Monday 3 September 2012

ह्या नभाने ह्या भुईला.


.माणसाच्या जगण्याला आकार देण्यात भाषा आणि शब्दांचे योगदानच खरे महत्त्वाचे असते. एखादे वाक्य, एखादी ओळ, एखादा शब्द आपलं जीवन उभं करीत असतो. हे एखाद्या नव्हे, तर अनेक उदाहरणांद्वारे पटवून देता येईल. त्यासाठी 'हर हर महादेव' हे एकच घोषवाक्य पुरेसे आहे. अशाच शब्दांचा, वाक्याचा आधार घेऊन समूह संघटना, सैन्यदल, समाजमन, समाजजीवन उभं राहिलेलं आहे. असं जगभरातल्या विविध संघटना, पक्ष, उद्योगसमूह यावरून दिसून येईल. तेवढा एक शब्द किंवा विधान उच्चारले, की अर्थाची अनेक वलये उभे करणारे आशयविश्व आपल्यापुढे साकार होते.

जसे सामूहिक पातळीवर तसेच वैयक्तिक पातळीवरसुद्धा त्या दिशेने प्रेरित आयुष्य उभे करण्यात शब्दांचे फार मोठे योगदान असते. संपूर्णपणे शेतीवर राबणारे असे माझे 'शेती कसे' कुटुंब होते. शेतीवर घरातल्या लहानांपासून तर मोठय़ांपर्यंत आपापल्या कुवतीप्रमाणे कामाची विभागणी होऊन त्या-त्या पद्धतीचे काम आनंदाने करणारे, जे कुटुंब खेडय़ापाडय़ात सर्वदूर कार्यरत असते ते 'शेती कसे' कुटुंब. जे प्रत्यक्ष शेतावर राबत असते तर 'शेती पोसे' वर्गातील जे सधन, श्रीमंत शेतकरी असतात. जे केवळ बांधावर उभे राहून मजूरदारवर्गाकडून आपली शेती कसून घेऊन आपण होबासक्या करून जगत असतात ते 'शेती पोसे' शेतकरी असतात. अर्थात, शेतकरी नसणारे इतर उद्योग, व्यवसाय, नोकरी, धंदा करणारे लोकंसुद्धा याच वर्गात मोडत असतात.

अशा 'शेती कसे' कुटुंबात मला विद्यार्थिदशेपासूनच विविध कामे करावी लागायची. सकाळ-संध्याकाळ हंगामी पिकांवरची पाखरे हाणायला जाणे. खळ्य़ादळ्य़ाच्या वेळी, उन्हाळ्य़ात घरची गुरे राखणे, पाणी भरणे, शेण काढणे, नंतर हळूहळू वखर, कोळपे, तिफण, औतफाटे चालवणे असं कोणत्याही शेतकर्‍याच्या कुटुंबातील मुलाचं कामाच्या बाबतीत प्रमोशन होतं. तसं माझं सुरू होतं. कथा, कादंबरी किंवा ललितगद्य असं गद्य स्वरूपाचं वाचक एकदा वाचतो व त्यातून वेगळा होतो. पण कवी मात्र पुन्हापुन्हा वाचून त्यात गुरफटून जातो. याच काळात लोकगीते, लोककथा, रेडिओवर वाजणारी चित्रपटगीते हे मनोरंजनाचं साधन होत. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त काही वाचायलाही मिळायचं नाही आणि शालेय पुस्तकातही जे पाठ, कविता असायच्या त्याही काही आपल्या वाटायच्या नाहीत. कुठलं तरी दूरचं, अप्राप्य, आपलेपणा न वाटणारं ते विश्व होतं आणि याच काळात आपलं जीवन हे जिचं आशयविश्व आहे असं काही वाचायला, पाहायला कलाकृतीच्या माध्यमातून मिळतं तेव्हा आस्वाद पातळीवर होणारा आनंद खरोखर अवर्णनीय स्वरूपाचा असतो. याची जाणीव मला नवव्या वर्गातली 'ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे' ही कविता वाचून झाली.

माझ्या गावातील, माझ्याभोवतीचा समाज ह्या ओळींभोवती आयुष्यभर रुंजी घालून तर जगत होता. उन्हाळाभर नांगरणी, वखरणी करून तो मृगनक्षत्रातील पावसाची वाट पाहत होता आणि म्हणून मंदिरातल्या सगळ्य़ा आरत्या आणि प्रार्थनेपेक्षा मला ही प्रार्थना, ही आळवणी, ही विनवणी अधिक मानवी, अधिक उत्कट, जगण्याशी निगडित वाटत होती.

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे

आणि ह्या मातीतूनी चैतन्य गावे

कोणती पुण्ये अशी येती फळाला

जोंधळ्य़ाला चांदणे लखडून जावे..

