Tuesday 31 July 2012

फॅमिली डाक्टरायची हे आखरी पिढी



दोस्ताय हो या आंधी तं हरेक मंगयवारी तुमच्यातल्या काईचे फोन येतचं होते, पन मांगच्या मंगयवारी 'मायचं बिल देता का?' या भागावर्त इतके फोन आले का लेयनार्‍याले समाधान व्हावं आन् आपलं लेयेन वाचनार्‍यायच्या कायजापावतर जावे हे जवा तुमच्या फोनच्यानं कयते त्याची खुसी सबुदात नाई सांगता येत. मी सार्‍यायले पुन्यांदा धन्यवाद देतो. तुमचं पिरेम हेच लेयन्याची ऊर्जा असते. काई वाचकायची असी मागनी होती का त्या डाक्टरांच्या अखीन काही आठोनी आठवत असतीनं तं जरूर लिहा.

माह्या लहानपनी खरं तं पयस्याले लय लय किंमत होती. त्याच्याच्यानं तो खर्च करतानी मानूस इचार करूनच खर्च करे. होईन तवरिक निभून न्याची पाहे. आता कसं थोडसं दुखलं तं डाक्टर सिवाय पर्याय नाई, पन तवा कसं होतं का समजा पाय मुरगयला आन् सुजला तं जानकार सांगे 'अरे' थो अमका अमका पाला कोनाले सांगून आनून घे आन् बांध. कमरीचे म्हनलं की या बोटाच्या कांडय़ावानी बिना पाल्याचा येल हाय आपल्या शायेच्या पलीकून थो हातभर तोडून आनाचा. त्याले कुटाचा आन् त्याच्यात शेंदूर आन् आंड फोडून त्याले एकात मिसयून त्या लगद्याचा लेप चांगल्या कापडय़ाच्या पट्टीवर्त घेऊन तो कमरीले बांधून आराम कराचा. तीन दिवस असं कराचं. पाहय़ आरम पडते का नाई? कोनी दुसरा इलाज सांगतानी सांगे, अरे नदीच्या थडीनं हडसन निघानी असनं आता. ते उपडून आनाची आन् आपन मेथीची भाजी करतो तसी करून खाची. आता सांगनारे भेटत नाई आन् भेटला तं ते कुटाना कोन करत बसनं. त्या परीस आनला बजरंग लेप आन् लावला असे नयतूरने पोरं म्हनते.

आमच्या गावाले दुसरे सरकारी डाक्टर आले ते डॉ. सुधाकर पुरी. मी त्यायच्या कुटुंबाचा घटकचं झालो होतो. एक डाव वयनी पोरायले घेऊन माहेरी नागपूरले गेल्या होत्या. म्या संध्याकायच्या दवाखान्यात जाऊन त्यायले इचारलं का, ''तुमी घरी जेवाले येता का मंग आपल्या दोघांचा डबा घेऊन मी तुमच्याकडं येऊ ?'' ते म्हने, ''डबाचं घेऊन ये. मी जेवायला येणार म्हटलं की आईपासून सगळे जेवायचे थांबतात. त्यापेक्षा डबाचं घेऊन ये.'' राती नऊ साडे नवले आमी जेवनं केलं आन् गोठे करतं बसलो. बैयलाच्या घंटय़ायच्या आवाजा संग खासर (बैलगाडी) थांबल्याचा आवाज झाल्याच्यानं म्या घडाय पाह्यलं तं रातीचे साडेअकरा वाजले होते. त्यायनं आवाज देल्यावर्त म्याचं दाठ्ठा (दार) उघडला. जवयगाववून ते दोघे आले होते. ते समोरच्या बेंचावर बसल्यावर्त सांगाले लागले,''डाक्टरसायेब घरी दोन मयन्याचं लेकरू हाय. थे सकायपासून निस्त रडून रायलं. रडून रडून अदमुसा होते, पन मायच्या दुदाले तोंड

नाई लावून रायला. आजूबाजूचे लोकं आपापल्या वसरीत बसून हाय. तुमाले न्यासाठी आलो डाक्टर सायेब आमी. डाक्टर सायबान हे आयकून घेतल्यावर्त त्यायले सांगतलं का,''मी तुम्हाला औषध लिहून देतो. तुम्ही बच्चूभाईकडे जा. ते माडीवर झोपले असतीन. त्यायले आवाज द्या. ते उठल्यावर माझं नाव सांगा म्हणजे ते खाली येऊन दुकान उघडून तुम्हाला औषध देतील. ते घेऊन या. मी ते कसं द्यायचं ते समजावून सांगतो.''

ते गयावया करत होते का, ''तुमी चाल्ले अस्ते तं खूप बरं झालं अस्त डाक्टरसायेब.'' आखरीले ते दोघं दवाई आनाले गेल्यावर म्या डाक्टर सायबाले म्हनलं, ते एवढे कायुतीले आलेत. चाला ना, वाटल्यास मी येतो तुमच्या संग. माह्या डोया म्होर सारा सीन उभा झाला. ते इतकुसं लेकरू त्याचा अकात त्याच्याच्यान सारं घर कायजीत जागं आन् शेजारीपाजारी डाक्टर येतेतं या आसीवर वाट पाह्यत असतीन असं चित्र मलेच दिसाले लागलं. ते दवाई घेऊन आल्यावर्त त्यायनं आखीन डाक्टर सायबाले आग्रव कराले लागले. तसे डाक्टर सायेब म्हने, ''निघा तुम्ही पुढे मी याला घेऊन मोटारसायकलने येतो.'' टायमाचा अंदाज घेऊन डाक्टर सायबानं त्यायच्या राजदूत फटफटीले किक मारली. आमी गावापासी आलो. ते वाट पाहत थांबूनचं होते. इतकी रात झाल्याच्यानं गाव झोपलं होतं. मले त्यायच्या घरापासी जाची घाई झाली होती. त्यायचं खासर एका घरा शेजी त्यायनं थांबवलं तं मले वाटलं बाजूच्या गल्लीत घर असनं, पन नाई समोरच्या घरची साखयी यानं वाजोली चांगली तीन-चार खेपा. साखयी वाजोल्यावर्त आतून दाठ्ठा उघडला. गावा संग शेजारीपाजारी झोपले हे तं ठीक, पन इथ तं पेशंट आन् अवघं घर झोपलेलं पाहून मलेच चक्कर याची वक्ता आली.

आमी वापेस निंघालो तवा रस्त्यात म्या डाक्टर सायबाले म्हणलं, ''डाक्टरसायेब माफ करा बुवा. माह्याच्यानं तुमाले झटका झाला.'' त्याच्या वर ते म्हनेत, ''झटका बसणार आहे याची मला पूर्ण कल्पना होती आणि तुला सांगू मी पेशंटसाठी नाही तुझ्या समाधानासाठी मुद्दाम आलो. आम्हाला इतकी सवय झाली असते की, येणार्‍याच्या सांगण्याच्या पद्धतीने आम्हाला पेशंट खरचं सिरीयस आहे की नाही याची कल्पना येते. तसं असतं तर ते पेशंटला घरी ठेवून नाही इथ घेऊन आले असते. पण मी तुला घेऊन न जाता हे सांगितलं असतं तर तुला पटलं नसतं आणि त्यात तुझी काही चूक नसती. आमचा अनुभव तुला कसा असणार?''

मी लहान असतानी बिन सरकारी आमच्या गावच्या बाजूचे डाक्टर होते डॉ. रामकृष्ण ठोकळ. ते दवाई आयुर्वेदिक लिहून देत आन पेशंटले सुई देत. तवा पेशंटचा सुई देल्ली का आपलं दुखनं बसते याच्यावर्त लय इस्वास. कवा कवात पेशंटचं म्हने एखांद पॉवरबाज इंजेक्सन देऊन ह्या डाक्टरसायेब मंग खटखट नाई राहतं. हेयी त्यांले नाराज ना करे. त्यायच्या आजूबाजूले चार-पाच जन बसून नाई असं कवाचं ना होये. ते सारे त्यायच्या गोठी आयकासाठी बसत. माह्या मोठय़ा भावाचं मेडिकलचं दुकानं होतं. त्यांच्या वसरीत पलीकडच्या भितीकडून पेशंट तपासाचा टेबल, पडद्या मांग. बाजुले एका मोठय़ा स्टूलवर वातीचा स्टो सिरींज उकयासाठी. तवा काई ता सारके युज अँड थ्रो अशा सिरींजा नव्हत्या निंघाल्या. आमच्या गावालं मंगयवारचा बजार. त्याच्याच्यानं दिवसभर पेशंटले पेशंट सुरूचं राहे. मंगयवारी थो वातीचा स्टो पेटूनचं राहे. त्याच्यावर्त जरमलच्या गंजात दोन-तीन काचेच्या सिरींजा आन् पाच-सहा सुया पान्यासंग उकयत राहे.

आता सुधारना खूप झाल्या. सकायी मोतीबिंदूच्या अपरेसनसाठी गेलेला पेशंट लेसर का काय म्हन्ते त्यानं अपरेसन करून दुपारी जेवाले घरी येते. पह्यले अपेंडिकच्या अपरेसनले जर बोरीवून पेशंट गेला तं गावाले धाकधुकं लागे. आता तं बायपासचा पेशंट पाच-सहा दिवसात हासत घरी येते. आता सारी पयस्याची दुकानदारी झाली आन् त्याच्याच्यानं पेशालिस्ट डाक्टराच्या जमान्यात फॅमिली डाक्टरायची हे आखरीची पिढी हाये. यवतमायले माह्या ओयखीचे डॉ. हरीश झंवर आन् डॉ. दि. का. बडे हे असेचं. आता तं पह्यले दीडसे, दुसर्‍यान गेले का शंभर. त्यायच्या पॅडवर्त छापूनचं यादी अस्ते. त्याच्यावर्त खुना केल्या का हे तपासून रिपोट दाखवा म्हन्ते. एक डाव माही आजी हा ताल पाह्यल्यावर म्हने, बावू हा कमी सिकला हाय कारे? दुसर्‍याले इचारून आपल्याले काय झालं सांगते.

डॉ. बडे अजूनयी मुलाला नावाने ओयखतात. माह्या मधण्या मुलीला दोन पोरं हाय, पन आपली नितू काय म्हंते असं इचारतेत. चार मयन्या पयले ताप आला म्हून गेलो. बळी काई बोल्लो नाई. त्यायनं दवायीच्या चिठ्ठी संग रक्त तपासाले चिठ्ठी देल्ली आन् त्यायची शंका खरी ठरली, साकर निंघाली. याले म्हंते डाक्टर! फॅमिली डाक्टर म्हनलं का फॅमिलीतलं असल्यावानी अधार वाट्टे मानसाले. ते जे सल्ला देतीनं तो योग्य देतीलनं हे गॅरंटी अस्ते. असा फॅमिली टच असल्याच्यानंचं फॅमिली डाक्टर नाव पडलं असनं लेका!

(लेखक शंकर बडे  हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment