Tuesday 3 July 2012

लहानपन देगा देवा



मांगच्या भागात लेयत असतानी मी लहानपनात हिंडून आलो. तुमाले सांगतो, जवरीक आपल्या कायजातलं लहानपन ओड देतेना तवरीकचं जगन्यातली मजा अस्ते. अखीन एक सांगू, आमच्या पिढीपावतर जे लहानपनच्या जगन्यातली मजा होती ना, ते आता पुढच्या पिढीत भेटनं कठीन हाय. आता पयसा आला. खा-प्याचा सुकाय झाला. पन त्या वक्तीचा मोकयेपना गेला. आता आपन अभ्यासाच्या वझ्याखाली त्याचं लहानपन निरं गुदमरून टाकलं. आमच्या लहानपनी पह्यलीत एक पाटी, एक उजयनीचं पुस्तक आन् एका धडय़ाच्या पुस्तकासंग इंचलपट्टी. झालं दप्तरं. लेखन आपन इसरलो तं बाजूचा एक कुटका देउनचं टाके.

तवा बोरीच्या म्हंजे माह्या गावाची शाया नावजलेली शाया होती. तिले म्हनत 'जेष्ठ मुलोद्योग बेसिक शाळा' त्या वक्ती यवतमाय जिल्ह्यात पाचच तालुके होते आन् हरेक तालुक्यात असी एकचं शाया राहे. बाकी आता जस्या जि.प.च्या शाया हायेत तस्या तवा जनपदच्या शाया होत्या. आमच्या शायेत जे गुरुजी होते त्यायची बदली दुसर्‍या बेसिक शायेतच होये. या जनपदच्या शायेत नाई. आमच्या शायेत अभ्यासासंग चवथीपावतर टकयीवर्त सूत काता लागे आन् पाचवी, सहावी चरख्यावर सूतकताई. सातवीत गेल्यावर नेवार इनाचं आन् हातमागावर कपडा इनाचं दिघे गुरुजी सिकवतं. आठवीत गालिचा इनो.

शारीरिक अभ्यास डंबेल, मुद्गल, लेझीम, मलखांब, खो-खो, हुतुतू, लंगडी असे सारे खेय. हरेक वरगाचं मंत्रिमंडय आन् शायेचं मंत्रिमंडय निल्ख, निल्ख. वरगाची वेवस्था या मंत्रिमंडयाकडं तं शायेची वेवस्था त्या मंत्रिमंडयाकडं. पाचवीपासून दर मंगयवारी वरगाची लहान बालसभा भरे. त्याच्यात बोलासाठी जे नंबर लागे ते हजेरीबुकापरमानं. या मंगयवारी सभा झाली का गुर्जी पुढच्या मंगयवारच्या भासनाचा ईसय तयारीसाठी सांगत आन् मंग मयन्याच्या आखरीच्या मंगयवारी मोठी बालसभा. याच्यात लहान बालसभेत ज्यायनं. सव्र्यात जादा मार्क कमावले त्यायचा नंबर राहे आन् त्यायले तिथचं सांगतल्या ईसयावर तवाच्या तवा बोला लागे. आमाले थेटे सर, हेड सर होते. त्यायचं अभ्यासासंगचं खेय असो का बालसभा, बारीक ध्यान राहे.

दरसाली जानेवारी मयन्यात 'जीवन शिक्षण सप्ताह' राहे. सारे खेय होतेय. कायी चढाओढी, वादविवाद स्पर्धा. सात दिवस अभ्यासाले सुट्टी. निरी मजाचं मजा आन् आखरीच्या दिसी राती 'सांस्कृतिक' कार्यकरमानं सप्ताहाचा समारोप होये. वरीसभरत आमचे सारे गुरुजी मन लावून सिकवेतचं, पन या सात दिवसांत कोनी मागं ना राहे. मंग ते नायगावकर सर, किन्हेकर सर, ढवक सर, तुमसरे सर, नाल्हे सर असो का लांबे सर असो, सारे एकजुटीनं हातभार लावेत. एका साली आपल्या चांद्याचे असलेले मा. कन्नमवार सायेब तवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडयात होते. ते शायेच्या सप्ताहात पावने म्हून येनार होते.

ते येनार होते त्या दिसी हेड सरांनी मले आफिसमंदी बलावलं. ते सांगाले लागले, ''पाहा, आज संध्याकाळी आपले पाहुणे येणार आहेत आणि त्यांचं स्वागत तुला करायचं आहे.'' म्या म्हनलं, ''माझ्या हातानं?'' ''हो! तुझ्या हातानं. काल आमची मिटिंग झाली. त्यात मी हा मुद्दा मांडला की, आपले पाहुणे हे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत आणि आमच्या शाळेच्या मंत्रिमंडळात शंकर बडे हा आरोग्यमंत्री असल्यामुळे त्याच्या हस्ते स्वागत करणे हे औचित्यपूर्ण होईल.'' सर्वानुमते शेवटी हे ठरले की, स्वागत तुझ्या हस्ते होईल. तुला काय बोलायचे आहे ते मी लिहून देतो. ते पाट कर. हातात कागद घेऊन बोलायचे नाही समजले.

त्या काळात मंर्त्याचं लोकायले अप्रूप खूप राहे. त्याच्याच्यानं शायेतले पोरं होतेच. पन गावातल्या लोकायसंग आजूबाजूच्या खेडय़ातले बरेच लोकं आले होते. जसी पावने याची वक्ता झाली पोलीसायची धावपय, शिटय़ा, लोकायले रस्त्यावून बाजूले करनं चालू होतं. पोलीस म्हनलं का चांगल्या मानसाच्या मनात धडकी भरेचं. एक गोठ साठ सालाच्या वर्त झाले तरी या देशात बदलली नाही. ते म्हंजे तवायी पोलिसाले पाह्यलं का चांगल्या मानसाच्या मनात धडकी भरे आन् आतायी चांगल्या मानसाच्या मनात तसीचं धडकी भरते आन् वांगले लोकं त्यायच्या खांद्यावर हात टाकून जातेत. जाऊ द्या, थोडय़ा टायमानं त्यायची लाल दिव्याची गाडी त्यांच्या मांग पाच, सात जिपा. पावने त्या गाडीतून उतरून लोकायच्या नमस्काराले नमस्कार करत स्टेजवर येऊन बसले. जसं माहं नाव घेतल्या गेलं मी स्टेजवर जाऊन माईकसामोर उभा झालो आन् सुरू केलं, ''मी ज्येष्ठ मुलोद्योग बेसिक शाळेच्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राचे लोकप्रिय आरोग्यमंत्री माननीय कन्नमवार साहेबांचे आम्ही विद्यार्थ्यांनी चरख्यावर कातलेल्या सुताच्या हाराने स्वागत करतो.'' लोकायनं बम टाया वाजोल्या. पावन्याच्या चेयर्‍यावर्त कौतुकाचं हासू

फुटलं. तुमाले वर्‍हाडीत सांगाचं तं मी 'रिलॅक्स' झालो.

लहानपनी शाया झाल्यावर्त जेवन आटपलं का तसेच वले हात चड्डिले पुसतं खेयाले पयाचं. पावसानं जमीन नरम पडली का मंग खुपसनी चालू होये. त्याच्या बास्ता गोया म्हंजे कांचे. ढोपरता ढोपरता ढोपर फुटे, पन खेयनं चालूचं राह्ये. मंग ये गिल्लीदांडूचा सिझन. आताच्या नईन पिढीले तं गिल्लीदांडू समजनारयी नाई. घरातलं कोनी जतरीले जाऊन आलं तं मंग परसादासंग पोरीयसाठी चमकनार्‍या बांगडय़ा आन् लाकडाची तिरकोनी भुलाई. आमाले पोटय़ायले लाल, लाल ऐनकं .पन त्यावक्ती त्याची इतकी खुसी ये का काई इचारू नोका. तवा का आता सारके कॅडबरीचे चाकलेट राहे का? लिमलेटच्या गोया, हत्ती, वाघाच्या आकाराचे बिसकुटं आन् चांदनीच्या नाईतं पह्यले एक आना राहे तसी पदिन्याची रंगीत गोयी मंधात दोरा ओवलेली. तेच भिंगरी आन् तेच गोयी. त्या दोर्‍याले आटा देल्ला का ते बिंग फिरे. त्याची मजा घ्याची आन् सामोरून भाऊ येतानी दिसला का त्याचा हिस्सा पडनं म्हून गपकन तोंडात टाकाची. हे हिस्सेवाटनी जलमल्यापासूनचं आपल्या मनात घरं करून अस्ते का लेक ?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम

अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment