Thursday 12 July 2012

रिमझिम


 पाऊस येतोय. रस्ता भिजलाय. अगदी चिंब. हिरव्यागार नव्या नवलाईनं निसर्ग बहरलाय. त्या काळ्याशार रोडवर पाऊस झेलत मी आणि ती स्वत:ला विसरून हिंडतोय. पण हल्ली ती जास्त आगाऊ झालीय.ं नेमकी अशा वेळेस च्याट मारते. अन् मग आपणच हिंडा, तो पाऊस झेलत. शांत-शांत शिश्रू अगदी 'मुसाफीर हूं यारो, ना घर है ना ठिकाना' च्या थाटात. मग ती दुसर्‍या दिवशी होस्टेलला येणार. काही झालं नाही, असा चेहरा घेऊन आल्याबरोबर 'हाय' म्हणणार. आपण काही बोलायच्या आधी आपल्याकडे लक्ष न देता सरळ इझल कडे जाऊन त्यावरचं स्केच बघत, ''कधी केलंस! आज की काल रात्री? मस्त जमलंय!, कॅनव्हासवर कधी घेतोयस?''

''तू गेल्यावर!''

''का रे?'' कपाळावर आठी, ''मी तुझा ब्रश धरून ठेवते?''

''हं''

''हं काय?''

''हं'' (अजूनच लांबवत)

''तू असा देवदास सारखा का बसलाहेस? नाही तेव्हा मारे शेर ठिबकत असतात. काय म्हणे ब्वा? हं, ''बना लिया है तुझे अपनी जिंदगी हमने अब इससे बढकर तेरा ऐतबार क्या होगा, कोण ते आपले गालिब, मीर, फिराक सध्या सुट्टीवर आहेत का? असा टक्क लावून काय पाहातोय? आज मौनव्रत आहे का?''

''नाही गाणं आठवतोय...''

''कुठलं''

''गुस्सा इतना हसीन है तो प्यार कैसा होगा. तू ऐकलंस?''

''नाही मी ते ऐकलंय''

''कुठलं?''

''तेरी दुनिया मे दिल लगता नहीं वापस बुलाले मैं सजदे में पडा हुॅं ऐ मालिक उठाले''

''तुझं एक बरं आहे यार, चित भी मेरी पट भी मेरी अंटी मेरे बापकी! म्हणजे आम्ही तिथे होस्टेल समोर पावसात पागलासारखं ओलं होत उभं राहायचं.

आपण घरी 'घोडे बेचके' झोपायचं अन् वरून तेरी दुनिया मे! खरंय यार. आम्ही साले बांगरू ते बांगरूच...''

''रागावलास? ए तू पण कसा अगदी टिपिकल आहेस. एवढं काय रुसवे-फुगवे घेऊन बसलाहेस? माणसानी प्रॅक्टिकल असावं.''

''तेच म्हणतोय मी. आम्ही बांगरूच!''

''ए सोड ना आता, का लांबवतोय? तुलापण 'सॉरी' म्हणायचं का?''

''तुझे केसं खूप सुंदर आहेत यार.. घनगर्द.. अगदी जुल्फे है या बादल.!''

''कितव्यांदा?''

''असंच, एखादा सिनेमा नाही का आवडला की, आपण नेहमी-नेहमी पाहतो तसं. आहेत सुंदर म्हणून तारीफ करतोय

दुसरं काय?''

ती मानेला झटका देत केसांना अधिकच नादान करते.

''अब क्या कहते हो बादल?''

''झकास! ए! तुझं पोट्रेट करायचं का? सॉलिडपैकी? केस असेच ठेव, आहेस तशीच बैस!''

खिडकी उघडताच प्रकाशझोत तिच्या चेहर्‍यावर पडतो. मी तिच्या प्रसन्न चेहर्‍याशी संवाद साधू लागतो. तिच्या 'बादलांना' चंदेरी छटा लाभते. तिच्या चेहर्‍याची रेषन्रेष बोलू लागते आणि कॅनव्हास जिवंत होतो.

माणसांना आवरणं नसले की कुठली निर्जीव वस्तूसुद्धा जिवंत जाणवते. माणसाला जगण्यातला निखळ आनंद लाभतो.

''पोस्टमन''

पाऊस कधीचाच थांबलाय. धूळ झटकलेलं हातातलं पोट्रेट मी भिंतीला टेकवतो. पत्र घेतो. तिचचं पत्र आलंय. बडोद्याहून.. नागपूर सोडल्यानंतर तीन वर्षात 'बादल' पाह्यलेय नाहीत. शहाणीनी दोन वर्षानी सरळ बडोद्याहून पत्रं पाठवलं. मी एम.एफ.ए.करतेय म्हणून. अन् आज पुन्हा तब्बल एका वर्षानंतर.. एकेका अक्षरात तिचं अस्तित्व (सामावल्यासारखं) जाणवंत, तो टवटवीतपणा पत्रातूनही..

''तू पण एम.एफ.ए. करायचं असतं. दृष्टिकोनात खूप फरक पडतो. नवनवीन मित्र-मैत्रिणी, नव्या-नव्या स्टाईल्स. आता जाणवतंय. होस्टेलात तू एकटा राहायचा. तुझी काय अवस्था होत असेल ते.. याबाबतीत प्रॅक्टिकल होणं त्रासदायक ठरतं.

तू असता तर मग नसतं जाणवलं. ए, पाऊस आला की तुला माझी आठवण येते नं? मलापण, बडोद्याला कधी येतोस?

'बादलों की छॉंव मे.' आमचा कॅम्पस खूप विस्तीर्ण आहे. हिंडता येईल.. पत्र मिळताच ये. वाट पहातेय.''

काळ माणसाला प्रॅक्टिकल बनवून टाकतो. हळूहळू सगळ्या जाणिवा बोथट व्हायला लागतात.

तिच्या पत्रानी, पोट्रेटनी मी चिंब झालो असतो. 'धिस इज टू मच हं. तीन वर्षे विदाउट बादल टू मच!

मी सरळ उठतो. बॅगमध्ये कपडे भरायला लागतो.

'बादलोंकी छॉंव में' मला सुकून मिळणार असतो.

(लेखक हे नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत.

'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650

No comments:

Post a Comment