Friday 27 July 2012

सत्तेचे तुंबलेले गटार


स्व च्छता शिकवणारे एक गुरू होते. त्यांच्याकडे शिक्षण पूर्ण करून एक शिष्य गावाकडे आला. गावात येताच त्याला बेंदाडात लडबडलेले डुक्कर दिसले. ताजे ताजे शिकलेले त्याच्या डोक्यात होते. घाण झालेल्या डुकराला आंघोळ घालून स्वच्छ करावे असा विचार त्याच्या मनात आला. तो डुकराला पकडण्यासाठी झेपावला. डुक्कर असे का हाती लागते? डुकर सटकले. शिष्य त्याच्या मागे. खूप धावाधाव करून महत्प्रयासाने त्याने त्यास पकडले. आंघोळ घातली. तेवढय़ात त्याला दुसरे डुक्कर दिसले. आता शिष्य त्याच्या मागे धावू लागला. त्याला पकडून आंघोळ घालीसतोवर तिसरे.. तिसर्‍याला घातली तेवढय़ात पहिला पुन्हा बेंदाडात लडबडून आलेला. शिष्याची दमछाक झाली. काय करावे काही सुचेना. तेवढय़ात तिकडून गुरुजी आले. दमलेला शिष्य पाहून त्यांनी विचारले, ''काय झाले?'' धापा देत शिष्य म्हणाला, ''तुमच्याकडे स्वच्छतेचे धडे घेऊन आलो. येथे येताच घाण झालेली डुकरे पाहिली. त्यांना पकडून आंघोळ घालतोय. एकाला घातली की दुसरा. दुसर्‍याला घातली की तिसरा.. पुन्हा पहिला घाण होऊन येतो. मी तर दमून गेलोय. काय करावे काही समजत नाही.''

गुरुजी शांतपणे म्हणाले, ''अरे, डुकरांना आंघोळी घालण्यापेक्षा ज्या गटारात ही डुकरे लडबडून येतात ते गटार का साफ करीत नाहीस?'' शिष्याच्या डोक्यात प्रकाश पडला. भ्रष्टाचाराचेही नेमके हेच आहे. एकेक पुढारी पकडून त्याला आंघोळी घालण्यापेक्षा ज्यामुळे हे पुढारी भ्रष्टाचार करतात ते गटारच का साफ करू नये? हे गटार सत्तेत तुंबले आहे. आमच्या राज्यकत्र्यांना

मिळालेल्या संपत्तीच्या अमर्याद अधिकारांमुळे भ्रष्टाचार माजला आहे. सत्तेच्या हातातील संपत्तीचे अधिकार मर्यादित केले की, गटार तुंबणार नाही हे माहीत असूनही सगळे भ्रष्टाचाराचे विरोधक त्या शिष्यासारखे भ्रष्टाचार्‍यांमागे धावताना दिसतात. कोणीच गटार साफ करायला तयार नाही. सत्तेच्या शिंक्यावर जोपर्यंत संपत्तीचे लोणी ठेवलेले आहे तोपर्यंत लोणी गट्टम करण्याच्या इराद्याने तेथे बोके येणारच. तुम्ही लोण्याचे रक्षण करण्यासाठी दोन उपाय करू शकतात. एक तर बोक्यांवर संस्कार करायचे. बाबांनो, हे लोणी खाऊ नका अशी शिकवण द्यायची. बोके काही ऐकणार नाहीत. दुसरा मार्ग लोण्याच्या रक्षणासाठी वॉचमन नियुक्त करायचा हा आहे. 'लोकपाल'ची कल्पना ही वॉचमन नेमण्यासारखीच आहे. कोणी म्हणतो, वॉचमनच्या हातात काठी द्या. तो बोके हाकलून लावील. कोणी म्हणतो, त्याच्या हातात बंदूक द्या. मारून पाडील. सरकार आणि अण्णांच्या टीममध्ये एवढाच मतभेदाचा मुद्दा आहे. सत्तेच्या शिंक्यावरचे लोणी सांभाळायला नेमलेल्या

वॉचमनच्या हातात भले काहीही दिले तरी शेवटी तोही एक माणूसच असणार आहे. राग, लोभ, माया, मत्सर त्यालाही असणारच. बोके त्याची नजर चुकवून कधी लोणी गट्टम करतील याचा त्याला पत्ताही लागणार नाही. वॉचमन फारच सतर्क असला व डोळ्यांत तेल घालून बसला, तर हे बोके त्याला म्हणतील, का उगाच ताप करून घेतोस? निम्मे तू खा निम्मे आम्हांला दे. वॉचमन पघळणारच नाही याची काय खात्री? वॉचमन बोक्यांपेक्षा हुशार असला तर म्हणेल, हे पाहा बोक्यांनो, तुम्ही इथे गर्दी करू नका. तुम्हांला लोणी मिळत राहील अशी व्यवस्था करतो. बोके राजी झाले तर वॉचमन आणि बोके मिळून सगळा लोण्याचा गोळा फस्त करतील. तात्पर्य एवढेच की, सत्तेच्या हातात संपत्ती ठेवून तुम्ही भ्रष्टाचारविरोधी केलेली कोणतीही उपाययोजना परिणामकारक ठरू शकत नाही.

