Monday 23 July 2012

वासनवेल

     A A << Back to Headlines     
मृग नक्षत्रात दणकावून पाऊस पडतो. शेताच्या बांधबंधार्‍याने झाडं असतातच. उन्हाळ्यात ही झाडं उघडी उघडी एकटी, मोकळी दिसतात; पण पावसाच्या पाण्याने जमिनीत पडून असलेलं वेगवेगळ्या रानवनस्पतींचं वेलीजाळीचं बियाणं टरारून वर येते. पाहता पाहता बांधावरची झाडं सगळी वेलविळख्यांनी गुरफटून जातात. कपडे घातलेल्या बाई-माणसाने अंगावर पुन्हा शाल पांघरूण घ्यावी तशी ही झाडे वेलीवळ्यांचे घुंगट घेऊन उभी असलेली दिसतात. पावसाळा, हिवाळा संपला की पुन्हा ह्या हंगामी वेली आपली जागा धरून खाली खाली दबून नाहीशा होऊ लागतात. चरायला सोडलेली गुरंढोरं, गाई, बकर्‍या शेंडेखुडी करून वेलींना होत्याचं नव्हतं करतात.

जशा बांधबंधार्‍याने किंवा शेत बंधार्‍याने वेली वाढतात तशाच माणसाच्या मनावरही वेगवेगळ्या विचारांच्या वेली वाढतच असतात. कधी ती विचारवेल मनाला पार गुरफटून घेते. सुदबुद हरवते. दुसरं काही सुचूच देत नाही आणि आयुष्य मग एकारून जाते. त्यातल्या काही वेली ह्या अमरवेलीसारख्या असतात. अमरवेली जशा ज्या झाडावर चढल्या, वेली विळखा मारून बसल्या त्या झाडाला गुदमरून मारून टाकतात. तशाच ह्या अविचाराच्या वेली माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा र्‍हास करतात.

दृष्टांतपाठामध्ये या 'जळमांडवी'चा मोठा समर्पक दृष्टांत आलेला आहे. तो ऐकून सगळ्या मानवजातीसाठी मोठा समर्पक वाटतो. जळमांडवी ही एक प्रकारची पानवेल असून ती पाणी स्वच्छ राखते असा समज आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष झाले आणि तिची नको तेवढी वाढ होऊ दिली तर मात्र, ती सगळा जलाशय, सगळी विहीर व्यापून टाकते. पाणीच दिसू देत नाही. मग पाण्याचे प्रदूषण वाढते. कारण वारा वाहतो, वाहत्या वार्‍याने तिच्या मुळावर, पानांवर रजधूळ बसते. तिथे आणखी बेंचळ उठतात. त्यामुळे थोडय़ाच दिवसात सगळी विहीर जळमांडवीने भरून जाते. तिथे उदक आहे. असा काहीच भाव त्या ठायी राहत नाही. मग ती जळमांडवी काढून टाकायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही.

स्त्री असो अथवा पुरुष. मनावर वारंवार उगवणार्‍या अशा भाववेली काही क्षणापुरता आनंद देत असल्या, आल्हाददायक वाटत असल्या तरी अतिरेक झाला तर वाईटच. त्यातल्या त्यात ती वेल व्यसनाची असेल, वासनेची असले तर वाईटच वाईट. लोपाबाई आणि सखाराम पानझाडेच्या मनावर असाच आकर्षण. सखाराम लोपाबाईच्या कुणबिकीत कामासाठी होता. तिचं लग्न झालेलं, पण बापाच्या आजारात माहेरी आली आणि सखाराम पानझाडेच्या प्रेमात पडली. आपल्या तिकडच्या नवर्‍यापेक्षा तिला तोच खूप आवडू लागला. सासरी राहून जाच सोसणं, काम करणं, बंधनात राहणं यापेक्षा माहेरी राहून सखारामशी रत होणं यात ती रममाण झाली.

सासरहून नवरा न्यायला आला, पण गेली नाही. मग नवर्‍याने सोबत माणसं आणून तिला ओढून न्यायचं ठरवलं. चहापत्ती आणायला किराणा दुकानावर गेली तेव्हा तिला धरून नवरा ओढू लागला. सोबतच्या ऑटोत टाकण्यासाठी धडपडू लागला. तर तिने नेसत्या लुगडय़ाचा पदर त्याच्या हाती तो तसाच राहू देऊन स्वत:भोवती गोल फिरून लुगडं त्याच्या हाती सोडून दिलं आणि नागडीच रस्त्यातून पळत निघाली. पळताना सगळ्या लोकांनी पाहिली. समाजात, गावात बापाची, भावाची पच्ची झाली.

