Wednesday 4 July 2012

तानाजी.. घोरपडी फितूर झाल्या हो!

  


तानाजी,

आपला महाराष्ट्र म्हटला की सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची आठवण होते. जिजाऊंचीही आठवण होते. तुमचीही आठवण होते सोबतच!

पण का कुणास ठाऊक, आज महाराष्ट्र आठवला आणि सर्वप्रथम मला तुमची आठवण झाली. तुमच्याशी बोलावं असं वाटलं. मन मोकळं करावं असं वाटलं. आभाळाएवढी व्यथा बोलावी तरी कुणाजवळ तानाजी? ही केवळ माझी व्यथा नाही. माझे एकटय़ाचे हुंदके नाहीत. लाखो-करोडाेंचं दु:ख आहे! त्यांच्या मनाला जाळणारा वणवा आहे!

तानाजी स्वराज्याची स्थापना करताना जिजाऊंनी केवढं भव्यदिव्य स्वप्न पाहिलं होतं. एवढय़ाशा बाळराजेंचा जीव धोक्यात घातला होता. तो माँ जिजाऊंचा वेडेपणा होता का हो? तुम्हालाही वेडच लागलं होतं का? आपल्या रायबाचं लग्न बाजूला ठेवून कोंडाणा घ्यायला गेलात. मूठभर मावळय़ांची सोबत.. मनात वेडं स्वप्न.. आभाळाएवढा निर्धार आणि सोबतीला मुकी बिचारी 'यशवंती' घोरपड!

ती नुसती कल्पना करतानाही सर्वांग थरथरतंय तानाजी!

कशासाठी केलंत हो तुम्ही सारं?

केवळ शिवाजी राजांचा शब्द पाळण्यासाठी?

तुम्हाला काय मिळालं हो त्यातून?

एवढासा शब्द मोडला असता किंवा किमान तूर्तास बाजूला ठेवला असता तर असं काय मोठं आभाळ कोसळलं असतं हो?

आता आम्हाला स्वातंर्त्य मिळालं तानाजी! आम्ही स्वतंत्र आहोत! आपला महाराष्ट्र स्वतंत्र आहे! तुमचा कोंडाणाही स्वतंत्र आहे! (पण किती दिवस सुरक्षित राहील याची खात्री मात्र देता येणार नाही.)

माफ करा तानाजी, पण कशाला बांधले हो तुम्ही लोकांनी असले अगडबंब किल्ले? नुसती माती आणि दगड ह्याशिवाय काय आहे त्यात? विकतो म्हटलं तर कुणी घ्यायला पण तयार नाहीत. त्यापेक्षा रेतीघाटासाठी ठेकेदारांच्या उडय़ा पडतात. त्यातून अधिकार्‍यांनाही चार पैसे मिळतात. मंर्त्यांचीही दहा पिढय़ांची सोय होते. आमच्याकडे मंत्रालय आहे तानाजी. त्यात मंत्रीही असतात. मुख्यमंत्रीही असतात. पण शिवाजी राजे नाहीत. तानाजीही नाही. फार काय मोजके अपवाद सोडलेत तर मावळय़ांचं रक्तही कुणाच्या नसामधून वाहात असेल, याची शंका आहे.

तुम्ही यशवंती घोरपडीवर केवढा विश्वास टाकला होता! आम्ही आमच्या मंर्त्यांवर, मुख्यमंर्त्यांवर विश्वास टाकतो. तिनं तुम्हाला दगा दिला नाही.. आणि तुम्ही जिंकलात तानाजी! कोंडाणा सर केलात! तुम्ही विश्वास टाकलात घोरपडीवर-तुम्ही जिंकलात! आम्ही विश्वास टाकला आमच्या मंर्त्यावर-आम्ही बर्बाद झालो!

किती किती घोटाळे सांगू तानाजी यांचे.. यांच्या गद्दारीची किती उदाहरणं देऊ? 'बुलेटप्रुफ' जाकीट खरेदीचे प्रकरण तुम्हाला माहीत असेलच. समाजाचं-देशाचं रक्षण करणार्‍या पोलिसांसाठी, सैनिकांसाठी यांनी नकली 'बुलेटप्रुफ' जाकिटं खरेदी केलीत! भरपूर कमिशन खाल्लं! अहो, मागे मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यांच्याशी लढता लढता आमचे करकरे, साळगावकरांसारखे अधिकारी शहीद झालेत. त्यांना माहीतच नव्हतं आपण घातलेलं बुलेटप्रुफ जाकीट नकली आहे म्हणून! मेले बिचारे! देशद्रोहय़ांचा सामना करायला गेलेत! मरणारच ना?

करकरे- साळगावकर मेलेत ह्यापेक्षा मंर्त्यांना भरपूर कमिशन मिळालं, हे महत्त्वाचं आहे तानाजी! अहो नाहीतरी एक दिवस प्रत्येकाला मरायचंच आहे! उलट नकली जाकिटामुळे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद होण्याची संधीच मिळाली ना त्यांना! केवढं नाव झालं त्यांचं! त्यासाठी मंर्त्यांचे आभारच नको का मानायला!

तानाजी आपले शिवाजी राजेसुद्धा अफजल खानाला भेटायला गेले होते ना! त्यावेळी त्यांनीही अंगावर चिलखत घातलं होतं. अफजल खानानं दगाबाजी केली. महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसला! महाराजांनी चपळाईने वाघनखं खानाच्या पोटात खुपसलीत आणि त्याचा कोथळा बाहेर काढला! तानाजी, महाराजांच्या अंगावरचं चिलखत नकली असतं तर काय झालं असतं हो!

एका नकली चिलखतामुळे स्वराज्यावर केवढं संकट ओढवलं असतं? आपल्याकडे खूप सारे मंत्री आहेत तानाजी.. स्वतंत्र कृषी मंत्रालय पण आहे. तशी बहुसंख्य शेतकर्‍यांचीच मुलं असतात मंत्रिमंडळात. पण तुम्हाला सांगतो.. शेतकर्‍याला कधीही बियाणं वेळेवर मिळत नाहीत. खतं मिळत नाहीत. शेतपंपाला वीज मिळत नाही. अहो, बियाण्यांमध्येसुद्धा केवढा काळाबाजार? एवढं कृषी मंत्रालय आहे. हजारो अधिकारी आहेत. तरीसुद्धा नकली बियाण्यांची दरवर्षी जोरात

विक्र ी होते. लाखो शेतकरी बर्बाद होतात. पण कुणावरही कारवाई होताना दिसत नाही. मंत्री काय झोपा काढत असतील का हो? अधिकार्‍यांनाही लाज कशी वाटत नाही? नकली बियाण्यांचे निर्माते असो, विक्रे ते असो की त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी असो, सारेच एकमेकांना सामील! शेतकर्‍याचा उभा संसार क्षणात उद्ध्वस्त करताना यांना काहीच वाटत नसेल का हो? सारेच सैतानाची औलाद!

तानाजी, तुमचे मावळेही स्वराज्याशी प्रामाणिक राहिलेत! घोरपडही प्रामाणिक राहिली! आमच्या तर लाल दिव्यातल्या बहुसंख्य घोरपडीही दलालांना सामील आहेत! तुमच्या बलिदानाला आलेली फळं पाहून लाज वाटते तानाजी! तुम्हाला तोंड दाखवयाचीदेखील हिंमत नाही!

घोरपडी ह्या फितूर झाल्या.. माफ करा तानाजी

स्वार्थासाठी विकल्या साल्या.. माफ करा तानाजी!

त्रस्त जिजाऊ, त्रस्त मावळे.. कशी करावी शेती

उभ्या पिकावर चढला लाल्या.. माफ करा तानाजी!

तुम्हीच सांगा, शिवरायांना कैसे उत्तर देऊ..

तलवारी 'भुरटय़ा'च निघाल्या.. माफ करा तानाजी!

बाळ रायबा, सोबत येरे.. लग्न बघू या नंतर..

कोंडाण्याहून हाका आल्या.. माफ करा तानाजी!

तानाजी तुमच्या 'यशवंती'लाही सलाम.. तुम्हालाही सलाम..! महाराजांशी बोलण्याची तर माझी हिंमतच नाही पण.. तुम्हीच पुन्हा एकदा येता का महाराष्ट्रामध्ये!

..आणि हो.. सोबत स्वत:ची तलवार आणायला मात्र विसरू नका.. नक्की काम पडेल..

(लेखक हे नामवंत कवी असून त्यांचा

'सखे-साजणी' हा कार्यक्रम गाजलेला आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment