Monday 9 July 2012

दैववादाच्या चोरवाटा



हीघटना सुमारे चाळीस वर्षापूर्वीची. माझा एक विद्यार्थी इरबा रोडे खूपच आजारी पडला होता. मी मुद्दामच त्याला अंबेजोगाईच्या शासकीय दवाखान्यात पाठविले. तिथून तो पाचसहा दिवसांनंतर परतला तो रडतच. मी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, ''तेथील डॉक्टरने औरंगाबादच्या सर्जनच्या नावे चिठ्ठी दिलीय.'' त्याला औरंगाबादला जायचे होते. आपणाला खूप मोठा आजार झाला असावा या धास्तीनेच तो रडू लागला. मी त्याची समजूत घातली. औरंगाबादच्या ज्या सर्जनच्या नावे चिठ्ठी दिली होती ते औरंगाबाद येथील अतिशय प्रसिद्ध सर्जन होते. त्याला प्राचार्यांकडे नेले. त्या वेळी प्राचार्य डॉ. स. रा. गाडगीळ होते. प्रश्न थोडा खर्चाचाही होता. 23 महिन्यांची शिष्यवृत्ती अँडव्हान्स म्हणून द्यावी अशी विनंती केली. त्याप्रमाणे त्याची व्यवस्था केली. सोबत एकदोन विद्यार्थी दिले; पण जातानाही तो रडतच होता. आम्ही त्याला औरंगाबादला निरोप देऊन पाठवले. तो पोरका होता. त्यास जवळचे असे सख्खे कुणीच नव्हते. इरबा गेला. सातआठ दिवसांनंतर त्यास ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आणि अतिरिक्त रक्तस्नवामुळे इरबाचा टेबलावरचा मृत्यू झाला. औरंगाबादसाठी निरोप घेऊन गेलेला इरबा आम्हा सर्वाचाच कायमचा निरोप घेऊन गेला. या बातमीने मला जबरदस्त धक्का बसला. अखेर त्याचे पाचसहा मित्र घेऊन मी औरंगाबादला आलो. शवागारामधून इरबाची डेडबॉडी मिळवली आणि खाम नदीकाठी त्याला अग्नी दिला. माझे विद्यार्थी शोकाकुल झाले होते. पण एवढय़ा प्रख्यात सर्जनने त्याचे ऑपरेशन केले आणि तरीही इरबा गेला कशामुळे? या एकाच प्रश्नामुळे मी पुरेसा अस्वस्थ होतो.

