Monday 2 July 2012

हे 'नशीब' आपला पिच्छा केव्हा सोडेल?

   A A << Back to Headlines     
कुठल्याही वृत्तपत्राची रविवारची साप्ताहिक आवृत्ती घ्या. त्यात साप्ताहिक राशी भविष्य छापलेलं नाही असं घडत नाही. अर्थात याला अपवाद असू शकतो. वृत्तपत्र राष्ट्रवादी असो, गांधीवादी असोत, वाणिज्य हेतूने चालवलेली असोत की कुठलीही असोत. तिथे राशी भविष्य असतंच. नाही म्हणायला आंबेडकरवादी वृत्तपत्रात मात्र मला राशी भविष्य वाचायला मिळत नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे या वृत्तपत्राचा वाचक 99 टक्के आंबेडकरवादी आहे. आंबेडकरवाद 'नशीब' ही संकल्पना नाकारतो. त्यामुळे आंबेडकरवादी वृत्तपत्रावर आंबेडकरवादी वाचकांचाच एक सोशल कंट्रोल आहे; पण आंबेडकरवादी वाचक मात्र राशी भविष्य अर्थात इतर पेपरमध्ये येणारे वाचतच नसतो हे तरी खात्रीलायकपणे म्हणता येईल का? फार कशाला सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्मानंतर एक भविष्यवाणी झाली. ही भविष्यवाणी जगाच्या पाठीवर जिथे जिथे बुद्ध धर्म आहे त्या सर्वच देशातल्या बुद्ध चरित्रात आहे. तथागताच्या तत्त्वज्ञानात भविष्याला थारा नाही. पण बुद्ध चरित्रात मात्र ही दंतकथा आलेली आहे. शिल्प आणि चित्रातही ही कथा रूढ झालेली आढळून येते? का असं घडावं? मला हा छळणारा प्रश्न आहे.

आणखीही एक वैशिष्टय़ असं की, सुधारलेल्या पाश्चिमात्य जगातही भविष्य कथनाच्या निरनिराळय़ा स्कूल्स आहेत. कुणी हातावरील रेषांच्या आधारे भविष्य सांगतो, कोणी प्लॅनेटच्या आधारे तर कोणी राशीच्या आधारे. भारतात कुंडली वाचनाला शास्त्र प्रमाणाचा दर्जा दिला जातो. अलीकडे तर काही विद्यापीठातून भविष्यशास्त्राचे अध्यापन केले जाते. भविष्यशास्त्राच्या पदव्याही दिल्या जातात. इतकेच काय तर आपला देशही याला अपवाद नाही.

वृत्तपत्रात काम करणार्‍या माझ्या एका मित्राने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर असे सांगितले की, त्यांच्या वृत्तपत्रात अनेक वेळेला भविष्यातलं 'ओ' का 'ठो' कळत नाही, अशी माणसे भविष्य लिहितात. कधी कधी तर मागच्या एखाद्या अंकातलं भविष्यच पुन्हा प्रसिद्ध केलं जातं.

मी एकदा गंमत म्हणून चार वृत्तपत्रातील हा कॉलम निवडून तपासून पाहिला. सगळी वृत्तपत्रं अतिशय मोठा लौकिक असणारीच होती. विशेष म्हणजे या चारही वृत्तपत्राच्या राशी भविष्यात कुठेच एकवाक्यता नव्हती. इतकेच नाही तर शास्त्र म्हणून ज्या ग्रहदशा सांगितल्या जातात त्यातही एकवाक्यता नव्हती. एका वृत्तपत्रात मेष राशीला शनीची महादशा होती तर त्याच आठवडय़ात दुसर्‍या वृत्तपत्रात ती तूळ राशीला होती. तिसर्‍या वृत्तपत्रात आणखी कुठल्या तरी राशीला. राशी भविष्य सांगणार्‍या माझ्या एका मित्राला मी विचारलं, ही तफावत का? तर त्याचं उत्तर होतं, तुला ज्यातलं कळत नाही त्यातला प्रश्न विचारतोस कशाला? अर्थात मी वाद अधिक वाढवणार नव्हतोच. कारण खर्‍याखुर्‍या अनेक विकसित शास्त्रातलं आपणाला कळत नाही आणि आपण प्रश्न विचारला की, तो अनेक वेळेला बालबुद्धीचा असतो. या तर्काच्या आधारे कुणीही कुणाला गप्प करू शकतो; पण माझी अडचण वेगळीच होती. भविष्य आणि नशीब या गोष्टी खरोखरच एवढय़ा खोटय़ा असतील तर त्या आपला पिच्छा का सोडत नाहीत?

