Thursday 12 July 2012

शेतकरी आत्महत्या व महासत्ता



नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोचा ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्या अहवालानुसार गेल्या 15 वर्षात देशभरात पावणेतीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. तसा हा 'मरण्याचा' आकडा कोणत्याही संवेदनशील माणसाची छाती दडपून टाकण्यास पुरेसा आहे. पण तसे होताना दिसत नाही. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत एवढय़ा मोठय़ा संख्येने माणसं मेली नाहीत. वादळ, भूकंप, महापुरातही एवढी माणसं मेली नसतील. स्वातंर्त्यलढय़ामध्येसुद्धा एवढी माणसं ब्रिटिशांनी मारली नाहीत. अमेरिकेने दुसर्‍या महायुद्धात नागासाकी व हिरोशिमावर केलेल्या बॉम्बहल्ल्यातसुद्धा इतकी माणसं मेली नाहीत. पण गेल्या 15 वर्षात पावणेतीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात याची लाज-शरम मात्र कोणाला वाटली नाही. तीळतीळ जीव तुटावा तसा हा शेतकरी कणाकणाने क्षणाक्षणाला मरत होता. मरतो आहे. आत्महत्या करतो आहे. आणि आम्ही ते सर्व निर्लज्जपणे पाहत होतो. आजही पाहतो आहोत. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात काही माणसं मरतात तर सारा देश हळहळतो. त्या हल्ल्यात ठार झालेल्यांसाठी 'मेणबत्त्या' लागतात. सचिन तेंडुलकरला आपल्या शतकातील एक शतक या हल्ल्यात ठार झालेल्यांना श्रद्धांजली म्हणून अर्पण करावेसे वाटते. पण गेल्या पंधरा वर्षात पावणेतीन लाख शेतकरी आत्महत्या करतात पण त्यांच्याविषयी कोणाला सहानुभूती वाटत नाही. त्यांच्यासाठी कोणाला एक मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली द्यावी असे वाटत नाही किंवा सचिन तेंडुलकरला आपले एखादे शतक त्यांना अर्पण करावेसे वाटत नाही. उलट त्याच्या मरण्याची टिंगलटवाळीच अधिक होताना दिसत आहे. एखादा शत्रू जरी मेला तरी त्याची मरणोत्तर टिंगलटवाळी कोणी करीत नाही. पण शेतकर्‍यांच्या बाबतीत हाही विधिनिषेध कोणी पाळताना दिसत नाही. तो आत्महत्या करतो आहे. का करतो आहे? या कारणांचा शोध न घेताच त्याच्या आत्महत्येचेही 'खापर' त्याच्याच माथ्यावर फोडून आपण मात्र नामानिराळे होत आहोत. तो दारूच पितो. तो आळशीच आहे. त्याला अक्कलच नाही. तो आपल्या मुलामुलींच्या लग्नात खर्चच जास्त करतो. एकूण काय तर त्याच्या आत्महत्येला तोच जबाबदार. त्याच्या आत्महत्येनंतर त्याला एक लाख रुपये मिळतात म्हणून तो आत्महत्या करतो असे म्हणणार्‍या निर्लज्ज आणि बेशरम माणसांचीही संख्या काही कमी नाही.

दारू पिऊन जर आत्महत्या झाल्या असत्या तर आतापर्यंत सर्वाधिक आत्महत्या सिनेमा क्षेत्रात व्हायला पाहिजे होत्या. सिनेमा क्षेत्रात सर्वाधिक दारू पिली जाते. पण तेथे मोठय़ा प्रमाणावर आत्महत्या दिसत नाही. राजकीय क्षेत्रातही दारू मोठय़ा प्रमाणावर पिली जाते. पण तेथेही आत्महत्या नाही. दारू पिल्यानेच जर आत्महत्या झाल्या असत्या तर आतापर्यंत पुढार्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या छापण्याचे सौभाग्य वृत्तपत्रांना प्राप्त झाले असते. पण तसे होताना दिसत नाही. नोकरदार वर्गामध्येही दारूचे प्रचंड प्रमाण आहे. दारू पिल्यानेच जर आत्महत्या झाल्या असत्या तर आतापर्यंत कलेक्टर कचेर्‍या, तहसील ऑफिसेस ओस पडायला पाहिजे होत्या. पण तसेही झाले नाही. ग्रामीण भागापेक्षा शहरी उच्चभ्रू वर्गात दारूचे प्रमाण वाढले आहे. परंतु तेथेही आत्महत्या नगण्य आहेत. परंतु शेतकरी दारू पितात म्हणून आत्महत्या करतात असे म्हणताना म्हणणार्‍यांची जीभ मात्र गळून पडत नाही.

लग्नामध्ये खर्च सर्वाधिक कोठे होतो ते आपण पाहतो. परंतु त्यांनी लग्नात खर्च खूप केला म्हणून ते कर्जबाजारी झाले व त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली असाही आपला अनुभव नसतो. परंतु शेतकर्‍यांच्या बाबतीत, 'ते आपल्या मुलामुलींच्या लग्नात खर्च करतात' म्हणून त्यांच्यावर आत्महत्येची पाळी येते असे म्हणताना उचलली जीभ आणि लावली टाळूला असा प्रकार सर्रास घडतो.

मला आठवतं ऑक्टोबर 2005 मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा दौरा विदर्भात होता. आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी ते भारतभर फिरत होते. त्यांच्या कामाचाच भाग म्हणून ते विदर्भात आपल्या ताफ्यासह आले होते. या दौर्‍यात ते शेतकर्‍यांना शेती संशोधन केंद्रांना, कृषी केंद्र, कृषी विद्यापीठांना भेटणार होते. त्यांच्याशी बोलणार होते. त्यातच त्यांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांच्या काही घरांना भेट द्यायचा मानस व्यक्त केला. आणि अधिकार्‍यांच्या कपाळावर आठी पडली. पण राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या अध्यक्षांचा निर्णय टाळणे अधिकार्‍यांना शक्य झाले नाही.

वर्धा जिल्हय़ातील आष्टी या गावी प्रभाकर कठाळे या 35 वर्षीय शेतकरी तरुणाने आत्महत्या केलेली होती. त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांचे सांत्वन करावे, त्यांच्याशी बोलावे असे आयोगाने ठरविले. राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष, आयोगाचे सदस्य, अधिकारी, पत्रकार असा 30-35 गाडय़ांचा ताफा. त्या ताफ्यात पत्रकार या नात्याने मीही होतो. ताफा आष्टी गावाच्या दिशेने निघाला असतानाच कोणीतरी बातमी दिली, ज्या प्रभाकर कठाळेनी आत्महत्या केली म्हणून त्याचे वडील श्यामराव कठाळे यांचे सांत्वन करण्यासाठी आयोग निघाला होता. त्याच श्यामराव कठाळेंनीसुद्धा दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. एकूण परिस्थिती सुन्न करणारी होती. तरीदेखील आयोग आपल्या ताफ्यासह आष्टीला कठाळेंच्या घरी पोहोचला. शेतकर्‍याचं घर किती मोठं असणार? त्यामुळे बर्‍याच जणांना घरात उभं राहण्यापुरतीही जागा नव्हती म्हणून बरीच अधिकारी मंडळी बाहेरच घोळका करून उभी होती. त्याच घोळक्यात मीही उभा होतो. अधिकार्‍यांची चर्चा सुरू होती. त्यात एका अधिकार्‍याने मुद्दा मांडला, 'जर डॉ. एम.एस. स्वामीनाथनसारखा राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अध्यक्ष, ज्याला कॅबिनेट मंर्त्याचा दर्जा आहे, असा माणूस आत्महत्याग्रस्त घराला भेट देत असेल तर इतर शेतकर्‍यांनासुद्धा आपण आत्महत्या केली तर अशीच मोठमोठी माणसे आपल्या घराला भेट देतील असे वाटून आत्महत्येची 'प्रेरणा' मिळणार नाही का?'

अधिकार्‍याचा मुद्दा ऐकूनच मी चक्रावलो. मेल्यानंतर कोणीतरी मोठा माणूस आपल्या घरी भेट देईल म्हणून कोणी आत्महत्या करतो? शेतकरी आत्महत्येची ही प्रेरणा होऊ शकते? मेल्यानंतर लाख रुपये मिळतात म्हणून शेतकरी आत्महत्या करतात हे बर्‍याच अधिकार्‍यांच्या तोंडून ऐकलं होतं. त्याच्या पलीकडे संताप व चीड आणणारा नवीनच मुद्दा आता ते अधिकारी मांडत होते. मला ओळखणारे तेथे कोणीच नव्हते. मी 'पत्रकार' आहे हे त्यांना माहीत नव्हते. म्हणून ते 'निर्भीड'पणे बोलत होते. शेतकरी आत्महत्येची टिंगलटवाळी करीत होते. अखेर माझ्याने राहावले गेले नाही.

आत्महत्येला 'प्रेरणा' मिळणार नाही का? हा मुद्दा मांडणार्‍या अधिकार्‍याच्या खांद्यावर हात ठेवत 'मी एका मोठय़ा वृत्तपत्राचा संपादक आहे' असा परिचय करून देत मी म्हणालो, 'आपल्या मृत्यूनंतर कोणीतरी मोठा माणूस आपल्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी येईल या 'प्रेरणे'तून शेतकरी आत्महत्या करणार नाही का? हा मुद्दा मला आवडला. पण तुम्ही सर्व जिवंत आहात. कारण तुम्हाला आत्महत्या करण्याची 'प्रेरणा' अजूनपर्यंत कोणी दिलेली दिसत नाही. पण मी तुम्हाला ती देतो. तुमच्यापैकी कोणीही आत्महत्या करणार असेल तर तुमच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी या देशाच्या पंतप्रधानांना आणण्याची जबाबदारी माझी. हे वचन मी तुम्हाला देतो. ही 'प्रेरणा' घेऊन तुमच्यापैकी कोण आत्महत्या करायला तयार आहे?

कोणीच काही बोलले नाही. थोडय़ा वेळाने मीच म्हणालो, आत्महत्येसाठी ही 'प्रेरणा' पुरेशी नसेल तर वर तुमच्यापैकी कोणीही आत्महत्या करणार असेल तर त्याला 1 कोटी रुपये देण्याची मी व्यवस्था करतो.

त्या अधिकार्‍यांच्या टोळक्यातील कोणीही आत्महत्येस तयार झाले नाही.

मृत्यूनंतर 'पैसा' मिळेल. मृत्यूनंतर कोणीतरी मोठा माणूस कुटुंबाला भेट देईल, त्यातूनच 'प्रतिष्ठा' मिळेल म्हणून कोणी आत्महत्या करीत नसतो हे सर्वाना चांगलं माहीत आहे. 'शहाण्यांना तर अधिकच चांगलं माहीत आहे. तरीदेखील हेच 'शहाणे' शेतकरी आत्महत्येची टिंगलटवाळी करतात. जिवंतपणी शेतकर्‍याला कोणी चांगलं म्हटलं नाही. मेल्यानंतरही त्याचा पिच्छा सोडत नाहीत. मेलेल्या शेतकर्‍यांची किमान माती खराब करू नये हेही 'शहाण्यांना' समजत नसेल का?

शेतकर्‍यांचा इतका दुस्वास का व कशासाठी? गेल्या 15 वर्षात पावणेतीन लाख शेतकरी आत्महत्या करतात पण देश हालत नाही. कोणाचं मनही पाझरत नाही. पण का? देश महासत्ता बनणार अशा आवया मधूनमधून उठत असतात. ते ऐकून गुदगुल्या होणारेही या देशात कमी नाहीत. देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि शेतकरी मात्र मोठय़ा प्रमाणावर आत्महत्या करतो आहे. आतापावेतो पावणेतीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या करूनसुद्धा हा देश महासत्ता बनला नाही. अजून किती मोठय़ा प्रमाणावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या म्हणजे हा देश महासत्ता बनेल? एकूणच शेतकर्‍यांच्या मरण्यातच या देशाची महासत्ता आहे का? शेतकर्‍यांना आत्महत्या करायला लावणारी महासत्ता या देशात येणार आहे का? शेतकर्‍यांचे मरण हेच सरकारचे धोरण हे आतापर्यंत ऐकून होतो, परंतु जागतिकीकरणानंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्येतच देशाची 'महासत्ता' दडली आहे की काय अशी शंका आता यायला लागली आहे. अन्यथा एका बाजूला शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या तर दुसर्‍या बाजूला 'महासत्ते'चे ढोल सोबत सोबतच वाजले नसते.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहे.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment