Friday 6 July 2012

जळत्या घरातून बाहेर पडण्याची धडपड

उन्हाळ्याच्या सुटय़ा संपल्या. शाळा सुरू झाल्या. खाजगी वाहनात लदून येत असलेली शाळकरी मुलं-मुली. बसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी. बाहेर गावाहून ये-जा करणारे जेवढे आहेत, जवळपास तेवढेच गावात खोल्या करून किंवा वसतिगृहात राहणारे. पन्नास वर्षातला हा एक मोठा बदल आहे. आम्ही तालुक्याच्या गावात राहत असल्यामुळे आम्हाला बाहेर गावी जावे लागले नाही. आमच्या लहानपणी शाळेत आमच्या बरोबर आमच्या गावाचीच मुले-मुली असायच्या. मुलींची संख्या खूप कमी असायची. कॉलेजात जाईपर्यंत आसपासच्या गावांची तुरळक मुलं यायला लागली होती, पण हल्ली हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मुलांपेक्षा मुलींची पटसंख्या जास्त झालीय. खेडय़ातील मुला-मुलींचे शहरात जाऊन शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. बरेच पालक केवळ मुलांच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी घर करून राहताना दिसतात. त्या काळात एवढय़ा शाळा नव्हत्या. पोरांनी शिकलेच पाहिजे असा आई-बापांचा आग्रह नसायचा. पोरंही चिंचा-बोरी खाण्यात मस्त असायची. शेवटी आपल्याला शेतीच करायची आहे अन् शेतीसाठी शिक्षणाची काय गरज? असे अनेकांना वाटायचे.

शेती त्याही काळात परवडत नव्हती. शेतीधंदा शेकडो वर्षापासून तोटय़ात चालतो तसाच रखडत चालायचा. जास्तच मार्मिक सांगायचे तर त्या काळात शेती जास्त कष्टप्रद आणि अधिक निर्बधाने जखडलेली होती; परंतु त्या काळात जगण्यासाठी फारसे काही लागतही नव्हते. अनेक गरजा मारून जगता येत होते. आज मात्र तुमची ऐपत असो वा नसो काही गोष्टी करणे तुम्हाला भाग पडते. उदाहरणार्थ पन्नास वर्षापूर्वी एखाद्याच्या आईला कॅन्सर झाला असता. तर त्याने काय केले असते? आईच्या यातना कमी व्हाव्यात यासाठी त्याने तिची खूप सेवा केली असती. ती सेवा पाहून लोक म्हणाले असते, 'वाह, पोरगा असावा तर असा.' आज जर कोणाच्या आईला कॅन्सर झाला व तो आईला घरी झोपवून खूप सेवा करू लागला तर लोक काय म्हणतील? अगोदर त्याच्या तोंडावर थुंकतील. नंतर म्हणतील, 'आईच्या मरणाची वाट पाहतोय. पैसा खर्चायला नको म्हणून कॅन्सर हॉस्पिटलला नेत नाही. कॅन्सर हॉस्पिटल काय लांब आहे का?' पोराने माईला दवाखान्यात नेले व तेथे ऑप्रेशन करायची वेळ आली तर किमान साठ हजार रुपये लागतात. हे पैसे आणण्याची कुवत त्यात नसते. तरीही त्याला हा खर्च करणे भाग आहे. ज्या पालकांच्या घरात टीव्ही आला आहे. तो त्यांनी फार खुशीने आणला आहे का? थोडय़ा बारकाईने चौकशी केली तर कळेल की, घरातील मुली रात्रीच्या सिरियल पाहायला दुसर्‍यांच्या घरी जाऊन बसू नयेत म्हणून आपली औकात नसताना टीव्ही विकत घेतलेला असतो. बदल झाला तो हा आहे. अवतीभोवती विकास होतोय. तो शेतकर्‍याच्या अंगावर येऊन आदळतोय आणि शेतकर्‍याची विकास पेलण्याची ताकद राहिलेली नाही. आवतीभोवतीही विकास नसेल तर त्याचा ताण येत नाही. माणूस परिस्थितीशी तडजोड करून जगू शकतो. पूर्वी अधिक कष्टप्रद आणि निर्बधाने जखडलेली शेती तोटय़ात होती तरी शेतकरी कसाबसा का असेना जगत होता; परंतु आज जेव्हा आवतीभोवती विकास झालेला आहे, तेव्हा त्याला जगणेही असह्य झाले आहे. कारण या परिस्थितीशी तडजोड करण्याची कुवत राहिलेली नाही.

सिलिंगचा कायदा आला. जमीन धारणेवर मर्यादा पडली. शेती क्षेत्राच्या बाहेर नवे रोजगार निर्माण झाले नाहीत. अशा परिस्थितीत भाऊ वाटण्या होत गेल्या. जमिनीचे तुकडे पडत गेले. आज 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. केवळ शेतीच्या भरवशावर या शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह चालूच शकत नाही. म्हणूनच स्वामिनाथन कमिशन समोर 40 टक्के शेतकर्‍यांनी शेती सोडण्याची इच्छा व्यक्त केली.

शेती तोटय़ात ठेवली. शेतीतील संपत्ती शेतीच्या बाहेरच्या विकासासाठी वापरली गेली. अशा परिस्थितीत शेतीतून बाहेर पडण्याची तीव्र आकांक्षा तयार होणे क्रमप्राप्त आहे. शेतीच्या बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? कोणतीतरी नोकरी मिळविण्याची पात्रता संपादन करणे. खेडय़ातून शिकायला येत असलेली मुले पाहिली की या परिस्थितीचा उलगडा व्हायला लागतो.

माणसं घर कधी सोडतात? स्थलांतराची अनेक कारणे संभवतात. ही सर्व कारणे दोन वर्गात विभागता येतील. एक स्वखुशीने केलेले व दुसरे नाईलाजाने केलेले. शहरातील मुले विदेशात जातात. त्यांना उदरनिर्वाहाची समस्या नसते. येथे चाळीस हजार रुपये महिना पडतो. परदेशात गेल्यानंतर लाख रुपये मिळतील. घराबाहेर पडल्याने आपली संपन्नता वाढेल, अधिक समृद्धी येईल. अशी शक्यता असते तेव्हा माणसे घर सोडून दुसरीकडे स्थलांतर करतात. दुसरी संभावना अशी की, तुमचे घर जळाले आहे, निवारा राहिला नाही, गावात भागत नाही. गावात राहणेच शक्य नाही. अशा परिस्थितीतही स्थलांतर होते. 72च्या दुष्काळात असे स्थलांतर मोठय़ा प्रमाणात झाले होते. गरजेसाठी केलेले स्थलांतर आणि स्वखुशीने केलेले स्थलांतर यात गुणात्मक फरक आहे. खेडय़ातील मुलांच्या शिक्षणाच्या प्रमाणात दिसत असलेली ही वाढ जळत्या घरातून बाहेर पडण्यासाठी केलेली धडपड, या स्वरूपाची आहे.

इंग्रजाच्या काळात शिक्षण सार्वत्रिक झाले, तेव्हापासून समाजातील अनेक धुरिणांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी पाठपुरावा केला. अनेकांनी या कार्यासाठी उभी हयात समर्पित केली. या महात्म्यांना वाटत होते की, मुलं शिकतील. चार भावांपैकी एक भाऊ शेती करेल. तिघे अन्य कौशल्य संपादन करतील. दुर्दैवाने या महात्म्यांचे स्वप्न आमच्या राज्यकत्र्यांनी पूर्ण होऊ दिले नाही. इंग्रजांचेच धोरण पुढे राबविल्या गेल्यामुळे स्वतंत्र भारतातही पन्नास वर्षे केवळ सरकारी नोकरी हेच एकमेव रोजगाराचे सर्वाधिक आकर्षक क्षेत्र राहिले. रोजगाराचे विविध क्षेत्र विकसित झाले असते तर शिक्षणाचे स्वरूपही पालटले असते. एकसुरी शिक्षण पद्धती कायम राहिली. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, शिक्षण वाढले आहे. शिकून मुलं बाहेर पडत आहेत; परंतु ती नव्या रोजगारांना लायक होतातच असे नाही. अनेक क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाचा अभाव दिसत आहे. योग्य माणसे मिळत नाहीत अशी तक्रार सर्वदूर व्यक्त होत आहे.

खेडय़ापाडय़ात नव्याने शिक्षणाचे जे अंकुर फुटले आहेत ते टिकून ठेवण्यासाठी, विकसित करण्यासाठी या मुलांची रोजगार क्षमता वाढेल असा बदल शिक्षण पद्धतीत करणे ही काळाची गरज बनली आहे. नुसत्या शिक्षण संस्था काढून दुकानदारी करणार्‍यांना याचे काही सोयरसुतक आहे का?

(लेखक हे नामवंत सामाजिक कार्यकर्ते व लेखक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9422931986

No comments:

Post a Comment