Wednesday 11 July 2012

राजे, आम्हाला माफ करा!



राजे,
तुम्हाला मानाचा मुजरा करण्यापूर्वी मला तुमची माफी मागायला हवी!

परवा तानाजीशी बोलताना महाराष्ट्रासोबत झालेल्या दगाबाजीचा पाढा वाचला. घोरपडी फितूर झाल्याचेही सांगितले. सारा महाराष्ट्र सत्तेच्या दलालापासून त्रस्त असल्याचंही सांगितलं. भ्रष्टाचारानं कळस गाठल्याचंही सांगितलं. महाराष्ट्राला वाचविण्यासाठी पुन्हा एकदा तानाजीनं यावं, अशी विनंतीही केली. सोबत त्यांची तलवार आठवणीनं घेऊन या, हेही आवर्जून सांगितलं.

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून फोन आलेत. समाजमन ढवळून निघालं. भाजीवाले, पंक्चरवाले, ड्रायव्हर, दुकानदार, प्राध्यापक, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, विद्यार्थी सारे सारे बोललेत. पत्रकारही बोललेत. काही अधिकारीही बोललेत. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकही बोललेत. वेगवेगळय़ा (विरोधी आणि सत्ताधारी) पक्षाचे काही नेतेही बोललेत. आता हे फार झालं म्हणालेत. हे थांबायला हवं असंही म्हणालेत. काही रडून बोलले, काही चिडून बोललेत.. भाषा वेगवेगळी असली तरी प्रत्येकाच्या मनातली आगही सारखीच होती. रागही सारखाच होता.

राजे,

मी तानाजीला पुन्हा एकदा या म्हणालो.. पण मला वाटतं.. ती माझी चूक होती!

घर आमचं जळतंय आणि विझवण्यासाठी तानाजीनं का म्हणून यावं हो? आम्ही एवढे कुचकामी आहोत का? आम्ही एवढे नालायक आहोत का? काही ठरावीक घराण्यांच्या हातामध्ये हा सारा महाराष्ट्र गेलाय हे खरं आहे. काही ठरावीक लोकांनी राजरोसपणे सारा महाराष्ट्र ओरबडण्याचा ठेकाच घेतलाय हेही खरं आहे. पण त्याला जबाबदार कोण आहे हो? मोजकी शंभर-दोनशे कुटुंबं महाराष्ट्राला राजरोस लुटत असताना दहा कोटी जनता मुकाटय़ानं सहन कशी काय करते हो? आम्ही यांचे गुलाम आहोत का? जातीच्या, धर्माच्या, भावनेच्या भरवशावर आम्हाला हे लोक मूर्ख बनवत आहेत, हे आम्हाला कळत कसं नाही?

भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये जाणार्‍या लोकांच्या गळय़ात हार घालताना आम्हाला जराही लाज का वाटत नाही हो? जेलमधून बेलवर आलेल्यांचेही आम्ही धडाक्यात स्वागत करतो. बँड वाजवतो. गुलाल उधळतो. तुमची ती प्रेरणादायी, पवित्र तुतारीही वाजवतो!

नुसती कल्पना करतानासुद्धा जीवाची आग आग होते राजे!

लोकशाहीचं पाविर्त्य आणि ताकद समजून घेण्याची आमची लायकी नाही का हो?

तुमचं नुसतं नाव घेतलं तरी आमचं रक्त सळसळतं असं आम्ही म्हणतो. (ते खरंही आहे) तुमचंच रक्त आमच्या नसानसातून वाहतंय असंही ठोकून देतो कधी कधी! फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा आम्हाला लाभलाय याचा शिरा ताणून ताणून आम्ही अभिमानही बाळगतो! आणि त्यांचंच नाव घेत घेत आम्हालाच लुटणार्‍या लोकांच्या पालख्याही मोठय़ा अभिमानानं वाहतो! कारण काय तर ते आमच्या जातीचे आहेत! धर्माचे आहेत! लुटारूंना कुठे जात, धर्म असतो काहो राजे? ज्यानं माणुसकी विकून खाल्ली तो कोणत्याही धर्माचा अनुयायी कसा काय असू शकतो? कोणत्याही महापुरुषाचं नाव घेण्याचा त्याला काय अधिकार?

