Wednesday 5 September 2012

कविता, गझल आणि मुक्त गझल!


कविता म्हणजे तसा अतिशय लोकप्रिय प्रकार. गझलच्या काव्यप्रकाराचे तर असंख्य चाहते आहेत. गझल तशी मराठीमध्ये चांगलीच रुळली. स्थिरावलीय.

कविता कशी होते, याचं कुतूहल रसिकांना असतं! गझल ही तंत्राच्या बाबतीत फार काटेकोर असते, पण कविता बरीच स्वतंत्र आहे त्यामानाने. ही गझल कशी होते, हे सांगणं तसं कठीणच आहे.

खरं तर मनाला आलेला पूर टेप घेऊन मोजायचा नसतो. मुक्तपणे व्यक्त होणं हाच कवीचा स्वभाव; मात्र कविता निर्मिती ही वेगळी प्रक्रिया आहे. वेदना-संवेदना आणि चिंतनाच्या घुसळणाचा योजनाबद्ध कलात्मक आविष्कार म्हणजे कविता होय. जसं घुसळण - तसेच परिणाम! घुसळणातून ताकही बाहेर पडणार. लोणीही हातात येणार! लोणी तापवलं की तूप-विरजण घातलं की दही आणि आणखीही बरंच काही! पण दूध मात्र असली हवं!

कविता कशी होते, कशी लिहावी याचे काही नियम नाहीत. असूही शकत नाहीत. कवितेची व्याख्या करणंही तसं कठीणच! धुक्याची वीण आणि ढगांचे आकार कुणाला सांगता येतील का? कवितेचंही तसंच आहे. आपण फक्त दिशानिर्देश करू शकतो. जुन्या वाटांचा आधार घेऊन काही ठोकताळे मांडू शकतो. एका मर्यादेपर्यंत ते मार्गदर्शकही ठरतात. पण त्यांचा अतिआग्रह बरा नाही. असल्या ठोकताळ्य़ांनाच 'ब्रम्हवाक्य' समजणं आणि येता जाता कुणावरही त्या चौकटी लादणं ही अतिरेकी कृती आहे. कवितेलाच नव्हे तर कुठल्याही सृजनाला ती मारकच आहे!

पूर्वी मुक्तछंदाच्या विरोधात असाच गदारोळ उठला होता. आता गझलेच्या प्रांतात तंत्राचा अतिरेकी आग्रह धरणारे काही अतिउत्साही लोक नवे प्रयोग करणार्‍याची शिकार करण्यासाठी टपून बसलेले असतात. बाबा आदमच्या जमान्यातील गंजलेली शस्त्रे घेऊन हे 'तंत्रपाळे' पंथाचे लोक सार्‍या गावाला शहाणपणा वाटत फिरतात! याचा त्रास सुरेश भटांनाही झाला. भीमराव पांचाळेंनाही झाला. शुद्ध, सात्त्विक हेतूने मार्गदर्शन करणं वेगळं आणि आगाऊपणा वेगळा!

वास्तविक कलाकृती आधी जन्माला येते नंतर त्याचा अभ्यास करून शास्त्राची मांडणी केली जाते. आधी नाचण्याचं शास्त्र तयार झालं आणि नंतर मोर नाचायला लागलेत. असं झालय का कधी? पण तंत्राचा थोडासा अभ्यास करून पिवळे झालेले पंडित जेव्हा 'असे नाचू नका-तसे लिहू नका?' अशी मुजोरी करत मोरांनाच नाच शिकवायला लागतात, तेव्हा कुणीतरी पुढे येऊन त्यांना समज देण्याची गरज निर्माण होते.

अशाच काही तक्रारी समोर आल्या. मलाही त्या असह्य झाल्या आणि म्हणूनच मागे मी गझलच्या प्रांतात 'मुक्त गझल'ची संकल्पना मांडली होती. तिच्यावर जरा खुलासेवार भाष्य करण्यासाठी ही योग्य जागा आहे, असं मला वाटते.

मुक्त गझल

'मुक्त गझल' ही सुद्धा परिपूर्ण गझलच आहे. गझल हे 'वृत्त' नसून 'वृत्ती' आहे. असा सर्वमान्य सिद्धांत आहे. तो मुक्त गझलालाही लागू आहेच. फक्त तंत्राच्या बाबतीत, इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करतानाच काही प्रमाणात योग्य तो बदल करण्याचं स्वातंर्त्य 'मुक्त गझल'मध्ये घेता येईल. कवीच्या अपुर्‍या क्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी किंवा पळवाट शोधण्यासाठी मुक्त गझलची संकल्पना नसून समर्थ प्रतिभा असलेल्या कवीने स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक घेतलेले स्वातंर्त्य आणि त्यानुसार केलेली रचना म्हणजे 'मुक्त गझल' होय.

कृपया ही 'मुक्त गझल' बघावी.

सोहळा हा खास होतो.. बारमाही

आगळा वनवास होतो.. बारमाही !

भेटलो का आठवेना.. बोललो का आठवेना

का तुझा आभास होतो.. बारमाही?

वादळाच्या सोबतीला पेरले का चांदणे तू

काळजाला त्रास होतो.. बारमाही!

या नदीला, त्या नदीला.. त्या नदीला पूर येतो

.. आणि मी मधुमास होतो.. बारमाही!

