Wednesday 18 July 2012

अण्णा-बाबा चलो भोपाल!


प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं राजकारणात मोठय़ा प्रमाणात आणि सर्वच पक्षात आहेत, ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. मानवतेवरचा कलंक आहे.

'महाराष्ट्र कुणाच्या बापाचा?' 'तानाजी घोरपडी फितूर झाल्या हो!' आणि 'राजे, आम्हाला माफ करा' या तीन लेखांवर खूप प्रतिक्रिया आल्यात. आपला देश, आपला महाराष्ट्र भ्रष्टाचारात अगदी होरपळून निघाला आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. अगदी पराकोटीचा संताप, पराकोटीची घृणा राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात आहे. आपल्या आत असंतोषाचा लाव्हा खदखदतो आहे. आपण एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत.

अण्णा हजारे यांच्या 'लोकपाल विधेयका'च्या निमित्ताने केलेल्या उपोषणाला मिळालेला भाबडा प्रतिसाद या अस्वस्थतेतूनच मिळत गेला.

अण्णांच्या वैयक्तिक चार्त्यिाबद्दल सर्वांना आदर आहे. त्यांची भावनाही चांगली आहे. पण आंदोलनाची दिशा मात्र चुकीची आहे. भूमिका धरसोडीची आहे, गोंधळाची आहे.

दिल्लीतील उपोषणापूर्वीच्या दौर्‍यातील नागपूरमधील पहिल्या धरणे कार्यक्रमात मी होतो. तिथे अण्णांनी 'मनमोहनसिंग अच्छा आदमी है.. सोनियाजी अच्छी है' असा सूर लावला आणि तिथेच माझा भ्रमनिरास झाला.

मनमोहनसिंग पंतप्रधान आहेत. सोनिया गांधी सत्तारूढ आघाडीच्या सर्वेसर्वा आहेत. दोन-चार कोटींचं बजेट असलेलं साधं एमएलसीचं तिकीटही सोनिया गांधी यांच्या संमतीशिवाय फायनल होत नाही. मग कलमाडींनी केलेला घोटाळा, ए. राजांनी केलेला घोटाळा हे अरबो रुपयांचे घोटाळे यांना माहीत न होता झाले असतील क ा? एवढे प्रचंड घोटाळे एकटय़ाने करण्याची राजा आणि कलमाडी यांची खरंच औकात आहे का? आणि मग मनमोहनसिंग काय झोपा काढण्यासाठी पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसले आहेत का? ते स्वत: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी नसतीलही; पण हे घोटाळे ते मुकाटय़ाने का बघतात? चोरांना रान मोकळं का सोडलं? सत्तेचा एवढा मोह आहे का त्यांना? मग खुर्चीला लाथ मारण्याची हिंमत का दाखवत नाहीत? काय मजबुरी आहे त्यांची? हा जनतेचा विश्वासघात नाही का? देशाला दिलेला धोका नाही का?

या सार्‍या पाश्र्वभूमीवर अण्णांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक लोकपाल आला की सारा भ्रष्टाचार झटक्यात संपणार असा भाबडा आणि पोरकट विश्वास सर्वांनाच वाटायला लागला होता. मीडियानं आगीत आणखी तेलं ओतलं. भ्रष्टाचाराला कंटाळून अनेक देशातल्या हुकुमशाही राजवटीही लोकांनी नुकत्याच उलथून टाकल्या होत्या. सारं जग या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने धास्तावले होते. नेमके त्याचवेळी आपलेही मोठमोठे घोटाळे उघडकीस येत होते. त्यामुळे बाहेरची आग आपल्याही देशात पसरण्याची भीती निर्माण झाली होती. आणि नेमका त्याचवेळी अण्णांच्या आंदोलनाचा राष्ट्रीय पातळीवर पद्धतशीरपणे वाजतगाजत उदय झाला.

हा केवळ योगायोग नव्हे. अनेक मोठमोठी आंदोलनं पचवणारं सरकार एवढं कसं काय घाबरू शकते? दोन-दोन, तीन-तीन केंद्रीय मंत्री अण्णा हजारे किंवा रामदेवबाबा यांच्यासमोर कसे काय शेपटी हलवायला लागतात? हे सारं संशयास्पद नाही का?

आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. लवकरच फुगा फुटला. यात सरकार जिंकलं. अण्णा फायद्यात राहिले. जनता मात्र उघडय़ावर पडली. तोंडघशी पडली. एका चांगल्या आंदोलनाची 'भ्रूणहत्या' झाली!

यात कुणी कुणाचा 'गेम' केला? कुणाचं काय चुकलं?

भ्रष्टाचाराला आपण सारे कंटाळलो आहोत. भ्रष्टाचार संपावा असेही आपल्याला वाटते; पण आपण खरंच भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहोत का? प्रश्न आपण स्वत:लाच विचारायला हवा! भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणे म्हणजे नेमके काय? त्याला समर्थन असणे म्हणजे नेमके काय? हेही डोळसपणे ठरविले पाहिजे. अण्णा हजारेंचीही इथेच गफलत झाली. रामदेवबाबांचीही झाली.

भ्रष्टाचार म्हणजे केवळ काँग्रेसचे कलमाडी किंवा अशोक चव्हाण यांनी केलेला भ्रष्टाचार अशी अफलातून विचारधारा यांनी देशासमोर मांडली. मग काँग्रेसचा अनायासेच काटा निघतो आहे म्हणून भाजपावालेही आपले घोडे वरातीमध्ये नाचवू लागले. भाजपाने आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहोत असे पत्र दिले. आंदोलनाचे नेते त्या बोगस पत्रावरच हवेत उडू लागले. पण जर तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहात तर मग येदियुरप्पावर पक्षीय पातळीवरून त्वरित कारवाई करा, असे अण्णा किंवा बाबा रामदेव का बोलले नाहीत? मायावती, मुलायमसारखे भ्रष्ट नेतेही आमचा पाठिंबा आहे असे सांगायला लागले आणि टीम अण्णा खुशीने नाचायला लागली, ही कीव करण्यासारखी गोष्ट नाही का?

तात्पर्य काय, लोकपाल किं वा विदेशातील काळा पैसा भारतात आणणे या दोन्ही आंदोलनामध्ये योग्य रणनीतीचा अभाव होता. दूरदृष्टी नव्हती. आपले खरे शत्रू कोण हे माहीत नव्हते. आताही रामदेवबाबा भ्रष्ट नेत्यांच्या दारांचे उंबरठे झिजवत आहेत. त्यातून काय होणार? ज्यांचा स्वत:चा पैसा विदेशी बँकात आहे, ते तुम्हाला मदत कशी काय करणार? आणि तरीही तुम्ही त्यांच्याकडे भेटायला जाता म्हणजे एकतर तुम्हाला त्या विषयाची गंभीरता तरी समजली नाही किं वा तुम्ही स्वत: गंमत म्हणूनच हे सारं करीत आहात, असा संशय नाही का निर्माण होणार?

भाजपा हा विरोधी पक्ष आहे. तो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असल्याचा आव सुरुवातीपासूनच आणत आहे. अण्णा व रामदेवबाबा यांच्या उपोषणाला सरकारने दिल्लीमध्ये हवे ते मैदान देण्याचे नाकारले आहे. भाजपाचे नेतेही सरकारवर टीका करण्यासाठी तुटून पडले आहेत. अशावेळी भाजपाने त्यांची सत्ता असलेल्या राज्यात उपोषण करण्यासाठी अण्णा व रामदेवबाबा यांना का बोलावून घेऊ नये? दिल्लीच का? कर्नाटकात उपोषण ठेवावे किंवा मध्यप्रदेशातही भाजपाचे सरकार आहे. तिथे उपोषण करायला काय हरकत आहे. भोपाळ हे शहरही सर्वांच्या दृष्टीने सोयीचेच आहे. जनतेनेही त्यांना सांगावे, की अण्णा-बाबा, चलो भोपाल!

भाजपानेही व्यवस्था करावी. स्वागत करावे. अनायासेच प्रामाणिकपणा सिद्ध करण्याची त्यांना एवढी मोठी संधी चालून आली आहे, तिचा फायदा घ्यावा. आहे का भाजपावाल्यांमध्ये एवढी हिंमत? विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या कोणत्याही राज्यात अण्णा म्हणतील त्या अटीवर उपोषणाला परवानगी द्यायला काय हरकत आहे. अण्णांनीही एकदा विचारून बघावे त्यांना! एका झटक्यात दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा.

सत्ताधारी तसेच विरोधी पक्षही तसेच हाच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे राजकीय पक्ष अण्णा म्हणतात तसे लोकपाल आणणार नाहीत. अशावेळी जनतेने काय करावे? अण्णांनी कोणती भूमिका घ्यावी? रामदेवबाबांनी काय करावे, याचाही गांभीर्याने विचार करायला हवा. तूर्तास एवढेच..

बाकी पुढे बघू या..! लढणार्‍यांना साथ देऊ या!

अण्णा-बाबांनाही शुभेच्छा! भाजपालाही शुभेच्छा!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपट निर्माते

आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी'

हा त्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988
     

No comments:

Post a Comment