Saturday 15 September 2012

अस्मानीपेक्षा सुलतानी संकट महाभयंकर

पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर त्याची ाद कोठे मागणार? असे म्हटले जायचे. संकटांनादेखील अस्मानी आणि सुलतानी अशी नावे देण्यात आली. राजाला देवाचा अवतार मानले गेले. सरकारच्या शक्तीची तुलना निसर्गाच्या शक्तीशी करण्यात आली. एकेकाळी ते खरे असेलही.

माणसांच्या उत्क्रांतीच्या काळात पदोपदी आणि क्षणोक्षणी निसर्गाशी झगडा करावा लागला. श्वापदांचे हल्ले व्हायचे. त्याला परतावन्यासाठी दगडे भिरकवावी लागायची. धोधो पाऊस पडायला लागला. शिकारीलाच काय, साधी कंदमुळे गोळा करायला बाहेर पडता येईना, तेव्हा त्याने केलेली ढलपीची छत्री आभाळाचा हल्ला थोपविण्यासाठी केलेली ढाल होती. जंगलांना आग लागायची. वणवा पेटायचा तेव्हा तो जीवाच्या आकांताने पळत सुटायचा. पुढे याच आपत्तींना माणसाने नियंत्रणात आणले. पाणी असो की अग्नी, यांना त्याने आपल्या सेवेसाठी वापरले. अन्न शिजविण्यासाठी त्याला अग्नी वापरता आला आणि तहान भागवायला पाणी. शेतीचा शोध लागला आणि बचत निर्माण होऊ लागल्यानंतर वस्तूंची निर्मिती मोठय़ाप्रमाणात झाली. शेतीचा शोध लागला नसता तर आजही आपण नग्न अवस्थेत शिकार वा कंदमुळे शोधत भटकत राहिलो असतो. शेतकरी आणि संशोधकांनी मानवी विकासासाठी जे योगदान दिले, तेवढे अन्य कोणीही नाही. ना राज्यकत्र्यांनी, ना धर्मपंडितांनी. माणसाने निसर्गावर संपूर्ण विजय मिळविला आहे, असा दावा कोणी करीत नाही. मात्र मोठी मजल मारली हे नक्की. नैसर्गिक आपत्तीतून बचाव करून घेण्याची तजवीज निर्माण करणे, यालाच आपण प्रगती किंवा विकास म्हटले आहे.

राजाचे काय? एकेकाळी शेतीतील बचत लुटायला दरोडेखोर यायचे. त्यांनीच पुढे राज्ये स्थापन केली. 'या भागातील शेतकर्‍यांना लुटण्याचा अधिकार माझा' अशी घोषणा ज्याने केली तो त्या प्रदेशाचा राजा झाला. शेतकर्‍यांना लुटण्याचा अधिकार मिळविण्यासाठीच राजा-राजांच्या लढाया झाल्या. राजाकडे शस्त्रे असायची. फौजफाटा असायचा. रयत नि:शस्त्र, बेसावध, एकेकटी, विखुरलेली आणि युद्धतंत्राच्या बाबतीत अप्रशिक्षित. लुटल्या गेलेल्या रयतेत राजाशी दोन हात करण्याचे त्राण नसायचे. आर्थिक परिस्थिती बिकट झाली की माणसे मानसिकरित्याही पराभूत होतात. या पराभूत मानसिकेतेतून राजाला देवाचा अवतर म्हटल्या गेले. ज्या काळात अवतार म्हणणे सुरू झाले असेल, त्या काळात राजाची किती प्रचंड दहशत असेल, याची आज कल्पना सुद्धा करवत नाही.