अंत्यविधी आटोपल्यावर मी डॉक्टरांना भेटायला गेलो. तो काळ वैद्यकव्यवसाय सेवेसाठीच असतो असे समजण्याचा होता. डॉक्टरांनी मला तत्काळ त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले. माझे हात हाती घेऊन डॉक्टर काहीच न बोलता स्तब्ध होते. त्यांचेही डोळे पाणावले होते. मी न राहवून विचारले, ''डॉक्टर! नेमकं काय झालं होतं?'' डॉक्टरांनी सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, ''इरबाची तब्येत अतिशय चांगली होती. जे ऑपरेशन करायचे होते तेही अजिबात गुंतागुंतीचे नव्हते. मी अशी अनेक ऑपरेशन्स केली आहेत. त्याला टेबलावर घेतले आणि त्याच्या पोटावरून शस्त्राची रेषा ओढताच जो रक्तस्नव झाला तो अतिशय अनावर होता. आम्ही 45 रक्ताच्या बाटल्याही चढवल्या; पण उपयोग झाला नाही.'' डॉक्टर क्षणभर थांबले. पुढे ते म्हणाले, ''आपल्या पोटात निरनिराळे बारीक मोठे खूप अवयव असतात. प्रत्येक अवयवांचे कार्य व्यवस्थित चालावे म्हणून निसर्गानेच प्रत्येक अवयव अतिशय पातळ पॉलिथिनसारख्या पारदर्शक आवरण पांघरूण एकमेकांपासून वेगळे ठेवलेले असते आणि या सर्वच अवयवांना पोटाच्या जाड आतडय़ांपासून वेगळे ठेवावे म्हणून पुन्हा चरबीचे पारदर्शक आवरण असते. या आवरणाला धक्का न लावता पोटाची आतडी उघडावी लागते. म्हणजे ज्या अवयवाची शस्त्रक्रिया करायची तेवढाच अवयव बाजूला घेऊन आम्ही शस्त्रक्रिया करीत असतो. इरबाच्या पोटाच्या आतडय़ाशी पोटातील सर्व अवयवांवर आवरण असलेली पातळी पारदर्शक पिशवी एकजीव झालेली होती. अर्थात, हा अपवाद होता. असे अगदी लाखात एखाद्याच पेशंटबाबतीत घडते. त्यामुळे पोटाचे आतडे रेषा ओढताच ते आवरण फाटले.'' डॉक्टर क्षणभर शांत झाले. अपराधी भावनेने त्यांचा चेहरा काहीसा मलूल झाला होता. ते म्हणाले, ''तो अपवाद घाताला कारणीभूत ठरला.'' पुन्हा शांत होऊन ते म्हणाले, ''इरबा पोरका होता हे मला माहीत होते. इतकेच नाहीतर तो माझ्याही दूरच्या नात्यातला होता; पण तो अपवाद मलाही त्या वेळी गृहीत धरता आला नाही.'' डॉक्टर खोटं बोलत नव्हते; पण इरबाचं असं धक्कादायक निघून जाणं माझ्यावरही खूप परिणाम करून गेलं. निसर्गानं माणसाचं शरीर बनवताना इतकं सारखेपणानं घडवलं आहे की, त्यामुळेच शल्यचिकित्सा निरपवादपणे होत असते. एक शरीरशास्त्राची उभारणी होते. हे शास्त्र निसर्गाच्या शक्तीलाही आव्हान देत उभं आहे. असं असलं तरी मृत्यू कुणाला चुकत नाही हे मात्र खरं. इरबा जाताना औरंगाबादसाठी निरोप घेऊन गेला. पण त्यानं आम्हा सर्वाचाच कायमचा निरोप घेतला. यामुळे आणखी एक आघात माझ्या काळजावर झाला. शास्त्र आणि नियमांना धक्का देऊन माणसाला नामोहरम करण्यासाठी निसर्गानं अपवादाचा हातचा एक राखून ठेवला होता. प्रत्येक सर्जरी करताना डॉक्टर त्या अद्भुत शक्तीपुढे हात जोडूनच ऑपरेशन थिएटरमध्ये का जात असावा याचं कोडं उलगडलं. माझ्या मुलाला दोन वर्षापूर्वी जबरदस्त अपघात झाला. औरंगाबादच्याच प्रख्यात सर्जनने त्याचं ऑपरेशन केलं. पण ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी ऑपरेशन थिएटरच्या दर्शनी भागात लावलेल्या गणपतीच्या प्रतिमेला डोळे मिटून नमस्कार करून ते आत गेले. हे सर्जन म्हणजे माझे मित्र डॉ. रंजलकर. ऑपरेशन गुडघ्याचे होते. 23 तास चालले. थिएटरमध्ये पेशंटला नेताना त्यांनी मला धीर देताना सांगितलं, ''अतिशय किरकोळ ऑपरेशन आहे.'' माझा मुलगा त्यातून बरा झाला. अगदी पूर्ण बरा. पण 23 महिन्यांनंतर त्यांनी माझ्या मुलाला सांगितले, ''ऑपरेशन अवघड होते. वाटीखाली असलेली महत्त्वाची नस तुटली होती; पण त्या वेळी मी कुणालाच बोललो नाही. तुला व्यवस्थित हिंडता-फिरताना पाहून मला स्वत:लाच खूप आनंद होतो.'' इथे एका सर्जनला यश मिळालं. तिथे एक सर्जन पराभूत झाले होते. पण मला माझ्या मुलाच्या ऑपरेशनच्या वेळी इरबा आठवला होता. अगदी 30-40 वर्षानंतर आपल्या शरीरातले अपवाद ही निसर्गाची एक राखीव निर्मिती आहे. हे अपवाद नुसते शास्त्राच्या अभ्यासावर आघात करतात असं नाही, तर तुमच्या बुद्धिवादावर आणि ज्ञानाच्या अहंतावरही आघात करतात. जोपर्यंत हे आघात विघातक ठरत नाहीत तोपर्यंत त्याचे आपणाला काहीच वाटत नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. एखाद्याच्या हाताला पाचऐवजी सहासहा बोटे असतात; पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हाही अपवादच. पण अत्यंत निरुपद्रवी अपघात. पण एखाद्याचे हृदयच डाव्या बाजूला असण्याऐवजी उजव्या बाजूला असणे हा अपवाद. तो मानून जोपर्यंत निरोगी आहे तोपर्यंत निरुपद्रवी. पण एकदा का त्याला गंभीर आजार झाला, तर डॉक्टरला विशेष काळजी घ्यावीच लागते.

