Friday 21 September 2012

'संवेदना' हाच आपल्या जगण्याचा आधार


आम्ही अवघे 30-32 विद्यार्थी मॅट्रिकला होतो. सर्व जातिधर्माचे आणि पंथाचे. वाचनसंस्कार व्हावा म्हणून प्रत्येक वर्गाचे एक लहानसे ग्रंथालय होते. शिक्षक रजेवर असले, की आम्ही आमच्या आलमारीत ठेवलेली पुस्तके वाचत असू. प्रत्येक शनिवारी वादविवाद स्पर्धा असायची. शाळेतली सामूहिक प्रार्थना होताना आमचे पी. जी. सर पायपेटवर बसायचे. प्रार्थना म्हणजे सुमारे 15 ते 20 मिनिटांचा विविध कविता आणि गीतांचा सामुदायिक गायनाचा कार्यक्रमच असे. शाळा सुटली, की खेळासाठी स्वत: पी. जी. सर मैदानावर उतरायचे. पी. जी. सर म्हणजे पी. जी. कुलकर्णी सर. ते आमचे हेडमास्तर होते. सर्व जण त्यांना 'पी. जी. सर' म्हणत असत. शाळेतल्या विद्यार्थ्यांवर त्यांचा खूप धाक होता. त्यांचा धाक वाटावा असाच त्यांचा वेश होता. खादीचा पायजमा, खादीचाच पांढराशुभ्र नेहरू शर्ट, त्यावर जाकीट आणि डोक्यावर शिकारी हॅट. त्यांचा कपडेपणा सौम्य करणारी एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांच्या जाकिटाच्या खिशात गुलाबाचे एक टवटवीत फूल नेहमी असे. ते अतिशय उत्तम शिकवत असे. गणित, भूगोल आणि इंग्रजी याही विषयांत त्यांना सारखीच गती होती. त्यांनी शिकवलेले भूमितीतले प्रमेय आणि सोहबराव रुस्तुमची कथा मी अजूनही विसरलो नाही.

उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हाती छडी असे. क्वचित ते विद्यार्थ्यांना छडीने मारत असत. त्या वेळी त्यांचा चेहरा खूपच उग्र दिसे. शाळेतल्या मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना सेंडऑफ दिला जाई. तो कार्यक्रम खूपच भाऊक असे. पण आमच्या आधीच्या बॅचने सेंडऑफवर बहिष्कार घातला. नेमके काय बिनसले होते हे मला माहिती नाही. परंतु त्या बॅचमध्ये एकाहून एक हुशार विद्यार्थी होते. किशोर बंडेवार, पी. जी. भगत, जी. जी. नरवाडे हे तीन विद्यार्थी त्या वेळी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले होते. भगत आणि नरवाडे हे पुढे एक्झिकेटिव्ह इंजिनिअर झाले. हे सर्वच विद्यार्थी जन्मदलित आणि गरीब. तशी आमची शाळाच गोरगरीब आणि दलित विद्यार्थ्यांची होती. या विद्यार्थ्यांमधून सुमारे 50-60 वर्षापूर्वी विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण व्हावेत यासाठी शिक्षक किती कष्ट घेत असतील याचा आजचा विद्यार्थी तर्क करणे शक्य नाही. विद्यार्थीही तसेच कष्टाळू आणि विनम्र होते परंतु त्या वर्षी काय बिघडले होते कोणास ठाऊक! विद्यार्थ्यांनी सेंडऑफवर बहिष्कार घातला आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या बॅचपासून शाळा विद्यार्थ्यांना सेंडऑफ देणार नाही, असा निर्णय पी. जी. सरांनी घेतला. मॅट्रिकच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याआधी शाळा एक परीक्षा घेत असे. त्या परीक्षेत जे नापास व्हायचे त्यांना परीक्षेचा फॉर्म भरू दिला जात नसे. त्यामुळे ती परीक्षा आम्ही मॅट्रिकपेक्षाही जास्त महत्त्वाची मानत असू. शाळेला असा अधिकार आहे किंवा नाही असा प्रश्न त्या वेळी आमच्या मनात येत नसे. आमच्या आधीच्या बॅचच्या अशाच दोन विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरू दिला नव्हता असे कळले. कदाचित त्या वर्गाने सेंडऑफवर बहिष्कार घातला त्याचे कारण हेच असावे.

आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी बैठक घेतली आणि शाळा आपणाला सेंडऑफ देणार नसेल तर हरकत नाही. परंतु आपण शाळेला सेंडऑफ द्यायचा असा निर्णय आम्ही घेतला. आमची परीक्षा जवळ आली. त्या परीक्षेत सर्वच विद्यार्थी पास झाले. फॉर्म भरू शकणार नाही असा एकही विद्यार्थी आमच्या वर्गात नाही याचा आम्हांला आनंद झाला. आम्ही चार चार आणे गोळा केले. शाळेला कोणती भेटवस्तू द्यायची ही जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांनी आम्हा एकदोन विद्यार्थ्यांवर सोपवली. अर्थात, त्यात मी एक होतोच. खादी ग्रामोद्योगमध्ये आम्हांला 56 रुपयांची एक सुंदर बुद्धमूर्ती मिळाली. ती आम्ही समारंभपूर्वक भेट दिली. पी. जी. सर खूप भारावून गेले. त्यांचे डोळे किंचित पाणावले होते. ''आज विद्यार्थ्यांनी आम्हांला शिकविले,'' असं काहिसं ते भारावून म्हणाले. यापुढे विद्यार्थ्यांना मी छडीने मारणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि खरोखरच पी. जी. सरांनी विद्यार्थ्यांना मारले नाही. पुढे कित्येक दिवस ती बुद्धमूर्ती मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच होती. विद्यार्थी नकळतपणे शिक्षकांना शिकवू शकतो असा एक संस्कार माझ्या मनावर झाला.

पुढे मी शिक्षक झालो. पाचव्या आणि सहाव्या वर्गाला मी इंग्रजी शिक वत असे. विद्यार्थ्यांनी रोज दोन ते तीन शब्द स्पेलिंगसह पाठ करावेत असा साधा नियम होता आणि जो चुकायचा त्याला मी पाच छडय़ा मारत असे. माझे शिक्षक म्हणून ते पहिलेच वर्ष होते. सूर्यकांत नावाच्या विद्यार्थ्याला मी पाच छडय़ा मारल्या. छडय़ा किती जोरात माराव्या याचा मला संयम नसावा. परंतु दुसर्‍या दिवशी सूर्यकांतने पुन्हा तीच चूक केली आणि माझा राग खूपच वाढला. रागाने मी त्याला ''हात पुढे कर,'' असं म्हणालो. परंतु हात पुढे न करता तो माझ्या डोळ्य़ांत पाहत म्हणाला., ''सर, हातावर मारू नका.'' त्याच्या डोळ्य़ांत केवळ निर्भयपणाच नव्हता, तर धैर्य एकवटून त्याने ते वाक्य उच्चारले होते. तरीसुद्धा एक छडी मी त्याच्या पाठीवर ओढली आणि तास संपल्यानंतर भेटायला सांगितले.

मधल्या सुटीत सूर्यकांत मला भेटायला आला. मान खाली घालून माझ्यासमोर उभा राहिला. खरेतर तो मेहनती विद्यार्थी होता. परंतु तो ''सर, हातावर मारू नका असे तो का म्हणाला?'' मान वर न करता सूर्यकांत बोलू लागला, सर मी दुकानात काम करतो. तिथे हातात तराजू घेऊन वस्तू मोजाव्या लागतात. पुडय़ा बांधाव्या लागतात. परवा तुम्ही हातावर मारलं. मला तराजूने तोलता येत नव्हते. दुकानदार रागावला. सूर्यकांत भरभर बोलला. मी पुरता अंतमरुख झालो. शाळेत शिकताना मीही भाजी विकली. हातपंखे विकून घरसंसाराला मदत केली होतीच. परंतु मला शाळेत अशी काही अडचण आली नव्हती. मला सूर्यकांत खूप शिकवून गेला. शिक्षक शिकवतो; पण शिकता शिकता विद्यार्थ्यांकडूनही त्याला खूपकाही शिकता येते असा माझा अनुभव होता. पी. जी. सरांचा अनुभव आता मला अधिकच अर्थपूर्ण वाटला.

कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना पँथरची चळवळ अतिशय जोमात होती. माझ्या अनेक संतापी विद्यार्थ्यांना शांत करता करता माझ्या नाकीनऊ येत असे. त्या तरुण विद्यार्थ्यांचा संताप मला कधीच खोटा वाटत नसे. त्यांची भाषा खूप आक्रमक असे. पण ग्रामीण भागात होणारे अन्याय त्याहूनही भयंकर असायचे. त्यामुळेच त्यांचा संताप मला रास्त वाटे. 'अँग्री यंग मॅन'चा प्रतिनिधी म्हणून अमिताभ बच्चनचे सिनेमे त्या वेळी खूप लोकप्रिय झाले होते. 'जंजीर'मधील अमिताभ, त्याचे खलनायकावर तुटून पडणे काळजाला भिडत असे. परंतु थिएटरच्या बाहेर आलो, की अखेर तो सिनेमा होता या जाणिवेने सगळी धुंदी ओसरत असे. परिणामाची पर्वा न करता असं

असामान्य धाडस करणारी पोरं मला खूप आवडायची. त्यांचा उतावीळपणा सोडला तर काय चूक बोलत होती ती मुलं? याच विचारातून 'वाटा-पळवाटा' नाटकातला माझा अजरुन जन्माला आला. कोल्हापूर भागातल्या प्रा. गायकवाड नावाच्या एका तरुण प्राध्यापक मित्राने मला पहिल्याच भेटीत सांगितलं, सर मी कॉलेजमध्ये असताना मुलं मला 'वाटा-पळवाटा'

मधला अजरुन म्हणायचे. माझ्या नाटकातला अजरुन माझ्या विद्यार्थ्यांच्या योगदानातून जन्मला आहे. 'वाटा-पळवाटा' या नाटकानं मला खूप कीर्ती मिळाली. अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत मला याच नाटकानं पोहोचवलं. याचं अर्थातच बरचसं श्रेय माझ्या विद्यार्थ्यांनी निर्भयपणे माझ्याशी वाद घातले यात आहे. त्यामुळे एखाद्या प्रश्नाकडे अनेक बाजूंनी पाहता येते हे कळले.

आपल्या समग्र मराठी साहित्याकडे आपण पाहू लागलो म्हणजे आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. 60-70 टक्के लेखक व्यवसायाने शिक्षक आहेत. अत्यंत लोकप्रिय आणि सकस साहित्यनिर्मिती करणार्‍या लेखकांत 90 टक्के भरणा शिक्षकांचाच आहे. शिक्षकांना लेखन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. पुरेसा निवांतपणाही मिळतो हे खरं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातल्या कुठल्याही प्रश्नाकडे चौफेरपणाने पाहता येईल अशी दृष्टी मिळते. त्यामुळे शिक्षकाला आतून समृद्ध होत जाणे सुलभ होते. जे शिक्षक ही समृद्धी शब्दांत प्रकट करतात ते लेखक होतात. पण जे लेखक होत नाहीत ते सातत्याने शिकवता शिकवता स्वत:ही कायम विद्यार्थी राहतात आणि स्वत: समृद्ध होतात ही मला लाखमोलाची गोष्ट वाटते.

माझे हे पी. जी. सर फार काही लिहू शकले नाहीत; पण आतून ते केवढे मोठे झाले होते! आयुष्याच्या अखेरीला त्यांना कॅन्सर झाला. त्यांच्या मुलाने भारतदर्शन घडवून आणण्याची त्यांची इच्छा पूर्ण केली. परंतु मदुराईला जाऊनही ते मीनाक्षीच्या मंदिरात गेले नाही. कारण काय, तर त्या मंदिराच्या बाहेर पाटी होती 'येथे हिंदूंनाच प्रवेश मिळेल.'''ज्या मंदिरातली देवता हिंदू-अहिंदू असा भेदभाव मानते त्या मंदिरात मी कशाला जाऊ?'' असे ते म्हणाले. आयुष्याच्या शेवटच्या बॅचमधले विद्यार्थी मोठय़ा संख्येने नापास झाले. त्यामुळे कित्येक दिवस ग्रॅच्युइटी मिळावी यासाठी त्यांनी अर्जच केला नव्हता. परंतु या सर्वावर कडी म्हणजे त्यांची शेवटची इच्छा होय. मृत्यूनंतरचे शरीर गंगेच्या प्रवाहात बुडवून त्याला गंगास्नान घालून सरणावर ठेवण्याची रूढी आहे. पण सरांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले, मी कॅन्सर पेशंट आहे. म्हणून असे काही करून गंगेचे पाणी दूषित करू नका. मला पी. जी. सरांसारखे शिक्षक लाभले यामुळे मला धन्य झाल्यासारखे वाटते. मला त्यांच्याएवढे मोठे होता आले नाही. परंतु निदान त्यांच्याइतकी

मनाची संवेदना ताजी ठेवावी असा प्रयत्न करीत राहण्याची ओढ जडली आणि हीच संवेदनशक्ती माझ्या लेखनाचा आधार आहे.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment