Monday, 10 September 2012

उत्साहाने सुरू केलेल्या व्याख्यानमाला मधेच का बंद पडतात?


व्याख्यान देण्याच्या निमित्ताने मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर बराच फिरलो आहे. त्यातील पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, मीरज, कराड इत्यादी ठिकाणच्या व्याख्यानमाला 50-75 वर्षाहून अधिक काळ सातत्याने चालू आहेत. उपरोक्त महत्त्वाच्या शहरांखेरीज काही अतिशय लहान गावांत, तालुक्याच्या ठिकाणीही मी वक्ता म्हणून उपस्थित राहिलो आहे. पण माझा असा अनुभव आहे, की त्यातील अनेक गावांतील व्याख्यानमाला 45 वर्षाचे सातत्य राखून बंद पडल्या आहेत. असे का घडत असावे? खरेतर आज मोठय़ा शहरांत व्याख्यानमाला चालू ठेवाव्यात याची फारशी आवश्यकता उरली नाही. कारण व्याख्यानमालांच्या खर्चीक आणि सामुदायिक परिश्रमांऐवजी कमी खर्चाचे आणि कमी परिश्रमाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याउलट लहानशा गावात मात्र व्याख्यानमालांची आवश्यकता संपलेली नाही. दीर्घकाळ चालणार्‍या व्याख्यानमालांची आवश्यकता आता परिस्थितीनुरूप स्वरूप बदलून सातत्य ठेवले आहे, तर लहान गावातल्या व्याख्यानमाला चांगल्या वक्त्यांची अनुपलब्धता आणि आर्थिक ओढाताण यामुळे बंद पडल्या आहेत. असे असले तरी काही नवनव्या व्याख्यानमालांचाही आरंभ होताना दिसत आहे. अशा लहान गावातल्या व्याख्यानमाला संपूर्णपणे बंद पडल्या आहेत असे मात्र नाही. अतिशय सामान्य मंडळींनी एकत्रित येऊन सुरू केलेली हिंगोलीची व्याख्यानमाला गेल्या 30-35 वर्षापासून सातत्याने चालू आहे. परभणीची बी. रघुनाथ व्याख्यानमाला चालू आहे. पण किनवट, मानवत या ठिकाणच्या व्याख्यानमाला मात्र बंद पडलेल्या दिसून येतात.

हे फक्त व्याख्यानमालांबाबतच घडते असे नाही. अनेक ठिकाणी सुरू झालेल्या एकांकिका स्पर्धा 45 वर्षात बंद पडल्या असा माझा अनुभव आहे. अनेक ठिकाणी सुरू झालेली गावपातळीवरची साहित्यसंमेलनं 45 वर्षात बंद पडली आहेत. असे का घडते याची कारणेही आम्हांला माहीत आहेत. पण ही कारणपरंपरा लक्षात घेऊन नव्याने उदयाला येणार्‍या व्याख्यानमालांचे नियोजन होत नाही आणि अशा व्याख्यानमाला मग बंद पडतात असा माझा अनुभव आहे.

अजूनही आपल्या देशात फर्स्ट रिडर्स जनरेशनमधील उत्साही तरुण अशा व्याख्यानमाला चालविण्यासाठी पुढाकार घेतात. नुकत्याच मिळालेल्या नोकरीतून येणार्‍या आर्थिक उत्पन्नाचा काही वाटा त्यासाठी राखून ठेवतात. पण अशी दृष्टी असणार्‍या तरुणांच्या आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदार्‍या वरचेवर वाढतात हे मात्र लक्षात घेतले जात नाही. वर्गणी देणारी मंडळी तीच ती असतात आणि वारंवार आपण त्यांच्याकडेच मागणी करतो. न देणार्‍यांकडे दुर्लक्ष करणे आणि देणार्‍यांवर सक्ती करणे यातून देणार्‍यांच्या वाढत्या खर्चाचा आपण विचार केलेला नसतो. त्यामुळे सतत देणारा आर्थिक तंगीप्रमाणे हात आखडता घेतो आणि पुढेपुढे तर तो आपले तोंड चुकवायला लागतो. एखादा दुसरा मागच्या वर्षीचा हिशेब का दिला नाही अशा शंकेचे अडथळे उभे करतो. याचा अर्थ असा, की व्याख्यानमाला चालू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी निधी उभारावा असा आपण कधी विचारच करीत नाही. मीही अशा अनुभवांतून गेलो आहे. त्यामुळे नांदेड येथील 'फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे' असे दीर्घ नावे असणारी व्याख्यानमाला सुरू करताना माझ्या सहकारी मित्रांबरोबरही चर्चा केली. वेळ लागला तरी हरकत नाही; पण किमान 250 रुपये देणारे पाचशे सभासद करावेत असे ठरवले. त्याआधारे जमा होणारी अडीच लक्ष रुपयांची ठेव बँकेत कायम ठेवण्यात यावी म्हणजे वर्षाला मिळणार्‍या पंचवीस हजार रुपयांच्या कायमस्वरूपी व्याजावर व्याख्यानमाला चालू शकेल असा निर्णय घेण्यात आला. पाचशे सभासद करता आले नाहीत; पण व्याख्यानमालेवर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही याची सोय झाली. आता वर्गणी द्या, अशी मागणी करण्यासाठी आम्हांस दरवर्षी दारोदार भटकावे लागत नाही. वर्गणी देणारे हक्काचे श्रोते तयार झाले. त्यामुळे श्रोतेही जमा करण्याचा प्रश्न मिटला. व्याख्याते कोण असावेत आणि विषय काय असावेत याविषयी सभासदांचा कानोसा घेण्यात येतो. यात अजून तरी कुठलेही वाद निर्माण झाले नाहीत. पण गेली दहा वर्षे अबाधित चालणार्‍या व्यायानमालेसमोर आम्ही गृहीत न धरलेली नवीन संकटे आता आमच्यासमोर उभी राहिली आहेत.1 टक्का व्याज जास्त मिळावे म्हणून ज्या बँकेत पैसे ठेवले तीच कर्जवसुलीअभावी बुडाल्यामुळे ठेवी फ्रिज झाल्या आहेत. दुसरी अडचण म्हणजे सक्रिय कार्यकत्र्यांच्या बदल्या दूरगावी झाल्या आहेत. यातून एक धडा घेता येतो. सक्रिय कार्यकत्र्यांतसुद्धा बदल्या न होणारे काही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून असायला हवेत आणि बँकेत ठेवी ठेवताना राष्ट्रीय बँकेचाच पर्याय निवडायला हवा.

व्याख्यानमालेची गती खंडित होण्याचे आणखी एक कारण संभवते. येणार्‍या वक्त्याचा सन्माननीय पाहुणा म्हणून आम्ही विचार करीत नाही. वक्त्यांच्या प्रवासाचे आरक्षण आणि त्याच्या सुरक्षित प्रवासाची आम्ही काळजी घेत नाही. एका लहानशा खेडेगावात चालू असणार्‍या व्याख्यानमालेसाठी मी गेलो. प्रवासखर्च साध्या एसटीचा साडेपंधरा रुपये होता. मंडळींनी माझ्या हातावर मोजून 31 रुपये ठेवले. एसटी स्टँडपासून घरी पोहोचण्यासाठी माझा पाच रुपये खर्च झाला होता. तो मागावा असे मला वाटले नाही. पण आंबेडकरवादी विचारवंताने स्वत:चे पाच रुपये खर्च केले तर बिघडले कुठे? असेही बोल ऐकायला मिळतात. तो वक्ता लेखन-वाचनाचे श्रम घेतो, वेळ देतो, याची नोंद घ्यावी अशी एक सांस्कृतिक परंपराच बहुजन समाजात अभावाने आढळून येते. संयोजक लाऊडस्पीकरवर खर्च करतात. पॉम्पलेट, टेंट, खुच्र्या, सभागृह यांवर खर्च करतात. पण निमंत्रित वक्त्याला मात्र धड प्रवासखर्चही देण्यासाठी टाळाटाळ करतात. फुले, बाबासाहेबांच्या कृपेने जे एवढे मोठे झाले त्यांनी खिशातून थोडा खर्च केला तर बिघडले कुठे? असेही काही संयोजकांना वाटते. 'पे बॅक टू सोसायटी' असा एक सात्त्विक शब्दही ते वापरतात. पण वक्त्याला, लेखकाला तुम्ही तुमच्या खर्चाने यावे हे मात्र आधी सांगत नाहीत. महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ता श्री. हरी नरके यांना मी एकदा रेस्ट हाऊसच्या आवारात सकाळी 10-11 वाजता घुटमळताना पाहिले. चौकशी केल्यावर कळले, की ते एका कार्यक्रमासाठी तिथे आले होते. व्याख्यान रात्री झाले. पण दुसर्‍या दिवशी ना संयोजक तिथे फिरकले ना परतीचे तिकीट त्यांना कुणी आणून दिले. अखेर माझे मित्र डॉ. विजयकुमार माहुरे यांनी त्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय केली.

व्याख्यानमाला बंद पडण्याचे आणखीही एक कारण आहे. अनेकांकडून वर्गणी म्हणून जमा केलेली रक्कम कशी खर्च झाली याचा तपशील सादर करायचा असतो. त्यात तो जमाखर्च ऑडिटेट स्वरूपात देता आला तर विश्वसनीयता अधिकच वाढते. सतत तीन वर्षे ऑडिटेट खर्च देता आला आणि व्यवस्थित अहवाल ठेवता आला तर नोंदणीकृत संस्थेला 80 सीची सवलत मिळते. 80 सीची सवलत म्हणजे देणगी दिलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम आयकरातून सूट म्हणून दाखवता येते. त्यामुळे मोठे देणगीदारही मिळवता येतात. पण ही तांत्रिक बाबसुद्धा साहित्यसंमेलन घेणार्‍या अथवा व्याख्यानमालांचे आयोजन करणार्‍या संघटनांना माहिती नसते. सतत तेच ते पुढारी जमाखर्च करतात आणि जमाखर्च सादर न करताही लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करू लागले, की एक प्रकारचे अविश्वासाचे वातावरण निर्माण होते. व्याख्यानमाला बंद का पडतात? याची काही संभाव्य कारणे मी सांगितली. त्याखेरीजही काही कारणे असू शकतात. पण अशी कारणे सांगणे एवढाच माझ्या या लेखाचा उद्देश नाही. शिक्षणाची आणि ज्ञानाची परंपराच नसलेल्या समाजात जेव्हा असे ज्ञानप्रसाराचे उपक्रम सुरू होतात तेव्हा असा उपक्रम संपला, की कार्यकत्र्यांची बैठक घ्यावी, नियोजनातल्या उणिवा शोधाव्यात आणि विश्वासाचे वातावरण कसे निर्माण होईल याबाबतचा विचारविनिमय न करण्यातूनही व्याख्यानमाला बंद पडू शकतात एवढेच मला सुचवायचे आहे.

व्याख्यानमाला समाजाला वळण लावायचे साधन असतात. तसेच समाज नियंत्रणाचेही साधन असतात. मला नेहमीच एक गोष्ट खटकत आली आहे आहे. शासनाची पोलीस यंत्रणाही समाज नियंत्रणाचेच एक महत्त्वाचे साधन असते. या व्याख्यानमालेचा संबंध केवळ बंदोबस्तापुरता आहे असे हे खाते का समजत असावे? त्याचा परिणाम म्हणून अजूनही पोलीस आणि सामान्य माणूस यांच्यात कधी विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले नाही. जणू काही पोलिसांचे जग गुंडांपुरतेच सीमित असते. एखाद्या पोलीस ठाण्यात व्याख्यामाला चालवली हे माझ्या ऐकिवात नाही. काही मंदिरे आणि वक्ता निवडताना आपले सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी काही नाते आहे असे चुकूनही त्यांना वाटत नाही. आपला धर्म सनातन आणि परिवर्तनशीलही आहे. या त्यांच्या घोषणा स्वत:ची पाठ थोपटून घेण्यापुरत्याच सीमित असतात. जोपर्यंत समाजात निरक्षरता आहे, वाचनसंस्कृतीला उठाव नाही तोपर्यंत तरी व्याख्यानमाला हा आपल्या गरजेचा उपक्रम आहे. हे अन्य कुणी नाही तरी शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी समजूनच घ्यायला पाहिजे असे मला वाटते.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचावंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी-9881230084

नवरा- बायकोचं माजोन


''काय व्हय वं भयानथुतरे..''
''काय झालं?''
''माह्या आंगावर पाय देऊन राह्यली अन् अदिक इचारून राह्यली काय झालं?''

''तुम्हीच मंधात झोपले''

''तुले दिसत नाही काय? फुटकी झाली काय?''

''तुम्ही दारात कायले झोपले? कोपर्‍यात झोपावं.''

''दारापाशी हवा लागते म्हणून इकडं झोपलो.''

''दिवसा कायले झोपता?''

''झळीपाण्याचं काय करू? पाण्याचं बाहीर जाता येत नाही म्हणून माणूस जराभर आंग टाकते.''

''दरवाज्यात कोणी आंग टाकत असते काय? येता- जाता लाता लागते हे तुमालेच समजाले पाह्यजे.''

''तुह्या जाणून माह्या आंगावर पाय देला.''

''जाणून म्हणजे?''

''मुद्दामून देला.''

''मुद्दाम कोणी नवर्‍याच्या आंगावर पाय देत असते काय? कावरलं कुत्र डसलं का मले? तुम्ही मंधात होते म्हणून धक्का लागला.''

''धक्का नाई.. तू आंगावर उभी राह्यली.. माहा पाठकोळ अजून दुखून राह्यलं.''

''पाठ दाबून देऊ का?''

''राहू दे.. अदिक एखांदी हड्डी मोडशीन''

''झोपून राहा''

''आता झोप गेली.. तू जागी असली की मले झोप येत नाही.''

''काहून?''

''आता पाठीवर पाय देला.. जराभर्‍यानं छातीवर पाय देशीन.''

''मी पागल आहो काय?''

''मंग कसा पाठीवर पाय देला?''

''मी मांजर हाणाले गेली.. घाई-घाईत पाय पडला.''

''तुव्हं कोणतंही काम धसमुसयच असते. तुले बोलाचं सूत नाही अन् खायाचं सूत नाही.. जरा वजन कमी कर.. सत्तरच्या वरतं काटा गेला. वात होईन एखांद्या रोजी.. खायाले सठ पाह्यजे.. माह्या चोरून खाते उबारी.''

''कधी खाल्लं तुमच्या चोरून?''

''मी वावरात गेलो की तू तुपाचा शिरा करून खातं.''

''कोण सांगे तुमाले?''

''जनाबुढी सांगे.''

''आणा तिले माह्यापुढ.े. झिटय़ा धरतो तिच्या.''

''खोटी बोलू नको.. लेकराची शपथ घेऊन सांग.. शिरा खाल्ला का नाही?''

''खाल्ला म्हणून काय झालं? माहाच घर हाये.''

''खाल्ला का नाई? मंग खोटी कायले बोलून राह्यली? माह्या चोरून घरात भजे होतात, आलुबोंडे होतात, एकादशीच्या रोजी गंजभर उसळ होते, चार-चार टाईम उसळ खाते.. हा कोणता उपास व्हय ओ तुहा?''

''तुमच्यासाठीच धरते मी उपास.''

''माह्यासाठी कायले?''

''तुम्ही सुधरले पाह्यजात म्हणून धरते.''

''बायकोनं सठ खाऊन नवरा सुधरत नसते. अशा खायाच्या एकादसा धरू नको.. त्याच्यापेक्षा वजन कमी कर.''

''तुम्हीच वजन वाढवा.''

''काही गरज नाही.. माहा वजन बरोबर आहे!, तुलेच खायाचं सूत नाही. दिवसभर तोंडाचा खलबत्ता सुरूच असते.''

''अशा कोणत्या काजू, बदामा हाये तुमच्या घरी खायाले? उळदाची दाय अन् भाकरी असतात दोनही टाईम.. कोण्या रोजी बायकोले गुलाबजामून आणता काय? मोठे गोष्टी करून राह्यले?''

''तुह्या बापानं हुंडाच तेवढा देला.''

''माह्या बापानं त्या टायमाले दहा हजार देले तुमाले. माह्यासारखी धटधाकट बायको भेटली हेच शुकर माना.''

''लय पोरी चालून आलत्या मल.''

''पण एकीनं बी तुमाले पसन केलं नाही. मी जराशीक जाडी होती म्हणून तुमाले करा लागल.ं''

''काही सांगू नको.. मी होतो म्हणून तुव्हा लगन तरी झालं.. नाहीतर तुह्यासारखा फेतका कोण करतं होतं?''

''फेतका गितका म्हणू नोका.. मलेबी तसं बोलता येते.''

''काय बोलता येते तुले?''

''तुमच्या तं सार्‍या हड्डय़ाच दिसते. सदरा काढला का पासोयाचा पिंजरा दिसते टीबी पेशंटवानी. मले तं वाटते तुमाले काहीतरी हड्डीची बिमारी आहे.''

''मले काही बिमारी नाही.. तुलेच वात आहे. चोरून खाऊ-खाऊ वात वायला. जरा व्यायाम करत जाय.. सकाऊन रस्त्यानं फिरत जाय.''

''व्यायाम कायले करा लागते? वावरात तसाच व्यायाम होते.''

''मंग खानं कमी कर.. एका टाईमले तुले तीन-चार भाकरी लागते.''

''माही खुराकच तेवढी हाये.. बापाच्या घरी मी अशीच खात होती.'' ''तुह्या बापानं तुही सोय घेतली नाही.. तुहा बापही तसाच रावण्या आहे.''

''माहा बाप कायढू नोका.''

''काय करशीन तू?''

''तुमाले माही औकाद दाखून देईन.''

''माहा झटका दाखू काय तुले?''

''काय करता तुम्ही? या आंगावर.''

''एका थापडीत तीन जागी पाडीन तुले.''

''बस करा गप्पा.. हात उगारून पाहा.. तुमचा हातच पिरगाऊन टाकतो.. आता काहून भेले? मारून पाहानं.. निसता तोंडात जीव हाये.. वारे वा माणूस.. वार्‍यावर वरात अन् गधी घुसली घरात..! आता आंगावर घेऊन कोपर्‍यात झोपून राहा.. डबल लात लागली त बोंबलू नोका.''

(लेखक नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572

नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा

   A A << Back to Headlines     
मागच्या आठवडय़ाचा लेख प्रसिद्ध झाल्यावर 'नशीब-कर्तृत्व' या विषयासंबंधी खूप प्रश्न निर्माण झाल्याचं फोनच्या प्रतिसादावरून लक्षात आलं. त्यासंबंधी सखोल विवेचन करण्याची गरज लक्षात आल्यामुळं हा प्रपंच. ''माणसानं कितीही कर्तृत्व करायचं ठरवलं तरी त्याला नशिबाची साथ असावी लागते. त्याशिवाय कर्तृत्वाचं फळ मिळत नाही. कर्तृत्वाला नशिबाची साथ असावी लागते.'' अशा प्रकारची वाक्य आपण भारतीय नेहमीच ऐकत आलो आहोत, बोलत आलो आहोत. यात आपल्याला काहीही वावगं वाटत नाही, चुकीचं वाटत नाही. दोन्हींमध्ये अंतर्विरोध आहे हेही आपल्या लक्षात येत नाही. कारण तर्कशुद्धरीत्या विचार करण्याची क्षमताच आपल्या शिक्षणातून, संस्कारातून निर्माण होत नाही.

आम्ही पत्रकार छापत असलेली नेहमीची बातमी-''सुमोभरून दहा माणसं दर्शनासाठी चालली होती. रस्त्यात अपघात झाला. सुमो गाडीचा पार चकनाचूर झाला. 'ऑन द स्पॉट' नऊ माणसं मेलीत. एक माणूस जिवंत राहिला. देव तारी त्याला कोण मारी.'' ही बातमी वाचून आपण सारेच खूश होतो. आपल्याला वाटतं अपघातात दहाही माणसं मरणार होती. त्यापैकी नऊ मेलीत, पण नेमकं एकाला देवानं वाचवलं. पण हे खरं आहे का? अपघात झाला हे खरं. नऊ माणसं मेलीत हेही खरं. पण ही नऊ माणसं देवाच्या परवानगीशिवाय, संमतीशिवाय मेलीत का? जर देवानं एकाला वाचविलं असं आपल्याला म्हणायचं असेल तर नऊ माणसांना देवानेच मारलं असंही आपल्याला म्हणावं लागेल. मात्र हे आपल्या लक्षातच येत नाही. खरं काय आहे? ''अपघातानं नऊ माणसं मेलीत. त्याचप्रमाणे अपघातानंच त्यातील एक माणूस वाचला.'' नाहीतर ''देवानं एकाला मुद्दाम वाचवलं आणि नऊ माणसांना मुद्दाम मारलं.'' या दोन वाक्यांपैकी कोणतं तरी एक वाक्य पूर्ण खरं आहे. दोन्हीमधलं अर्धअर्ध वाक्य खरंच असू शकत नाही.

स्वामी विवेकानंद इंग्रजीतील एक म्हण नेहमीच वापरत असत. ''देव त्यांनाच मदत करतो जे स्वत:ची मदत करतात.'' याचा नेमका अर्थ काय? ''देईल हरी खाटल्यावरी असं कधीच घडत नाही. माणसानं कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. मी स्वामी विवेकानंदांना खरा समाजसुधारक मानतो. तर्कशुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करणारा धार्मिक संत मानतो ते याचमुळं. त्यांच्या अशा प्रखर विचारांमुळं. आता नशीब आणि कर्तृत्व यात कसा अंतर्विरोध आहे ते आपण समजून घेऊ. नशीब म्हणजे गेल्या जन्मीच्या पाप-पुण्यामुळं असेल अथवा कुणी आपलं नशीब लिहून ठेवलं असेल म्हणून असेल, पण ''जे आपल्या आयुष्यात घडणार आहे ते आधीच ठरलेलं असतं. ते त्यानुसारच घडतं.'' असं मानणं म्हणजे नशीब मानणं. कर्तृत्व म्हणजे आपण जी कृती करतो, प्रयत्न करतो, मेहनत घेतो ते. 'केल्याने होत आहे रे' या उक्तीनुसार आपल्या आयुष्यात घडणार आहे असं मानणं, त्यानुसार जगणं, त्याप्रमाणं परिश्रम करणं म्हणजे कर्तृत्व. थोडक्यात परिश्रम केले तरच काही घडतं अथवा काही घडत नाही असं मानणं.

या दोन्हीही संकल्पना परस्परविरोधी आहेत. नशीब खरं असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही. काही केलं काय आणि नाही केलं तरी, ठरलं आहे. त्यानुसारच घडणार आहे. कर्तृत्वाला यात मुळी स्थान असूच शकत नाही. याचा अर्थ 'देई नशीब खाटल्यावरी' असा होतो. म्हणूनच गेल्या लेखात मी असं नशीब मानणार्‍यांना म्हटलं होतं, ''मी येतो. तुमच्या मुस्काटात एक मारतो. म्हणतो, नशिबात होतं (तुमच्या) म्हणून तुम्ही झापड खाल्ली. माझ्या नशिबात होतं म्हणून मी मारली.'' पण आपल्यापैकी कुणीही असं नशीब मानायला तयार नाही. तरी आपण, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर नशीब का मानतात, असे विचारतो. ''कर्तृत्वाला नशिबाची साथ असावी लागते का?'' असाही आपला प्रश्न असतो. कारण आपल्याला तर्कशुद्ध विचार करता येत नाही म्हणून. कर्तृत्व केल्याशिवाय काहीच घडत नाही. हे आपल्याला मान्य असतं. त्याबद्दल आपल्या मनात संदेह नसतो. पण अनेकदा आपण कर्तृत्व करूनसुद्धा, खूप प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश मिळत नाही आणि मग आपण त्या अपयशामागची नेमकी कारणं न शोधता नशिबाला बोट लावून मोकळे होतो.

आता मी कितीही करेक्ट कार चालवली, हायवेवरून प्रवास करताना सगळे रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळलेत, तर माझा अपघात होणारच नाही का? होऊ शकतो. समजा समोरच्या ट्रक ड्रायव्हरनं चूक केली तर, चांगल्या रस्त्यामध्ये मध्येच एखादा मोठ्ठा खड्डा पडला असेल तर आणि त्या ठिकाणी रोड संबंधित अधिकार्‍याने कोणताच सूचनाफलक लावला नसेल तर अथवा अचानक एखादं मोकाट जनावर रस्त्यावर धावत आलं असेल तर अपघात होऊ शकतो. माझी काहीही चूक नसतानासुद्धा त्या अपघाताचे दुष्परिणाम मला भोगावे लागतील. मग हे दुष्परिणाम माझ्या नशिबाचा भाग आहे का? नशीब मानलं तर हा अपघात आधीच ठरला होता त्याप्रमाणं घडला असं मानावं लागेल. मग कुणाला दोष देता येणार नाही. पण हे खोटं आहे. अपघात का घडला? ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळं अथवा रोड इंजिनिअरनं रोड बांधताना भ्रष्टाचार केल्यामुळं वा आपलं कर्तव्य नीट न बजावल्यामुळं (खड्डय़ाचा फलक लावण्याचं काम) अथवा जनावरांच्या मालकानं जबाबदारी पार न पाडता जनावराला मोकाट सोडून हायवेवर जनावर येऊ दिल्यामुळं अपघात घडू शकतो. म्हणजे माझी वैयक्तिक चूक नसतानासुद्धा दुसर्‍या कुणाच्या तरी चुकीचे परिणाम मला भोगावे लागतात. कारण आपण एकटे नसतो, शंभर टक्के स्वतंत्र नसतो. आपण सारेच आपल्या देशाचे, समाजाचे घटक असतो. समाजात निर्माण होणार्‍या संधीचे आपल्याला फायदेही मिळतात आणि समाजात निर्माण होणार्‍या चुकांचे परिणामही भोगावे लागतात.

इतरांच्या चुकांचे परिणाम पाहिले. आता फायद्याचे पाहू. 1978 मध्ये मी इंग्रजी साहित्याच्या एम.ए. फायनल परीक्षेला बसलो. त्या काळी मी एक वक्ता म्हणून प्रसिद्ध होतो. स्त्रीमुक्ती चळवळींमध्ये अग्रेसर होतो. नागपूरच्या दै. 'तरुण भारत'चा माझा युवकांसाठीचा स्तंभ अतिशय लोकप्रिय होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका महाविद्यालयाचे काही प्राध्यापक ''तुम्ही

आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून जॉईन व्हा,'' अशी विनंती करायला आले. दुसरीकडे जाऊन नोकरी मागण्यापेक्षा ही आयती चालून आलेली सन्मानजनक संधी घ्यायचं मी ठरवलं. परीक्षेचा निकाल लागायचाच होता. निकाल लागला. पास झालो. त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. सिनिअर कॉलेजलाही शिकविण्याची संधी मिळाली. हे माझं नशीब होतं का? आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात फर्स्टक्लास आलेल्या विद्यार्थ्यालासुद्धा सहजासहजी अशी सिनिअर कॉलेजला प्राध्यापकी मिळणार नाही. मग त्याचं नशीब वाईट आहे का? 1978 मध्ये इंग्रजी विषयातील प्राध्यापकांचा खूप तुटवडा होता. या क्षेत्रात भरपूर संधी होती. म्हणून मला कुठेना कुठे प्राध्यापकी मिळणारच होती. फक्त मला नावलौकिक असल्यामुळं पास होण्याच्या आधीच निमंत्रण मिळालं एवढंच ते काय घडलं. त्या काळी समाजात संधी होती म्हणून मला प्राध्यापकी मिळाली. आज या क्षेत्रात सॅच्युरेशन निर्माण झालं आहे. म्हणून आज जशी सहज प्राध्यापकी मिळणार नाही, एवढाच याचा अर्थ आहे.

नुसतं आपलं कर्तृत्व महत्त्वाचं नसतं. आपण समाजाचा घटक असल्यामुळं समाजात उपलब्ध असलेल्या संधीनुसार अनुकूल कर्तृत्व केलं तरचं त्या कर्तृत्वाचं फळ मिळतं हे आपण समजून घेत नाही आणि अपयशाची कारणं न शोधता नशिबाचे ढोल बडवत बसतो. नशीब असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही आणि कर्तृत्व खरं असेल तर आधी नशीब ठरलेलं असू शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपली भाषा सुधारली पाहिजे. विचारप्रक्रिया तर्कशुद्ध केली पाहिजे. एक गोष्ट सांगून संपवितो. शिवाजी राजांचे तानाजी मालुसरे गड 'सर' करायला गेले. ('गड आला, पण सिंह गेला.') घोरपडी-दोर लावून गडावर चढले. लढाई सुरू झाली. तानाजी धारातीर्थी पडले. सेनापती पडल्यावर सारे मावळे गडाच्या दोरावरून उतरून पळू लागले. तानाजीच्या भावानं सारे दोर कापले, ''आता उडय़ा टाकून नेभळटासारखे मरा, नाहीतर शूरासारखे लढून मरा अथवा जिंका,'' असा आदेश सोडला. परिणाम, सारे मावळे लढले. गड जिंकला. आता तरी नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा. समोर आलेल्या प्रसंगाला धैर्यानं व कर्तृत्वानं तोंड द्या. जिंका अथवा मरा, पण भेकडासारखं जगणं, पळणं सोडा.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी -9371014832

Friday, 7 September 2012

शेतकर्‍यांचे प्रश्न सुटतील कसे?

    A A << Back to Headlines     
लोक आपली कामे करवून घेण्यासाठी पाचसहा मार्गाचा अवलंब करतात. धनाढय़ लोक पैशांनी आपली कामे करवून घेतात. एका शिक्षणसंस्थेच्या अध्यक्षांशी बोलत बसलो

होतो. ते निवांत गप्पा मारीत होते. थोडय़ा वेळाने कळले की, त्यांच्याकडे इन्स्पेक्शन करायला टीम आलेली आहे. मी म्हणालो, ''मी निघतो. तुम्हांला तिकडे जावे लागेल.'' ते म्हणाले, ''काही गरज नाही. मी त्यांची व्यवस्था लावून ठेवलेली आहे. काही अडचण येणार नाही. सामान्यपणे पैसेवाल्यांची कामे अडत नाहीत. त्यांची रीत ठरलेली आहे. त्यांचे दर एकमेकाला माहीत असतात. गरिबांची कामे अडतात. एकतर गरिबांना रीत माहीत नसते. असली तरी तेवढय़ा पैशांची तरतूद करणे त्यांना कठीण असते. मग हे लोक काय करतात? काही लोक पुढार्‍यांशी संधान बांधून असतात. काही अडचण आली, की ते पुढार्‍यांकडे

जातात. पुढार्‍यांना माहीत असते, की याच्या डोक्यावर हात ठेवला की हा आपल्या

दावणीला कायमचा राहतो.'' एका पुढार्‍याकडे काही माणसं आली. गावात भांडणे झाली होती. या गटाच्या एकादोघांना अटक झालेली. त्यांना सोडविण्यासाठी पुढार्‍याने पोलिसांना सांगावे अशी अपेक्षा होती. पुढारी चाणाक्ष होते. त्यांनी लगेच फोन लावला. ''अटक केलेली माणसे माझी आहेत. त्यांना सोडून द्या.'' तिकडून फौजदार काहीतरी म्हणत होता. ते ऐकू येत नव्हते. पुढारी म्हणाले, ''ठीक आहे. सोडून द्या अन् एक करा. तुम्ही ताबडतोब इकडे या.'' पुढार्‍याने फोन ठेवला. लोकांना म्हणाले, ''जा तुम्ही. मी सांगितलंय. सोडून देतो म्हणाला.'' लोक पाया पडून निघून गेले. ते जाताच फौजदार आले. पुढारी त्यांना म्हणाले, ''साहेब, तुम्ही इथे नवे

आहात. आमचं आयुष्य गेलंय. आम्हांला इथं राजकारण करायचं आहे. त्यासाठी माणसं सांभाळावी लागतात. तुम्ही सांगा, तुम्हांला राजकारण करायचं आहे का? फौजदार गप्प. तुम्ही आज इथं

आहात. उद्या दुसरीकडे जाल. सांगा, की तुम्हांला इथं राजकारण करायचं आहे का?'' फौजदार ''नाही'' म्हणाले. पुढारी म्हणाले, ''हे बघा, आम्ही जे

म्हणतो त्याला तुम्ही हो म्हणायचे. आम्ही सांगितलेले नियमात बसवून तुम्ही केले तर लोक म्हणतील, साहेबांचे तुम्ही ऐकले. नियमात बसणारे नसेल वा तुम्हांला परवडणारे नसेल तर तुम्ही करायचे नाही. तुम्ही काम केले नाहीतर लोक म्हणतील, साहेबांना हो म्हणून त्याने काम केले नाही. तुम्हांला शिव्या घालतील. तुम्हांला इथं राजकारण करायचे नसल्यामुळे लोकांनी तुम्हांला शिव्या घातल्या तरी तुमचे काय बिघडते? तर यापुढे आम्ही म्हणू त्याला लोकांसमोर हां-जी करतो म्हणायचे. आले लक्षात.'' पुढे पुढारी आणि तो पोलीस अधिकारी यांचे चांगले सख्य जुळले. असे असले तरी किती लोकांचा या पुढार्‍यांशी तरी संबंध येतो? गोरगरिबाला ते तरी कशाला विचारतात?

वैयक्तिक कामे पैसा आणि पुढारी या दोन माध्यमांनी होत असली तरी अनेक सामूहिक कामे असतात. आपल्यासमोर वैयक्तिक म्हणून आलेल्या अनेक प्रश्नांच्या मुळाशी धोरणविषयक कारणे असतात. त्या समस्या कशा सोडवायच्या? त्यासाठी पाच माध्यमे वापरली जातात.

पहिला मार्ग आंदोलनाचा. सरकारी कचेरीवर मोर्चा न्यायचा. निवेदन द्यायचे. भाषण करायचे. फार झाले तर त्या अधिकार्‍याशी चर्चा करायची. तो अधिकारी म्हणतो, ''तुमचे निवेदन मी वर पाठवीन. निवेदन वर पाठवायला तू कशाला लागतो? आम्हांला डायरेक्ट पाठविता येत नाही का? असे प्रश्न विचारले जात नाहीत. अशा आंदोलनातून अलीकडच्या काळात फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही. मोर्चा काढणार्‍याला आपण या प्रश्नावर काहीतरी केले याचे समाधान मिळते एवढेच! काही लोक उपोषणाचा मार्ग हाताळतात. सरकारी

कचेरीसमोर आमरण उपोषण करणार्‍यांची संख्या कमी नसते. उपोषण करणारे लोक उपोषणाचे तत्त्व किती पाळतात हा मुद्दा आपण बाजूला ठेवू. कारण तो अनेकांना अडचणीचा होईल. आमरण

उपोषणाने तरी प्रश्न सुटतात का? या प्रश्नाचे उत्तरदेखील नकाराच्या बाजूनेच जाते.

लोकशाहीमध्ये लोकांना आपल्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलनांचा मार्ग खुला राहिलाच पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण आंदोलकांनी कधीतरी या मार्गाच्या

परिणामकारकतेबद्दल चिंतन करायला हवे.

मोर्चा, उपोषण, धरणे या लोकशाही आंदोलनांची परिणामकारकता संपत आल्यामुळे काही लोक सशस्त्र आंदोलनाचा मार्ग हाच रामबाण उपाय म्हणून सांगू लागले आहेत. या मार्गाने तरी गरिबांचे प्रश्न सुटतात का? सगळे गरीब व विशेषत: शेतकरी समाज चोवीस तास सशस्त्र आंदोलन करू शकत नाही. एखाद्या घटनेत काही लोक हिंसा करू शकतात. पूर्ण समाज ते करू शकत नाही. कायम किंवा सातत्याने तर नाहीच नाही. काही दिवसांतच सशस्त्र आंदोलन करणार्‍यांची टोळी तयार होते. त्या टोळीचे हितसंबंध तयार होतात. गरिबांची लढाई बाजूला पडते. सशस्त्र आंदोलनांचा इतिहास पाहता उत्पादक समाज अशा लढय़ांपासून दूर राहिलेलाच दिसून येतो. शांतिमय लोकशाही आंदोलनांची परिणामकारकता संपुष्टात आली आहे व सशस्त्र लढय़ात उत्पादक समाज सहभागी होऊ शकत नाही. गुलामांचे मालक बदलल्याने गुलामी संपत नसते. गरिबांचे प्रश्न लोंबकळत राहतात. तिसरा मार्ग माध्यम किंवा मीडियाचा आहे. पेपरात बातमी द्यायची. पत्रकारांना प्रश्न समजावून सांगायचा. त्यांनी त्यावर लेखन करायचे किंवा टीव्हीमध्ये स्टोरी दाखवायची. अलीकडच्या काळात हे माध्यमदेखील गोरगरिबांच्या समस्यांपासून दुरावत चाललेले आहे. हे खरे असले तरी मीडियाची वफत्ती जनसमस्यांची असल्यामुळे त्यांना काही ना काही छापणे वा दाखविणे भाग पडत असते. माध्यमांच्या कमजोरीपेक्षा माध्यमात आलेल्या प्रश्नांकडे प्रशासन आणि राज्यकत्र्यांची दखल घेण्याची वफत्ती संपत चालली ही अधिक चिंतेची बाब आहे. तुम्ही काहीही व कितीही छापून आणा, टीव्हीवर दाखवा. नोकरशाही त्याची अजिबात दखल घ्यायला तयार नाही. हा कोडगेपणा असेल तर गरिबांचे प्रश्न कसे सुटतील?

चौथा मार्ग न्यायालयाचा आहे. घटनेने जनहित याचिकांचा मार्ग दिला आहे. अनेक प्रश्नांसाठी लोक जनहित याचिका दाखल करतात. हा मार्ग परिणामकारक आहे. कारण सुदैवाने आपल्या देशात पुष्कळशा प्रमाणात न्यायालयाच्या निकालांचा मान राखला

जातो. मात्र यात काही अडचणी आहेत. एक तर जनहित याचिका केवळ उच्च न्यायालयात दाखल करता येतात. उच्च न्यायालये सामान्य माणसांच्या आवाक्याच्या अजूनही बाहेर आहेत. नागपूर, औरंगाबाद, मुंबई संपूर्ण राज्यात तीनचारच उच्च न्यायालये असल्यामुळे दूर राहणार्‍या लोकांना नियमितपणे जाऊन पाठपुरावा करता येत नाही. खूप मोठय़ा विभागासाठी व लोकसंख्येसाठी एकच उच्च न्यायालय असल्यामुळे अनेक प्रकरणे पल्रंबित

राहतात. गोरगरिबांना न्यायालयात दाद मागणे परवडत नाही. काही स्वयंसेवी संस्था अशा याचिका करण्यास पुढे येतात. हे चांगले असले तरी त्या नेमक्या कोणत्या याचिका करतात हे तपासले तर फारसे आशादायक चित्र दिसत नाही. सर्वात

मोठी अडचण अशी, की न्यायालयांना प्रस्थापित कायद्यांच्या चौकटीतच निकाल द्यावा लागतो. अनेकदा कायदेच गरिबांच्या विरोधात असतात. अशा परिस्थितीत न्यायालयेदेखील काही करू शकत नाहीत.गरिबांचे सामूहिक प्रश्न अंतिमत: संसदेतच सुटणार आहेत. कारण संसद कायदे तयार करू शकते, रद्द करू शकते आणि सुधारणा करू शकते. संसदेत गरिबांचा आवाज पोहचू शकतो का? निवडणुकीत पैशाचा होत असलेला वापर विचारात घेतला तर ती आशा ठेवता येईल अशी परिस्थिती दिसत नाही. पैशाच्या वापराबरोबर गुंडगिरी हेदेखील राजकारण्यांचे शस्त्र आहे. त्याच्यापुढे गरीब माणसांचा निभाव लागणे कठीण आहे. पैसा आणि गुंडगिरीला तोंड देण्यासाठी गोरगरीब व विशेषत: शेतकरी समाज तयार आहे का? या समाजात जातिधर्माचे वाद आहेत. आपलापरका अशा प्रादेशिक भावना नव्याने पेटविल्या जात आहेत. अशा वातावरणात गरिबांचे, शेतकर्‍यांचे हित जोपासणारी संसद निर्माण होऊ शकेल का? आगामी लोकसभा निवडणूक दोन वर्षावर येऊन ठेपली आहे. कोण पंतप्रधान होईल किंवा कोणत्या पक्षाचे राज्य येईल यापेक्षा संसद गरिबांच्या, शेतकर्‍यांच्या समस्या सोडविणारी असेल? का नसेल? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. मोठमोठे लोक याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. शेतकरी आणि गरीब लोक तरी मतदान करताना याचा विचार करतील का?

(लेखक हे नामवंत विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

दूरध्वनी-9422931986

शेतीतील 'बुवाबाजी'


मटक्याचे अचूक आकडे सांगणारी मार्गदर्शनपर पुस्तके असतात. कोणत्या घोडय़ावर पैसे लावले म्हणजे तुम्ही मालामाल व्हाल हे सांगणारीही पुस्तके असतात. तसेच शेती करा आणि श्रीमंत व्हा असे बोधामृत पाजणारीही पुस्तके असतात. या तिन्हीमध्ये एक प्रश्न मात्र सारखाच पडतो, 'अशी पुस्तकं लिहून इतरांना 'मालामाल' होण्याचे आमिषं दाखविण्यापेक्षा ही माणसे स्वत:च याच मार्गाने 'श्रीमंत' होण्याची संधी का दवडतात? ती इतरांनीच साधावी म्हणून का धडपडतात?' कारण स्पष्ट आहे. त्यांचे 'अचूक मार्गदर्शन' 'बकवास' आहे याची लिहिणार्‍यांना पुरेपूर खात्री असते. तरीदेखील 'फसणारे'असतात म्हणून ते त्यांना फसवतात. वाहत्या गंगेत हात धुऊन घेतात.

भारतीय शेतकरी अज्ञानी, अडाणी आणि आळशी आहे ही आपल्या देशात 'शहाण्यां'मध्ये 'लोकप्रिय' अशी अंधश्रद्धा आहे. शहाण्यांची असल्यामुळे ती अंधश्रद्धा राहत नाही. तर तीच बाब डोळस वास्तव ठरविल्या जाते. ज्ञानी जनांचे अज्ञानही ज्ञानातच जाऊन मोडते. अशातला हा प्रकार आहे. भारतीय शेतकरी अज्ञानी, अडाणी आहे म्हटल्यानंतर त्याला 'ज्ञानी' करून सोडण्यासाठी मग मोठय़ा प्रमाणावर 'बुवाबाजी' चालते. अर्थात शहाण्यांच्या लेखी ही बुवाबाजी असत नाही. हा भाग वेगळा. कोणी 'सेंद्रिय शेती म्हणजे सुखाची शेती' हा नारा देतो. कोणी गांडूळ शेती सांगतो. कोणी ऋषी शेती. जपानमधील फुकुवोकाने 'वन स्ट्रॉ रिव्हॉल्युशन' हे पुस्तक लिहिलं. त्याचं मराठीत 'एका काडातून क्रांती' असं भाषांतर झालं. 'मशागत करू नका' हे (डू नथिंग) हे त्यांच्या शेतीचं सूत्र. आता जपानमधला फुकुवोका 'डू नथिंग' पद्धतीने शेती करतो आणि भरपूर पीक घेतो आणि भारतीय शेतकरी शेतीत काबाडकष्ट करतो. मूर्खच म्हटला पाहिजे. एरवी शेतकर्‍यांना 'आळशी' म्हणणार्‍या 'शहाण्यांना' फुकुवोकाच्या पाश्र्वभूमीवर काबाडकष्ट करणारा शेतकरी मग मूर्खच वाटू लागतो. भारतीय शेतकरी अज्ञानी, अडाणी आहे ही त्याची अंधश्रद्धा अधिकच बळकट होते.

मध्यंतरी आमच्याकडे 'झिरो बजेट' शेतीचं पेव जोरातच फुटलं होतं. शेती कोणतीही असो एकतर ती कमी खर्चाची असू शकते वा जास्त खर्चाची. 'बिनखर्चाची' शेती असत नाही. शेती 'लो'बजेट असू शकते किंवा 'हाय'बजेट. परंतु ती 'झिरो'बजेट शक्य नाही. शेती 'लो कॉस्ट'असू शकते परंतु ती 'नो कॉस्ट' शक्यच नाही. तरी देखील कोणी झिरो बजेट शेतीचे लेबल लावून तो 'माल' मार्केटमध्ये विकत असेल तर त्यांच्या 'मार्केटिंग' कौशल्याला दाद दिलीच पाहिजे. अर्थात सर्वच बुवामहाराजांकडे असे गंडेदोरे, ताईत, माळा, खडे-गोटे विकण्याचे कौशल्य असतेच. धर्माच्याच क्षेत्रात अंधश्रद्धा असते असे नाही. ती शेतीच्याही क्षेत्रात असू शकते. दरवेळी या क्षेत्रातही नवीन 'बुवामहाराज' उदयास येत असतात. 'झिरो बजेट' शेतीचे प्रणेतेही त्याच प्रकारात मोडतात की काय अशी शंका येते. या महाराजांचे बीजामृत, जीवामृत हे 'बोधामृत' जरी आचरणात आणले तरीही त्यासाठी खर्च येतोच येतो. या बोधामृतासाठी गाय आवश्यक. तिला ठेवणे, राखणे, पोसणे तिच्या दाण्या-पाण्याची सोय करणे हे खर्चाचेच काम. कदाचित कमी खर्चाचे म्हणता येईल. पण 'बिन खर्चाचे' तर निश्चितच नाही. त्यांचे बीजामृत तयार करायला शेण, गोमुत्र लागते. ते आपोआप तयार होत नाही. ते तयार करायला माणूस लागतोच लागतो. तो बाहेरचा असेल तर त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून मजुरी द्यावी लागेल. किंवा तो माणूस घरचा जरी असला तरीही त्याचे श्रम धरावे लागेल. शेतकर्‍याच्या घरच्या श्रमाला 'फुकटात' गृहीत धरण्याचे पाप शासनाच्या शोषण नीतीने केले आहे. तेच पाप 'झिरो बजेट'वाल्यांनी का करावे? जीवामृतासाठी लागणारे दोन किलो कडधान्याचे पीठ, एक किलो गूळ, चार लिटर उसाचा रस, दहा किलो ज्वारीचे धांडे हे ही फुकटात मिळत नाही. ते तयार करण्यासाठी, नंतर पिकांना देण्यासाठी माणूस हा लागणारच. त्याला मजुरी द्यावी लागते आणि घरचा असला तरीही त्याची मजुरी धरावी लागणार. केवळ जीवामृत आणि बीजामृताचे उदाहरण घेतले तरीही ते 'फुकटात' होत नसेल तर ही शेती 'झिरो बजेट' कशी हा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात हे 'झिरो बजेट' प्रणेत्यांना कळत नसेल असेही नाही. परंतु असली फेकाफेकी केल्याशिवाय 'बुवामहाराज' बनता येत नाही. शेती कमी खर्चाची करा किंवा जास्त खर्चाची शासनाची धोरणं आहेत तशीच राहिली तर त्याचे 'मरण' अटळ आहे. परंतु शासनाकडे बोट न दाखवता त्याच्या मरणाला तोच जबाबदार आहे हे कोणी सांगत असेल तर शासन दरबारी अशा 'संतां'ची मागणी असतेच. राजकीय पुढार्‍यांसाठीसुद्धा असे संत सोयीचे ठरतात. शेतकरी विरोधकांसाठी तर त्यांचे 'झिरो बजेट' तत्त्वज्ञान उपयुक्तच ठरते. शेती करण्यासाठी 'शून्य' खर्च येत असेल तर हा धंदा शंभर टक्के नफ्याचा ठरतो. खर्च काहीच नाही म्हणजे येणारे उत्पन्न म्हणजे शंभर टक्के नफा. त्याला भाव कमी असला किंवा जास्त फरक काय पडणार? तो फक्त 'नफ्या'मध्येच लोळणार. 'झिरो बजेट' शेती तंत्र उपलब्ध असताना शेतकरी त्या तंत्राचा अवलंब करत नसेल तर शेतकरीच मूर्ख दुसरं काय? त्याच्या आत्महत्येलाही तोच जबाबदार. अशा शेतकर्‍यांच्या मरण्यासाठी कोणी का रडावं? आणि त्यांच्यासाठी कोणी का म्हणून काही करावं? नैसर्गिक शेती की सेंद्रिय शेती, कोरडवाहू शेती की ओलिताची शेती, शेती कोणतीही करा धोरण शेतीविरोधीच राहणार असेल तर त्याचे मरण अटळ आहे. हे न सांगता त्याला झिरो बजेटसारखे खुळखुळे वाजवून दाखविण्याचे 'खूळ' नवीन नाही. गांडूळ शेतीच्या नावावर कॅलिफोर्नियाचा एक गांडूळ 50 पैशाला विकून गब्बर झालेले येथे कमी नाहीत. श्रीपाद दाभोळकर नावाचे एक विद्वान होऊन गेलेत. त्यांच्या हयातीत '10 गुंठय़ाच्या शेतीचा' बोलबाला होता. त्या काळात त्यांचा भक्तपरिवार 'प्रयोग परिवार' या नावाने ओळखल्या जायचा. 'प्लेंटी फॉर ऑल' हे त्यांचे इंग्रजी तर त्याचेच मराठी भाषांतरित 'विपुलाची सृष्टी' ही पुस्तकंही त्या काळात गाजली होती. त्यांच्या 10 गुंठय़ांच्या शेतीचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु त्यांचा दावा होता या 10 गुंठे जमिनीच्या भरोश्यावर प्राध्यापकाच्या स्तराचे जीवनमान जगता येते. त्याचाच अर्थ प्राध्यापकांना जितके वेतन मिळते तितकेच उत्पन्न 10 गुंठय़ांच्या शेतीतून मिळू शकते. यावर माझा तीव्र आक्षेप होता. दहा गुंठे जमिनीमध्ये प्राध्यापकाइतके वेतन मिळाले असते तर कोणीही आपली दोन चार एकर जमीन विकून प्राध्यापक झाला नसता. दुसरा अर्थ त्यातून निघत होता तो म्हणजे शेतकर्‍यांना शेती करण्याची अक्कलच नाही. दाभोळकर 10 गुंठय़ांच्या तुकडय़ातून प्राध्यापकाला मिळणारे उत्पन्न मिळवतात. आणि शेतकर्‍यांकडे दहा-पंधरा एकर जमीन असूनही तो कर्जबाजारी. म्हणजे खोटं शेतकर्‍यांमध्येच. तोच शेती करण्यास नालायक. शेतकरी नालायक ठरविणार्‍या कोणत्याही 'तर्का'ला तत्काळ मान्यता मिळते. आणि असा तर्क देणारा अल्पावधीतच 'विद्वान' ठरतो. त्यांचा तर्क तार्किक कसोटय़ावर तपासण्याचीही आवश्यकता कोणाला वाटत नाही. या विषयावर मी त्यांचा पिच्छाच पुरविला. तेव्हा ते म्हणाले, 'मी दहा गुंठा जमिनीतून येणारे उत्पन्न ऊर्जे (एनर्जी)च्या रूपात मोजतो.' परत मी विचारले म्हणजे काय? त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'या जमिनीतून निघणारे उत्पादन, काडीकचरा, पालापाचोळा म्हणजेच बायोमास या सर्वातून निर्माण होणार्‍या ऊर्जेचा हिशोब केला तर त्यातून येणारे उत्पन्न प्राध्यापकाच्या पगाराइतके होते.' दाभोळकरांनी केवळ अन्नधान्याचेच नव्हे तर त्याच्या तनकट, धसकट, तुर्‍हाटय़ा-पर्‍हाटय़ा, फोलपट, टरफल एवढेच नव्हे तर त्याच्या शेतीतील काडीकचर्‍यालासुद्धा 'किंमत' देऊन शेतकर्‍यांचे 'उत्पन्न' प्राध्यापकांच्या समकक्ष आणून ठेवले होते. त्यांची 'चालाखी' माझ्या लक्षात आली. त्यावर मी त्यांना विचारले, 'समजा शेतकर्‍याच्या मुलाला शाळेत प्रवेश पाहिजे आहे. त्याच्याजवळ पैसे नाही. त्याऐवजी तो पर्‍हाटय़ाचे ओझे फी ऐवजी द्यायला गेला तर शाळा, कॉलेज ते स्वीकारेल का? डॉक्टरांकडे गेला त्याने त्यांची फी म्हणून तुर्‍हाटय़ाचे भारे त्याला दिले म्हणजे तो घेईल का? दुकानात काही खरेदी करण्यासाठी गेला आणि पैशाऐवजी त्याने गवताचे भारे दिले तर चालेल का? किंवा शेतकर्‍यांसाठी असलेल्या तुमच्याच प्रशिक्षण शिबिरासाठी त्याने प्रवेश फी ऐवजी तेवढय़ाच किमतीची 'ऊर्जा' काडीकचर्‍याच्या स्वरूपात दिली तर चालेल का? आणि हे जर चालणार नसेल तर या सर्वाचे पैशांमध्ये रूपांतरण करून, दहा गुंठय़ाच्या शेतीमधून प्राध्यापकाला मिळते इतके 'उत्पन्न' मिळते असे म्हणणे योग्य ठरेल का?' यावर त्यांचे कोणतेही उत्तर नव्हते. तरीही त्यांच्या विद्वत्तेची 'दुकानदारी' चालतच राहिली. तात्पर्य एवढेच की शून्य खर्चाची 'झिरो बजेट' अर्थात 'फुकटात' शेती होऊ शकत नाही. ती असू शकत नाही. 'दाम' खर्च न करताही शेती करायचे ठरविले तरीही 'घाम' गाळावाच लागतो. या घामाला दाम मिळत नाही हा खरा प्रश्न आहे. 'कमी' खर्चाच्याच शेतीला कोणी 'झिरो' बजेट म्हणत असेल तर मात्र शब्दांचेही 'अर्थ' बदलले आणि यानेच सर्व 'अनर्थ' घडविले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

ये तो सच है के भगवान है..


सध्या पंच्याहत्तर चालू आहे बेटा, पुढच्या वर्षी पंच्याऐंशी.. वडिलांचे कोणी मित्र भेटले की साधारणपणे अशा स्वरूपाचं बोलणं होतं. कोणी पंच्याऐंशी असतं तर कोणी पंच्याहत्तरवाले असतात. मी लवून त्यांच्या पाया पडतो. उगाच मनाला वाटून जातं की नमस्कार केला नाही तर बाबांना वाटेल 'पोट्टं शहाणं झालं का?' इतके दीर्घायुषी म्हातारे पाहिले की वाटतं आपल्याही बापाने थोडंसं थांबायचं असतं. काय एवढी घाई होती? परवा दौलताबादचा किल्ला चढता-चढता थकून एका दगडावर बसलो. तिथे समोरच्याच दगडावर बसलेली वयस्क बाई म्हणाली, 'आप अभी से बैठ गये हो सोचो हमारा क्या हुआ होगा'. उत्तरादाखल मी म्हणालो, 'आपने असली माल खाया है, हम मिलावटी खाने पे पले बढे हैं.' (आठवा तुपासारख्या दिसणार्‍या तेलात गायीच्या चरबीची भेसळ असल्याची चर्चा) त्यावर सोबतचे काका म्हणाले, 'मुझे याद है बचपन में जब मेरी तबियत खराब होती थी तो माँगाय का दूध लाती थी. उसमें चने का पानी मिलाती थी और मुझे पिला देती थी. आज भी जब गाव जाता हूं और कुछ तकलीफ होती है तो माँइसी तरह के उपाय करती है.' मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. चेहर्‍यावरचे भाव ताडून ते पुढे म्हणाले, 'जी, मेरी माताजी अभी भी है और स्वस्थ है. नब्बे साल की है. स्वस्थ ही नहीं बल्की ये किला वो मुझसे भी

फुर्ती से चढ सकती है.' पुन्हा तेच, आपल्या मायबापाला काय घाई होती. अर्थात मीही नशीबवान होतोच. माझ्या एकोणतिसाव्या वर्षापर्यंत ते होते. मेरी जंग या सिनेमातला एक सुप्रसिद्घ डायलॉग आहे ज्यात अनिल कपूर वेडय़ा नूतनला म्हणजे त्याच्या आईला म्हणतो, 'किसी भी उमर के बच्चे बिना माँ-बाप के रह नहीं सकते.' (सलीम-जावेद जिंदाबाद) माझ्या एका क्लाएंटशी अवांतर बोलता-बोलता सहज कुटुंबाचा विषय निघाला. तो म्हणाला, सर, मेरे दादा-दादी अभी भी है. मी त्याला म्हणालो की, तू नशीबवान आहेस की तुला आजी-आजोबा आहेत. त्यावर तो म्हणाला, 'सर, मुझसे नसीबवाला मेरा बेटा है जिसे परदादा-परदादी है. सर, मेरा लडका जमीन पर कम दादा-परदादा के कंधों पर ज्यादा रहता है. हम लोग, तीन अंकल, दादा-दादी सारे साथ में ही रहते है और बडे मजे से रहते हैं.' माझा दुसरा क्लाएंट ज्याचा मुलगा माझ्याएवढा असेल बोलता-बोलता म्हणाला, गजाननराव आईची भलती आठवण येते राज्या! माझी बायको म्हणते आता काय वरून आणता आईला? पण काय करता राज्या? आठवण तर येतेच. परवा मी एलोरा गुफा पाहिल्या. पाहताना वाटलं आपल्या मायबापानेही हे बघायचं असतं. दोघंही हे सगळं न बघता, न अनुभवता निघून गेलेत. माझ्या मित्राला हे सांगितलं तर तो म्हणे, अरे असं समज की तुझ्या डोळ्य़ांनी तेच पाहताहेत. म्हटलं, राज्या 'समज' हा प्रकार गणितात ठीक आहे. तिथे म्हणतात, 'समजा की तीन घेतले त्याला पाचने गुणले' असं समजून कागदावर गणित मांडता येतं. आयुष्याचं गणित असं समजा करून सोडवता येत नाही. समजा की रस्त्यावर खड्डे नाहीत असं समजून खड्डे नाहीसे होत नाहीत. समजा की तू जेवला असं समजून पोट भरत नाही. जे उणेपण जगण्यात आलेलं असतं ते राहतंच. आपल्या मुलासाठी आजोबा आणि बाप दोन्ही भूमिका आपल्यालाच पार पाडाव्या लागतात. बाप गेल्यावरच 'बाप का राज है क्या' या वाक्याचा अर्थ कळतो. आईची आठवण येणार्‍या माझ्या क्लाएंटने तीन मजली जंगी घर बांधलं अन् आपल्या वडिलांना दाखवायला घेऊन गेला. छोटय़ाशा घरात राहणार्‍या, सायकलवर फिरून मसाल्याच्या पुडय़ा विकलेल्या म्हातार्‍याने ते घर पाहिलं अन् पोरांना विचारलं, 'अबे इत्ते बडे घर में रयनेकी अपनी औकात है क्या' अन् मग काही वेळ ना बाप मुलाशी बोलला ना मुलगा बापाशी. दोघांनाही भरून आलं. माय-बाप नावाचं प्रमेय सोडवता-सोडवता गणितात हुशार असणारा मित्र भेटला. बोलता-बोलता तो म्हणाला, 'गज्या, अबे आपला बाप मेला थोडीच. मरून आपल्या अंगात नाही का आला? त्याने फक्त जागा बदलली एवढंच!' बरोबर एकदम बरोबर!

प्रख्यात शायर निदा फाजली आपल्या कवितेत म्हणतात,

मैं जिन हाथों से लिखता हूं वो हाथ तुम्हारे है,

तुम्हारे मरने की सच्ची खबर जिसने फैलाई वो झुठा है

तुम मरे नहीं तुम मुझमें जिंदा हो

और मैं तुम्हारे कब्र में दफन हूं

कभी वक्त मिले तो फातहा पढने आ जाना

(फातहा = कबरीसमोर म्हणायची प्रार्थना)

(लेखक नामवंत व्यंगचित्रकार व कॅलिग्राफर आहेत. 'गंमतजंमत' हा त्यांचा लोकप्रिय एकपात्री कार्यक्रम आहे.)

भ्रमणध्वनी - 9823087650