Monday 16 July 2012

खरंच आपली स्वातंत्र्य चळवळ न्यायसमतेसाठी होती?


25-30 वर्षे झाली त्या घटनेला. महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम विदुषींच्या घरी माझा मुक्काम होता. त्या विदुषी जशा लेखिका होत्या तशाच महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम प्रकाशन संस्थेच्याही प्रमुख होत्या. विविध पुस्तकांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील वाचकांच्या संस्कारित अशा तीन पिढय़ा घडवीत आलो आहोत याचा त्यांना गर्व होता. त्यांचा हा गर्वदेखील सार्थ होता. आम्ही तीनचार मित्र त्यांच्याशी चर्चा करीत होतो. बोलता बोलता चर्चा आरपीआय आणि पँथरच्या ज्या चिरफळ्य़ा उडाल्या त्याकडे वळली. मी माझी मतं देत होतो. खरेतर त्यांचा-माझा फारसा पूर्वपरिचय नव्हता. पीपल्स कॉलेजचा एक प्राध्यापक आणि कुरुंदकरांचा विद्यार्थी एवढीच त्यांना माझी माहिती होती. त्यात माझ्या काही एकांकिकांचे त्या काळात पुण्यात सादरीकरण होत होते. त्यामुळे मला ललितलेखनाची आवड आहे एवढेच त्यांना माहीत होते. त्या चर्चेतल्या विवेचनाचे वेगळेपण त्यांना महत्त्वाचे वाटले असावे म्हणून त्या मला म्हणाल्या, ''तू आरपीआय आणि पँथरच्या चळवळीवर पुस्तक लिहिशील का? त्यासाठी हवी ती मदत मी तुला करते. हवी असणारी पुस्तके मिळवून देते, आणि पाहिजे तर इथेच तुझ्या राहण्या-भोजनाचीही व्यवस्था करते.'' माझे विवेचन त्यांना वेगळे आणि पुस्तक लिहावे इतके महत्त्वाचे वाटले. त्यामुळे मी आजवर सुखावलो. लेखकांकडून लिहून घेण्यासाठी त्याला सर्व साधनसामग्री उपलब्ध करून द्यायची ही त्या प्रकाशनाची शिस्तच होती. पण पुण्यातील विद्वान मंडळी जेव्हा आपणाला सुखावणारी प्रतिक्रिया देतात तेव्हा ते आपली खरोखरीच तारीफ करतात की निंदा? याविषयी संभ्रम निर्माण व्हावा असेही काही अनुभव माझ्या गाठीशी होते. त्यामुळे मी लगेच म्हणालो, ''पुस्तक लिहावं एवढा काही माझा राजकारणाचा अभ्यास नाही. शिवाय माझा अभ्यासविषयही राज्यशास्त्र नाही. चळवळीच्या विषयावर नाटय़शाखेत काम करावं एवढाच काय तो माझा अनुभव.'' माझा नकार खरेतर विनम्रपणे दिलेला आणि मनापासून दिलेला होता. पण बहुधा त्यांना तो रुचला नसावा.

''खरेतर दलितांच्या चळवळीला ही फुटीरता परवडण्यासारखी आहे असं तुला वाटतं का?''

''मुळीच नाही!''

''मग त्यांना शहाणं करून सोडायची जबाबदारी तुझ्यासारख्या लेखकाने का पत्करू नये?''

''पण मी दलितांना आपल्या संपूर्ण समाजाचा एक घटक मानतो. त्यांना समाजातले एक बेट आहे असे नाही मानत'', मी म्हणालो.

''तरीपण ही फुटीरता काहीशी अल्पबुद्धीच्या आणि स्वार्थी लोकांमुळेच निर्माण झाली असं नाही तुला वाटत? समाजावर दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार नको व्हायला?''

मीही मनातून चिडलो होतो. पण सर्व संताप गिळून मी म्हणालो, ''त्याचं काय आहे मॅडम, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे; पण त्याचीही काही कारणं आहेत.''

''कोणती?''

''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं आम्हांला थेट अल्लाउद्दीनच्या गुहेच्या तोंडाशी आणून ठेवलं. हातात मतदानाच्या दिव्याची ताकद दिली. मग काय? 'खुल जा सीम सीम!' आणि समोर गुहेचं दार उघडताच हिरे, माणकं, सुवर्णमोहरा यांच्या थप्प्याचथप्प्या! आयुष्यातलं हे एवढं धन कधी आम्ही पाहिलं नव्हतं. म्हणून मिळेल ते लुटण्याची स्पर्धा सुरू झाली.ह्या घाईत रस्ता फुटेल तिकडे धावताना सगळे वेगवेगळ्य़ा दिशेला पांगत गेले ! इतकंच.'' त्या क्षणभर गप्प झाल्या. माझं हे 'आत्मनिरीक्षण' त्यांना आवडलं असावं. मी 'दलितांना बेट नाही समजत' हे विधान मात्र त्यांनी पुरेसं लक्षात घेतलं. मला आता त्या विधानाच्या संदर्भात पुढं बोलायचं होतं. थोडा वेळ स्तब्धतेत गेला. मी शांतता भंग करणारा प्रश्न विचारला,

''मॅडम, आता मी प्रश्न विचारू?''

''विचार'', त्या म्हणाल्या.

''आता असं पाहा, की आजचं राजकारण मान्य करो अथवा न करो, आपल्या स्वातंर्त्याच्या चळवळीत आपल्या देशातला ब्राह्मण अग्रभागी होता हे नाकबूल करता येत नाही. सर्वच प्रांतातील तरुणांनी त्याग केला, शिक्षण अर्धवट सोडलं आणि आपलं आयुष्य देशाच्या स्वातंर्त्यचळवळीसाठी वाहून घेतलं. हा न रुचणारा पण एक वास्तव इतिहास आहे.'' ''तू म्हणतोस ते खरंच!'' बहुधा त्यांना हे विश्लेषण आवडलं होतं. ''त्याचं कारण आपल्या देशातल्या ब्राह्मण समाजाला त्यागाचा एक इतिहास आहे. त्याग करणं आणि त्यासाठी स्वत:हून दरिद्री राहणं याचा त्याला गर्व वाटतो. त्याच्या ह्याच वृत्तीमुळे त्यानं देवाला लाथ घातली तर ते छातीवरचं पदचिन्ह अलंकार म्हणून मिरवावं असं देवानासुद्धा वाटलं अशा कथा जन्माला येतात''

मला नेमकं काय म्हणायचं असावं याचा अंदाज त्यांना येत नव्हता. त्या गप्प राहून ऐकत होत्या. मी पुढं म्हणालो, ''असा हा नेतृत्वस्थानी असलेला ब्राह्मण आणि चळवळीच्या बाहेर असलेलाही ब्राह्मण स्वातंर्त्य मिळाल्यानंतर आपल्या मुलांना डॉक्टर तरी करू इच्छितो किंवा इंजिनिअर तरी! का? आपल्या देशात रुग्णसेवेचं खूप मोठं काम त्याला आव्हान देत होतं. म्हणून की, देशात आता रस्ते, धरणं बांधून देशसेवा करायची ह्या ध्येयानं तो प्रेरित झाला होता म्हणून?'' माझ्या प्रश्नातला पुणेरी टोला मॅडमनी ओळखला. पण त्या खरोखरच प्रांजळपणे बोलू लागल्या. त्या मला म्हणाल्या, ''तुला माहितंय मी कोण आहे? म्हणजे माझ्या घरातलं वैचारिक वातावरण? माझं कुटुंब?'' ''मला एवढंच माहितंय, की तुम्ही एका कॉम्रेड जस्टिसच्या भगिनी आहात.'' देशाच्या पातळीवर त्यांना खूप मान होता.

''एवढंच नाहीतर आम्ही लहान होतो त्या वेळी कॉम्रेड डांगे, कॉ. रणदिवे यांच्यासारखी दिग्गज मंडळी माझ्या घरी यायची. देशाच्या राजकारणाची चर्चा करायची. मी सांगतेय तो काळ 1932-35चा होता. त्या चर्चेत एक मुद्दा हाही होता, उद्या स्वातंर्त्य मिळालं, तर ब्राह्मण सत्तेत असणार नाही. त्यामुळं आत्तापासून आपण आपल्या मुलांना प्रोफेशनल कोर्सेसकडं पाठवायला हवं. त्यामुळे प्रश्न ध्येयवादाचा नव्हताच, आपलं अस्तित्व टिकवण्याचा होता. मॅडम प्रांजळपणे सांगत होत्या. मला हवं ते उत्तर मिळालं होतं. मी म्हणालो, ''मॅडम, काय खरं? अस्तित्वाची लढाई की त्याग आणि ध्येयवाद? लढायचं अस्तित्वासाठी आणि भाषा वापरायची ती मात्र ध्येयवादाची. ज्ञानाची परंपरा असणार्‍या वरिष्ठ समाजाला हे वाटत असेल तर दलित तर बोलूनचालून ज्ञानवंचित आणि समाजाच्या दृष्टीने कनिष्ठ. स्वार्थाचे मुद्दे सजवून सांगावेत हे त्याला कसे जमेल? लोभाला बळी पडणं आणि त्यासाठी परस्परांना ओरबाडणं यात काही हाती येते आहे हे त्याला कसं कळणार?''

''पण त्यामुळे दलितांचंच नुकसान होईल असं नाही तुला वाटत?''

''होईल, पण दलितांचा विचार असा दलितांना समाजापासून वेगळा काढून कसा करू शकेल मी? आज कोणत्या ध्येयवादी पक्षांच्याही चिरफळ्य़ा उडाल्या नाहीत? त्यांच्या चिरफळ्य़ा उडाल्या त्या ध्येयनिष्ठेमुळे आणि दलितांच्या संघटनेच्या चिरफळ्य़ा उडाल्या त्या फक्त स्वार्थामुळे, असं कसं म्हणता येईल.''

आज या चर्चेला 30-35 वर्षे उलटून गेली आहेत. आज मॅडमही नाहीत आणि समाजातल्या ध्येयवादी पक्षाच्या अलंकाराचे सगळ्य़ांचेच पितळ उघडे पडले आहे. सगळेच आता छोटय़ामोठय़ा स्वार्थासाठी, 'पळा, पळा, पुढे कोण पळतो?' या स्पर्धेत उतरले आहेत. मीही आता उतरणीच्या मार्गाकडे वळलो आहे. आता असं वाटतं, आचार्य जावडेकरांनी 1935 साली स्वातंर्त्यचळवळीची केलेली मीमांसा कालबाह्य झाली आहे. जिज्ञासूंनी त्यांचा 'आधुनिक भारत' हा ग्रंथ वाचावा. मुळात आपली स्वातंर्त्याची चळवळच एकदा तपासून पाहिली पाहिजे. दोन टक्के पदवीधरही ज्या राष्ट्रात नव्हते त्या राष्ट्राला स्वातंर्त्याचे स्वप्न देणारी काँग्रेस 1885 साली कोणती मागणी करीत होती? 'आयसीएसचे परीक्षा केंद्र आपल्याच देशात हवे!' कुणासाठी होती ही मागणी? किती टक्के लोकांसाठी? 1905 साली स्थापन झालेल्या 'सव्र्हट्स ऑफ इंडिया' या नामदार गोखले (म. गांधींचे गुरू) यांच्या संस्थेचे सभासद व्हायचे असेल तर अट होती : 'किमान तो पदवीधर पाहिजे.' समाजातला कोणता वर्ग तेव्हा पदवीधर होता? संपूर्ण स्वराज्याची मागणी जोरदारपणे करणार्‍या वर्गाबद्दल त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 'हे मागच्या दाराने भांडवलशाही आणू पाहताहेत!' पण त्या वेळी आपला राष्ट्रीय समाज बाबासाहेबांना ते फक्त 'दलितांचे' पुढारी आहेत एवढय़ाच मर्यादित दृष्टीने पाहत होता. आपली स्वातंर्त्याची चळवळ ही खरोखरंच न्यायसमतेसाठी उग्र होती की, उदारमतवादी भांडवलशाहीच्या छुप्या रस्त्याला राजमार्गाकडे नेऊ पाहत होती हे आता नव्या पिढीनेच तपासून पाहिले पाहिजे. कुणाचा अवमान करावा यासाठी मी हे सांगत नाहीय. इतिहास कोणास दोष देण्यासाठी समजून घ्यायचा नसतो. आपले वर्तमान तरी प्रश्न डोळसपणे सोडवावेत यासाठी तो समजून घ्यायचा असतो हे आपणांस केव्हा कळेल?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी : 9881220084

No comments:

Post a Comment