एकाच वेळी सृजनाची प्रतीक्षा, अध्यात्मातील 'पुण्य' ही संकल्पना आणि मानवी पोटाच्या भुकेच्या पूर्तीसाठी आवश्यक असणारे जोंधळे, शेतकर्‍याचे प्राण भुईत गुंतलेले असणे, शेतावरची फाटकी झोपडी स्वत:च्या काळजाइतकीच जपणे आणि स्वत:च्या पोटापाण्याच्या इच्छेप्रमाणेच जगाच्या पोटाच्या भुकेची चिंता वाटणे. एवढे सगळे अर्थ -'बाळा, तू बोंबलू-बोंबलू, रानोमाळ उधळून जे गाणं म्हणतो त्या गाण्यात आहेत' असं माझी ही कविता ऐकून-ऐकून मायने जेव्हा असा अर्थाचा उलगडा करून दाखवला. तेव्हा तर आत्ताराकडून कमरेत बांधायला आणलेल्या लाल करदोडय़ाचा गुंता उलगडावा तसा मनस्वी आनंद मला झाला. नंतर ना. धो. महानोरांची 'सांजावताना' वार्‍याच्या गंधगर्भ लयीने आकाश कसं ओथंबून येतं ही कविता अकरावीत आणि -

पानांत छंद धुमसतात झाडे झिंगून जातात

पिवळ्य़ा बांबूच्या गीतगंगेत पक्षी बुडून जातात

ही कविता बारावीत वाचण्यात आली असावी. कुठल्या तरी वर्तमानपत्राच्या किंवा मासिकाच्या मुलाखतीत, ग्रंथालयातून या कवीची आणखी एक कविता वाचण्यात आली. ती माझ्या शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाचे मनोगत बोलून दाखवत आहे. असंच कायम वाटत राहायचं.

ह्या शेताने लळा लाविला असा असा की

सुखदु:खाला परस्परांशी हसलो, रडलो

आता तर हा जीवच अवघा असा जखडला

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..

शेतीचं आणि शेतकर्‍यांचं जन्मापासून तर मरणापर्यंतच नातं केवळ भुईतून उगवलेला माणूसच लिहू शकतो आणि भुईतून उगवून कायम भुईच्या अंगाखांद्यावर वावरणारा भुईनिष्ठ शेतकरीपुत्रच हे अद्भुत रसायन आपल्या मनाशी गोंदवून घेऊन जगू शकतो. कष्टतानाही भूमिपुत्राचा आनंद त्याच्या दैनंदिन कामातून त्याला कसा मिळत जातो. भुईवर कष्टत असतानाच त्याच्या मनात दाटून येणारी भुईनिष्ठ स्वप्नांची झुंबरं त्याला मानसिक पातळीवर किती समृद्ध, किती श्रीमंत करून जातात याची प्रचिती मला त्या कळत्या वयातच येऊन गेली आणि या शब्दांपायी चांगल्या अर्थाने मी खरोखर पागल झालो.

उन्हाळ्य़ात उघडय़ा पडलेल्या लपणीच्या जागा पाऊस पडल्यावर पुन्हा पूर्ववत होतात. कारण भुईतून उगवलेल्या अनेक वनस्पतींनी आता तिच्या अंगाखांद्यावर बागडायला सुरुवात केलेली असते. झेपावणार्‍या वेलींनी झाडांच्या खोडफाद्यांना विळखे मारून त्यांना झांजरून, मोहरून, गुदगुदून टाकलेलं असतं. सगळा निसर्ग विविधांगी रंगाकाराने, मस्त तालेवार झालेला असतो. हिरव्या रंगाने सृष्टीच्या अंगोपांगी आपलं अधिराज्य स्थापन केलेले असतं आणि तसाच आपल्या मनाचाही ताबा शब्दातल्या अर्थाच्या तालेवारपणाने घेतलेला असतो.

घराच्या कष्टासाठी, शेतावर राबणार्‍या हातांच्या गरजेपायी माझं बारावीनंतरचं शिक्षण थांबलं होतं. पण झाडाला वेलीने गुरफटून घ्यावं तसं या शब्दांचं वेढलेपण मनाभोवती होतं. म्हणून मग माझ्या आयुष्यातली मी पहिली पुस्तक खरेदी केली. पॉप्युलर प्रकाशनकडे मनिऑर्डर पाठवून 'रानातल्या कविता' आणि 'वही' हे दोन कवितासंग्रह विकत घेतले आणि त्यातल्या कवितांनी पुन्हा माझं जगणं शब्दांच्या माध्यमातून कलाकृतीच्या आकृतिबंधात अभिव्यक्त झाल्याचं पाहून मीही मग बांधावरचे वेलविळखा तोलणारे जडभारी झाड झालो.

शेतावर पेरणी करताना मधेच पावसाचा ठोक यायचा आणि औतं थांबवून पाऊस ओसरण्याची वाट पाहत मग आम्हीही जोरजोरात ओरडत हात उंचावून म्हणत राहायचे -

चिंब झाली पावसाने दूर राने

गर्दशी ओली निळाई डोंगराने

मुग्ध बेहोशीत आम्ही गीत गातो

वादकाचा देह आता झिंगल्याने..

कारण ती गर्दशी निळाई सभोवार असायची. पावसाने चिंब झालेलं रान सभोवार असायचं आणि भुईवर कष्टत असताना आपल्या ओठावर गाणं येणं हे तर त्या भुईचंच सृजन-अनुकरण असतं.

माणसाचं जगणं आणि लिहिणं जेव्हा असं सेंद्रिय पातळीवर एकजीव होतं तेव्हाच तो साहित्यबंध लाख लाख रसिकांच्या हृदयाचा ठाव घेऊन त्यांना आपलंसं करून घेत असतो. कारण या शब्दांचं स्वरूप थेट -

आषाढाला पाणकळा सृष्टी लावण्याचा मळा

दु:ख भिरकावून येती शब्द माहेरपणाला..

अशा पद्धतीचं असतं !

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास','तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादबंर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ, ता.मेहकर, जि. बुलडाणा

No comments:

Post a Comment