Saturday 29 September 2012

'बारोमास'च्या निमित्ताने


गेल्या आठवडय़ात सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' कादंबरीवरील हिंदी सिनेमाचा प्रीमियर शो नागपुरात झाला. या शोला लेखक, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मंत्री, नेते, सामाजिक कार्यकत्र्यांची आवर्जून उपस्थिती होती. सदानंद देशमुख यांची 'बारोमास' ही कादंबरी शेतकरी जीवनाचे वास्तव मांडणारी व शेतकरी निखळपणे नायक असलेली मराठीतील पहिली कादंबरी. एरवी या देशातील कोणत्याही भाषेच्या साहित्यामध्ये शेतकरी हा नायक आढळत नाही. असलाच तर तो खलनायक असतो किंवा विनोदी पात्र बनून साहित्यात अवतरतो. गाव, शेती, शेतकरी यांचं साहित्यातील चित्रण व वास्तवता यांचा अर्थाअर्थी कधीच संबंध राहिला नाही. एकतर गावाचं नितांत सुंदर चित्रण साहित्यात रंगविलेले आहे. गाव कसं सुंदर. गावात झुळझुळ वाहणारी नदी. गावात गुण्यागोविंदाने राहणारी माणसं. गावाचा वारा किती सुंदर. गावची कांदा-भाकर वा.. वा किती गोड. गावातली झोपडी, त्यातून डायरेक्ट येणारा सूर्यप्रकाश वा चंद्रप्रकाश. गावचा गुराखी, त्याच्या हातातील बासरी म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचाच अवतार. आणि गाव तर जणू गोकुळच. सर्वत्र आबादी-आबाद किंवा आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे गावाचे चित्रण. गावच्या गरिबीचे, दारिद्रय़ाचे, तिथल्या अभावाचेही उदात्तीकरण. कांदा, भाकर एक दिवस चवपालट म्हणून गोड असेल पण आयुष्यभर तीच खायची तर त्यात गोडी कशी असणार? हा प्रश्नही तथाकथित उच्चभ्रू, उच्चवर्णीय साहित्यिकाला पडला नाही. म्हणून त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडले नाही. दुसर्‍या प्रकारच्या साहित्यात गाव म्हणजे 'एक गाव बारा भानगडी.' ज्या काही भानगडी असतील त्या सर्व गावात. गावचा पाटील म्हणजे तर एक नंबरचा हलकट, अन्यायी, अत्याचारी, जुगारी, दारूडय़ा, स्त्रीलंपट. दिसेल त्या स्त्रीची अब्रू लुटणारा, काहीही कामधंदा नसलेला, मग्रूर, उद्धट, मुजोर, भांडखोर. असा गावचा पाटील तर आता आतापर्यंत मराठी साहित्यात व मराठी सिनेमाच्या पडद्यावर दाखविला जात होता. असा हा पाटील शहरी प्रेक्षक साहित्यात चवीने वाचत होता तर पडद्यावर मिटक्या मारत पहात होता. गावच्या माणसांचे असे हे विकृत चित्रणच साहित्यामध्ये भरभरून होते आणि आजही आहे. गावचा पाटील असो वा सरपंच हे तर हलकटच; पण गावच्या इतर माणसांना अक्कल कोठे? एकूण काय तर गावच्या गरिबीचे उदात्तीकरण करीत गाव किती सुंदर याचे चित्रण किंवा दुसर्‍या टोकाला जाऊन गाव, त्यातील माणसं कशी हलकट याचं चित्रण. या दोन्ही चित्रणामध्ये गाव, गावची शेती, शेतकरी, गावचे बारा बलुतेदार, त्यांची गरिबी, दैन्य-दारिद्रय़ यांचे वास्तव चित्रण अनेक वर्षे साहित्यामधून हद्दपारच होते. ते तसे हद्दपार का झाले किंवा का केले गेले हा खरंतर गंभीर चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे; पण कृषिप्रधान देशात त्यावर चिंताही नाही अथवा चिंतनही नाही हेच दुर्दैव आहे.

'मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती'च्या गदारोळात शेतकर्‍यांचे दु:ख झाकून टाकल्या गेले. ज्या देशातल्या जमिनीत केवळ सोने, हिरे, मोतीच पिकतात, त्या देशातला जमिनीचा मालक असलेला शेतकरी श्रीमंतच असणार. त्याला ददात ती कशाची? मराठी कवितेत ज्वारीच्या कणसाला मोत्याचेच पीक येत असेल किंवा कणसाला चांदणेच लगडून येत असेल तर त्या शेतकर्‍यांना दु:ख कोणते असणार? त्यामुळे शेतकर्‍यांचे दु:ख कधी मांडल्याच गेले नाही. उलट 'मेरे देश की धरती सोना उगले उगेल हिरे मोती'च्या आवरणाखाली झाकल्या गेले किंवा ज्वारीला मोती लावून मारल्या गेले किंवा लगडलेल्या चांदण्यात लपविल्या गेले.

आदिवासी, शेतमजूर, भूमिहीन यांच्यावरील अन्याय-अत्याचाराचे चित्रण साहित्यात व सिनेमातही पडलेले दिसते. पण याबाबतीत साहित्यात व सिनेमात शेतकरीच कसा विस्मरणात गेला हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. 'दो बिघा जमिनी'चा मालक असेपर्यंत शेतकरी साहित्यासाठी 'नायक' ठरत नाही. पण हाच 'दो बिघा जमिनी'चा मालक शहरात येऊन रिक्षा चालवतो तेव्हा साहित्य आणि सिनेमात नायक बनतो असे का व्हावे? साहित्यात भूमिहीन, शेतमजूर, आदिवासी नायक आहे किंवा शेतकरी जमिनीवरून उखडून फेकल्या गेला, विस्थापित झाला. शहरात कामगार, हमाल, रिक्षाचालक बनला. खेडय़ातून शहरात झोपडपट्टीत आला तर तोच खेडय़ातून विस्थापित झालेला शेतकरी मात्र नायक बनतो. असे का झाले आणि का व्हावे?

सदानंद देशमुख लिखित 'बारोमास' ही कादंबरी मात्र याला अपवाद आहे. या कादंबरीत प्रथमच शेतकरी नायक म्हणून येतो. कादंबरीचा नायक एकनाथ, त्याचा आजा नानू आजा आणि वडील सुभानराव असा तीन पिढय़ांच्या पडझडीचा पट ही कादंबरी उलगडून दाखवते. हायब्रीड पीक येण्याआधीचा म्हणजेच हरितक्रांतीपूर्वीचा शेतकरी नायक एकनाथचा आजा आणि हरितक्रांतीनंतर शेती करणारे एकनाथचे वडील सुभानराव या दोन्हींचा साक्षीदार एकनाथ आहे.

'बारोमास' या कादंबरीतील नानू आज्याचा प्रश्न 'हे हाब्रीड तुमचंभी हाब्रीड करल एक दिवस. आरे पीक होते म्हंता बदबद. पण तो नुस्ता भपका. दिसायले देखावा. सम्द उत्पन्न खर्चातच आटून जाते. न तुमचं.दांडातलं पाणी दांडातच आटून जाते. वाफा कोल्डा फटांग. हे बर्कतीचं आस्त तं पैसा जाते कुठी तुमचा?'

हरितक्रांतीनंतर 'उत्पादन' वाढलं पण शेतकर्‍यांचं 'उत्पन्न' कमी झाल.ं यावर नेमका लेखक नानू आज्याच्या निमित्ताने बोट ठेवतो.

एका ठिकाणी एकनाथ म्हणतो, 'पण शेती पिकली तर भाव नसतात अन् भाव असतात तेव्हा शेतीच पिकत नाही.'

शेतकर्‍यांच्या वास्तव जगण्याचं इतकं जिवंत चित्रण 'बारोमास'मध्ये आलेलं आहे की त्याला तोड नाही. गाव, शेती, शेतकरी यावर लिहिले गेलेच नाही असेही नाही. पूर्वी म्हटल्याप्रमाणे एकतर ते, 'उगले हिरे मोती'च्या धर्तीवर तरी होतं किंवा ज्वारीचे कणीस मोत्याने व चांदण्याने लगडलेल्या प्रकारात मोडणारं साहित्य होतं. वास्तवापासून कोसो दूर असलेला साहित्यातला शेतकरी 'बारोमास'मध्ये वास्तवाच्या जवळ येतो हेच 'बारोमास'चे व बारोमासकार सदानंद देशमुख यांचे वेगळेपण.

गावातल्या शेतकर्‍याच्या दु:खाला गावातलाच कोणीतरी जबाबदार अशाप्रकारचंही चित्रण साहित्यात आढळतं. नायक समजा शेतकरी असलाच तर खलनायक सावकार, सरपंच, पाटील किंवा जमीनदार. भूमिहीन, आदिवासी, शेतमजूर नायक असला तर खलनायक शेतकरी. म्हणजे गावातल्या दु:ख, दैन्य, दारिद्रय़ाला जबाबदार जर कोणी असेल तर गावातलाच. पण 'बारोमास'मध्ये शेतकरी नायक असला तरी खलनायक म्हणून 'परिस्थिती' प्रामुख्याने समोर येते. इथे माणसं दुष्टाव्याने वागत असली तरीही ती परिस्थितीच्या अगतिक व असहाय्यतेतून ती तशी वागतात, हे स्पष्ट होते आणि हळूहळू शेतकरी, त्याची दुरवस्था, त्याच्या संसाराचे तानेबाणे, सरकारी धोरणांशी निगडित शेतकरी शोषणाचे धागेदोरे हळूवारपणे 'बारोमास'मध्ये उलगडत जातात.

निखळ शेतकरी नायक असलेली 'बारोमास' कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा वर्षभरात त्याच्या केवळ बावीस प्रतीच खपल्या. परिस्थिती अशीच राहिली असती तर 'बारोमास'मध्ये आत्महत्या करणारे एकनाथचे वडील सुभानराव यांच्यासारखीच पाळी लेखक व प्रकाशकांवर आली असती. पण नशीब शेतकर्‍याचे की तो नायक असलेल्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि ही कादंबरी प्रकाशझोतात आली. पुढे तर या कादंबरीने इतिहासच घडवला. शेतकरी जीवनावरचे इतके दाहक, वास्तववादी चित्रण साहित्यात अन्यत्र आढळत नाही ही कबुली नंतर नाक मुरडत का होईना अनेकांनी दिली. सदानंद देशमुखांनी 'बारोमास' या कादंबरीत नायक म्हणून रंगविलेला 'शेतकरी' आता प्रत्यक्ष सिनेमाच्या पडद्यावर 'नायक' म्हणून वावरणार आहे. साहित्यात नायक म्हणून आलेला शेतकरी, सिनेमाच्या पडद्यावर नायक म्हणून वावरणारा शेतकरी प्रत्यक्ष समाजजीवनात नायक म्हणून कधी व केव्हा स्वीकारल्या जाईल? स्वीकारल्या जाईल अथवा नाही? हाच प्रश्न 'बारोमास' सिनेमाच्या प्रीमियर शोच्या निमित्ताने माझ्या मनात वारंवार उसळी मारतो आहे हेही तेवढंच खर.ं

(लेखक चंद्रकांत वानखडे शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment