Tuesday 10 July 2012

विश्वाचा प्रारंभ एकाच बिंदूपासून!



निर्जीव पदार्थ (मॅटर) व विविध प्रकारच्या ऊर्जा (एनर्जी) मूलत: एकाच तत्त्वापासून विस्तारल्या आहेत ही बाब आता विज्ञानमान्य झाली असून या प्रचंड विश्वाचा प्रारंभदेखील एकाच बिंदूपासून झाला असावा, असाही अनेक मोठमोठय़ा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. कारण असे, की पृथ्वीवरून अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने अंतराळाचे निरीक्षण केले असता दिसणार्‍या सर्व आकाशगंगा (प्रत्येक आकाशगंगेत करोडो सूर्यमाला असतात.) पृथ्वीपासून सर्व दिशांनी दूर दूर जाताना दिसतात. एखाद्या फुग्यावर अगदी छोटय़ाछोटय़ा अनेक चकत्या चिकटवून त्या फुग्यात हवा भरू लागलो, तर त्या

फुग्यावरील सर्व चकत्या एकमेकांपासून दूर जातात. परंतु त्या चकत्यांचे आकार वाढत नाहीत. तसेच काहीसे घडत आहे. आकाशगंगांच्या दूर दूर जाण्याचा वेगदेखील शास्त्रज्ञांनी मोजला असून त्या वेगाची दिशा बघूनच त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, फार-फार पूर्वी म्हणजे विश्वाच्या आरंभी विश्वातील सर्व ग्रहतारे हे एकाच बिंदूमध्ये सामावले असावे व त्या बिंदूतून झालेल्या अतिप्रचंड स्फोटामुळे (बिगबॅंग) दशदिशांना ऊर्जा फेकली गेली. जिचे रूपांतर हळूहळू तारे व ग्रहगोलांमध्ये आणि विविध पदार्थामध्ये होत गेले. आपण ज्याला काळ (टाइम) व अवकाश (स्पेस) म्हणतो त्यांना विश्वारंभापूर्वी अस्तित्वच नव्हते ही कल्पना समजणे अवघडच आहे!

काळ आणि अवकाश यांनी बद्घ असलेल्या लांबी, रुंदी व उंची या त्रिमितीतच जाणवणार्‍या भौतिक विश्वाचाच एक क्षुद्रातिक्षुद्र घटक असलेला मनुष्यप्राणी त्या त्रिमितीपलीकडे व अवकाश-काळापलीकडे काही असून शकेल अशा शक्यतेच्या पातळीवरच सूट देऊ शकतो. परंतु ते पलीकडील अस्तित्व कसे असेल याबाबत कल्पना करण्यास तो असमर्थ ठरतो.

असो. परंतु महास्फोटाचा (बिगबॅंग) हा सिद्धान्त सर्वच वैज्ञानिकांना मान्य नाही. फ्रेड हॉईल व आपले डॉ. जयंत नारळीकर यांच्या संशोधनातील अनुमानानुसार दृश्य विश्व अनादिअनंत असून त्यातील काही भागात अधूनमधून स्फोट होत राहतात व पदार्थाचा नाश व नवनिर्मिती या क्रियाही घडत राहतात. त्यामुळे विश्वाचे संतुलन कायम राहते. सर्व आकाशगंगा (गॅलॅक्सीज) एकमेकांपासून वेगाने दूर जाताना आढळत असल्या तरी अधूनमधून विश्व थोडेबहुत आकुंचनही पावते व पुन्हा प्रसरणशील होते. मात्र अलीकडील काळात महास्फोटाच्या सिद्घान्तालाच वैज्ञानिक जगतात जास्त मान्यता मिळत असल्याचे आढळून येते.

विश्वनिर्मितीबाबत सध्या अंदाजाच्या स्वरूपातच असलेल्या वेगवेगळ्या सिद्धान्तांमध्ये काही मूलभूत गृहीतके मात्र समान आहेत. उदाहरणार्थ, प्रकाशापेक्षा अधिक वेग कोणत्याही पदार्थाचा असू शकत नाही व विश्वातील एकूण ऊर्जा नेहमीच कायम असते. ऊर्जा रूपांतरित होते; पण नष्ट होत नाही. मध्यंतरी वृत्तपत्रांत एक खळबळजनक बातमी प्रसिद्ध झाली, की प्रकाशापेक्षा अधिक वेगवान असलेला एक मूलकण वैज्ञानिक प्रयोगात आढळून आला. ही बातमी खरी असल्यास पदार्थविज्ञानशास्त्राला पुन्हा शीर्षासन करावे लागेल.

आतापावेतो वैज्ञानिकांना ही बाब स्पष्टपणे उमजली आहे, की या विश्वात करोडो आकाशगंगा (गॅलॅक्सीज) असून प्रत्येक आकाशगंगेत आपल्यासारख्या करोडो सूर्यमाला असू शकतात. आपल्या पृथ्वीवरून पाहिले असता प्रत्येक आकाशगंगा आपल्यापासून वेगाने दूर जात आहेत. त्यातही जी आकाशगंगा आपल्यापासून जितकी दूर तितका तिचा वेग जास्त. हे दृश्य फक्त पृथ्वीवरूनच अनुभवता येईल असे नव्हे. विश्वातील प्रत्येक जागेवरून पाहिले असता असेच आढळून येईल. म्हणजेच विश्व एखाद्या फुग्यासारखे प्रसरण पावत आहे व प्रसरणासोबतच अवकाश व काळाची नवनिर्मितीही करत आहे.

