Saturday 29 September 2012

विवाहसोहळे साधेपणाने का होत नाहीत?


एका प्रसिद्ध शहरातल्या बायपास रोडवर सध्या मी राहतो. मला तिथे ना कुरिअरचे पत्र मिळते ना भारत सरकारचे टपाल. एकापरीने माझे वास्तव्य सध्या गावकुसाबाहेरच्या वस्तीत आहे, असेच म्हणता येईल. त्यामुळे जगाशी संपर्क साधण्याचे माझे एकमेव साधन म्हणजे माझा सेलफोन. सुमारे 67 वर्षापूर्वी मी हे घर स्वत:हून घेतले. मनात हेतू एवढाच होता, की लिहिण्यावाचण्यासाठी शांत वातावरण मिळावे. पण हा हेतू अवघ्या पाचसहा वर्षात पार विफल झाला.

हा बायपास म्हणजे सुमारे 80 फुटांचा आणि गावाशेजारून सरळ 5 ते 6 किलोमीटर जाणारा. त्यामुळे 56 वर्षात या रस्त्यावर 25 ते 30 मंगल कार्यालये झाली. त्यातलं कुठलंही मंगल कार्यालय किमान 25 ते 30 हजार रुपये भाडय़ापेक्षा कमी भाडे असणारे नाही. शिवाय 80 फुटी रस्ता म्हणजे हक्काची बिनभाडय़ाची पार्किगची जागा. त्यामुळे या रस्त्यावर आता 3-4 महिने शांततेचे सोडून दिले तर लग्नकार्याची भरपूर वर्दळ असते. ऐन लग्नाच्या मोसमात डीजेची धूम, रस्त्यातल्या वराती, वाहनांची वर्दळ, लग्नानंतरचे दारूकाम आणि बायपासवरून वेगाने धावणार्‍या ट्रक्सचे आवाज यांमुळे आमचा हा भाग खूपच गजबजून गेला आहे. ध्वनिप्रदूषण म्हणजे काय त्याचा मी रोजच नव्याने अनुभव घेतो आहे. हे सर्व माझ्याच शहरात आहे असे नाही. ज्या ज्या शहरात असे बायपास निर्माण झाले त्या प्रत्येक शहराची हीच अवस्था आहे.

काही दिवसांपूर्वी मात्र मला एक अतिशय सुखद अनुभव आला. माझी मुलगी या रस्त्यापासून बर्‍याच अंतरावर असलेल्या एका वस्तीत राहते. तिथे मजुरांचीही घरे अतिशय विरळ आहेत. त्यातल्याच एका मजुराच्या घरी लग्न होतं. 11 वाजेपर्यंत तिथे काही मंगलकार्य आहे याची खूणही नव्हती. पण 11 वाजता एक लहानसा मंडप तिथे आला. बारा वाजेपर्यंत 50-60 वर्‍हाडी जमा झाले. टाळ्य़ांच्या गजरात वधूवरांवर पुष्पवृष्टी झाली आणि पाच वाजेपर्यंत तिथे लग्न होते याची एकही खूण शिल्लक राहिली नाही. मी माझ्याच कुटुंबातले असेच एक अत्यंत आटोपशीर लग्न केले होते याची मला आठवण झाली. पण मी माझ्या मुलीच्या लग्नात मात्र इतका साधेपणा पाळू शकलो नाही. माझ्या आर्थिक कुवतीप्रमाणे मीही थोडा गाजावाजा करीत आणि थाटामाटानेच लग्न केले. लग्न आपापल्या कुवतीनुसार थाटामाटातच करावे असे भारतीय माणसाला का वाटते?

खरेतर भारतीय व्यवस्थेत लग्न हा संस्कार आहे. इथे संस्कार म्हणजे असा विधी ज्या विधीनंतर आपल्या मनाच्या निर्णयशक्तीत आमूलाग्र बदल होतो. हा बदल आपण स्वेच्छेने पत्करतो. एकदोन दिवसांपूर्वी परस्परांना ज्यांनी कधीच पाहिले नाही असे तरुणतरुणी या विधीनंतर परस्परांना शारीरिक संबंधांसाठी अतिशय उत्सुकतेने आणि पवित्र भावनेने स्वीकार करण्यासाठी मनानेही तयार होतात.

सुमारे शंभर वर्षापूर्वी लग्न इतक्या लहान वयात होत असे, की त्यामुळे मानसिक आकर्षणासाठी वेगळे काही करावेच लागत नसे. पतिपत्नी विवाहसंबंधाआधी 8-10 वर्षे एकाच छताखाली राहत असत. या सहवासातून परस्परांना थोडेबहुत का होईना समजून घेणे शक्य व्हायचे. आई, तू मला माझ्या लग्नाला नेशील का, असा प्रश्न जोतिबा फुलेंनी आपल्या आईलाच विचारला होता. अशा या जोतिबांच्या पत्नी नंतरच्या काळात त्यांच्या समाजकार्यात किती समरस झाल्या होत्या हे आता उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.

एकूण काय, तर विवाह आपल्याकडे संस्कार आहे. तो करार नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांत मात्र विवाह हा करार आहे. विवाहाशिवाय शरीरसंबंध होणे तिथे अनैतिक मानले जात नाही. इतकेच नाही, तर विवाहाशिवाय होणार्‍या संततीलाही तिथे आईबाप म्हणून नाव लावण्यास संमती मिळते. तेव्हा मुलेबाळे झाल्यानंतर उभयतांची संमती असेल तर स्त्रीपुरुष तिथे लग्न करतात आणि इथे मुळीच परिचय नसणारे स्त्रीपुरुष विवाह कसे करतात, एवढेच नाही, तर परस्परांच्या शरीरसंबंधासही परवानगी देतात.

ही अतिशय मागासलेपणाची रूढी आहे असेच त्यांना वाटते. आता आपल्या विवाहसंस्थेचा आणि कुटुंबसंस्थेचा अभ्यास पाश्चात्त्य मंडळी गंभीरपणे करू लागली आहेत. काही पाश्चात्त्य अभ्यासक महिला महाराष्ट्रात येऊन अभ्यास करता करता इथेच स्थायिक झाल्या आणि त्यांना आपली विवाहपद्धत अधिक सुरक्षितता देणारी वाटली असे मी कुठेतरी वाचले आहे. कोणती विवाहपद्धती चांगली आणि कोणती वाईट हे सांगणे हा काही माझ्या या लेखाचा हेतू नव्हे. मला एवढेच सांगायचे आहे, की विवाह हा भारतीयांच्या समाजव्यवस्थेतला एक संस्कार आहे. आपल्या संस्कृतीने चार पुरुषार्थ सांगितले असून आपल्या निरामय कामजीवनासाठी आणि स्थैर्यासाठी विवाह आणि कौटुंबिक कर्तव्य यांना पुरुषार्थाचा दर्जा दिला आहे. भारताबाहेरून आलेले अन्य धर्म, पंथ अथवा भारतात निर्माण झालेले अन्य धर्म, पंथसुद्धा विवाहाला करार न मानता संस्कारच मानतात. विवाहविधीनंतर मुस्लिम अथवा बौद्धांमध्ये अनुक्रमे 'कबूल' अथवा 'प्रतिज्ञांचा' उच्चार होत असला तरी इथेही या मंडळींच्या जीवनशैलीत विवाह हा संस्कारच मानला जातो. संस्कार ही मानसिक धारणा निर्माण करणारी जीवनशैली खोलवर रुजलेली एक आचारपद्धती असते. म्हणूनच या संस्काराचे महत्त्व रुजवणारे काव्य-नाटकादी ग्रंथ निर्माण होतात. संत एकनाथांच्या 'रुक्मिणी स्वयंवर' या आख्यानात 77 दिवस चालणार्‍या विवाहसोहळ्य़ाचे वर्णन आलेले आहे. मध्य युगात सगळ्य़ात जास्त आख्यानकाव्ये याच विषयावर निर्माण झाली आहेत. सातशे वर्षापूर्वीच्या महदंबा या महानुभाव कवयित्रीला श्रीकृष्णवर्णन करण्यासाठी विवाहाची घटनाच महत्त्वाची वाटली आणि त्यांनी धवळे लिहिले. कालिदास यांनाही विवाहपूर्व झालेल्या संततीला नैतिक स्वरूप देण्यासाठी 'शाकुंतल' आख्यान लिहावेसे वाटले आणि सगळे 'रामायण' घडले तेही 'सीतास्वयंवरातून'च. सीतेला पळवून नेणार्‍या वाल्मीकीच्या दुष्ट रावणाने सीतेवर बलात्कार केला नाही. तिने आपल्याशी विवाह करावा, अशीच विनंती तो करीत राहिला.

मराठी नाटकाची सुरुवात ज्या नाटकापासून होते त्या नाटकाचे अथवा 'खेळाचे' नावही 'सीतास्वयंवर' असेच आहे. मराठी आणि कानडी संस्कृतीचे परस्परसंबंध अतिशय खोलवर रुजलेले आहेत. आपले अनेक खाद्यपदार्थ आणि नातीदर्शक सामान्यनामे अण्णा, अक्का इत्यादी कानडीच आहेत. कन्नड भाषेत 'विवाह' या शब्दाचा पर्यायी शब्द 'कल्याण' असा आहे. अठराव्या शतकातले तंजावर येथे सापडलेले आपले मराठी भाषेतले पहिले नाटक 'लक्ष्मीनारायण कल्याण' हीसुद्धा विवाहकथाच आहे. तत्त्वज्ञानाचे निरूपण करण्यासाठी कर्नाटकातल्या देवळातल्या ज्या भागाचा वापर करतात त्याला 'अनुभवमंडप' म्हणतात, तर पूर्वी सगळे विवाहच देवळात व्हायचे. त्याला 'कल्याण मंडप' म्हणतात.

महात्मा फुले यांनी 'सत्यशोधक धर्मा'ची स्थापना केल्यानंतर आणि 'आर्य समाजा'ने पूजाअर्चेचे नियम सांगतानाही 'विवाह' अतिशय साधेपणाने कसे पार पाडता येतील याबद्दल लिहून ठेवले असून या पंथातील मंडळी अतिशय साधेपणाने हा विधी पार पाडतात. एवढेच नाही, तर बौद्ध धम्माच्या स्वीकारानंतर बाबासाहेब आंबेडकरांनाही या विधीचे महत्त्व लक्षात घ्यावे लागले आणि त्यांनी आपल्या एका अनुयायाला हा विधी अतिशय साधेपणाने कसा करावा याची माहिती कळवली. दापोली (पुणे) येथील संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत ही माहिती उपलब्ध असल्याचे मला कळले आहे.

माझ्यासमोरचा प्रश्न एवढाच आहे, की जर हा विवाहविधी एक संस्कार असून तो अतिशय साधेपणाने करावा असे वारंवार सांगितले गेले असेल तर भारतीय माणसे विवाह एवढय़ा धूमधडाक्यात व थाटामाटात का साजरा करतात?

स्वातंर्त्यपूर्व काळात 'विवाह' ही साधेपणाने साजरी करावयाची घटना असून ती वैयक्तिक बाब आहे अशी मानसिक धारणा रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. तिथेच मुळी चूक झाली. विवाह हा संस्कार आहे म्हणून तो साधेपणानेच करायला हवा. पण ती वैयक्तिक बाब नसून समूहाची ओळख दृढ करणारी बाब आहे याकडे आपण दुर्लक्ष केले. हजारो वर्षापासून अंगवळणी पडलेले आपले मानस नीट समजून न घेता अगदी वेगळेच वैचारिक अधिष्ठान देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्हांला बदल घडवून आणता आला नाही. पण भारतीय राज्यघटनेने मात्र हे मानस ओळखले. भारतीय राज्यघटनेने कालानुरूप एक लहानसा बदल केला तो म्हणजे प्रत्येक विवाहाची नोंद व्हायला हवी. नोंद न झालेले विवाह अनैतिक अथवा बेकायदेशीर ठरवण्याचा उद्योग भारतीय राज्यघटनेने केलेला नाही. समाजमान्यतेशिवाय विवाहाला मंगलस्वरूप प्राप्त होत नाही ही भारतीय मनाची धारणा ओळखून विवाह साधेपणाने कसे होतील याचे वळण लागावे म्हणूनच 'सामूहिक विवाह' पद्धतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण

सरकारतर्फे अवलंबिले जात आहे. पण ती लग्ने फक्त गरिबांचीच असतात. या मनोगंडामुळे सामूहिक विवाहांना मात्र प्रतिष्ठा मिळत नाहीय. शेतकरी कर्जबाजारी होऊन विवाह थाटामाटात करतो असे वर्णन म. फुले यांनी लिहून ठेवले आहे. म्हणूनच त्यांनी सत्यशोधकी विवाह रूढ करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठात एका विभागाच्या प्रमुखपदी असणार्‍या माझ्या प्राध्यापक मित्राने इतका साधेपणाने विवाह केला याचा मला खूप आनंद झाला.

(लेखक हे नामवंत विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment