Tuesday 17 July 2012

मायचं बिल देता का?



आमच्या यवतमायले डॉ. काणे होते. मी माह्या नातवाले त्यायची तपासाची फी किती होती हे नाई सांगू शकत. काऊन का त्याचा त्याच्यावर्त इस्वासचं बसनार नाई. एक डाव म्या त्याले सांगतलं का म्हनलं, बाबू माह्य लगन झाल्यावर. . . मले मंधात अडवत इचारते कसा, 'याच आजी संग ना?' अबे म्या काय दोनचार लगनं केले काबे? 'नाई इचारून राह्यलो.' अस्सी थो गंमत करत राह्यते. असं होते पाहा मेन गोठ बाजुलेचं राहून जाते. हं. तं मी त्याले सांगून राह्यलो होतो का, 'बाबू आमचं लगनं झाल्यावर्त यवतमायचे माह्ये जे कालेजचे दोस्त होते त्यायच्या घरी भेटीले जाचं म्हून आमी जवा एस.टीनं यवतमायले गेलो तवा यवतमायची टिकीट एक रुपया इस पयसे होती.' त्याच्यावर त्यानं हो नाई म्हनलं. म्हने, 'काई फेकता का आबा?' म्हून म्या तुमाले म्हनलं का डॉ. काणेची त्यावक्ती तपासाची जे फी होती ते त्याले सांगाची हिंमतचं नाई केली. काऊन का त्यायची फी होती पह्यले दोन रुपये आन् आखरी आखरीले चार रुपये. वाट्टे का खरं? पन हे खरचं होतं.

माहा जलमगाव बोरी. हे सडकीले आन् तेयी हायवे ले लागून होतं. तरी होतं खेडचं कानी? तवा खेडय़ात डॉक्टर कुठचे? आपले गावरानी इलाज चाले. उरुसा झाला तं तुयसीचे पानं, सूठ, मिरे याचा काढा दे, कवा मुका मार लागला का आंबीहयदीचा लेप दे. पावसायात घरी पोटय़ाच्या पोटाले झोंब लागली का अस्यावक्ती गावात दोनचार चांगल्या घरी त्यावक्ती जिंदा तिलीस्मात नाईतं जीवन मिक्चरची शिशी राहे तं घरातली बाई तिच्या लहान पोरीपासी फुटक्या दांडीचा कप दे आन् तिले सांगे, 'जाय दादारावमामाच्या घरी जाऊन मामीले सांग का माह्या दादाच्या पोटाले झोंब येऊन राह्यलीतं दवाई सांगतली म्हना.' पोरगी जाले लागली का अखीन आवाज देऊन सांगे. . . 'छबू येतानी कप हातानं झाकून आनजो नाईतं दवायीची वाफ निंघून जाईन.' मामाच्या घरी जाऊन सांगतलं का मामी शिशी काढून त्याच्यातून पाच, सात थेंब कपात टाकून कप हाती देतानं सांगे, 'झाकून नेजो छबू.' छबू धावत धावत कप घेऊन आली का त्याच्यात थोडसं पानी टाकून पोरानं नाई नाई म्हनलं का खेकसून म्हने, 'नखरे नोको करू, वाफ निंघून जाईनं.' एका टकीतं पोट्ट टनटन होऊन जाये. एक डाव मायले समजलं का बयीरामच्या पोराले मधुरा झाला. तिनं कामावर असलेल्या दगडूमामाले सांगतलं का, 'दादा बयीरामच्या बायकोले सांग जो म्या बलावलं म्हनूनं.' जवा बयीरामची बायको आली तं मायनं तिले सांगतलं, 'सारजे तुह्या पोराले मधुरा झाला म्हून आयकलं. पोटात तं आग पडली असनं त्याच्या. एक घास तरी धकतं असनं का त्याले. आपल्या घरी गाईचं दूध हाय ते रोज न्याचं त्याले आराम पडे पावतरं. समजलं. इतकुसा जीव काय म्हनतं असंनं थो?' असा एकमेकाले जीव लावनार्‍याचा जमाना होता थो.

तो जमाना असा होता का बिना दवाई फवारल्याच्या भाज्या, बिना रासायनिक खताचं अनाज, भेसयीचा हैदोस नोता, पानी पाहन तं कसं निरमय आन् हवामान कसं तं पावसायात पाऊस, हिवायात थंडी आन् उनायात उनं. जव्हा जे पायजे ते म्हून रोगराई कमी होत असनं. एखांद्या वक्ती मातर कालर्‍याची साथ आली का सारं गाव हबकून जाये. साथयी आपल्या संग दोनचार जनाले नेल्या बिगर राहे नाई पन हे साथीपुरत बाकी मंग सारं अलबेल. मंग काई दिसानं हातगावचे वैद्य दौलतगीर बुवा हे बजारच्या दिसी मंगयवारी येतं. बाकी माह्या मोठय़ा भावाचं दवाईचं दुकान होत तिथचं डॉ. रामकृष्ण ठोकय यायची. पेशंट तपासाची सोय करून देल्ली होती. त्यायची डिग्री कोनती होती हेतं आठोत नाई, पन त्यायच्या हातानं पेशंट कवा गेला नाई, तं गुनचं आला.

हे गोठ मी शायेत सिकत होतो तवाची. मंग मी कालेज मंधातचं सोडून गावात वापेस आलो. त्यावक्ती बोरीले पीएससीचं हेल्थ सेंटर भेटलं. त्या आंधी गावात तब्येतीचं नाई जमलं तं गरीब यवतमायले सरकारी दवाखान्यात आन् ज्यायचं सुद होत ते डॉ. पंडित, डॉ. काणे, डॉ. नंजरधने यायच्याकडं येतं. 'फॅमिली डॉक्टर' जी हे सुरवात असावं, पन त्यावक्ती या डागदरायचा घरातल्या मोठय़ा मानसा सारका अधार वाटे. आमचे डॉ. पंडित होते. यवतमायले नगरभवनासमोर त्यायचा दवाखाना होता. सोन्याचं पदक घेऊन एमबीबीएस झालेले ते हुशार डॉक्टर होते. बोरीले पह्यले सरकारी डॉक्टर आले ते डॉ. रेकवार. निर्मय मनाचा डॉक्टर कसा असू शकते हे माहा डॉ. पंडित नंतरचा दुसरा अनुभव होता. साधा सभाव, बराबर निदान, पायजे तितकीचं दवाई यानं त्यायचं नाव बोरीतचं नाई तं आजूबाजूच्या खेडय़ात पसराले उसीर नाई लागला. दवाखान्याच्या टायमात ते तपासतचं, पन घरी इतर वक्ताले आलेल्या पेशंटचे तपासाचे त्यायनं पयसे नाई घेतले. गावात एखांद्याच्या घरी पेशंट पाहाले चालले असनं आन् रस्त्यात त्यायले जुन्या पेशंट आठोला तं जाता जाता, 'हाय का गंगाराम' म्हनून ना बलावता त्यायी पेशंटले पाहून टाकेत.

आता सरकारी डॉक्टर म्हनलं का बदली आलीचं. काऊन का आखरीले नवकरीचं कानी? जवा त्यायले बदलीची आरडर आली तं त्यायनं जाची तयारी सुरू केली, पन लोकायचा आग्रव का बोरी सोडू नोका. आखरीले त्यायनं नवकरीचा राजीनामा देल्ला आन् बोरी ना सोडाचा निर्णय घेतला. तो जमानाचं तसा होता का लोकं डॉक्टरले देवाचं दुसरं रूप समजे. त्यायच्या वर्त इस्वास टाकेत आन् तेयी त्यायच्या श्रद्धेले तडा ना जाऊ दे. त्यायचा सभाव सादाचं होताचं, पन धार्मिक होता. आता मांगच्या मयन्यात वयाची सत्तरी पार करून गेले तवा गावचं नाई तं आजूबाजूच्या खेडय़ापाडय़ातले लोकं हादरून गेले. एकाएकी गेल्यावानी गेल्याच्यानं लोकायले तो धक्का खूप जानवून गेला. त्यायले बोरीत नाई म्हनल तं पन्नास वर्साच्या वर्त झाले असनं. आमच्या गावात स्वामी चंद्रशेखर भजन मंडय होतं. डॉक्टर सायेब त्याचे मेंबर. पेशंट असले तं उसिरा भजनाले येत, पन आल्या बिगर ना राहे. आमच्या गावात स्वामी चंद्रशेखर महाराजाची समाधी हाय. त्याचे ते ट्रस्टी. आता ट्रस्टी ते एकलेचं थोडी होते, पन बाबावर्त त्यायची जे भक्ती होती त्याच्याच्यानं बाबाचा उत्सव सारा त्यायच्या खांद्यावर असल्यावानी होता.

त्यायचा आमच्या घरासी खूप घरोबा. मायले कॅन्सर झाला तोयी तोंडाचा. अकोल्यावून अपरेसन करून आनल्यावर ते जवा मायले पाहले आले तवा त्यायनं सांगून टाकलं का यायचं रोज ड्रेसिंग करा लागनार हाय. मी रोज ड्रेसिंगले येत जाईन, पन कवा व्हिजिटले गेलो, यवतमायले गेलो तं उसीर होईन, पन ड्रेसिंग चुकनार नाई हे ध्यानात ठेवा. माय त्याच्या बास्ता सहा मयने जगली, पन डॉक्टर सायबाचं ड्रेसिंग कवा चुकलं नाई. ना बलावता रोज ड्रेसिंग कवा खाडा नाई. आखरीले माय गेली. तिचं सारं अटपल्यावर्त म्या मोठय़ा भावाले म्हनलं, 'दादा ना चुकता डॉक्टर सायेब सहा मयन्याच्या वर ड्रेसिंग साठी आले हे त्यायचे आपल्यावर्त उपकारचं झाले. कवा बलवाचं काम नाई पडू देल्ल. त्यायले बिल इचारून ते देऊन टाकू, चाल त्यायच्याकड. इकडंतिकडच्या गप्पा झाल्यावर म्या म्हनलं, 'डॉक्टर सायेब मायच्या ड्रेसिंगच बिल द्याचं राह्यल ना अजून.' त्याच्यावर्त ते बोलले, 'काऊन ते तुमचीचं माय होती का? मी मायचं म्हनो ना तिले? मायचं बिल देता का? आमचीतं वाचाच बंद झाली.

(लेखक शंकर बडे    हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

पेशवे प्लॉट, यवतमाळ,

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment