Tuesday 31 July 2012

सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच जीवापासून!


आपण कोण आहोत? आपल्या जीवनाला काही हेतू आहे का? या प्रश्नांचा वेध घेत असता पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राकडून जी सामान्य माणसांना समजू शकेल अशी माहिती मिळू शकते. तिची मांडणी या आधीच्या लेखांकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, ही माहिती मुख्यत: निर्जीव पदार्थाबाबत आहे. आमचे व सर्व सजीवांचे देहदेखील पदार्थमय आहेत, जे निष्प्राण झाल्यानंतर निर्जीव पदार्थातच रूपांतरित होतात. या विश्वातील सर्व निर्जीव पदार्थ व ऊर्जा एकाच मूलतत्त्वाची निर्मिती असून सृष्टीच्या आरंभी तर अवकाश - काळासह सर्व ब्रह्मंड एकाच बिंदूमध्ये सामावले होते, असा विज्ञानाचा बहुमान्य तर्काधारित निष्कर्ष असल्याचेही आपण मागील लेखांकात पाहिले. परंतु या माहितीने आपल्या मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

भौतिक पदार्थमय देह हा आपल्या मानवी अस्तित्वाचा केवळ एक भाग आहे. कोणताही जीव निव्वळ पदार्थमय नसतो. पदार्थमय देहात प्राण असेल तरच आपण त्या देहाला 'सजीव' म्हणतो. अचेतन सृष्टीची सचेतन होण्याकडे जी वाटचाल सुरू झाली, त्या यात्रेतील पहिला टप्पा प्राण आहे. प्रत्येक सजीव देह हा सूक्ष्म पेशींचा (सेल) बनलेला असतो. एकच पेशी असलेले कित्येक सूक्ष्म जीवाणू असतात तसेच कोटी-कोटी पेशींनी मिळून घडविलेले मानवासारखे व मानवापेक्षाही अगडबंब देह असलेले प्राणी असतात. मात्र या नानाविध देहरचनांचा मूळ घटक असलेल्या पेशींची कार्यपद्धती बरीचशी सारखी असते. अगदी वेगळी कार्यपद्धती असणार्‍या पेशी कदाचित पृथ्वीवर फार पूर्वी अस्तित्वात आल्याही असतील; परंतु त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. विशाल अंतराळातील दूरवरच्या एखाद्या किंवा अनेक ग्रहांवर अशी वेगळी कार्यपद्धती असणार्‍या पेशी व त्या पेशींपासून तयार झालेले सजीव प्राणी अस्तित्वात असतीलही, मात्र त्याबाबत कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजूनतरी आढळलेला नाही.

पृथ्वीवरील प्रत्येक जीवपेशीला एक पातळ त्वचा असते, ज्या त्वचेतून काही द्रव व अतिसूक्ष्म घन पदार्थ आत येऊ शकतात व बाहेरही टाकले जाऊ शकतात. ही पातळ त्वचा त्या पेशीला बाह्य जगापासून वेगळे करते. भोवतालच्या वातावरणातून पोषक घटक आत शोषून घेणे, त्या घटकांवर रासायनिक प्रक्रिया करून स्वत:चे पोषण व दुरुस्ती करणे आणि स्वत:सारखीच दुसरी पेशी निर्माण करून निष्प्राण होणे, हे कार्य प्रत्येक सजीव पेशीमध्ये अविरत सुरू असते. पेशीच्या गाभ्यात लांबलचक साखळी असलेले न्यूक्लिक अँसिडचे 'डीएनए' नावाने ओळखले जाणारे जे रेणू असतात, त्या 'डीएनए'मधील जीन्स नावाचे घटक हे त्या-त्या सजीवांच्या देहरचनेचे गुणधर्म ठरवितात. पेशींच्या आत सतत सुरू असलेले हे नवनिर्मितीचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे, जलदगतीचे व प्रचंड उलाढालीचे असते. हजारो रेणूंची त्यासाठी ठरावीक कार्यक्रमानुसार धावपळ सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारचे रेणू वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पाडत असतात. एखाद्या अजस्र कारखान्यासारखी प्रत्येक पेशीच्या आतली कार्यपद्धती असते. पोषण, दुरुस्ती व नवनिर्माण या कामांसाठी आवश्यक ते पदार्थमय घटक बाह्य वातावरणातून शोषून घेणे व प्रक्रिया झाल्यानंतर अनावश्यक द्रव्य पुन्हा बाह्य वातावरणात सोडून देणे, हे कामही अखंड सुरूच असते. अगदी स्वत:च्या त्वचेची निर्मिती व दुरुस्तीदेखील पेशींच्या आतूनच होत राहते.

अशा लक्षावधी पेशींचा मिळून आपला एक-एक अवयव बनतो. त्या पूर्ण अवयवांच्या निर्मितीचा आराखडा प्रत्येक पेशीजवळ असतो. अनेक अवयवांचा मिळून आपला देह बनतो. प्रत्येक अवयवाचे कार्य वेगळे; परंतु सर्व अवयव एकमेकांना पूरक असतात. कोटय़वधी पेशींचा समूह असलेला देहदेखील ढोबळमानाने पेशींसारखेच कार्य करतो. देहाबाहेरून पोषक अन्न आत घेणे, त्यावर प्रक्रिया करून देहाचे पोषण करणे, अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे, नवीन देहाची निर्मिती करणे व नंतर निष्प्राण होणे!

पृथ्वीच्या पोटात, पृष्ठभागावर व वातावरणात सूक्ष्म जीवाणूंची अफाट संख्या असते. आपल्या मानवी दृष्टीला हे जीवाणू दिसत नाही; परंतु आपल्या देहाच्या आत व देहाच्या त्वचेवरदेखील अब्जावधी जीवाणू नांदत असतात. आपल्या देहातील नित्य निष्प्राण होणार्‍या पेशी हे जीवाणू फस्त करतात. ते अतिशय उंच जागी व अतिखोल विवरांमध्ये तसेच कडाक्याच्या थंडीत व होरपळणार्‍या उष्णतेतदेखील टिकाव धरून राहतात. हे सूक्ष्म जीवाणूदेखील पेशींचेच बनले असतात व त्यांच्या पेशीतदेखील व नमूद केलेले कार्य सुरू असते.

सर्व सजीव पेशींची रचना व कार्यपद्धती मूलत: समान असल्यामुळे पृथ्वीवर आता आढळून येणार्‍या व ज्यांच्या देहरचनांचा अभ्यास होऊ शकतो अशा पूर्वी नष्ट झालेल्या सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच आद्य जीवापासून किंवा पेशीपासून झाली असावी, असा जीवशास्त्राच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. म्हणजेच पदार्थविज्ञानशास्त्राप्रमाणेच जीवशास्त्रदेखील अद्वैताकडे इशारा करते असे मानावे लागेल.

सजीवसृष्टीचा प्रारंभ आपल्या पृथ्वीवर सुमारे साडेतीन कोटी वर्षापूर्वी झाला असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. प्रथम जीव कसा जन्मला. याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत. ज्वालामुखीच्या स्फोटातून निर्माण झालेल्या ढगात मिथेन, अमोनिया व हायड्रोजन विपुल प्रमाणात एकत्र असावे व विजेच्या कडकडाटामुळे त्यांच्या संयोगातून अमिनो अँसिड्स व साखरेसारखे क्लिष्ट रचना असलेले रेणू तयार होऊन जीवनाची उत्पत्ती झाली असावी, असा काही वैज्ञानिकांचा अंदाज आहे. दुसरे काही वैज्ञानिक मात्र सूक्ष्म सजीव प्रथम परग्रहावरून अथवा अंतराळातून उत्कापातासोबत अथवा धूमकेतूच्या शेपटीवर स्वार होऊन पृथ्वीवर आले व त्यांनीच येथे जीवनाचा विस्तार केला, असे मानतात. वैज्ञानिकांचा तिसरा गट असे मानतो की, तीन कोटी वर्षापूर्वी सूर्य सध्यापेक्षा कमी तेजस्वी असल्यामुळे पृथ्वीवर हिमयुग होते व शेकडो फूट जाडीचा बर्फाचा थर समुद्रावर पसरला होता. त्या थराखाली समुद्राच्या तळाशी जीवनिर्मितीला पोषक वातावरण व घटक असल्यामुळे तिथे प्रथम जीवनिर्मिती झाली असावी. इतरही काही वेगळ्या मान्यता आहेत.

सारांश, पृथ्वीवर सजीवसृष्टीचा प्रारंभ नेमका कसा व कोणत्या कारणाने झाला याबाबत वैज्ञानिकांचे एकमत नाही. मात्र आज अस्त्विात असलेल्या सर्व सजीवांचा आद्य पूर्वज एकच असावा याबाबतीत मात्र दुमत आढळून येत नाही. आपल्या सामान्य भाषेत असे म्हणू की किडय़ामुंग्यांसह आपण सर्व सजीवांमध्ये एकच प्राणतत्त्व प्रवाहित असतो.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881574954

No comments:

Post a Comment