Sunday 23 September 2012

बाप तसा लेक


''काहून मारून राह्यले पोराले?''

''लय मज्जावलं ते''

''मारू नका.. काय झालं ते सांगा?''

''नवी चप्पल हारोली भडव्यानं.. पैशाची कदरच नाही''

''जाऊ द्या.. लेकरू हाय''

''लहान आहे काय? आठवीत गेला घोडा.. नवी चप्पल पंधरा दिवसात हारोली''

''कुठी हारोली रे?''

''अबे सांगनं.. तोंड शिवलं काय तुव्ह?''

''त्याचं ध्यान नाई''

''झोपीत असते काय रातदिवस? आतापर्यंत त्यानं चारपाच चपला हारोल्या, चप्पल सस्ती आहे काय? एकशे साठ रुपयाची होती..

मागच्या मयन्यात म्या सार्‍याइले चप्पल आणल्या.. या खेटराखेटरात माहे हजार रुपये बसले''

'' जाऊ द्या.. लेकराले आठोन राह्यत नाही''

''खायाची कशी आठोन राह्यते? वीस रुपयाचं टरबूज एकटा खाते''

''तुमाले कुठीच चुकला नाई तो.. बाप तसा लेक''

'' म्हनजे?''

''तुम्हीच काय कमी खाता? एका टाइमले शर्यत लाऊन किलोभर घुगर्‍या खाता''

''माणसानं खाल्लंच पाह्यजे''

''ह्या तुमच्यासारखाच आहे.. शाळेतून आल्याबरोबर खायाले पाह्यजे''

''शाळेत खिचडी भेटत नाही काय त्याले?''

''तो म्हनते रोजच्या रोज खिचडी खाव वाटत नाही''

''मंग काय तुपाचे रोडगे देतीन काय गुरुजी?''

''शाळेतून आल्याबरोबर कुरकुर्‍याले पैसे मागते, रोजच्या रोज कुठून देऊ पैसे?''

''भात खाऊ घालत जाय त्याले''

''शाळेत खिचडी अन् घरी भात? निरा तांदुयच खाऊ घालता काय त्याले?''

''मंग काय पाह्यजे?''

''माजू करी पाह्यजे त्याले''

''काजू करी? त्याचा बाप हैद्राबादचा नबाब आहे काय? माह्या डोकशावर केस ठेवता की नाही? खायाले माल पाह्यजे त्याले.. दर मयन्याले नवा ड्रेस पाह्यजे.. आमाले शाळेत एकच हापपॅंड राहे.. तोच धूधू घाला लागे, तुह्यासारखं अडीचशे रुपयाचं दप्तर ना भेटे.. महाबीजच्या थैलीचं दप्तर शिवा लागे. दोन मैल शाळेत पैदल जा लागे. पायात चप्पल नसे.. काटे खुडत.. चटके लागत.. तरी मी मॅट्रिक फस्ट क्लास पास झालो, स्टेट लेव्हलच्या 'वेटलिफ्टिंग स्पर्धेत पह्यला आलो होतो''

''काही सांगू नका.. आता पान्याचा गुंड उचलत नाही तुमाले'' ''तवाचा अन् आताचा फरक आहे.. त्या टाईमले आपल्या घरी म्हैस होती, मी रोज दोन लीटर दूध पेत जाव''

''पोराले कधी दोन लीटर दूध पाजसान? फक्त गोष्टीच करून राह्यले?''

''हे पोट्ट दूध पेत नाही ना! खाल्लं तरच आंगात भरीन, पन या पोटय़ाले काही खाऊ घातलं तरी लोळच हाये..

पाह्यनं कटिंग कशी वाढोली आसोलासारखी''

''त्याले मी आठ दिवसापासून सांगून राह्यलो की, कटिंग कर्‍याले जाय.. पन कटिंग म्हटली की जसा काही त्याले इचू डसते''

''सकायपासून दोन येन्या घालत जाय त्याच्या.. वारे वा लेकरू.. त्याले मंगापासून विचारून राह्यलो का चप्पल कुठी हारोली? अबे कुठी हारोली चप्पल? तुले बोलाले तोंड नाही काय?''

''आता विचारू नका.. तुम्ही लयखेप काहीकाही हारोता''

''म्या काय हारोलं?''

''बॅग हारोली.. छत्री हारोली.. एकखेप लायन्या पोरीले बजारात ठेऊन घरी आले होते.''

''जुन्या गोष्टी काढू नको''

''मंग कायले तोंड वासून राह्यले?''

'' त्यानं नवी चप्पल हारोली म्हणून बोललो.. मानसानं स्वत:च्या वस्तूवर ध्यान ठेवाव बाबू.. मी कसा ध्यान ठेवतो तुह्या मम्मीवर''

''माह्यावर ध्यान ठेवाचं काम नाही.. तुमचंच तुम्ही पाहा''

''ध्यानाचा विषय निंगाला म्हनून बोललो.. या पोराचं कायच्यातच ध्यान नाही.. अभ्यासात अजिबात नाही..

टीव्ही झाला की क्रिकेट अनं क्रिकेट खेयला की टीव्ही..

कसा पास होइन?''

''यंदा पासच आहे तो''

''कशावरून?'' ''आठवी लोक सारे पासच होतात, कितीकई ढ पोरगा असला तरी ढकलपास होते''

''आठवीत पास होइन पण दहावीत काय?''

''दोन वर्षात दहावी लोक ढकलपासचा नियम येते''

''तरी हा दहावीत गोता खाते''

''कशावरून?''

''ह्या पोट्टा तुले कधी अभ्यास करतावेळी दिसला काय?

दिवसभर पिंकीच्या खोडय़ा करत राह्यते.. तिचे केसं ओढते, चिमकोले घेते.. तिले डेबरी म्हणते, अभ्यासाच्या नावानं बोंब! आठवीत गेला तरी त्याले तुह्या नावाचं स्पेलिंग येत नाही''

''सांग बाबू.. सुवर्णाचं स्पेलिंग काय?''

''तो काय सांगीन? त्याले सरनेम इंग्रजीत लिहिता येत नाही.. निरानाम ठस आहे. ससरीचा''

''बाप तसा लेक''

''काय म्हटलं?''

''काई नाई''

''हा पोट्टा एक दिवस मायबापाचं नाव गमावते''

''कशावरून?''

''आता आपल्या घरी नवा टीव्ही आहे किनी? आपल्या घरी कलर टीव्ही असल्यावर हे पोट्ट शेजारच्या घरी जाते''

''जाऊ द्या.. लेकरू हाये''

''जायेना.. मी त्याबद्दल म्हनत नाही पन हे पोट्ट त्याच्या खिडकीतून पाह्यते''

''तेवढय़ासाठी तपा लागते काय? तो शेजारच्या घरात घुसला काय?''

''नाही''

''खिडकीतूनच पाह्यलं किन?''

''हाव''

''मंग पाहेना.. तुमचं काय जाते?''

''अवं आता काय सांगू तुले.. त्याच्या घरी टीव्हीच नाई ना!''

''मंग काय पाह्यते लेकाचा?''

''इचार त्याले''

''जाऊ द्या. तुमाले बी दुसर्‍याच्या घरात तोंड घालाची सवय आहे. काय लेकरापुढे बोलाले लावता? बाप तसा लेक अनं मसाला एक!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी -9561226572

No comments:

Post a Comment