Monday 23 July 2012

गोष्ट आजची की खरंच खूप वर्षापूर्वीची?

खूप वर्षापूर्वीची गोष्ट. भारतवर्षात एक राजा होऊन गेला. त्याचे नाव भीमसेन. त्याच्या पित्याचे नाव शूरसेन. तो आपल्या नावाप्रमाणेच पराक्रमी होता. निधनापूर्वी त्याने आपल्या पुत्रांना एक मौलिक उपदेश केला. आपण शूरवीरांचे वारस. शूरवीरांनी लढायचे असते; पण आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी. चार दिशांना चार राज्ये आहेत. त्यांच्या कोंडीत सापडलेला आपला चिमुकला देश आहे. या चार देशांचे राजे बाहेरच्या राज्यांची मदत घेतात. आपण कष्टाने पिकवलेले अन्नधान्य लुटून नेतात. परस्परांत वाटून खातात. आपली मात्र कायम उपासमार होते. तुम्ही असा काही उपाय करा की, ज्यामुळे आपल्या प्रजाजनांचे कष्ट कमी होतील, त्यांची उपासमार थांबेल आणि चारही बाजूंनी घेरलेल्या देशांशी आपले संबंध सलोख्याचे राहतील. राजा शूरसेन मरण पावला; पण त्याचा उपदेश भीमसेनाने मनात रुजवला. अहोरात्र कष्ट केले. चार राज्यांच्या राजांना पटवून दिले. आपण परस्परांत लढण्याऐवजी एकजुटीने कष्ट करू. मिळेल त्याचे समान वाटप करू. चार देशांचे आणि मधे सापडलेल्या आमच्या प्रदेशाचे एकच राज्य करू. बाहेरचे राजे आमचे धन लुटून नेतात. त्यांचा एकजुटीने प्रतिकार करू. सगळ्य़ांना ही कल्पना आवडली. सर्वानी एकजूट केली. एका नव्या साम्राज्याची निर्मिती केली. सर्वानी परस्परांशी कसे वागावे याची चर्चा केली. चर्चेचा ग्रंथ केला आणि इथून पुढे या ग्रंथाचे सर्वानीच पालन करावे असा फतवा काढला. राजा भीमसेनावर सर्व राजे खूश झाले. ते म्हणाले, ''आता या ग्रंथाप्रमाणे सर्वानी वागावे. यावर देखरेख ठेवण्याचे काम तुम्हीच करा.'' राजा भीमसेन यांनाही ही सूचना आवडली. राजा भीमसेनाने सर्वाकडून एक वचन घेतले. आता आपल्यापैकी कुणीही मोठा नाही. कुणीही छोटा नाही. आपले वाद निर्माण झालेच, तर ते याच ग्रंथाच्या आधारे मिटवू. ग्रंथाची प्रतिष्ठा राखू. या ग्रंथात हवे तर एकमताने चर्चा करून बदल घडवून आणू; पण या ग्रंथापेक्षा कुणी मोठा नाही अशी प्रतिज्ञा करू. सर्वानी प्रतिज्ञा घेतली. जगाला धाक वाटेल असे नवे साम्राज्य निर्माण झाले. राज्य ग्रंथाच्या आधारे सुरू झाले.

सगळे राजे परस्परांशी सहकार्याने वागू लागले. वाद उद्भवले की, राजा भीमसेनाचा सल्ला घेऊ लागले. बाहेरच्या राज्यांचे अतिक्रमण थांबले. परस्परांशी लढून शक्ती खर्च करण्यापेक्षा आपल्या साम्राज्याचे उत्पन्न कसे वाढेल यावर ती शक्ती खर्च होऊ लागली. पण काही लोक स्वभावत: आळशी असतात तर काही लोभी. ग्रंथाआधारे न्यायनिवाडा होतो म्हणून काय झाले? अखेर न्यायनिवाडे देणारी माणसेच तर असतात! अशा जागेवर चुकूनमाकून एखादा लोभी माणूस न्यायनिवाडा करण्यासाठी बसला की, तो आपल्या स्थैर्यासाठी चार लोकांचे बळ वापरणारच. त्यांचे पाठबळ मिळावे म्हणून तो मोहबळाचे अस्त्र वापरणारच. राजा

भीमसेन जसजसे वृद्ध होऊ लागले तसतसे त्यांना तशा मूठभर लोकांचे संख्याबळ वाढू नये म्हणून काय करता येईल, असा प्रश्न भेडसावू लागला. खरेतर यावर एकच उपाय होता. तो म्हणजे ग्रंथाविषयी जागरूकता वाढवणं. राजा भीमसेनांच्या देशात एक प्रथा होती. दसर्‍याच्या दिवशी राजा हत्तीवर बसून नगरप्रदक्षिणा करीत असे. यानिमित्ताने प्रजेला राजाचे दर्शन होत असे. लोकांचे राजाविषयीचे प्रेम वाढत असे. भीमसेन राजाने या प्रथेत बदल केला. एका दसर्‍याच्या दिवशी राजहत्तीच्या अंबारीत आपण सिद्ध केलेला ग्रंथ ठेवला. स्वत: राजा अश्वारूढ होऊन हत्तीच्या मागे निघाला. गर्दी कुतूहलाने हे दृश्य पाहू लागली. हत्तीचा डौल दिमाखदार वाटावा म्हणून हत्तीच्या मागेपुढे चार प्रशिक्षित श्वानांची योजना केली. आपण अश्वारूढ राजाच्या पुढे आहोत, राजहत्तीचे संरक्षक आहोत हे लक्षात आल्यामुळे ते श्वानही आता डौलात चालू लागले. एका दसर्‍याला सुरू झालेली ही प्रथा पुढे अधिकच वैभवसंपन्न झाली. ग्रंथाची प्रतिष्ठा वाढली. 'ग्रंथापेक्षा अन्य कुणी श्रेष्ठ असू शकत नाही' हा विचार रुजला. राजा भीमसेनाचे समाधान झाले आणि एके दिवशी राजा भीमसेनाचे निधन झाले. प्रजाजन व्याकूळ झाले. भीमसेन गेले पण ग्रंथरूपाने ते आता उरले या विचाराने प्रत्येक दसर्‍याची मिरवणूक आता अधिक वैभवसंपन्न होऊ लागली. आणि एके दिवशी प्रजेवर दुसरा आघात झाला. राजहत्ती मरण पावला.

दसरा जसजसा जवळ येऊ लागला तसतसा प्रत्येकासमोर एकच प्रश्न पडला. ग्रंथाची मिरवणूक काढायची कशी? राजहत्तीची जागा अन्य कुण्या हत्तीला द्यायला कुणीच तयार नव्हते. म्हणून चार श्वानांनी बैठक घेतली. सल्लामसलत केली आणि ते प्रजेला म्हणाले,

''मित्रहो, काळजी करू नका. ग्रंथ याच अंबारीत ठेवला जाईल. या अंबारीला दोन दांडय़ा लावल्या जातील. त्या दांडय़ा आम्ही आमच्या पाठीवर घेऊ. मिरवणूक पूर्ववत निघेल.''

त्यांचा हा विचार लोकांना पटला. पण एकदोघांनी शंका व्यक्त केली. ''ग्रंथ अंबारीतच राहील हे ठीक; पण तो तुमच्या पाठीवर ठेवून प्रदक्षिणा घालताना ग्रंथाची उंची कमी होईल त्याचे काय?'' पण लगेच श्वानांनी सांगितले, ''ग्रंथाची उंची कशी कमी होईल? ग्रंथात

फेरबदल केले तर त्याची उंची कमीजास्त होईल. आपण ग्रंथात कुठे फेरबदल करीत आहोत?'' हाही विचार लोकांना पटला. तेव्हा श्वान म्हणाले, ''ग्रंथाची उंची आहे तेवढीच राहणार आहे. फरक फक्त तुमच्या दृष्टीचा असणार आहे. ग्रंथ राजहत्तीवर होता तेव्हा तुम्ही माना उंचावून त्याकडे पाहत होते. आता तो आमच्या पाठीवर आला तर माना उंच न करताही तुम्ही पाहू शकता.'' अखेर सर्वानुमते श्वानांचा निर्णय मान्य झाला. श्वानांच्या पाठीवर अंबारी ठेवण्यात आली. नगरप्रदक्षिणा सुरू झाली. पुढच्या वर्षी नवा पेच निर्माण झाला. प्रजेने श्वानांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या वर्षावामुळे प्रत्येक श्वानाला वाटले, अंबारी फक्त आपल्यामुळेच पेलवली गेली. म्हणून प्रत्येक श्वानाने आग्रह धरला, आता ही अंबारी मी एकटाच वाहून नेणार. ती माझ्या पाठीवर ठेवा. प्रत्येक श्वानाने हाच आग्रह धरला. आता हे भांडण मिटवायचे कसे? एवढय़ात एक लबाड कोल्हा तिथे आला. तो म्हणाला, ''मित्रहो, असे भांडू नका. त्याऐवजी आपण या अंबारीचे समान चार भाग करू आणि प्रत्येकाच्या पाठीवर ते चार तुकडे ठेवू.''

''हो, पण मग ग्रंथाचे काय करायचे?''

''ग्रंथाचेही चार विभाग करू ना!'' कोल्हा म्हणाला. ग्रंथाचेही चार तुकडे करायचे! ही कल्पनाच प्रजेला सहन झाली नाही. प्रजाजनांनी टाहो फोडला.

''अरे, तुम्ही चौघे आहात. एकजुटीने अंबारी उचला म्हणजे ग्रंथही सुरक्षित राहील आणि अंबारीचेही तुकडे होणार नाहीत.''

पण प्रजेचा हा केविलवाणा आक्रोश कुणी ऐकलाच नाही. पाहता पाहता ही वार्ता विंध्याचल प्रदेशातल्या परिप्राजकांना लागली. त्यांच्या नेत्याने एक बलदंड हत्ती निवडला आणि थेट भीमसेन राज्याच्या प्रदेशात पोहोचले. ऐन दसर्‍याच्या दिवशी परस्परांत भांडणार्‍या श्वानांची पर्वा न करता त्यांनी ती अंबारी उचलली आणि आपल्यासोबत आणलेल्या हत्तीवर प्रतिष्ठापित केली. प्रजेने हत्ती पाहिला. त्यावरची अंबारी पाहिली आणि प्रजा हरखली. नगरप्रदक्षिणा सुरू झाली. सर्व मिरवणूक निर्विघ्न पार पडली. या हत्तीच्या अवतीभवती श्वानांऐवजी चार हुशार कोल्ह्यांची नियुक्ती केली. कोल्ह्यांनी चातुर्यपूर्ण संभाषण केले. त्यांनी प्रजाजनांची मने जिंकली. श्वानांची राजमान्यता संपुष्टात आली. राजा भीमसेनाचा पायंडा सुरू राहिला.

बिसापाने गोष्ट संपवली. व्यास ती गोष्ट मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. गोष्ट संपल्यानंतर व्यास तंद्रीतून बाहेर आले आणि बिसापाला म्हणाले,

''पण बिसापा, मला एक कळले नाही. भीमसेन राजाच्या प्रजेने हा एवढा मोठा बदल मान्य कसा केला?''

''एवढा मोठा बदल?''

''नाहीतर काय? भीमसेनाच्या प्रदेशातून त्यांचा ग्रंथ थेट विंध्याचल पर्वताकडे गेला आणि तरी लोक गप्प?''

बिसाप हसला आणि म्हणाला, ''मुनिवर्य तुम्ही भारतवर्षात तरी आहात. मी मात्र गांधार देशातला. तेव्हा जी गोष्ट मला सहज कळली ती तुम्हांला मात्र कळू नये याचे मला आश्चर्य वाटले.''

''म्हणजे काय?''

''म्हणजे असं की, हत्तीला पर्याय हत्तीच असू शकतो हे त्या विंध्याचलच्या नेत्याला कळले. इथे खरा प्रश्न ग्रंथ परिशीलनाचा नसतो. तो असतो ग्रंथप्रदर्शनाचा. दर्शन हत्तीवरून झाले याचे समाधान प्रजेला झाले.''

''पण मला ती श्वानाऐवजी कोल्ह्यांची योजना..?''

''नुसता प्रामाणिकपणा काय कामाचा? कोल्हा प्रामाणिक असो नसो, तो चतुर असतो हे तुम्हांला माहीत आहेच ना?'' एवढे बोलून बिसाप निघून गेला. व्यास त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिला. इसाप सगळ्य़ांना माहितंय; पण बिसाप मात्र कमी लोकांना. मी ही बिसापाची गोष्ट वाचली आणि उगाच विंध्याचल, हत्ती, एकजुटीचा उपदेश आणि नियमांचा ग्रंथ या उल्लेखांमुळे मला आजच्याच वर्तमानातील वाटली. माझी शंका खरी की खोटी? अजून मला कळले नाही.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881230084

No comments:

Post a Comment