एक काळ असा होता जेव्हा धर्मसंस्था आणि राज्यसंस्था एकत्र होत्या. राजाला देवाचा उत्तराधिकारी मानले जात असे. देव सृष्टीचा पालनहार तसा राजा प्रजेचा पालनहार समजला जाई. रेनेसान्सची चळवळ सुरू झाली तेव्हा राज्यसत्ता म्हणाली, मला धर्मसत्तेच्या सोबत नांदायचे नाही. राज्यसत्ता, धर्मसत्ता विभक्त झाल्या. त्यानंतर लोकशाही आली. परंपरेने राजा नियुक्त होण्याऐवजी आता लोक आपले कारभारी निवडू लागले. पुढे सत्तेने आपला काळा पदर पसरायला सुरुवात केली. सर्वांत आधी अर्थसत्ता, त्यापाठोपाठ अन्य व्यवस्था राजसत्तेने काबीज केल्या. अंकित केल्या. मानवीजीवनाचे सर्व व्यवहार राजसत्तेच्या पंखाखाली आले. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व व्यवहारात राजसत्ता ढवळाढवळ करू लागली. साम्यवादी विचाराने या प्रक्रियेला खतपाणी घातले. 1947 साली आपल्या देशाला स्वातंर्त्य मिळाले. त्याच्या काहीसे अगोदर रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली होती. त्या क्रांतीचा मोठा प्रभाव नेहरू व त्या काळातील अनेक नेत्यांवर होता. त्यामुळे स्वतंत्र देशाच्या उभारणीच्या पायाभरणीतच गफलत झाली. पुढे त्या चुका वाढतच गेल्या. लोककल्याणकारी म्हणत सरकार लोकजीवन नियंत्रित करू लागले. अर्थव्यवहारात ढवळाढवळ करू लागले. शेतीमालाची आयातनिर्यात असो की कापूस एकाधिकार, यांचे दुष्परिणाम शेतकर्‍यांना आजही भोगावे लागत आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांनी ग्रामीण भागातील मुलांची कशी वाट लावली हे सांगण्याची गरज नाही. गावोगाव त्याचे पुरावे दिसतात. सरकारने गरिबांच्या कल्याणाच्या नावाने अनेक योजना सुरू केल्या. अब्जावधी रुपयांच्या या योजना. त्या राबविण्यासाठी करवसुली. या करांच्या रकमांनी सरकारची तिजोरी भरली. ही तिजोरी ज्यांच्या हातात राहील ते तळ्याचे पाणी चाखणारच. शिवाय या योजना राबविण्यासाठी नेमलेल्या कर्मचार्‍यांची याच पैशातून चंगळ होणार हे उघड आहे. गरिबांच्या कल्याणाच्या नावाने सुरू झालेल्या योजना म्हणजे भ्रष्टाचाराची कुरणे होत. लोककल्याणाच्या नावाखाली निर्माण झालेल्या योजनांची अशा प्रकारे वाताहत झाली आहे. यातून आपण धडा घेणार आहोत की नाही, की पुन्हा सरकार मायबाप आहे असेच म्हणणार? हाच खरा प्रश्न आहे.

रेनेसान्सच्या काळात जसे राज्यसत्ता धर्मसत्तेपासून विभक्त झाली तशीच आज अर्थसत्ता व अन्य सत्ता ह्या राजसत्तेपासून विभक्त होऊ मागत आहेत. त्या प्रक्रियेला वेग देण्याऐवजी सत्तेचे गटार कायम ठेवून जर कोणी 'लोकपाल'च्या भरवशावर भ्रष्टाचार कमी होईल असे मानत असेल तर त्याच्या हातात निराशेशिवाय दुसरे काही लागेल असे वाटत नाही.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही करण्याची गरज नाही. जे सरकार करीत आहे ते थांबविले तरी खूप मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार थांबू शकतो. सरकारच्या हातापासून संपत्तीची तिजोरी लांब कशी ठेवता येईल याचा विचार व्हावा. ते शक्य आहे का? होय आहे. ज्या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यल्प आहे त्या देशात नेमके हेच केलेले दिसून येते. सरकार हीच भ्रष्टाचाराची जननी आहे. सरकारचा विस्तार कमी केला, की त्या प्रमाणात भ्रष्टाचार कमी होतो. गटारात लडबडलेली डुकरे धूत बसण्यापेक्षा किंवा त्यांना तुरुंगात पाठविण्यासाठी 'लोकपाल' नियुक्त करण्यापेक्षा गटार साफ करणे जास्त निकडीचे आहे.

(लेखक हे नामवंत विचारवंत व

सामाजिक कार्यकर्ते आहेत)

भ्रमणध्वनी-9422931986

No comments:

Post a Comment