नवराही हबकला. अशा आब गमावू बायकोसोबत संसार केल्यापेक्षा दुसरी बायको केलेली बरी. म्हणताना परत गेला. थोडय़ाच दिवसात त्याने दुसरं लग्न केलं. लोपाबाईला ते बरं झालं. सखाराम पानझाडे सोबतचं तिचं प्रणयपर्व सुरूच होतं. एक दिवस आजारी बापाने दोघांना रंगेहाथ पकडलं. पोरीला मारझोड केली. सखारामला कामावरून हाकलून दिलं. मग त्यांच्या भेटीसाठी चोरून दुसर्‍याच्या शेतात, गावशिवारातल्या लपणीच्या जागा हेरून व्हायला लागल्या. चर्चा सगळीकडे पांगाळत गेली. तिच्या ह्या बदनामीमुळे भावाचं लग्न जुळणं कठीण झालं. सोयरिकी परत जायला लागल्या. मग भाऊ आपली रोजची कामधामं सोडून त्यांच्याच पाळतीवर राहू लागला. वढय़ाखडय़ात शोध घेऊन दिसतील तिथं त्यांना मारझोड करू लागला. हा घरचाच नवीनच अडथळा तयार झाला. भावाच्या जाचातून सुटण्यासाठी तिने नवाच आराखडा तयार केला.

एक दिवस सकाळीच लोकांना लोपाबाईच्या घरामुळे तिच्या रडण्याचा गहबला ऐकायला आला. सगळं गाव दारात जमा झालं.

''भावानं रात्री जीव देला, महा जिवाभाचा भाऊ मले सोडून गेला,'' लोपाबाई आक्रोश करत रडत होती. कपाळावर झोडून झोडून घेत होती.'' महा जिवाभावाचा भाऊ मले सोडून गेला व माय, आता मी कोणाच्या भरोशावर जगू व माय? आता माह्या लखवा होयेल बापाले कोण पोसंल? बापाची पंधरा एकराची कुणबिक कोण पोसील?''

लोपाबाई आभाळाकडे पाहून रडत होती. आभाळतल्या देवाला प्रश्न विचारीत होती, पण तिच्या दारात चित्र मोठं विचित्र निर्माण झालं होतं. ती रडत होती, पण लोक तिच्या रडण्याला हसत होते. ती आभाळातल्या देवाला प्रश्न विचारीत होती, पण भोवती जमा झालेले टगेच तिच्या प्रश्नाला एकमेकांना ढोसलून उत्तर देत होते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं, 'सखाराम पानझाडे... सखाराम पानझाडे..'

अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी, भावाच्या आत्महत्येची चौकशी करण्यासाठी पंचनामा करायला पोलीस आले. गावात कुणकुण होतीच. दोनच दणक्यात सखाराम पानझाडे आणि लोपाबाई कबुलले.

'आमच्या भेटीगाठीत आडथळा आणत होता म्हणून म्याच रात्री भावाच्या मटणाच्या भाजीत थिमिट खाऊ घातलं..'

यांच्या मनाला वेटाळून टाकलेल्या वासनवेलींनी असा अवसानघातकी विळखा घातला होता. तो ओरबडून बाजूला करण्याऐवजी सखाराम आणि लोपा दोघेही त्या वासनवेलीच्या विळख्यात झाकोळून गेले होते. आधी सगळं खूपच गोंडस, मधाळ वाटायचं. मनाला गुदगुल्या व्हायच्या आणि त्या होतचं असतात. कारण अनैतिक संबंधातलं, विवाहबाह्य संबंधातलं थ्रील मोठ मोहतुंकी असतं. सुखद अनुभूती देत असतं. कारण वास्तवातल्या घरसंसारी भनभनत्या विश्वापेक्षा अंतरंगी साकार होत असलेलं, ते भावविश्व खूपच आनंददायी वाटत असतं.

परस्परांवर केल्या जाणार्‍या प्रेमात आनंद असतोच. कारण प्रेमासारखं चैतन्यशाली दुसरं काही नसतं. कारण प्रेमात मोठी शक्ती असते. म्हणून तर राधाकृष्णाची प्रेमकथा गाण्यांचा विषय होऊन प्रेमसंबंधातील नवेनवे कलांकृत निर्माण करीत असतो; पण या प्रेमशक्तीला मर्यादा असतात. योग्य प्रकारे तिचा वापर केला गेला नाही तर मग अशी लव्ह स्टोरीची 'क्राईम स्टोरी' होते. विहिरीतील पाणी स्वच्छ राहावं म्हणून जळमांडवीची कलम टाकली जाते; पण तिची निगा राखली नाही तर नवीन जुंबाड वाढीला लागतात. अख्ख्या विहिरीतलं पाणी प्रदूषित होतं.

आपल्या जीवनाचा नितळ जलप्रवाहसुद्धा दूषित करण्यासाठी वेळोवेळी अशा विघातक गोष्टीचे आक्रमण सुरूच असते. मात्र, पिकातल्या तणकटाला वेळीच त्याची जागा दाखविली नाही तर मात्र, पीक दबते खाली आणि तणच येते वर. म्हणूनच म्हटलं जातं,

''चालताना गडय़ा असं जपून चालावं, निसरडी वाट तिथं, चालणं टाळावं.''

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

No comments:

Post a Comment