अवकाश (स्पेस) आणि काळ (टाइम) या परस्परांशी मुळीच संबंधित नसलेल्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे पूर्वी मानले जाई. परंतु महान प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी लांबी, रुंदी व उंची या अवकाशाच्या तीन मितींशी/आयामांशी (डायमेन्शन्स) घट्टपणे निगडित असलेली चौथी मिती म्हणजे काळ होय हे शोधून काढले. एकाच जागी उभे असलो तर आपण फक्त काळातून प्रवास करतच असतो. परंतु चालू लागताच आपण अवकाश-काळाच्या चौमितीतून प्रवास करू लागतो. आपण अतिशय वेगाने अवकाशातून प्रवास करू लागलो, तर अवकाश वाढल्यामुळे काळ लहान होतो म्हणजेच घडय़ाळ हळू चालू लागते. प्रकाशाचा वेग जवळपास 3 लक्ष कि.मी. प्रतिसेकंद इतका आहे. त्या वेगाच्या आसपास आपला वेग वाढल्यास काळ जणू स्तब्ध होतो. म्हणजे घडय़ाळ थांबून जाईल. दोन तरुण जुळ्या भावांपैकी एक जण जर अंतराळयानातून भ्रमण करून अनेक वर्षानी पृथ्वीवर परतला, तर त्याचे वय फारसे वाढलेले नसेल. पण पृथ्वीवरचा भाऊ मात्र तोपावेतो चक्क म्हातारा झाला असणार.

असे हे अवकाश-काळयुक्त चौमिती विश्व आरंभी केवळ लांबी-रुंदी-उंची नसलेल्या एका बिंदूत महाऊर्जेच्या रूपात सामावले होते अशी गंभीर मांडणी आता वैज्ञानिक करताहेत. विश्व शून्यातून निर्माण झाले असे विज्ञान म्हणू शकत नाही. कारण विश्वातली एकूण ऊर्जा ही अक्षय आहे म्हणजे तिचे रूपांतर दुसर्‍या ऊर्जेत अथवा पदार्थात होईल. परंतु ऊर्जेचा र्‍हास कधीच होत नसतो - हा विज्ञानाचा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. त्यामुळेच विश्वनिर्मितीपूर्वी हे आज असीम भासणारे संपूर्ण विश्व, त्यातील अब्जावधी ग्रहतार्‍यांसह महाप्रचंड ऊर्जेच्या स्वरूपात एकाच बिंदूमध्ये सामावले असणार आणि महास्फोटानंतर ती महाऊर्जा प्रकट होऊन अवकाश-काळाची निर्मिती करत प्रसरण पावू लागली. या महास्फोटाच्या वेळी जी अतिप्रचंड उष्णता निर्माण झाली असेल त्या उष्णतेमध्ये पदार्थाचे अणूसारखे घटक तयार होणे अशक्य होते. तापमान पुरेसे कमी झाल्यानंतर प्रोटॉन-न्यूट्रॉनयुक्त अणुगर्भाच्या रचना तयार झाल्यात व कालांतराने पदार्थमय वायुगोळे निर्माण होऊन तार्‍यांची सृष्टी झाली.

एक गमतीचा भाग असा, की शास्त्रज्ञांच्या मते, सृष्टिनिर्मितीच्या अगदी सुरुवातीस चारपेक्षा अधिक मिती (डायमेन्शन्स)मध्ये विश्व साकार होत गेले. परंतु लवकरच त्यापैकी बाकीच्या मिती (बहुतेक 6 किंवा 7) आपल्या चौमिती विश्वापासून वेगळ्या होऊन अतिसूक्ष्म आकारात आकुंचन पावल्या. दुसरी गंमत अशी, की प्रत्येक पदार्थ (मॅटर) कणासोबत त्याच्या विरुद्ध गुणधर्म असणारा परंतु समान वस्तुमानाचा दुसरा पदार्थकण (अँण्टिमॅटर)देखील सुरुवातीस निर्माण झाला. उदा. इलेक्ट्रॉन इतकेच वस्तुमान असलेला परंतु घन (पॉझिटिव्ह) विद्युतभार असलेला पॉझिट्रॉन नावाचा मूलकण. इलेक्ट्रॉनमध्ये ऋण (निगेटिव्ह) विद्युतभार असतो. मॅटर व अँण्टिमॅटर एकमेकांस नष्ट करू लागले. परंतु अंतिमत: मॅटरची मात्रा अँण्टिमॅटरपेक्षा किंचित जास्त होऊन पुढे मॅटरचाच फैलाव झाला. यावरून आपल्या पुराणकथांमधील देवदानव संघर्षाची कथा स्मरते. दानव देवांना भारी पडत होते. पुराणानुसार अशा वेळी देव महादेवांचा धावा करायचे आणि महादेवांना हस्तक्षेप करून दानवांची बाजू लंगडी करावी लागे. त्या सृष्टी आरंभकाळात दानवांची सरशी झाली असती, तर पृथ्वीचा विनाश निश्चित होता.

प्रश्न असा पडतो, की अँण्टिमॅटरपेक्षा मॅटर भारी ठरले. हे केवळ योगायोगाने, अपघाताने की, त्या महाऊर्जेच्या उदरात असलेल्या चैतन्याच्या संकल्पामुळे?

(लेखक हे नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881574954

No comments:

Post a Comment