केवढा भन्नाट आहे.. सांडण्याचा खेळ सारा

जन्म होतो, र्‍हास होतो.. बारमाही!

आता मी यात कोणतं स्वातंर्त्य घेतलं? तर 'मतला' किंवा पहिल्या शेराच्या दोन्ही ओळी मधील मात्रा आणि लगावलीचा क्रम हा दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या शेराच्या दुसर्‍या ओळीत तंतोतंत पाळला. पण दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या शेराच्या पहिल्या ओळीत मात्र सात मात्रा जास्त घेतल्यात. सध्याच्या तंत्राप्रमाणे मी जर कमी असलेल्या ओळीत सात मात्रा वाढवल्या की हीच परिपूर्ण गझल तयार होते. त्यासाठी मला फार काही करावेही लागत नाही. आता बघा..

सोहळा हा खास होतो.. बारमाही बारमाही

आगळा वनवास होतो.. बारमाही बारमाही !

वादळाच्या सोबतीला.. पेरले का चांदणे तू

काळजाला त्रास होतो.. बारमाही बारमाही!

या नदीला, त्या नदीला.. त्या नदीला पूर येतो

.. आणि मी मधुमास होतो.. बारमाही बारमाही!

मग मी हे स्वातंर्त्य का घेतले? तर 'या नदीला, त्या नदीला, त्या नदीला पूर येतो' या ओळीत 'नदीला' या शब्दाच्या पुनरावृत्तीमुळे येणारी 'अथांगता' मला हवी होती. ती 'या नदीला, त्या नदीला पूर येतो' या ओळीमध्ये येत नाही. मग सार्‍याच ओळीमध्ये बारमाही शब्द दोनदा वापरून मी ती गझल का लिहिली नाही, तर 'काळजाला त्रास होतो बारमाही।' यातली आर्तता 'काळजाला त्रास होतो.. बारमाही बारमाही' या ओळीत राहत नाही ! 'बारमाही' या शब्दाची पुनरावृत्ती त्या आर्ततेला मारक आहे, असे मला वाटते. 'आर्तता' आणि 'अथांगता या बाबतीत मला कुठलीही तडजोड करायची नसल्यामुळे मी हा मार्ग निवडला आणि तयार झाली एक 'मुक्त गझल!'

अर्थात तंत्रामुळे कवी कधीही मोठा होत नसतो. कवीमुळे तंत्राचं महत्त्व वाढते. तुकारामांचे अभंग असो, बहिणाबाईंच्या ओव्या असोत की कबिराचे दोहे असो, त्यांच्या प्रतिभेमुळे अजरामर झालेत. तंत्रामुळे/वृत्तामुळे नव्हे.

याचा अर्थ तंत्र शिकूच नये असा नव्हे. माझा तंत्राला विरोध नाही. विरोध तंत्राच्या अतिरेकाला आहे.

मी तंत्रातला तज्ज्ञ नाही, पण म्हणून तंत्रशुद्ध लिहू शकत नाही असेही कृपया समजू नये. कवितेतल्या सुमारे 18-20 प्रकारांमध्ये मी लिखाण केलेले आहे. रसिकांची भरभरून दादही मिळालेली आहे.

अशाप्रकारे तंत्रात सूट घेऊन लिहिण्याचे प्रयोग फारसी आणि उर्दू भाषेत आधीही झालेले आहेत. त्याला 'मुस्तजाद गझल' असे म्हणतात. 'मुस्तजाद' हा अरबी भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ वाढवलेला / अतिरिक्त असा होतो. पण हा शब्द मला तितकासा बरोबर वाटत नाही. मराठीमध्ये अशा तंत्राच्या बाबतीत किरकोळ कमतरता राहून गेलेल्या रचनेला 'गझलसदृश रचना' असे म्हणतात, हाही आडवळणाचाच शब्द वाटतो. त्यापेक्षा 'मुक्त गझल' हा शब्द मला स्वत:ला जास्त योग्य वाटतो.

अर्थात हे माझं मत आहे. मी अतिशय नम्रपणे ते व्यक्त केले आहे. माझा कुठलाही आग्रह नाही. मराठी भाषेत असा प्रकार नाही. असेही कुणी म्हणतील, पण गझलही मराठीत बाहेरूनच आली ना? मग अशी सूट घेणारी गझलही येऊ द्या. त्या प्रकाराला 'मुक्त गझल' हे नाव मात्र मी दिलेलं आहे. पटलं तर घ्याव. रसिकांचा निर्णय अंतिम!

अर्थात यावर आणखी चर्चेला वाव आहे. गरजही आहे. शिकत शिकतच पुढे जायचं आहे. कुणीही परिपूर्ण नसतो. मीही नाही. काळाच्या ओघात मौलिक असेल तेच टिकेल. कामाचं असेल ते मातीत पडलं असलं तरी आपण उचलून घेतो, हाच जगाचा नियम आहे.

त्यामुळे तंत्राच्या अतिरेकी आहारी जाऊन कुठलीही दुराग्रही भूमिका घेऊ नका. नव्या प्रयोगांची 'भ्रूणहत्या' करू नका. एवढच नम्रपणे सुचवावसं वाटतं! आपण सुज्ञ आहातच! गैरसमज नसावा!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

1 comment:

  1. 👌👌👌👌👌 खूप छान लेख, आणि खूप छान संकल्पना 'मुक्तगझल' 😍❤️❤️

    ReplyDelete