आपल्या घरात एकाएकी लहान मुलाला सणाणून ताप भरतो. म्हातार्‍या बायका त्या मुलाला दृष्ट लागली असे सांगून त्यावर उतारा करतात. अतिशय शिकलेल्या कुटुंबातसुद्धा असे घडते. डॉक्टरकडे गेले की, ते सांगतात, काळजी करू नका. व्हायरल इन्फेक्शन आहे आणि एकदोन दिवसांत मूल हसूखेळू लागते. खरेतर एकाच वातावरणात आणि सारख्याच वयाची मुलं एकत्रित खेळताना व्हायरल इन्फेक्शन आपल्याच मुलाला का व्हावं, असाही एक अस्वस्थ करणारा प्रश्न आपल्या मनात येऊन जातोच. त्याचं शास्त्रीय उत्तर असं, की मुळात शरीरातच एक प्रतिकार करणारी अतिशय समर्थ यंत्रणा असते. ती अशा व्हायरल इन्फेक्शनविरुद्ध क्रियाशील होते आणि औषध न घेताही मूल बरं होतं. पण 'उतारा' केला आणि दृष्ट निघाली असं एक समाधान मात्र सामान्य माणूस मिळवतो. आता पुढचा प्रश्न असा, की शरीराच्या आत असणारी ही प्रतिकारशक्ती मात्र सर्वच माणसांत सारखी नसते. त्यामुळेच एखाद्या दुर्धर आजारातून माणूस बरा झाला, की डॉक्टर म्हणतात, तुमची 'विलपॉवर' जबरदस्त आहे आणि योग्य निदान आणि योग्य औषध चालू असूनही ती जेव्हा लागू पडत नाहीत तेव्हा डॉक्टर म्हणतात, पेशंट औषधाला प्रतिसाद देत नाही. माणसाच्या शरीररचनेतल्या या अपवादाला काय म्हणावे? माणसाच्या विकासाचा इतिहास सुमारे चार ते पाच हजार वर्षाचा आहे. या विकासकामात निसर्गावर विजय मिळविण्यासाठी माणूस अनेक पातळ्य़ांवर लढला. या लढाईत कि त्येकांनी हौतात्म्य पत्करले. म्हणून खरेतर आपण या भौतिक समृद्धीपर्यंत पोचू शकलो. पण असे असले तरी नियतीने असे अनेक अपवाद आपल्या हाती राखून ठेवले आहेत. ज्याचा उलगडा करण्यासाठी माणसांचा संघर्ष चालू आहे. या अपवादाच्या चोरवाटेनेच 'नशीब' आपल्या जीवनात शिरते का? त्यामुळेच निराशेने घेतलेल्या माणसाला दैववादाचा आधार घ्यावासा वाटत असेल? मी दैववादाचे समर्थन करीत नाहीय. माणसे दैववादावर विसंबून राहिली असती, तर झाली एवढी प्रगती कधीच झाली नसती. दैववाद माणसाला निष्क्रिय करतो. म्हणून तो कसा आणि कुठून आपल्या जीवनात शिरकाव करतो हे समजून घेणे म्हणजे दैववादी होणे नव्हे. पण तो सर्व बाजूंनी आणि सर्व सामर्थ्यासह समजून घेणे आपले जगणे अधिक समाधानकारक होण्यासाठी अतिशय आवश्यक आहे असे मला वाटते. जीवनात येणार्‍या दु:खापासून पळून जाऊन आपणाला खरे समाधान मिळू शकत नाही. त्याऐवजी त्या दु:खांना प्रत्यक्ष भिडणे आणि पराभूत होतानाही एक समाधान मिळवणे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असते. कोकणातल्या एका सामान्य कुवतीच्या पतिपत्नीने आपल्या मुलीला झालेल्या अपवादस्वरूप आजाराविरुद्ध किती पराकाष्ठेने झुंज दिली आणि त्या अपयशातही समाधान मिळवले त्यांची कहाणी मी अजूनही विसरलो नाही.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881220084
     

No comments:

Post a Comment