Sunday 8 July 2012

झपाटलेपण

जग हे अद्भुत विविधतेने भरलेले आहे. काही भौतिक गोष्टीत साम्य असले तरी मानवी मन मात्र, विविधतेने भरलेलं आहे. आपापल्या विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवून इथं जन्माला आलेला माणूस जगत असतो आणि प्रत्येक माणसाचं आंतरिक आणि सामाजिक विश्व असतं. त्याच्या भोवतीच्या समाजव्यवस्थेने घालून दिलेल्या नियमावलीचा अंकुश त्याच्या आंतरिक विश्वावर नियंत्रण ठेवत असतो. परंतु कधीकधी हे अंतर्मन बाह्य वातावरणाच्या विरोधी उद्रेक करून लढतं. त्यासाठी मग कायद्याच्या आणि दंडसंहितेच्या माध्यमातून त्याला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो.

कधीकधी अंतर्मनात आणि बाह्य मनात असलेल्या विसंगतीचा ताण असह्य होऊन काहींना मग वेडही लागू शकतं. म्हणूनच असं जगत असताना उंबरठय़ावरचं जगणं हे सुवर्णमध्य साधण्याचं कार्य करतं. हा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. त्यातून आपलं जगणं अर्थपूर्ण केलं पाहिजे. या अर्थाचा 'उंबरे या विरत्माचा' दृष्टांत खूप महत्त्वाचा संदेश देऊन जातो. त्यातून जगण्याविषयीचं तत्त्वज्ञान, पण फारच सोप्या पद्धतीने सांगितलेलं दिसून येतं.

चक्रधर स्वामींनी आपल्या भटकंतीत खेडय़ापाडय़ातील लोकांना अशा उदाहरणाच्या माध्यमातून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. भुईमातीशी निगडित शेतीकाम करणार्‍या तत्कालीन गावखेडय़ातील लोकं ही आजच्या जागतिकीरणातील भांबावलेल्या समाजासारखे गोंधळून गेले होते. मात्र हा गोंधळ लौकिक-पारलौकिक जगण्यासंदर्भातील होता. मृत्यूनंतरच्या मोक्षप्राप्तीच्या प्रश्नासंबंधीचा होता. मृत्यूनंतरच्या मोक्षप्राप्तीच्या प्रश्नासंदर्भातील होता. कर्मकांडाचे स्तोत्र गाजलेले होते. संस्कृती ही ज्ञान भाषा होती आणि तिचे कर्तेधर्ते लोकभाषेचा, आणि ती बोलणार्‍यांचा धिक्कार करीत होते. त्यांना हिणवले जात होते. स्त्रियांची आणि कष्टकर्‍यांची भाषा ही हीन दर्जाची आहे. अशा अर्थाचे अनेक संस्कृत लोक प्राचीन वाङ्मयात, मनुस्मृतीत आढळून येतात.

ज्यांच्या कष्टावर हा पुरोहित वर्ग जगत होता. ज्यांच्या घामातून निर्माण झालेले धनधान्य धूर्तपणे लाटत होता. त्यांनाच ज्ञानक्षेत्राच्या, धर्मक्षेत्राच्या बाहेर ढकलून देण्याचे काम करीत होता. त्यामुळे आपल्या या जन्मातून आपल्याला काहीच साध्य होणार नाही. असा समज निर्माण होऊन कष्टकरी समाजाचा भ्रमनिरास होत होता. या काळात वर्णव्यवस्थेचा आणि स्त्री-पुरुष विषमतेचा धिक्कार करीत अतिशय साध्यासोप्या भाषेत, प्रसंगी लोकमनावर त्वरित प्रभाव पडावा म्हणून चमत्कृतीचा आधार घेऊन, पण वास्तव्याच्या भुईवर घट्टपणे पाय रोवून चक्रधर स्वामी आणि त्यांचा शिष्य परिवार समाजमन घडविण्याचे कार्य अतिशय नेटाने करीत होता. त्यामुळे ते ज्या ज्या गावी जात त्या त्या गावचे स्त्री-पुरुष त्यांच्या तत्त्वज्ञानाने आणि अमोघ वर्णनशैलीने झपाटून जात असत हे 'लीळाचरित्रा'वरून कळून येते.

जगण्याचा समतोल साधला जावा अशी शिकवण तशी प्रत्येकच संतकवींनी आपल्या लेखनातून दिली आहे. कधी ती आकलनाच्या दृष्टीने गहन वाटते. कधी सोपीसरळ पण गृहस्थ म्हणून घरात वावरणार्‍या माणसाला जगण्यातील सुवर्णमध्य साधताना उंबरे या विरत्माचा दृष्टांत जो संदेश देतो, त्याच्या अर्थाच्या भोवती आस्वाद पातळीवर संस्मरणीय अनुभूती येते.

घरातु असे आतुल सकळी पदार्थ देखे: परि बाहीरिल काहींचि न देखे!

बाहीरि असे तो बाहीरिल सकळै देखे: परि आतुल काहीचिं न देखे!

उंबरेयावरि जो असे तो आतुल सकळै पदार्थ देखे: आणि बाहीरिल सकळै पदार्थ देखे!

केवळ तीनच अल्पाक्षरी प्रसंग चित्रणातून येथे अवघ्या मानवी जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. नव्हे, माणसाने आपल्या जगण्यात कसा सुवर्णमध्ये साधावा यावर तात्त्विक भाष्य केले आहे.

जयराम उमाळेकडे बापजाद्याचं दहा एकर शेत होतं, पण त्या शेतात त्याचं मन रमत नव्हतं. रोजची उठायटक. पावसाळ्यात शेत पेरताना कर्जाऊ पैसा काढा, जोडजमाव करून शेत पेरा, त्यात हंगाम हाती येण्याची शाश्वती नाही. कधी मुगावर एखादा रोग पडायचा तर कधी चिकटवा. फवारणी करण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढा, मुगाच्या शेंगा तोडताना पुन्हा भयानक वाढलेले तोडाईचे भाव. त्यामुळे एकरी कसेबसे दोन-तीन पोते मूग व्हायचे. तर त्यातल्या एका पोत्याच्या विक्रीची किंमत मुगाचे शेत तयार करण्यात आणि शेतमाल घरी आणण्यातच जायची.

जशी मुगाची अवस्था. तसंच सोयाबीनचेही आणि तूरही. पेरलं तर पिकत नाही, पिकलं तर विकत नाही. त्याच्या भावाचं वाटणीचं पाच एकर शेत गालफाडे मास्तरने विकत घेतलेलं. नवरा-बायको दोघेही नोकरीला. हौशीसाठी शेत खरेदी केले, पण सालसाली शेताची किंमत वाढतच चालली. पाच वर्षाआधी एक लाख रुपये एकराने विकत घेतलेलं शेत आता पाच लाख रुपये एकरात झालं होतं.

मास्तर-मास्तरीण हिरो होंडावर बसून फेरीसाठी शेतावर यायचे. बांधावर उभं राहून आपली बटाईनं दिलेली शेती बांधावरूनच करायचे. त्यांचं झकपक राहणं, अंगावरचे कपडे, ढुंगणाखालची हिरो होंडा पाहून जयराम उमाळे झुरणी लागायचा.

''तुमचं मस्त हाये मास्तर, झकपक राह्यता, मनासारखं खाता येते, मनासारखं लेता येते, आमचं तं काईच खरं नाई. सदानकदा सारखं मन मारून जगा लागते. मनाची एकबी कामना पुरता करता येत नाई. कामना आली की दडपली, आलीवर की देलाच तिच्यावर पाय, काईच खरं नाई माह्या जिंदगीचं.''

'आम्ही असं जगतो याचं कारण आहे जयरामबुवा, अन् आम्हाला कशाला झुरता, आमच्या सारखंच तुम्हालाही जगता येऊ शकते. तुम्ही मनात विचार आणला तर!'

'' कसं काय बाप्पा? मले कुठी या वयात नवकरी लागणार हाये, मी कुठी तुमच्या एवढा शिकेल सवरेल हाये ? मले कसा काय भेटंल तुमच्यासारखा मह्यन्याचा मह्यन्या पगार?''

''भेटू शकते''

''कसा काय पण?'' सांगसाल त सई? आशी गुळणी धरून काहून बसता''

तुम्ही हे पाच एकर वावर पाच लाख रुपये एकराच्या भावानं इकून टाका. पंचवीस लाख रुपये येतील. त्याचं बॅंकेचं व्याज महिन्याचं पंचवीस हजार रुपये येते. मस्तपैकी बॅंकेत जायाचं. महिन्याच्या महिन्याला पंचवीस हजार रुपये पगार झाल्यासारखे काढून आणायचे, ही रातंदिवसाची झगझग नाही की, मरमर नाही.. तुमच्या जवळ सोन्याचं भांडं आहे, पण तुम्ही सोन्याच्या ताटात भीक मागता..'

मास्तरचं बोलणं ऐकून जयराम उमाळे झपाटून गेला. त्याचा विचार घेऊन सल्ला विचारण्यासाठी माझ्याजवळ आला. मास्तचं गणित बरोबर होतं. त्याची धुर्‍याला धुरा लागून दहा एकर सलग जमीन होणार होती. मी मास्तरच्या 'कावा' जयराम उमाळेला समजावून सांगितला. म्हणालो,

'जयरामा आज ज्या जमिनीचे भाव पाच लाख रुपये एकर आहेत. पुढच्या वर्षी सात लाख होतील. त्याच्या पुढच्या वर्षी दहा लाख अन् तीन वर्षानी तर तू एक कोटी रुपयाच्या संपत्तीचा मालक होशील. नाही करायची शेती तर करू नको. कुठं रोजमजुरीनं जाऊन त्यात घरखर्च भागव अन् उदास विचार मनात यायला लागला की, फक्त मी कोटय़ाधीश हाये, मले काई कमी नाई.. असा विचार मनात आणून पाहा. तुझ्यावरच फक्त आठ दिवस हा प्रयोग करून पाहा, अन् आठ दिवसांनी कोणते विचार मनात येतात, हे येऊन मला सांग!'

''बरं, काई हरकत नाई.. तसंच करतो'' असं म्हणून तो गेला.. मी वाट पाहतोय आठ दिवसांनी मी लावलेल्या बिजाला अंकुर येतो की नाही त्याची!

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', 'तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

जाणेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

No comments:

Post a Comment