माणसाला 'भूक'च लागणार नाही अशी अवस्था निर्माण करता येईल? लैंगिक गरज अनावश्यक ठरेल अशी अवस्था कधी तरी निर्माण होईल? माणूस हा कितीही बुद्धिमान असला आणि विकसित असला तरी तो मुळात पशू आहे आणि पशू असल्यामुळेच त्याला पशुसृष्टीकडून मिळालेला एक वारसा आहे. भूक, भय, लैंगिक गरज या सहजप्रवृत्ती माणसाला पशुसृष्टीकडून वारसा म्हणून मिळालेल्या आहेत. त्याचा तुमच्या आमच्या इच्छेशी काहीच संबंध नाही. एकत्र जगणे, कळप करून जगणे ही माणसाची पशू म्हणूनच एक आवश्यकता आहे. त्यामुळेच या सर्वच सहजप्रवृत्तींना वाट मोकळी करून देणारी एक व्यवस्था निर्माण करणं ही माणसाची एक गरज आहे. या गरजेतूनच समाज निर्माण झाला. नीतिनियम जन्माला आले, विवाह संस्थेचा उदय झाला, राजकीय विचारसरणी आणि त्यावर आधारलेल्या राज्यव्यवस्था निर्माण झाल्या. सहजप्रवृत्तींच्या अभावातून नव्हे तर नियंत्रणाच्या प्रभावातून जगाचा विकास झाला. अर्थात हे नियंत्रण प्रत्येक वेळी शास्त्रसिद्धच असेल असे नाही. अनेक वेळेला हे नियंत्रण फसवं असतं. बलवानांच्या सहजप्रवृत्तींचा आविष्कार होईल, अशा स्वरूपाचं असतं. महात्मा फुले यांनी एकदा प्रश्न विचारला, हिंदू स्त्रिया सती का जातात? त्यावर धर्मशास्त्रानं उत्तर दिलं त्यांना पतीच्या मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळावं म्हणून. मग महात्मा फुले म्हणाले, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीलाही स्वर्गात स्थान मिळावं असं कधी वाटत नाही का? मग स्त्रिया जशा सती जातात तसे पुरुष 'सता' गेले असे एकही उदाहरण का सापडत नाही? थोडक्यात काय तर नीतिनियम करणारे आणि ते राबवण्याची सत्ता असणारे जेव्हा एकच असतात तेव्हा ते नीतिनियमांच्या आड आपला स्वार्थ पाहतात. मुस्लिम धर्मात स्त्रिया सती जात नाहीत, पण सतत मार खाऊन आपापल्या नवर्‍याशी प्रेमाने जगणार्‍या स्त्रिया मात्र आढळतात. या उलट घडताना का दिसत नाही? कारण असं त्या जगल्या नाहीत तर त्या दोजखमध्ये (नरकात) जातील, असा संस्कार त्यांच्यावर बालपणापासून केला जातो.

कधी कधी आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात. अत्यंत निव्र्यसनी माणसाला कॅन्सर होतो. अत्यंत सदाचारी माणूस हृदयविकाराने मरतो. त्याउलट इतरांचा छळ करणारी माणसं दीर्घायुषी होतात तर अनेक व्यसनं असणारा माणूसही अल्पवयात मृत्यू पावत नाही. अर्थात हा नियम नाही; पण केवळ नाकारावे अशीही कविकल्पना नाही. आपल्या जगण्यातली ही अनिश्चितता माणसाला सतत छळत राहते. निसर्गदत्त सर्व गोष्टी असूनही सगळय़ांना शिवाजी महाराज होता येत नाही आणि अतिशय अनुकूल वातावरण असूनही सर्वच गावांत आणि सर्वच शतकांत गौतम बुद्ध जन्माला येत नाही. जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर्काने देता यावीत, द्यायला हवीत अशी महत्त्वाकांक्षा असणार्‍या अनेकांचा पराभव होताना दिसतो. 'भय इथले संपत नाही' हे आपले अटळ वास्तव आहे. आपल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा सतत पराभव करीत राहील, अशी ही अनिश्चितता आपण संपवू शकत नाही. राम-लक्ष्मणाच्या जोडय़ा बहुसंख्य असल्या म्हणून काय झाले? रावण-बिभिषणाच्याही जोडय़ा सतत आढळून येतातच की. मानवी जीवनात जोपर्यंत अनिश्चितता आहे, तोपर्यंत या अनिश्चिततेची खरीखोटी कारणे सांगणारे आपणाला आढळून येणारच. विवाहसंस्था आणि कुटुंबव्यवस्था निर्माण झाली तरी जगात सर्वत्र वेश्या व्यवसाय आढळून येतो. तेव्हा मानवी हानी होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न करतो. अगदी त्याचप्रमाणे दुबळय़ा माणसांना फसवून त्याची लुबाडणूक करणारे जे आहेत त्यावर नियंत्रण कसे ठेवावे एवढेच आपल्या हाती आहे. म्हणून भविष्यकथन आपला पिच्छा कधीच सोडणार नाही. आपली फसवणूक होऊ नये, असं नियंत्रण करता येणं एवढंच आपल्या हाती आहे, असं मला वाटतं.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत

व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084
     

No comments:

Post a Comment