिथे समोरच्याच दगडावर बसलेली वयस्क बाई म्हणाली, 'आप अभी से बैठ गये हो सोचो हमारा क्या हुआ होगा'. उत्तरादाखल मी म्हणालो, 'आपने असली माल खाया है, हम मिलावटी खाने पे पले बढे हैं.' (आठवा तुपासारख्या दिसणार्‍या तेलात गायीच्या चरबीची भेसळ असल्याची चर्चा) त्यावर सोबतचे काका म्हणाले, 'मुझे याद है बचपन में जब मेरी तबियत खराब होती थी तो माँगाय का दूध लाती थी. उसमें चने का पानी मिलाती थी और मुझे पिला देती थी. आज भी जब गाव जाता हूं और कुछ तकलीफ होती है तो माँइसी तरह के उपाय करती है.' मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. चेहर्‍यावरचे भाव ताडून ते पुढे म्हणाले, 'जी, मेरी माताजी अभी भी है और स्वस्थ है. नब्बे साल की है. स्वस्थ ही नहीं बल्की ये किला वो मुझसे भी

फुर्ती से चढ सकती है.' पुन्हा तेच, आपल्या मायबापाला काय घाई होती. अर्थात मीही नशीबवान होतोच. माझ्या एकोणतिसाव्या वर्षापर्यंत ते होते. मेरी जंग या सिनेमातला एक सुप्रसिद्घ डायलॉग आहे ज्यात अनिल कपूर वेडय़ा नूतनला म्हणजे त्याच्या आईला म्हणतो, 'किसी भी उमर के बच्चे बिना माँ-बाप के रह नहीं सकते.' (सलीम-जावेद जिंदाबाद) माझ्या एका क्लाएंटशी अवांतर बोलता-बोलता सहज कुटुंबाचा विषय निघाला. तो म्हणाला, सर, मेरे दादा-दादी अभी भी है. मी त्याला म्हणालो की, तू नशीबवान आहेस की तुला आजी-आजोबा आहेत. त्यावर तो म्हणाला, 'सर, मुझसे नसीबवाला मेरा बेटा है जिसे परदादा-परदादी है. सर, मेरा लडका जमीन पर कम दादा-परदादा के कंधों पर ज्यादा रहता है. हम लोग, तीन अंकल, दादा-दादी सारे साथ में ही रहते है और बडे मजे से रहते हैं.' माझा दुसरा क्लाएंट ज्याचा मुलगा माझ्याएवढा असेल बोलता-बोलता म्हणाला, गजाननराव आईची भलती आठवण येते राज्या! माझी बायको म्हणते आता काय वरून आणता आईला? पण काय करता राज्या? आठवण तर येतेच. परवा मी एलोरा गुफा पाहिल्या. पाहताना वाटलं आपल्या मायबापानेही हे बघायचं असतं. दोघंही हे सगळं न बघता, न अनुभवता निघून गेलेत. माझ्या मित्राला हे सांगितलं तर तो म्हणे, अरे असं समज की तुझ्या डोळ्य़ांनी तेच पाहताहेत. म्हटलं, राज्या 'समज' हा प्रकार गणितात ठीक आहे. तिथे म्हणतात, 'समजा की तीन घेतले त्याला पाचने गुणले' असं समजून कागदावर गणित मांडता येतं. आयुष्याचं गणित असं समजा करून सोडवता येत नाही. समजा की रस्त्यावर खड्डे नाहीत असं समजून खड्डे नाहीसे होत नाहीत. समजा की तू जेवला असं समजून पोट भरत नाही. जे उणेपण जगण्यात आलेलं असतं ते राहतंच. आपल्या मुलासाठी आजोबा आणि बाप दोन्ही भूमिका आपल्यालाच पार पाडाव्या लागतात. बाप गेल्यावरच 'बाप का राज है क्या' या वाक्याचा अर्थ कळतो. आईची आठवण येणार्‍या माझ्या क्लाएंटने तीन मजली जंगी घर बांधलं अन् आपल्या वडिलांना दाखवायला घेऊन गेला. छोटय़ाशा घरात राहणार्‍या, सायकलवर फिरून मसाल्याच्या पुडय़ा विकलेल्या म्हातार्‍याने ते घर पाहिलं अन् पोरांना विचारलं, 'अबे इत्ते बडे घर में रयनेकी अपनी औकात है क्या' अन् मग काही वेळ ना बाप मुलाशी बोलला ना मुलगा बापाशी. दोघांनाही भरून आलं. माय-बाप नावाचं प्रमेय सोडवता-सोडवता गणितात हुशार असणारा मित्र भेटला. बोलता-बोलता तो म्हणाला, 'गज्या, अबे आपला बाप मेला थोडीच. मरून आपल्या अंगात नाही का आला? त्याने फक्त जागा बदलली एवढंच!' बरोबर एकदम बरोबर!

प्रख्यात शायर निदा फाजली आपल्या कवितेत म्हणतात,

मैं जिन हाथों से लिखता हूं वो हाथ तुम्हारे है,

तुम्हारे मरने की सच्ची खबर जिसने फैलाई वो झुठा है

तुम मरे नहीं तुम मुझमें जिंदा हो

और मैं तुम्हारे कब्र में दफन हूं

कभी वक्त मिले तो फातहा पढने आ जाना

(फातहा = कबरीसमोर म्हणायची प्रार्थना)

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650
     

No comments:

Post a Comment