राजे,

तुम्ही म्हणाल, लोकशाहीच्या नावावर नुसती नौटंकी चालली आहे सध्या! तुमचं खरंही आहे. पण राजे.. लोकशाहीला पर्याय नाही. तुमचा काळ वेगळा होता. तुमच्यासारखे परोपकारी राजे होते! गरीब, अडाणी जनतेवर पोटच्या पोटासारखं प्रेम केलं तुम्ही! तुम्ही तुमच्या सैन्यालाही आदेश दिले होते- मोहिमेवर जाताना उभ्या पिकातून जाऊ नका. भाजीच्या देठालाही हात लावू नका! पण कधी कधी असं वाटतंय राजे.. तुम्ही पण अतिरेकच केलात! तानाजी पण तसेच!

अहो, आमच्या नेत्यांकडे बघा जरा. आधी आपल्या कुटुंबाची सोय करायची! देश खड्डय़ात जावो, नाहीतर महाराष्ट्राचं वाटोळं होवो! कुठेही नजर टाका. आपण लालदिव्यात. एक पोरगा आमदार, दुसरा खासदार, बायको जिल्हा परिषदेत अध्यक्ष तर पुतण्या महानगरपालिकेत महापौर असं सारं चाललंय वाटून खाणं.. कापलेल्या बकर्‍याची हिस्से-वाटणी करावी तस्सा अख्खा महाराष्ट्र वाटून घेतलाय आमच्या नेत्यांनी आपापसात!

आणि तरीही आम्ही पुन्हा पुन्हा त्यांनाच निवडून देतो.

चांगल्या माणसाला मत देण्यात आम्ही अपमान समजतो. कमीपणा समजतो. त्याला मत दिलंही असतं पण तो निवडून आला नसता ना.. असं म्हणून आमच्या मुर्दाडपणाचं निलाजरेपणानं समर्थनही करतो. जरासुद्धा लाज वाटत नाही आम्हाला!

चुका प्रत्येकाच्याच होतात राजे.. आमच्याही झाल्यात! कुणाचा द्वेष नको, राग नको.. पण आता महाराष्ट्र वाचला पाहिजे! लोकशाही वाचली पाहिजे! महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हाच निर्धार व्यक्त केला लोकांनी! अजूनही समाजात प्रामाणिक लोक जिवंत आहेत. सर्वच क्षेत्रात आहेत. हा महाराष्ट्र अजूनही तुमचाच आहे राजे! शाहू-फुले-आंबेडकर-तुकाराम-तुकडोजी-गाडगे महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचाच आहे! तुमचा महाराष्ट्र म्हणजे काही खादीमधल्या घुशींची बिळं नव्हे किंवा घुबडांनी सहकुटुंब कब्जा करण्याची ढोलीही नव्हे!

हा महाराष्ट्र शेतकर्‍यांचा आहे, कामकर्‍यांचा आहे, तरुणांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे. जो जो स्वत:च्या कष्टाचं खातो, त्याचा आहे. जो जो महाराष्ट्रावर प्रेम करतो-माणुसकीवर प्रेम करतो त्याचा आहे!

राजे,

काहीही करून महाराष्ट्र वाचला पाहिजे हो. महाराष्ट्राची दुर्दशा पाहवत नाही. सारेच विचारतात- काय करायला हवं? कसं करायला हवं? आम्हीही विचार करतो. तुम्हीही विचार करा. शाहू महाराजांसोबत बोला! महात्मा फुले, बाबासाहेब यांच्याशीही बोला! आणि पुढच्या आठवडय़ात आपण सांगून टाकू महाराष्ट्र वाचवण्यासाठी नेमकं काय करायला हवं! याच ठिकाणी.. याच दिवशी!

न्याय आतातरी सारखा पाहिजे!

अन् सुदामासही द्वारका पाहिजे!

मी निघालो पुढे या क्षणापासुनी

जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे?

राजे, स्वराज्याची शपथ घेताना रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये तुमच्यासोबतही मोजकेच मावळे होते ना हो?

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपट निर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी'

हा त्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment