Saturday 15 September 2012

धवलक्रांतीची काळी किनार


डॉ.वर्गीस कुरियन यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच निधन झाले. आवडत नाही म्हणून दुधाचा स्वत: एक थेंबही न पिणार्‍या डॉ. कुरियन यांनी दुधाच्या क्षेत्रात 'धवलक्रांती' घडवून आणावी हाच मोठा चमत्कार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातील वृत्तपत्रांमधून त्यांचा गौरव करणारे लेख, अगल्रेख लिहिले गेले. देशभर त्यांना आदरांजली वाहिली गेली. श्वेतक्रांतीचा जनक, धवलक्रांतीचा प्रणेता, दुधाचा महापूर योजनेचा नायक, दुधाच्या उत्पादनात भारताला आघाडीवर आणणारा महर्षी, 'अमूल'मॅन, 'मिल्कमॅन' अशा शब्दसुमनांनी त्यांचा गौरवही करण्यात आला. 1960 मध्ये 20 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन करणारा भारत आज 122 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन करतो याचेही श्रेय त्यांना देण्यात आले. 'अमूल'मॅनने सुमारे 33 लाख शेतकरी व 16 हजार दूध उत्पादक संस्था 'अमूल'शी जोडल्या. दररोज 90 लाख लीटर दूध संकलन, देशभरातील 5 हजार घाऊक विक्रेत्यांमार्फत 'अमूल'च्या विविध उत्पादनांचे वितरण व जगातील 37 देशांत 'अमूल'ची उत्पादने विकली जातात. याचा आवर्जून उल्लेख 'अमूल'मॅन डॉ. वर्गीस कुरियन यांच्या निधनानिमित्त झाला. हे सर्व खरे असले तरीही डॉ. वर्गीस कुरियन यांनी 'माझंही एक स्वप्न होतं..' या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे- ''आपल्या समाजातल्या सर्वात दुर्लक्षित घटकाचा म्हणजे शेतकर्‍याचा स्त्री-पुरुष दोघांचाही विकास आम्हाला साधायचा होता.'' हे जे स्वप्न पाहिले होते ते कितपत यशस्वी झाले यादृष्टीनेही विचार करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आपल्या देशात विकासाचा दर वाढतो आहे हे कौतुकाने सांगायचे, पण वाढती विषमता मात्र झाकून ठेवायची असा जो प्रकार घडतो तोच प्रकार 'धवलक्रांती'ची गोष्ट करताना त्याची 'काळी' बाजू मात्र झाकली जाते. देशात 'हरितक्रांती' झाली. दुधाची 'धवलक्रांती' झाली म्हणजे अन्नधान्याचे, दुधाचे उत्पादन वाढले. 1950 मध्ये 50 मिलीयन टन अन्नधान्याचे 'उत्पादन' होत होते, ते आज 246 मिलीयन टनापर्यंत पोहोचले. तीच गोष्ट दुधाची. 1960 मध्ये 20 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होत होते, ते आज 122 दशलक्ष टन होते. पण ही उत्पादनाची वाढ सांगत असताना या उत्पादनवाढीचा फायदा नेमका कोणाला झाला? ज्याच्या हितासाठी म्हणून ही उत्पादन वाढ करायची म्हणून सांगितले गेले त्याच शेतकर्‍यांचा तर फायदा झालेला दिसत नाही. कारण 'उत्पादन' वाढले, पण त्याचे 'उत्पन्न' वाढले नाही. तसेच उत्पादनात वाढ होत असतानाच शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणाही वाढला. एवढेच नव्हे, तर उत्पादनवाढीसोबतच शेतकर्‍यांच्या आत्महत्येमध्येही वाढ झाली आहे. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी उत्पादन वाढ सांगितली, पण झाले अकल्याण? म्हणजेच मोगरा फुलण्याच्या योजनेला लागली धोतर्‍याची फुले, पेरले टमाटरचे बी आणि उगवली वांग्याची झाडे. शेतीत प्रकाश पेरला आणि उगवला अंधार. शेतकर्‍याच्या भल्यासाठी योजना राबविल्या आणि पीक आलं शेतकरी आत्महत्येचं. असं कसं घडलं? असं तर होत नसतं. पेराल तेच उगवेल हा तर निसर्गाचा नियम. पण शेतकर्‍यांच्याच बाबतीत 'जीवन' पेरता पेरताच त्याचं 'मरण' कसं उगवलं?

अन्नधान्याचे, दुधाचे 'उत्पादन' वाढले, पण शेतकर्‍यांचे 'उत्पन्न' कमी झाले. पर्यायाने त्यांचा उपभोगही कमी झाला. 1950 ते 1990 च्या दरम्यान शेतकर्‍यांचा दरमहा दरडोई अन्नधान्याचा उपभोग 17 किलो होता. तो उपभोग आता 13 किलोपर्यंत घसरला आहे. म्हणजेच अन्नधान्याचे उत्पादन वाढले. देशाची अन्नधान्याची कोठारे भरली, पण हेच उत्पादन वाढविणार्‍या शेतकर्‍यांची पोटं मात्र उपाशी राहिली. उत्पादकच उत्पादन वाढवून उपाशी. तीच गोष्ट दुधाची. दुधाचा तुटवडा शहरांमध्ये होता तेव्हा किमान शेतकर्‍यांच्या घरात त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडी दूध, तूप लागायचं. दूध क्वचितच विकण्यासाठी असायचं. ताक तर मोफतच दिलं जायचं. 'दुधाचा महापूर' योजना आली. गाई-म्हशींसाठी कर्ज दिले गेले. दूध कर्ज फेडण्यासाठी दूध संकलन केंद्रावर देणे भाग पडू लागले. आता दुधाचे उत्पादन वाढले, पण शेतकर्‍यांच्या घरच्या मुलामुलींच्या तोंडचे दूध संकलन केंद्राद्वारे शहरांच्या घशात जाऊ लागले. जेथे दुधाचे उत्पादन नाही त्या मोठय़ा शहरी ग्राहकांच्या दरडोई दरदिवशी दुधाचा वापर 230 ग्रॅम, तर जेथे दुधाचे उत्पादन होते त्या खेडय़ापाडय़ातील दूध उत्पादकांचा दरडोई दरदिवशी दुधाचा वापर 50 ते 60 ग्रॅम. म्हणजे टनानी दुधाचं उत्पादन करणार्‍यांच्या नशिबी छटाकभरही दूध नाही. याला म्हणायचे दुधाचा महापूर? शहरात थोडाबहुतही पाऊस झाला तर रस्ते पाण्याने वाहू लागतात, कारण पाणी जमिनीत जिरण्यासाठी जागाच नसते. त्यामुळे रस्त्याने महापूर आल्यासारखे वाटते. अगदी तसेच दुधाच्या महापुराचे आहे. उत्पादकांचे उत्पन्न वाढले नाही म्हणून दुधाचा उपभोग वाढला नाही. म्हणून 'दुधाचा महापूर' मोठय़ा शहरातल्या लोकांनी दुधाचा महापूर करत करत डॉ. वर्गीस कुरियनची पाठ थोपटली यात वावगे काही नाही. पण दुधाच्या उत्पादनवाढीचे श्रेय डॉ. वर्गीस कुरियन यांच्यापेक्षा दुधाच्या किमती जेव्हा जेव्हा वाढल्या तेव्हा तेव्हा दुधाचे उत्पादन वाढले. तेव्हा उत्पादनवाढीसाठी डॉ. कुरियन यांनी उभ्या केलेल्या व्यवस्थेपेक्षाही दुधाची किंमतच जास्त प्रभावी ठरते हा अनुभव आहे. परंतु शेतीमालाच्या किंवा दुधाच्या किमतीला महत्त्व द्यायचे नसल्यामुळे डॉ. वर्गीस कुरियनला महत्त्व देऊन त्यांचा उदोउदो करणे या व्यवस्थेला आवश्यक ठरते. शेतीमालाच्या किंवा दुधाच्या किमती पाडण्याच्या शासकीय धोरणाला डॉ. कुरियन यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतच केली होती. 'ऑपरेशन फ्लड' अर्थात, 'दुधाचा महापूर' या योजनेसाठी त्यांनी मदतीच्या रूपात 37000 टन दुधाची भुकटी आणि 11000 टन सायीची भुकटी युरोपातून फुकटात आयात करून येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांचे एक प्रकारे कंबरडे मोडण्यासच मदत केली होती. आपल्या देशातील दूध उत्पादकांना तोटा होऊ नये. अतिरिक्त दूध उत्पादनामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किमती पडू नये म्हणून भारतासारख्या देशाला दुधाची भुकटी व सायीची भुकटी निर्यात करणारी युरोपियन राष्ट्रे, तर त्याच्या उलट आपल्या देशातील दूध उत्पादकांच्या किमती पाडण्यासाठी फुकटात दुधाची भुकटी आयात करणारा भारत व 'दुधाचा महापूर' या नावाखाली त्याला मदत करणारे डॉ. वर्गीस कुरियन हे 'शेतकर्‍यांचे मित्र' म्हणून भासविले जात असले तरी ते शेतकर्‍यांचे मित्र कधीच नव्हते.

