Monday 16 July 2012

खुशीचा अकात

  A A << Back to Headlines     
''कायची तयारी करून राह्यली बाले?'

''माहा नाव बाली नाही अंकल''

''मग काय हाये?''

''खुशी!''

''काय करून राह्यली खुशी?''

''दिसत नाही काय.. स्कूलची तयारी करून राह्यली''

''कोन्या वर्गात गेली तू?''

''थर्ड स्टॅंडर्ड! मी इंग्रजी शाळेत असते, आमची मॅडम म्हनते इंग्रजीत बोलत जा''

''कुठं गेले तुहे पप्प?''

''माहे पप्पा पेरन्यावर गेले''

''अन् तुही मम्मी?''

''मम्मी त्याहीची शिदोरी घेऊन गेली''

''अन् तुहा ब्रदर?''

''माय ब्रदर इज स्लिपिंग इन पायना''

''तुले एकदम फाडफाड इंग्रजी येते''

''मी कॉन्व्हेंटमंधी असते ना अंकल''

''मोठी झाल्यावर कोण होशीन तू?''

''मीस इंडिया!''

''नाकातला शेंबूळ पूस बाई आगुदर.. एकतर तुह्या नाकातली फाईल डिलीट कर नाहीतर सेव्ह कर..''

''पुसला म्या फराकाले! मले कालपासून कोल्ड झाली अंकल.. काल मी शाळेत गेली नाही''

''काहून?''

''देअर इज सो मच उवा इन माय हेड! मॅडम म्हने आगुदर डोकशातल्या उवा काढ मंग शाळेत ये''

''कोन ती मॅडम शिकोते तुले?''

''करिना मॅडम! पन तिले काहीच येत नाही''

''कशावरून?''

''कधी म्हनते बारा पंच साठ होतात.. कधी म्हनते वीस तिरी साठ होतात.. आ काय सांगते अन् उद्या काय सांगते.. सगळ्याइले कनफ्युज करून टाकले, म्हनून पोट्टे तिले चिडवतात''

''काय म्हंतात?''

''सैफ अली खान कुठं गेला म्हंतात! तिले वाटते आपल्यासारखं इंग्लिश कोनालेच येत नाही, पन एक दिवस आम्ही तिले विचारलं..''

''काय विचारलं?''

''लुगळ्याले इंग्रजीत काय म्हंतात?''

''मंग?''

''तिले सांगताच आलं नाही, तुम्हाले खोटं वाटीन अंकल.. पन आमच्या क्लासमधे मीच सगळ्यात इंग्रजीत हुशार आहे''

''सांग बरं.. एखांद्याले इंग्रजीत इकडे ये म्हनायचं असलं तर काय म्हनाव?''

''व्हेरी सिंपल.. इकडे ये म्हनजे कम हिअर''

''अन् तिकडे जाय म्हनायचं असलं तर?''

''ते त्याच्याहून सिंपल''

''कसं?''

''तिकडे जाय म्हनायचं असलं तर आपूनच उठून तिकडे जायचं अन् त्याले म्हनायचं कम हिअर''

''शब्बास! लय नाव कमावशीन बाई तू''

''चला लवकर शाळेत अंकल.. ट्रान्सफर आली''

''काय आली?''

''ट्रान्सफर''

''म्हनजे?''

''बदली आली.. वर पाहा.. अभायात ढग आले.. पानी येते''

''मंग बद्दल आली म्हन! हे नवी पिढी कोनता शब्द कुठं वापरीन काहीच सांगता येत नाही''

''उचल लवकर दप्तर''

''बापा बापा! पोरगी छटाकभर अन् दप्तर क्िंवटलभर! तिसर्‍या वर्गाले इतके पुस्तकं असतात काय?''

''सिक्टीन पुस्तकं हायेत आमाले.. तितक्याच वह्या आहेत''

''सोळा पुस्तकं कायचे?''

''मॅथ वर्कबुक, कॉम्प्युटर नॉलेज, एन्व्हायरमेंट, जनरल नॉलेज, इंग्लिश वर्कबुक, ड्रॉइंग, गोल्डन ग्रामर.. हिंदी.. मराठी..''

''अरे मेला मानूस! एवढे पुस्तकं पाहून मले चक्करच येऊन राह्यला, आमच्या टाइमले तिसरीले फक्त दोन पुस्तक होते''

''आता आमाले होलसेल दप्तर घ्या लागते, सोबत पान्याची वाटर बॅग.. टिफीनचा डबा अन् अमरेला''

''अमरेला कायले?''

''शाळेतून येताखेपी वाटर आलं की आंग ओलं होत नाही काय? सध्या रेनी सिझन चालू आहे ना अंकल''

''तुहा मेंदू केवढा.. पुस्तकं केवढे? एवढं कसं ध्यानात राहीन बाई?''

''स्टेप बाय स्टेप ध्यानात ठेवा लागते''

''कोन्या शाळेत आहेस तू?''

''डिंग डॉंग कॉन्व्हेंट! आमच्या सगळ्या मॅडम गुड शिकवतात, पन मराठीची मॅडम तोतरी बोलते, म्हनून म्या मराठीची टिवशन लावली''

''मराठीची टिवशन कायले पाह्यजे? ते आपली भाषाच आहे''

''आमच्या शाळेत लय शुद्ध बोला लागते अंकल.. तुमच्यासारखं गावरान बोलता येत नाही, नाहीतर मॅडम पनीश करते''

''हे दप्तर केवढय़ाचं आनलं बाई''

''वन हंड्रेड फिफ्टी रुपयाले''

''बापा बापा.. आमच्या टाइमले महाबीजच्या थैलीचं दप्तर राहे.. पायात चप्पल नसे.. सदर्‍याले गुंडय़ा नसत.. अर्धे पोट्टे शेंबळेच असत''

''आमाले लय पॉश राहा लागते अंकल.. सर्दी झाली की दप्तरात हँडकरचीफ न्या लागते''

''तुले त आताच सर्दी झाली.. फुरफुर करून राह्यली तू''

''काल मी वाटरमंधी भिजली''

''दस्ती नाही काय तुह्याजोळ?''

''माही हॅंडकरचीफ वली हाये''

''अशी नाकातून धार आली त काय करशीन शाळेत?''

''अशा टाइमले मॅडम आमाले दस्ती देते, आमची शाळा लय स्टॅंडर्ड हाये''

'तुले एकटीले हे दप्तर उचलत नाही काय?''

''नाही ना.. तुमच्या जवळ बायसीकल नाही काय अंकल?''

''नाही''

'मग मले शाळेत लोक तुमच्या शोल्डरवर बसून न्या.. अन् हे दप्तर गयात घाला''

''या गाटय़ापान्याचं मलेच धड चालता येत नाही, अन् तुले कसं नेऊ?''

''प्लीज न्या हो अंकल''

''बस माह्या खांद्यावर''

''बसली मी.. रेडी..''

''अरे रे.. तुह्या बुटाचे भरले पाय माह्या शर्टाले लागले.. सारा सत्यानास झाला कपळ्याचा''

''चला पटकन.. आता जसं मले नेता तसं तिकून आनून घालजा''

''या पोरीनं घेतला जीव मानसाचा.. आता हे खांद्यावर बसली.. सकाय डोक्यावर बसल्याशिवाय राह्यत नाही.. अकात आहे या पोरीचा.. वारे वा कॉन्व्हेंट!''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी: 9561226572

No comments:

Post a Comment