दरोडेखोर राजे झाले. राजेशाही प्रदीर्घ काळ चालली. घराणेशाही चालली. युरोप देशांमध्ये प्रबोधनाची (रेनेसान्स) चळवळ सुरू झाली. त्यातून लोकशाही प्रथेचा जन्म झाला. वंशपरंपरेने राजा ठरण्याची प्रथा बंद झाली. लोक आपले प्रतिनिधी निवडू लागले. या प्रतिनिधींनी कायदे बनवायचे, असे ठरले. न्याय व्यवस्था अस्तित्वात आली. राज्यकारभार चालविण्याचे नियम ठरले. भारतात शेकडो राजे राजवाडे होते. ते येथील शेतकर्‍यांची लूट करायचे. प्रचंड संपत्ती त्यांनी गोळा केली होती. त्यावर त्यांची चंगळ चाले. विदेशी राजे आले. त्यांनी राज्य काबीज केले तरी ह्यांची राज्ये अबाधित होती. पुढे इंग्रज आले तर त्यांच्याशी त्यांनी जुळवून घेतले. इंग्रजांच्या देशात लोकशाही आली होती तरी ती भारतात आली नव्हती. परंतु हे मान्य करावेच लागेल की इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा कायद्याप्रमाणे न्याय देण्याची प्रथा निर्माण झाली. 'इंडियन पिनल कोड' ने सर्वसामान्य माणसाचे अस्तित्व पहिल्यांदा निर्माण करून दिले. भारताच्या राज्य घटनेच्या किती तरी पूर्वी ही सुधारणा घडून गेली होती. आज असलेल्या मानवी हक्कांचे श्रेय, घटनेपेक्षाही जास्त या कायद्याला द्यावे लागेल. 1947 साली देशाला स्वातंर्त्य मिळेपर्यंत संस्थानिकांची बजबजपुरी माजली होती. आज दिसतो तसा भारताचा नकाशा, इतिहासात पूर्वी कधीही नव्हता. आपण लोकशाही स्वीकारली. परंतु राजेशाहीत जसे शेतकर्‍यांना लुटणे हा राजधर्म होता, तसाच तो लोकशाहीतही कायम राहिला. फरक मार्गाचा पडला. राजेशाहीत थेट अन्न धान्यच घेतले जायचे. इंग्रजांनी बाजार नियंत्रित केला. कमी भावात माल विकावा लागावा, असे कायदे केले. तशी धोरणे राबविली. स्वातंर्त्यानंतर राज्य पद्धती बदलली मात्र शेतकर्‍यांची लुबाडणूक करण्याचा तथाकथित राजधर्म बदलला नाही. अनेक कायदे करून शेतकर्‍यांना कमी भावात माल विकायला भाग पाडले गेले. माणसाने निसर्गाला नियंत्रित केले. अग्नी आणि पाण्याचा वापर केला. मात्र राजांचा शेतकर्‍यांना लटण्याचा 'धर्म' मात्र माणसाला बदलता आला नाही. शतकानुशतके अव्याहतपणे लूट चालू आहे. दारिद्य्र वाढत आहे. विकास तुंबला आहे. ज्या दिवशी शेतकर्‍यांची कोंडी झाली, त्या दिवसांपासून संघर्ष सुरू झाला. इतिहासाने या महान संघर्षाची नोंद ठेवली नाही. मानवी मुक्तीचा हा इतिहास काळोखात गडप झाला. अगदी अलिकडच्या काळात छ.शिवाजी महाराजांच्या रुपाने एक वीज चमकली. हजारो वर्षानंतर शेतकर्‍यांना एक आशेचा किरण दिसला. महाराजांच्या लढाया असो की राज्य कारभार, दोन्हींचा केंद्र बिंदू 'रयत' होती. त्या काळात शेतकर्‍यांची लढाई कशी लढावी व शेतकर्‍यांचे राज्य कसे निर्माण करावे, याचे आदर्श त्यांनी घालून दिले. महाराजांचे नाव सगळेच घेतात परंतु दुर्देवाने त्यांच्या आदर्शाचे आचरण मात्र कोणीच करीत नाही. बराच मोठा काळ महाराजांना मुसलमान द्वेष्टा म्हणूनच रंगविले गेले. इतिहासाने ते खोटे सिद्ध केले. आता त्यांना विशिष्ट जातीचा रंग माखण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. धर्म आणि जातीच्या विद्वेशाचे राजकारण करणार्‍यांना महाराजांची 'शेतकर्‍यांचा राजा' ही प्रतिमा गैरसोयीची आहे. शेतकर्‍यांच्या इतिहासाची ही शोकांतिका आहे की, एक तर तो इतिहास गडप केला जात नाही तर विकृत केला जातो.

शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातील प्रकाश किरण म्हणून महात्मा जोतिबा फुले यांच्याकडे पाहता येईल. म.फुले यांनी पहिल्यांदा शेतकर्‍यांचे तत्त्वज्ञान शब्दबद्ध केले. 'शेतकर्‍याचा आसूड' लिहिला. परिस्थिती, कारण आणि उपाय या तीन गोष्टींचा विचार केला तर म.फुले यांनी शेतकर्‍यांची परिस्थिती मांडली. 'गुलामगिरीत' कारण स्पष्ट केले. शैक्षणिक कार्यातून उपाय सांगितला. म. फुलेंना अपेक्षा होती की शेतकर्‍यांची मुले शिकून आपल्या शेतीच्या गुलामगिरीच्या बेडय़ा तोडतील. परंतु तसे झाले नाही. बहुजनांच्या जातींचे राजकारण करणार्‍यांनी म.फुलेंचे नाव वापरले. त्यांनीही 'शेतकर्‍यांचा आसूड'ची उपेक्षा केली. म.फुलेंचे नाव घेऊन चार दोघांना सत्तेची पदे मिळविता आली. शेतकर्‍यांची गुलामगिरीतून मात्र मुक्तता झाली नाही. स्वातंर्त्य लढय़ाच्या काळात सर छोटूराम, दक्षिणेत नारायण स्वामी नायडू या नेत्यांनी लढे दिले. एैंशीच्या दशकात शरद जोशी आणि चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनांचे नेतृत्व केले.

नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याच्या बाबतीत मनुष्य चार का असेना पाऊले पुढे गेला. मात्र सुलतानी संकटाच्या बाबतीत ती चार पाऊले सुद्धा आम्हाला चालता आली नाहीत. एक दोघांना नव्हे, लाख लाख शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात याचा अर्थच असा की अस्मानी संकटापेक्षा सुलतानी संकट महाभयंकर आहे. आता त्यावर मात करायलाच पाहिजे.

(लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

मो. 9422931986

No comments:

Post a Comment