Wednesday 5 September 2012

सद्गुनाची कलई करून घ्या लागते


मांगच्या हप्ती म्या तुमाले आर्केस्ट्राच्या काई आठोनी सांगतल्या. त्या आठोतानी हे आठोलं का तवा एस. टी. महामंडयाच्या गाडय़ा सुरू होऊन जुन्या परायवेट कंपन्याच्या गाडय़ा बंद झाल्या होत्या. हे याच्याच्यानं आठोल कां त्या बंद झालेल्या कंपनीतली एक गाडी दाते कालेजनं कालेजच्या पोरींना गावातून कालेजमंदी नेन्यासाठी इकत घेतली होती अन् तेच गाडी संध्याकायी दुसर्‍या शयरात कार्यकरम असला तं आमी ते गाडी भाडय़ानं घेऊन जावो. म्हून मले जवा या परायवेट गाडय़ा चालू होत्या तो काय आठोला. आमचं गाव हे आकोला आन् पुसद अस्या दोनी शयराले जाता येनारं गाव हाय. बोरीवून पुढं दारव्यापावतर एकच सडक आन् तिथून एक सिदी जानारी सडक अकोल्याले आन् डावीकडून जानारी सडक पुसदले. तिथून असे फाटे फुटत असल्याच्यानं माह्या गावापासून दोनी शयराकडं जाता येते. तवा आकोल्याले जाचं असन तं युनायटेड कंपनीची दुपारी दोनची बस एक टाईम. एक डाव ते गाडी हुकली का मंग गाडी नव्हती आन् तिकून येनारा दुपारी अकराचा टाईम बस. पुसदले जानारे जरा जादा टाईम होते पन तरी मोजकेच. दत्त सर्व्हिस, न्यू समर्थ, श्रीसमर्थ अस्या कंपन्यांच्या गाडय़ा.

सकायी साडेनव वाजता दत्त सर्व्हिसची कथ्थ्या रंगाची गाडी आमच्या घरासामोर सडकिले लागून असलेल्या निंबाच्या झाडापासी थांबे. तिले लोकं पोस्टाची गाडी म्हनत. गाडी थांबली का, तिचा डरायवर खाली उतरून बाजूले असलेल्या बापूरावच्या पानठेल्यावर जातानी अलीकडच्या नालीत यवतमायपासून तोंडात संभायून आनलेलं पान थुंकून टाके. मंग बापूरावच्या पानठेल्यापासी उभा होत नाई तं हा रोजचाच नेम असल्याच्यानं बापूरावनं हाटेलात आवाज देऊन सांगतलेला पाण्याचा काचाचा गिलास तयार राहे. तवा हाटेलात दोनतीनंच काचेचे मानवाईक गिर्‍हाइकांसाठी गिलास राहे. बाकी जनरल जरमलचे गिलास राहे. थो गिलास उचलून डरायवर पाण्याचा मोठा घोट घेऊन तोंडातल्या तोंडात गरारा करून थो गुराया बाजूच्या नालीत टाकून, राह्यलेलं पानी पिऊन टाकून खाली गिलास ठेवत नाई तं हाटेलातलं पोरगं गरम चहाची कपबशी आनून ठुवे आन् खाली गिलास घेऊन जाये. त्यायचं नाव काय होतं काय माईत, पन बापूराव त्याले आवो डरायवर साब म्हने. आलेल्या कपबशीतला कप दांडी धरून उचलून त्यातला चहा बसीत थोडा वतून बापूरावले दे आन् कपानं सोता फूक मारत च्या पेत. तिथंच उभा राहे ते कवा हाटेलात ना जाये. डरायवर सायबाचं बोलनं जसं इकत घ्या लागे आन् कंडक्टर जो होता त्याले बाबू म्हनत. तो बोलाले अघयपघय आन् आंगानयी तसाच. डरायवरचं च्या पेनं झालं का थे पानठेल्यावर आल्याबराबर बापूराव दोन मोठे कपुरी पानं पानी झटकून पह्यले चुन्याची दांडी फिरवे. मंग काथ्याची दांडी फिरवून पान हातातून सामोरच्या तबकात ठुवाच्या आंधी चुन्याच्या दांडीनं चुना झटके. थो काथावर उठून दिसे. च्या पिवूस्तर ते पान अखीनं कथ्थं झालेलं राहे. पानं लावताना बापूरावकडं पाह्यनं हा एक आनंदच राहे. त्यायचं पान लावून झालं का बापूराव सामोर ठेवलेलं पानदान उचलून त्यायच्या म्होर धरे आन् ते तीन बोटानं अलगद तोंडात सरकवे. ते पान बराबर गालाच्या खोबनीत ठुवाची आदत राहे. त्या वक्ती गाडीचा डरायवर, टुरिंग टाकीजचा आपरेटर हे खेडय़ातल्या साद्यासुद्या मानसासाठी व्हीआयपी राह्यते.

हे माह्या लहानपनच्या आठोनी. तवा आता नासुकल्या वाटनार्‍या गोष्ठीचं अप्रूप वाटे. ते गाडी आपल्या घरासमोर उभी राह्यते याचं अप्रूप. थो डरायवर आपल्याकडं पाहून ''कैसे हो मुन्ना?'' म्हंते म्हंजे आपल्याले ओयखते याचं अप्रूप. डरायवरच्या च्यावून हे आठोलं, का त्या वक्ती हाटेलात तीन परकारचा च्या राहे. एक चालू च्या. तो तवा गुयाचा राहत असावं तं दुसरा गोल्डन च्या आन् भारीवाला पेसल च्या. बरेचं दिवस हे चाल्लं आन् मंग काई दिसानं हे च्याचे पह्यले दोन परकार बंद झाले आन् मंग पेसल च्या आन् बादशाही च्या असं झालं. हे सारं लेयाचं यासाठी हाय का माह्या पिढीचे हायेत. त्यायले अखीन आठोनीची लपाछपी खेयाले भेट्टे आन् पुढच्या पिढीले ना पायलेलं वाचाले भेट्टे. आमच्या लहानपनी सेनिमाचं किती अप्रूप म्हनान. मले अजून आठोते, का त्या वक्ती राज कपूरचा 'संगम' ह्या सेनिमा उमरावतीच्या 'परभात' थेटरात पह्यल्यांदा लागनार म्हून तो सेनिमा पह्यल्या दिसीचा पह्यला शो पहाचा म्हून आमच्या बोरीवून चार जन आंदिल्या दिसी मुक्कामानं. आन् मुक्काम कुठी तं सेनिमाच्या टिकीटच्या खिडकीसामोर नंबर लावून. उमरावतीवून सेनिमा पाहून आल्यावर्त गावात यायचं मार्केट. ना जाऊ शकलेले पोरं मंग यायच्या मांग स्टोरी आयकासाठी. आता होते काय का ईस रुपयाची सिडी आनली तं अख्ख घर सेनिमा पाह्यते थोयी काल रिलीज झालेला नाई तं आमच्या लहानपनी माह्या गावाले बोरीले उन्हाया याच्या आंधी टुरिंग टाकीज ये. पडद्याची टाकीज. एका शेल्यावून मसनीचं केबिन. केबिनपासून अरध्या परीस जादा अंतरावर मंधात चारी बाजूनं काया रंगाच्या पट्टय़ा आन् मंधात पांढरा कपडा असलेला पडदा. अलीकडून मानसं आन् पलीकडून बायायले बसाले जागा. थोडय़ा अंतरावर टिकीट बुकिंगची लहान केबिन. आमच्या लहान पोट्टय़ायच्या चार चकरा कोन्ता सेनिमा लागते हे पाहासाठी.

आमच्या बोरीले जे माह्या आठोनीतली पह्यली टाकीज आठोते ते 'हिरा टुरिंग टाकीज'. तवा जादा धार्मिकच सेनिमे लागत. मी तवा तिसरी, चौथीत असल्यानं माहा नंबर मायच्या संग. माय सुना आन् लेकीयसंग मले ने. घरून जातानी कोनापासी तरी घडी केलेली सतरंजी राहे. थे आतनी गेलं का आथराची आन् बसाचं. या एकमेकीसंग बोलेत तं त्यायचा टाईमपास होये. पन मी एकला असल्याच्यानं सेनिमा चालू व्हाची वाट पाह्यनं जिवावर ये. मंग मी मायच्या मांग लागो, ''मा कवा होते वं चालू!'' त्याच्यावर थे म्हने, ''होते ना बाबू! जरा दम धर ना!'' आखरीले मी कुदकुद कराले लागलो का मंधातला जो पडदा होता थो वारा जिकून वाहे त्या टोकाकून दुसर्‍या टोकापावतर जसे नदीच्या थांबलेल्या पान्यावर तरंगा मागे तरंग येते तसे त्या पडद्यावर येत. ते दाखवत माय म्हने, ''बाबू, तुले पडद्यावर तरंगा मांग तरंग दिसून राह्यले ना थे तिथं सेनिमातले कलाकार भरनं चालू हाय. एकडाव सारे कलाकार भरले, का मंग सेनिमा चालू होते, समजलं?''

अस्या एक एक जुन्या आठोनी माहा पिछा नाई सोडून राह्यल्या. आजकाल या पॉश लोकायच्या घरातलं त्यायचं सयपाकघर पाहावं आन् त्यायचे भांडे पाहावं तं मानूस पाह्यतच राह्यते. आमच्या लहानपनी लहानमोठय़ा गंजापासून ताटवाटय़ा पावतर कोनाकडं पितयीचे आन् कोनाकडं जरमलचे भांडे राहे. आंगधुनीत तांब्याचं गंगाय आन् वरन सिजवाले कास्याचा कसीला. जादा भांडय़ांचा पसारा नोता. कवा पाच, धा मानसं जेवाले असले तं उसन्याची माय कवाचं मरे नाई. सयपाकाच्या वट्टय़ासामोर आपल्या हातानं पितयी ताट घेऊन चुलीपासी बसलेल्या मायच्या सामोर धरलं का ते उस्यावरच्या कसील्यातून पितयीच्या पयीनं वरन ताटात वाढून अलीकून भाकर मोडून ठुवे. आपन खाली ताट ठेवून बसलो का, वरनाच्या पाण्याचा लोट ताटात सरकाले पाहे. तवा माय चुलीपासच्या गवरीचं खांड (तुकडा) फेके. ते वरतून ताटाखाली लावाचं. त्याले अडगन म्हनत. पितयीच्या ताटाले, वाटय़ाले, गंजायले आतून कलई करा लागे. नाईतं त्याच्यात आंबटचिंबट ठुलं तं कयकाचं भेव राहे. आता तं मानसाले कलई कराची वक्ता आली हाय? आजकाल लोकायची नियत इतकी खराब होत चाल्ली हाय का इचारू नोका. सारेच तसे नसले तरी कोनाचा भरोसा करावं हेच समजत नाई. मी तं म्हन्तो मानसानं अवगुन झाकासाठी सद्गुनाची कलई करून घ्यावं! पाहा तुमाले पटते कां?

(लेखक शंकर बडे  हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री

कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment