Thursday 5 July 2012

कल, आज और कल



प्रथेप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी पावसासाठी मुख्यमंर्त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले. एकूणच प्रथा, परंपरा पाळणारे आपण लोकं असल्याने आपण आता काही नवीन प्रथा, परंपरा सुरू करून त्याचेही नित्यनेमाने पालन करू लागलो आहोत. वरची एक प्रथा त्यातलीच. प्रथेप्रमाणे अशा अनेक गोष्टी घडत असतात. कळायला लागल्यापासून मी रेडिओच्या सकाळच्या बातम्या ऐकतो. तेव्हापासून एक बातमी दर पावसाळय़ात ऐकतो; ब्रह्मपुत्रेच्या पुरामुळे आसाममधील जनजीवन अस्ताव्यस्त. आता पुरामुळे आसामी लोकांचं जनजीवन अस्ताव्यस्त होणे ही प्रथा असल्यामुळे आपल्याला त्यावर काहीच उपाययोजना करता येत नाही. (एकदम काहीच करता येत नाही असं नाही, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधीची तरतूद करता येते तीही प्रथेप्रमाणे आणि समजा पूर आलाच नाही तरी ही दुसरी प्रथा मोडता येत नाही.) अशा अनेक नव्या प्रथा, परंपरांची नोंद अस्मादिक करीत आहेत. आजपर्यंतच्या जमा नोंदी आपल्या अवलोकनार्थ देत आहोत. काही सुटलेल्या बाबी कृपया लक्षात आणून द्याव्यात. आता समजा आपल्या देशात दहशतवादी हल्ला झाला तर प्रथेप्रमाणे पुढील कामं करायची असतात. सर्वात आधी

क्रमांक एक - सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देणे.

क्रमांक दोन - संबंधित राज्यातील प्रमुख शहरात रेड अँलर्ट घोषित करणे.

क्रमांक तीन - मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत घोषित करणे.

क्रमांक चार - घटनेच्या चौकशीचे आदेश देणे.

क्रमांक पाच - तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावणे.

क्रमांक सहा - सर्व भारतीयांना एकजूट राखण्याचे आवाहन करणे. (भलेही सर्वपक्षीय नेत्यांत एकजूट राहो न राहो)

क्रमांक सात - बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंर्त्यांनी भेट देणे.

क्रमांक आठ - मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावणे.

क्रमांक नऊ - घटनेच्या चौकशीसाठी एखाद्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करणे.

क्रमांक दहा - गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे संकेत देणे. संकल्प करणे वा घोषणा करणे.

क्रमांक अकरा - पंतप्रधानांचा राष्ट्र के नाम संदेश. ज्यात आतंकवादाला कठोरपणे हाताळू, चिरडून टाकू, आर या पार की लढाई असे सणसणीत, दणदणीत वक्तव्य करणे.

क्रमांक बारा - शांतता राखल्याबद्दल समस्त देशवासीयांचे आभार मानणे किंवा त्यांना सलाम करणे. भाजपाचे सरकार असल्यास देशाऐवजी राष्ट्र शब्द वापरणे आणि समस्तऐवजी संपूर्ण असा शब्दप्रयोग करणे.

क्रमांक तेरा - झालेल्या दुर्घटनेला दोष न देता परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही देणे.

आणि

क्रमांक चौदा - घटनेची पूर्वसूचना देण्यास राज्याची गुप्तचर यंत्रणा अपुरी पडल्याची कबुली देणे. की, तोपर्यंत दुसरा हल्ला किंवा बॉम्बस्फोट होतोच.

समजा आपल्याकडे पाऊस आलाच नाही किंवा पूर आला तर प्रथेप्रमाणे काय करायचे याच्या ह्या नोंदी

क्रमांक एक - सर्वात आधी निधी मंजूर करणे.

क्रमांक दोन - आषाढी एकादशीला विठ्ठलाला साकडे घालणे.

क्रमांक तीन - निसर्गच कोपला, त्याला आपण काय करणार, असे म्हणणे.

क्रमांक चार - नैसर्गिक आपत्तीस तोंड देण्यास प्रशासन सज्ज आहे, असे निवेदन देणे.

क्रमांक पाच - जनतेला संयम राखण्याचे आवाहन करणे.

क्रमांक सहा - पाऊस न आल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी नवीन योजना, आराखडा, धोरण-समिती इत्यादींपैकी एक आखणे, नेमणे.

क्रमांक सात - संबंधित अधिकार्‍यांना त्यासंबंधी सूचना देणे.

क्रमांक आठ - राज्याची हवाई पाहणी करणे.

क्रमांक नऊ - मंत्रिमंडळाची बैठक बोलावणे.

क्रमांक दहा - दुष्काळाची झळ पोहोचलेल्या विभागाची पाहणी करणे, दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मूल्यमापन समितीची स्थापना करणे.

क्रमांक अकरा - मूल्यमापन समितीकडून आठ दिवसांत अहवाल मागवणे.

क्रमांक बारा - अहवाल विधिमंडळात मांडणे.

क्रमांक तेरा - मंत्रिमंडळाकडून मंजुरी घेऊन निधीची पूर्तता करणे.

क्रमांक चौदा - संबंधित विभागात निधी वाटप करण्यास देणे.

क्रमांक पंधरा - वाटपात घोळ झाला की नाही याची शहानिशा करण्यासाठी सत्यशोधन समितीची स्थापना करणे.

क्रमांक सोळा - त्याचा अहवाल मागविणे, अहवालात गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे संकेत देणे.

क्रमांक सतरा - कारवाईसाठी निवृत्त न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती स्थापन करणे, त्याचा अहवाल मागविणे.

क्रमांक अठरा - अहवालावर विधिमंडळात सोयीस्कर चर्चा करणे.

क्रमांक एकोणवीस - संबंधित प्रकरण कायदे विभागाकडे हस्तांतरित करणे.

क्रमांक वीस - त्यामार्फत न्यायालयात खटला दाखल करणे (न्यायालयीन लढाई ही काय भानगड आहे हे सर्वांना ठाऊक आहे.)

असो. अशा नोंदी घेण्याची एक प्रथा असल्यामुळे ह्या नोंदी घेतल्या आहेत. ह्या प्रथा निर्माण होण्यासाठी आपण लोकांनी पाडलेल्या काही प्रथा जबाबदार आहेत त्या पुढीलप्रमाणे

- मतदान न करण्याची प्रथा.

- चांगल्या लोकांची निवडणुका न लढवण्याची प्रथा.

- राजकारण हे चांगल्या लोकांचं क्षेत्र नाही असं मत जाहीरपणे व्यक्त करून वाईट लोकांसाठी हे क्षेत्र मोकळं सोडण्याची प्रथा.

आणि लास्ट बट नॉट लिस्ट

पोटभर जेवून ढेकर देत देत गव्हर्नमेंट होपलेस आहे. या शहराचं, राज्याचं, देशाचं काही खरं नाही म्हणण्याची प्रथा!

पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

पंढरीनाथ महाराज की जय!

(लेखक हे नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमत-जंमत' हा त्यांचा लोकप्रिय

एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी-9823089650

No comments:

Post a Comment