देशातील दूध उत्पादनवाढीचा व डॉ. वर्गीस कुरियनचा जो संबंध जोडला जातो तेही तितकेसे खरे नाही. महाराष्ट्राचीच आकडेवारी पाहिली तर 1974 मध्ये महाराष्ट्रातील एकूण दरदिवशीचे दूध संकलन 4.7 लाख लीटर होते. देवतळे समितीने दिलेल्या किमतीतील वाढीमुळे त्यात झपाटय़ाने वाढ झाली व 1977 मध्ये उत्पादन 8.5 लाख लीटरपर्यंत पोहोचले. 1977 ते 1981 सालापर्यंत पुन्हा दूध उत्पादनाची वाढ खुंटली. 1982 सालापर्यंत दुधाचे उत्पादन 11.6 लाख लीटर झाले. शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाने मिळालेल्या भाववाढीमुळे दूध उत्पादन झपाटय़ाने वाढून केवळ चार वर्षांत 23 लाख लीटर झाले.

शेतीच्या प्रश्नावर पीटीआय म्हणजे प्राईस, टेक्नॉलॉजी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि मराठीत म्हणायचे झाल्यास किमती, तंत्रज्ञान व संरचना ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या गेल्या आहेत. आपल्या देशात मात्र शेतीमालाच्या किमतीला महत्त्व न देता केवळ शेतीसाठी तंत्रज्ञान व संरचना उभी केली तरी चालेल असे मानले गेले आहे. डॉ. वर्गीस कुरियन हेसुद्घा तंत्रज्ञान व संरचना ह्या गोष्टींनाच महत्त्व देणारे होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने प्रथमच 1980 नंतर शेतकर्‍यांसाठी शेतीमालाच्या किमती महत्त्वाच्या हे मानले. त्याचाच परिणाम दुधाच्या किमती वाढल्याबरोबर दुधाच्या उत्पादनात वाढ झाली. दुधाच्या उत्पादनवाढीसाठी डॉ. कुरियन यांनी केवळ तंत्रज्ञान व संरचनेवर भर दिला. परिणामी, 1977 पासून दुधाचे उत्पादन प्रतिवर्षी 6 टक्के या दराने वाढले. पण महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनामुळे दुधाचे भाव वाढले. त्यानंतर दूध उत्पादनवाढीची गती प्रतिवर्षी 10 टक्के राहिली. याउलट सुजलाम सुफलाम गुजरात राज्यात डॉ. वर्गीस कुरियन यांच्या 'दूध महापूर' योजनेमुळे दूध उत्पादनवाढीची गती प्रतिवर्षी 4.5 टक्केच राहिली.

'विना सहकार नहीं उद्धार' म्हणत म्हणत सोसायटय़ांच्या अध्यक्षांचा उद्धार झाला. कोणी 'सहकारमहर्षी' बनले. कोणी 'सहकारसम्राट'. पण शेतकरी तेथल्या तेथेच राहिला. नव्हे, पूर्वीपेक्षा उद्ध्वस्त झाला. डॉ. वर्गीस कुरियन यांनी गुजरातमधील आणंदमध्ये उभारलेला व्याप पाहून कोणीही प्रभावित व्हायचे. त्यात एखाद्या शेतकर्‍यांचा प्रपंच थोडाबहुत सावरलाही असेल, पण तेथील एका शेतकरी कुटुंबातील एका शेतकरी स्त्रीची प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. ती म्हणाली, ''कर्जाने घेतलेल्या गाईची आम्ही काळजी घेतो. तिच्या खाण्यापिण्याची, आजारी पडल्यास तिच्या औषधोपचाराची योग्य ती काळजी घेतली जाते, पण या गाईची काळजी घेणार्‍या बाईची मात्र कोणतीही काळजी घेतली जात नाही. पोटात भाकर तुकडा आहे किंवा नाही. आजारपणात औषधोपचार नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते, देवा! पुढच्या जन्मी 'बाई'च्या ऐवजी 'गाई'चा जन्म दे. गाय होणे परवडले, पण बाई व्हायला नको.''

डॉ. वर्गीस कुरियन यांना समाजातील सर्वात दुर्लक्षित घटकाचा म्हणजे शेतकर्‍यांचा- स्त्री-पुरुष दोघांचाही विकास साधायचा होता. त्यासाठी त्यांनी जिवापाड मेहनत घेतली. गुजरात येथील आणंद येथे मोठी संस्था उभारली. त्याच संस्थेची सदस्य स्त्री, ''देवा! पुढच्या जन्मी 'बाई'च्या ऐवजी 'गाई'चा जन्म दे,'' अशी प्रार्थना करीत असेल तर हा 'अमूल'मॅन डॉ. वर्गीस कुरियनच्या स्वप्नांचा विजय होता की पराजय?

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment