Tuesday 10 July 2012

नात्यागोत्याचा कोतेपणा आन् मोठेपणा


नात्याचे दोन परकार. एक म्हंजे रगताचे नाते आन् दुसरे पिरमाचे. रगताच्या नात्याचं कसं असते, त्याले 'पर्याय' नसते. असते म्हंजे असते. यासाठी मले माह्या कवितेच्या दोन ओयी आठोते..

नाई तुह्यारे हातचं । सारा वरचा लावते

ज्याच्या पोटी जल्मसीनं । त्याच्या भाऊ काका होते

थो सारखा असूनयी तुमची सदान्कदा मठारत राह्यते. वरतून गोडगोड बोलून आतून काडय़ा करत राह्यते. अस्या मानसाले काका म्हणवं वाट्टे का? बरं कोनाले सांगताना असयी नाई सांगता येतं का आमाले पाण्यात पायनारा आमच्या बावाजीचा भाऊ होय म्हून? नाई सांगतानी असंच सांगा लागते का आमचे काका होत ना! रगताचे नाते हे गम्फलासच्या पट्टीवानी चिपकून असतेतं मेल्यावरयी.

कुठी कुठी नसिब कसं मार खाते पाहा. माही माय होती कानी ते जवा तिच्या मायच्या पोटात होती. कानी ते आजीचं पह्यलं बायतपन. माही माय पैदा झाली आन् पंधरा दिसानं आमची आजी मेली. झालं, आजी नातवाच्या नात्याले तवाचं फुली बसली. बरं, आजीचं थे पह्यलचं बायतपन असल्याच्यानं आमाले सख्खा मामा नाई आन् मावशी नाई. हावो का नाई

फुटक्या नसिबाचा? या दोन नात्यांची सर कायलेचं नाई येत. उगीचं नाई म्हनतेका 'माय मरो पन मावसी जगो.' माह्या दोस्त रघू लेकाचा लयंच आगाऊ. थो म्हने, ''हे आपल्या बापाची सोय न्हावं म्हून कोनी तरी घुसवलं असंनं.'' रघू असाचं हाय लेकाचा. गंमत जरी बाजूले ठुली खरं सांगू या नात्याले तोडचं नाई पन ते नात्याले जागले तं! आमच्या थ्या आबाजीनं दुसरं लगन केलं. मायले भाऊ झाला, पन पुढ मायचं लगन झाल्यावर्त तो कवाचं बोरीले नाई आला. बहनीलेचं नाई हुंगलं ते आमी कोन? सावतरा परीस निपटार निंघाला. मायचं माहेर खानदेशातलं. माय कॅन्सरनं बिमार असतानी योगायोगानं तिथचा कार्यकरम आला. मी त्याले जाऊन भेटलो. म्हनलं, ''मामा, इतले वर्स नाई आलात हरकत नाई, पन आता आखरीच्या भेटीले तरी ये.'' त्यानं ''हो'' म्हनलं. पन माय गेली तरी आला नाई पन तरी मामा म्हनाचं लागते कानी?

मानसं जोडावं कसे हे मायच्याकून सिकन्यासारकं होतं. तेयी नाटकीपनानं नाई तं आपलेपनानं. आपलेपनातून तयार झालेलं नातं अम्रीत पिऊन येते. ते अतूट असते. मायले माय नोती, पन तिले सापडलेली माय म्हंजे आमची आजी. तिले आमी नानी म्हनो. हिंदी भासेवाले मायच्या मायले नानी म्हंते ना म्हून ते आमची नानी. नानीनं कवा आमाले आजीची आठोनचं येऊ देल्ली नाई. नानीले एकचं पोरगं जानी. थो आमचा मामा-जानी मामा. आखरीपावतर मामा कुठी कमी पडला नाई. आमच्या घरच्या हरेक लगनात मामाचा आहेर, आंदन नाई असं कवा झालं नाई. मायचं निसटलेलं माहेर नानीच्या आन् मामाच्या रूपानं पाठीशी उभं राह्यलं. तुकाराम मामा, गुना मामा, दगडू मामा, तोताराम मामा असे एकाच्या जागी पाच, मामाचं पिरेम आमाले भेटलं. मी कालेजात सिकत असताना अवचित मंधातचं बोरीले दुपारी आलो तं माय सयपाकाची वक्ता नसतानी मले पुरनपोयी करतानं दिसली. म्या मायले म्हनलं, ''आज कोनता सन हाय म्हून तू पुरनपोया करून राह्यली?'' त्याच्यावर्त माय म्हने, ''बाबा, सन कोनताचं नाई. काल मी तुझ्या गुना मामाले भेटाले गेली होती. मयन्याच्या वरं झालं त्याची तब्यत सुदी नाई. दवापानी चालू हाय, पन ताप उतराचं नावचं नाई घेत. तोंडाची चवचं गेली त्याच्या. म्या काल त्याले इचारलं. काई खावं वाट्टे का दादा? त्याच्यावर्त तो म्हने, तुया हातची पुरनपोयी खाईन म्हंतो. कायची धकतेरे त्याले, पन मन जाते अस्या वक्ती. आवडीच्या गोठीत म्हून करून राह्यलो त्याच्यासाठी पुरनपोयी.''

''बाबा वापेस यवतमायले जाच्याआंधी आठोनीनं मामाले भेटून जाजो बरं.'' ''तुवा सांगतल्यावर मले मामाले भेटल्याबिगर गमन का मा?'' जीव गुतने याले म्हंते! त्यासाठी रगताचंच नातं नाई लागतं. भावाभावाच्या नात्याचं एक अजब रसायनं असते. एक भाऊ भावासाठी जीवाची पर्वा करतं नाई तं दुसरा भाऊ भावाच्याचं जीवावर्त उठते. जे पह्यलेपासून चालत आलं तेच चालवून राह्यलो आपनं. सुईच्या अनीवर राईन इतकी जमीन देनार नाई असं ठासून सांगनारे कौरव याचं मातीतले आन् आयतं भेटलेलं राज्य हे माह्य नोय म्हून रामाले वापेस कराले जानारा भरतयी याच मातीतला. दोघयी एकमेकांचे भाऊचं. पन या आन् त्या भावाभावाच्या वागन्यात जमीन असमानाचं अंतर. माझं एक ओयखीचा सोबती हाय. भल्यामोठय़ा पगाराच्या नवकरी हाय त्याची. त्याचा मोठा भाऊ खेडय़ावर्त शेती वाह्यते. दोघांची मियून दहा एकर कोरडवाहू वावरं. यानं आपला पाच एकराचा हिस्सा त्याच्याच पासी ठुला हाय. त्याच्यातून कवाचं काई मांगत नाई. उलट बरसातीत येऊन बी, बियाने, खताची मदत करते. हरेक दिवायीले तिकडून येऊन या घरी दिवायी साजरी सारे मियून करतेत. दरखेपी येतानी सार्‍यायले नईन कपडे आनल्याबिगर राहत नाई. भावाचा पोरगा त्यानं आपल्यापासी सिकाले ठेवला हाय. त्या दिसी भेटला तं म्हने, ''दादाचा पोरगा तं माह्या पोरासंग सिकून राह्यला. दोघयी हुशार हाय. त्यायची कायी कायजी नाई, पन दादाची पोरगी लगनाले येऊन राह्यली. बस्स, तितकीचं कायजी हाय. बस्स, ते निपटलं का टेन्सनं खलास.'' पोरगी भावाची, टेंसन याले.. याले म्हन्ते भाऊ.

माह्य लगन होऊन दोनेक वर्स झाले असंनं तं आमच्या बोरीले सरकारी डाक्टर म्हून डॉ. सुधाकर पुरी आले. पह्यले त्यायची ओयख झाली. मंग बोलन्यात एक समजलं का कालेजपासून त्यायले नाटकात काम कराची हौस आन् मलेयी नाटकाची आवड. त्याच्याच्यानं आमची जरा घसट वाढत गेली आन् त्या दोघा नवराबायकोनं माह्यावर मायेचं पांघरून घालत त्यायच्या घरचा मेंबर कवा करून टाकलं माहा मलेयी समजलं नाई. माह्यासाठी ते दादा आन् त्या वैनी झाल्या. माहातं. बॅकलॉगचं भरून निंघाला. देर-भावजयीच्या नात्यातल्या गमतीतली मिठास आन् लहान भावावानी कायजीतं वयनी अजूनयी जपून हायेत. आता तं दादाले जाऊन चार सालं झाले, पन होते तवरीक हरेक घडीले मले आधार देत राह्यले. ते बोरीले दहा वर्स होते तवा तं त्यायची सावली होतीचं, पन मंग त्यायची नेरले बदली झाली आन् मले बोरी सोडा लागली. ते नेरवून यवतमायले यायचे, भेटाचे. ते यवतमायले बदलून आले तवा पोरं मोठे झाले होते. दोन्ही पोरीयच्या पोरगा पाहन्यापासून तं लगनापावतर दादाचं पाहाले. पोराच्या नवकरीच्या वक्ती दिवसातून सात खेपा फोन.''यांना भेटला का? तमके काय म्हनतं होते?'' हाती आरडर मियेपावतर त्यायले चैन नव्हती. पिरमाच्या नात्यातला घटपना लय हिंमत देते भाऊ.

माय गेली त्या वक्तीचा परसंग आठोला का अजुनयी मन सुन्नं होऊ न जाते. माय गेली त्या दिसी तं जानी मामा होताचं, पन तिसर्‍या दिसी सावडाले जातानी जानी मामा आन् त्याचा पोरगा शफी होता. आमी नदीच्या पात्रात त्या ठिकानी गेल्यावर्त पूजापाती झाल्यावर्त पानी सिपडून सारे सावडाले लागल्यावर माह ध्यान गेलं मामा आन् शफी दोघयी सावडूनं राह्यले. म्या जानी मामाकडं पाह्यलं तं त्याचे डोये आसवानं डबडब. मनात आलं यायच्यात तं हा रिवाज नस्ते तरी जानी मामा बहिनीची आखरीची बिदाई कराले आलाचं. पिरमाचं नातं धरम वलांडून कायजात घुसून बसतं असंनं का लेक ?

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

पेशवे प्लॉट, यवतमाळ

भ्रमणध्वनी - 9420551260

No comments:

Post a Comment