Friday 13 July 2012

शेतकरी आणि खालमानघाले विचारवंत

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, 'मी एका मोठय़ा शहरात राहतो आणि माझा चुलत भाऊ एका खेडय़ात राहतो. त्याच्या व माझ्या जगण्यात खूप फरक आहे. हा फरक नाहीसा होऊन शहरे व खेडय़ातील जीवनाचा स्तर समान होण्यासाठी काय करावे?'

या प्रश्नाला महामहीम राष्ट्रपती महोदयांनी दिलेले उत्तर पाहा. त्या म्हणाल्या, 'प्रत्येक गावात मिळणार्‍या शिक्षणाचा दर्जा आपल्याला उंचवावा लागेल. तसेच काही रूढी, परंपरा आणि सवयी दूर साराव्या लागतील. महाराष्ट्रात एकदा दुष्काळ पडला. त्यावेळी जे मजूर काम करीत होते त्यांनी आपल्या मुलांनाही या कामाला लावले. यापैकी पन्नास टक्के लोकांनीच मिळालेल्या पैशांचा योग्य वापर केला. बाकीच्यांनी दारूसारख्या व्यसनात पैसे उडविले, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. आपल्याला या वाईट प्रथांशी लढावे लागेल. तरुणांना यासाठी विशेष कार्य करावे लागेल.'

राष्ट्रपती महोदयांचे पहिले वाक्य घ्या. त्या म्हणाल्या 'प्रत्येक गावात मिळणार्‍या शिक्षणाचा दर्जा आपल्याला उंचवावा लागेल.' म्हणजे काय? काहीच नाही. रोखठोक बोलाना.. ग्रामीण भागातील शिक्षणाची दुर्दशा झाली आहे. आता ती थांबवावी लागेल. एकेकाळी सरकारी आणि जि.प.च्या शाळांनी 

ग्रामीण भागात शिक्षणाची वाट लावली, आता सरकारी मान्यता घेतलेल्या संस्था वाट लावीत आहेत. दोन्ही ठिकाणी सरकार आहेच. म्हणूनच वाट्टोळे झाले आहे. खरं काय ते किमान बोला तरी. मला हेच समजत नाही की, ही तथाकथित मोठी माणसे गोलगोल का बोलतात? मोठी माणसे गोलगोल बोलतात की, गोलगोल बोलणारी माणसे मोठी होतात? अलीकडच्या काळात गोलगोल बोलणारी, ठाम मते नसणारी, बिनबुडाची माणसेच मोठी होताना दिसतात. तुम्ही कोणत्याही पुढार्‍याचे भाषण ऐका. गोलगोल बोलून वेळ मारून नेणार. हीच गत सरकारमान्य पंडितांची. नुसते शब्दांचे बुडबुडे. आजच असे घडतेय असे नाही. पूर्वापार चालत आले आहे.

एकेकाळी शूद्रांचा अमानुष छळ व्हायचा. हा छळ चालू राहावा म्हणून विद्वानांनी एक तत्त्वज्ञान उभे केले. तुम्ही पूर्वजन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी तुम्हाला शूद्राचे जीवन मिळाले. त्याला अवघड भाषेत 'कर्मविपाक सिद्धांत' म्हटले गेले. तुम्ही हीन का आहात? कारण तुम्ही पापी आहात. तुमचे प्राक्तनच असे होते. या धारणेचा इतका प्रचार झाला की, शूद्र स्वत:च स्वत:ला अपराधी समजू लागले. कालांतराने महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म झाला. त्यांनी मान ताठ करून म्हटले, शूद्रांच्या परिस्थितीला पूर्वजन्माचे पाप कारणीभूत नसून ब्राह्मणांचे षड्यंत्र कारणीभूत आहे. एक वीज चमकली. वास्तवाचे लख्ख भान आले.

म. गांधींचा उदय होण्याआधी भारतीय जनतेला लाख दोष दिले जायचे. जनता अडाणी आणि निरक्षर आहे. परंपरावादी आणि रूढीग्रस्त आहे. यांच्यात हिंदू-मुसलमानांची भांडणे आहेत. वगैरे.. अनेक भारतीयांची हीच समजूत झाली. आपण मागासलेले आहोत म्हणूनच आपण पारतंर्त्यात आहोत, असे आपलेच लोक छातीठोकपणे सांगू लागले. त्यानंतर महात्मा गांधी आले. त्यांनी मान ताठ करून सांगितले, भारतीय जनतेतील दोष हे तुमच्या साम्राज्यामुळे निर्माण झाले आहेत. तुम्ही आमच्या छातीवरून उठा, आम्ही आमची वाटचाल करू. पुन्हा वीज चमकली. लख्ख वास्तव दिसले. 

जनतेला दोष देणारे विद्वान सर्वत्र आढळतात. ते पायलीला पन्नास मिळतात. लोकांना दोष दिला की यांची सरकार दरबारी मातब्बरी वाढते. सरकारी कमिटय़ांवर वर्णी लागते. सरकारी तव्यावर पोळी भाजली जाते. चांगभले होते. मी अशा विचारवंतांना खालमानघाले (मान खाली घालून विचार करणारे) मानतो. ते खालच्या लोकांच्या चुका काढत राहतात व सरकारी बाजूचा बचाव करीत असतात. मान ताठ करून विचार करणारे विचारवंत प्रजेच्या स्वातंर्त्याबद्दल संवेदनशील असतात. ते लोकांना दोष देत नाहीत. प्रजेत आलेले दोष, उणिवा ह्या गुलामीचे दुष्परिणाम आहेत हे त्यांना समजते. त्यांना मी स्वाभिमानी विचारवंत मानतो. थोडेसे शास्त्रीय भाषेत बोलायचे तर असे म्हणता येईल की, खालमाने विचारवंत परिणामांना कारण म्हणून सादर करीत असतात. स्वाभिमानी विचारवंत हे मूळ कारणांची उकल करतात. 

हल्लीचे सरकारी पंडित शेतकर्‍यांना दोषी ठरविण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकेकाळी भारतातील शेतकरी सेंद्रिय शेती करीत होते, तेव्हा हेच विद्वान त्यांना आधुनिक शेती करायचे 'शहाणपण' शिकवीत होते. आज जेव्हा थोडय़ा-थोडक्या प्रमाणात रासायनिक खते व संकरित बी-बियाणे वापरू लागले, तेव्हा हेच विद्वान त्यांना सेंद्रिय शेती करण्याचा डोस पाजू लागले. शेतकरी लग्नावर पैसे उधळतो, त्यामुळे त्यावर आत्महत्या करण्याची पाळी येते असेही सर्रास म्हटले जाते. पुढार्‍यांनी त्यांच्या पोरांच्या लग्नात कोटय़वधी रुपये उधळले तरी ते आत्महत्या करीत नाहीत, हे त्यांना दिसत नाही का? शेतकरी जाती-पातीत अडकला आहे म्हणून तो मागे पडला, असा शोध काही 'दीड शहाणे विद्वान' लावतात. विद्यापीठांमध्ये माजलेला जातीयवाद त्यांना दिसत नाही. विद्यापीठांच्या परिसरात जातीयवादाची दुर्गधी किळस यावी एवढी माजलीय. विद्यापीठातील राजकारणी मागे का पडत नाहीत? असे विचारले तर हेच विद्वान निर्लज्जपणे हसून विषय टाळतात. एक नाही हजार उदाहरणे देता येतील जेथे शेतकरी अपमानित केला जातो. शेतकर्‍याला दोष दिले जातात. ऐतखाऊ समाजाने आपले पाप झाकण्यासाठी ही शक्कल काढली आहे.

शेतकरी मागे का आहे? त्याच्या समोर असलेल्या समस्या का आहेत? त्यावर आत्महत्या करण्याची पाळी का येते? या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मान खाली घालून शोधू लागलात तर तुम्हाला नेमके उत्तर सापडणार नाही. तुम्ही परिणामांनाच कारण समजायला लागाल. मात्र मान वर करून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, शेतकर्‍यांच्या दुर्दशेला सत्ताधारी आणि नोकरशहा जबाबदार आहेत. कोणी तरी मान उंचावून म्हणायला पाहिजे की, तुमच्याकडून आम्हाला काही नको, तुम्ही शेतकर्‍यांच्या वाटेवर धोंडे टाकायचे तेवढे थांबवा, त्यांच्या छाताडावरून उठा, मग पाहा, हेच शेतकरी त्याचे भवितव्य कसे घडवितात.

त्या विद्यार्थ्याच्या चुलत भावाची परिस्थिती वाईट असण्याचे कारण त्याचा बाप शेतकरी आहे आणि शेतकर्‍यांचा धंदा तोटय़ात राहावा यासाठी राज्यकर्ते जबाबदार आहेत. ज्या दिवशी चुलत्याचा शेती व्यवसाय मुक्त होईल त्या दिवशी चुलत भाऊही तुझ्याच सारख्या शाळेत शिकेल. कदाचित तुझ्याहीपेक्षा चांगल्या शाळेत. हे वास्तव कोणता राष्ट्रपती या मुलांना सांगेल?

(लेखक अमर हबीब  हे नामवंत विचारवंत व 

सामाजिक कार्यकर्ते आहेत)

भ्रमणध्वनी : 9422931986

No comments:

Post a Comment