Saturday 6 October 2012

ट्रॅक्टरची पेरणी ..

ट्रॅक्टरची पेरणी ..
दोन रट्टे पाऊस पडले. वावरात वळाणी झाली. चार दिवस पुन्हा पळापळ. बियाण्यांची जुळवा-जुळव ही आता पावसाआधी करावं लागत नाही. सगळं वेळेवरच मशिनवर येते. आता तहान लागल्यावरच विहीर खोदावं लागती. आता पाऊस पडल्यावरच वळण बांधावं लागते. पेरणीही केव्हा करावं लागेल त्याचा नियम नाही. वेळेवर बरसात झाली. मूग-उडीद, बरसात लांबली मूग उडीद कॅन्सल. सोयाबीन, तूर!

पेरणी करण्यासाठी सांगितलेल्या ट्रॅक्टरवाल्याने पन्नास रुपये जादा रेट लावलाच, कारण त्याचे अर्जटचे भाव वेगळे. आरामानं पेरायचे वेगळे. पण आरामानं पेरुन का आपल्याले खापी जायाचं. अशात लेकाचा पाउसही कुठ गायब झाला कळत नाही. त्याचं काही घेणंदेणं नाही म्हणा. पण एक विचार मनात आला म्हणून घोळवून घेतला, एवढंच बाकी काही नाही. तसं घरटय़ात टाकलेल अंडं कोणत्याही पाखराला पाखवा देऊन घोळून बाहेर काढवंच लागतं. नाहीतर ते गंध होतं. खर अंड म्हणजे बियाणंच एक प्रकारचं. पाखराचं उडतं झाड तयार करणारं! दुसरं काय?

इथं कामाचा एवढा धांदरझपका, की विचारांचे काहीच अंडे घोळावे लागतात. बरेचसे गंधे होऊन मचाळून जातात. मचाळू द्यावेच लागतात. नाहीतर मग अंडे तयार करणारा आपला मेंदूच मचाळून जायचा.

मोरानं शेपटीकडचे पंख उचलून हुदडत पुढे पळावं तसा ढुंगणावर पेरणीपेटी, त्याच्याखाली सात लोखंडी फण, पेटीतून फणाच्या भोकात गेलेल्या सात रबरी नळ्या, नळ्याच्या मागे रासण्या मोडणार्‍या आंगीच असणार्‍या वखराची लांबच लांब एकच पास. एवढा सगळा पसारा. हे लटांबर म्हणजे ट्रॅक्टरच्या ढुंगणावरच लोखंडाचे पंख फुटल्यासारखे आणि मोरासारखंच ठूमकत, हुदडत-हुदडत हायड्रोलिकच्या तालावर येणं.

दारातच ट्रॅक्टरची पेटी सोयाबीनच्या बियाण्याने अन् रासायनिक खताने भरुन घेतली.आणखीन आखणीत उभारीचं काय लागणार होतं त्याचे बोचके-बुचके मागेच अँंगलच्या आधार सांगाडय़ावर ठेवून दिले. ड्रायव्हर शेजारी बसलो. अन् चाललो चिकणी नावाचं वावर पेरायला. मांगचे चाकं मोठे, पुढचे लहान. त्याच्यानं ट्रॅक्टर काही सरका-सुदा चालत नव्हता. हुदडद-हुदडत, कुदत - कुदत चालत होता. त्याच्यानं खालचं ढुंगण बुड काही टेकवल्या ठिकाणावर राहत नव्हतं. सारख इकडच तिकडं सरकत होतं. ते पुन्हा ठिकच्या ठिकाणी आणताना कसे नाकीनऊ येत होते. अन् टिंगराचं मास खालून गोल दगडाने ठेचल्यासारख ठोकून निघत होतं.

ट्रॅक्टर पळता - पळता सहज म्हणून पाहिलं, ड्रायव्हरचं बुड काही खालून ठोकल्या जात नव्हतं. कारण त्याला बसण्यासाठी बेरोबर मध्यभागी खुर्ची होती. खुर्चीवर आंगीच कुशन नटबोल्टानं फीट केलेलं तर होतंच पण झवाडच्या हिमकत्यानं उभारीची आणखीन एक नरम उशी बुडाखाली ठेवली होती. कदाचित मूळ रुपात तो तकियाच असेल मोठा. पण बसून - बसून; चेपून चापून अशी उशी झाला असेल. कोणाचीबी अशी दाबदूब करून त्याचा रगडा केल्यावर अशीच चिपटी होणार. यात काय शक? आपलीही झालीच का नाही?

निघताना बायको दारात उभी होती. तिला जरा आबुस-आबुस म्हणजे चुकल्यासारखं वाटत होत? यात काय शक? दरवर्षी या पेरणीच्या दिवसात दारापुढच्या अंगणातून लवाजमा निघायचा. तेव्हा ती न्हावून - धुवून, गोड, धोड निवद पाणी करून, आरतीचं ताट, ताटात हळद- कुंकू, अक्षता,दीवा, निरांजन, प्रसाद, पुरण पोळीचा निवद असा पुजेचा सामा घेऊन, सजून-धजून दारात उभी असायची. मोठी खासच दिसायची. पाहत राहावं वाटायची. साक्षात भुईतून उगवल्यासारखी भुईकन्याच वाटायची. पेरणीआधी बाळवाही दिलेल्या, पेरणीसाठी आसुसलेल्या काळ्याखल, मऊसूत जमिनीसारखीच दिसायची.

पेरणीच्या कामासाठी वावरात जाणार्‍या बैल-बारदाण्याचा, औताफाटय़ांची पुजा करून ती भूमिकन्या गौरव करायची, सत्कार करायची. बैलांच्या पायावर तांब्याभर पाणी टाकून त्यांच्या केसाळ कपाळी कुं कू लावयची. बैल स्नेहभावनेने ओथंबून येऊन व्हटीतून फेसाळ लाळेच्या लोळ्या गाळत तिच्या हातातल्या ताटाकडे मुसकांड करायचे. तेव्हा त्यांच्या तोंडात ती पुरणाच्या एका एका पोळीचा, भात-भजे, कुरडय़ाचा निवद द्यायची. मचाक-मचाक करून, व्हटायावर उचलून तिफणीसाठी सजवलेले बैल गोड-तळीव घास खायचे. तिफणकरी, पेरकरी अन् रासण्यामोडी वखरहान्या माणसांच्याही कपाळवर कुंकवाची उभी बोटरेष, गोडधोडाचा प्रसाद, पुजा-अर्चा संगळ वातावरणच कसं पावन पवित्र आणि गडदगच्च मोहतुंबी व्हायचं.

हेलपाटत ट्रॅक्टर पुढं पळत होता. अन् गतकाळीचं मोहतुंबी वातावरण डोळयात - डोक्यात टाळसर होत होतं. यावर्षी घरधनीन, वावराची मालकीन तिफणतयारी करताना दारात उभी होती, पण कशी शिळपटल्या सारखीच दिसत होती. हातात पुजेच ताट नव्हतं. उलट होतं डोळयात टाचोटाच आश्चर्य. हे कासवासारखं गताडू पाहून तिने एवढंच विचारलं होत.

'काहो हे गताडू पेरणी बरोबर करील न तिफणीसारखी?'

'करते बरोबर'

'पण तुरीच्या वळी कशा काय घातल्या जातानं, खालून चिखुल लागून बेरलं तं याले कसं काय समजीन?'

'समजते बरोबर, लागलं त दुपारी येऊन पाह्यजो'

'दुपारी त्या वावरात येवस्तोर आपलं पेरणंबी होते, रामराव तात्या अन् तुमचं झालं की मले लगेच जानकीराम भाऊच्या वावरात जायाचं, त्याह्यचं खुंदळून टाकायले!'

'बर काही निवद-गिवद पुजा-गिजा?'

'आता या लोखंडी यंत्राची काय पुजा करता वह्यनी! त्याले का जीव हाये का जान हाये?' का तोंड हाये निवद खायाले? का कपाळ हाये कुंकू लावायले? आमचा मेळ लावा बुवा काई लावसान तं!'

' बर थांबा मंग तुम्हाले प्रसाद देते, गुळ साखर्‍याचा'

' नका देऊ .. नका देऊ!'

'मंग काय चहा घेतू का?'

'आता तुम्हीबी काय माह्या तोंडातून वदवून घेऊन माही पच्ची करता भाऊ? बाईच्या जातीपुढ! आहो चहा घेऊन माह्या मस्तकातली उतरणार नाई का? झरझर खाली, पाह्यटीच टॅंगोपंच मारली राजेहो!'

'म्हणजे काय?'

'जाऊ द्या तुम्हाले नाई समजणार. पण तुमच्याकडील आपलं जेवण बाकी हाये वह्यनी. आता पेरणी झाल्यावर अन् सोयाबीन चांगली ताशी लागल्यावर मस्तपैकी मुर्गा खाऊ घालजा आपल्याले!'

'काय आसं भावजी! पेरणीच्या पवित्तर कामाले चालले अन् दाडासाडावाणी काईबी आनप्-सानप् बोलाय लागले, चांगल्या कामाले जाताना चांगल बोलाव माणसानं'

'बर बुवा; चुकलं आपलं'

असं म्हणून त्याने ट्रॅक्टर सुरू केला. क्लचकाच दाबून गिअर टाकला. तसं करताना थोडा नाराज झाल्यासारख्खा दिसला. तसं तिच्यावर डोळे वटारले. तशी ती काय समजायचं ते समजली. दोन पावलं पुढ सरकून म्हणाली होती.

'करील भावजी, तुम्ही म्हणता तसचं करील'

पण त्यान काही ऐकल नाही. काहीच बोलला नाही. ट्रॅक्टर रस्त्याला लागला तसा तोंड कडू करत माला म्हणाला.

'ह्येत तिच्या मायमी.. सगळा मूड हाप झाला मपला. पाह्यटी घेतलं टॅंगोपंच सम्दी झर्रझर्र उतरुन गेली माह्या टाळक्यातली. पण इच्यात नुकसान आता तुमचंच होणार हाये नं!'

'कसं काय रे बाबाच्या नाना?'

'आता तुमच्या वावरात काई ट्रॅक्टर जोर्‍यानं पळणार नाई, निर्रा आरामा - अरामानं चाललं त्यो. त्याच्यावर आता इलाज एकच हाये'

'कोन्ता?'

'हे दारूचं दुकान आलं, मले शंभर रुपये द्या, तव्हाच ट्रॅक्टर जोरानं चालंल तुमच्या वावरात. नाई त काई खरं नाई तुमच्या पेरणीचं'

असं त्याने म्हटल्यावर मग इलाजच खुंटला, अन् शंभर रुपये देण्यासाठी हात खिशाकडे वळला!

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास','तहान' या त्यांच्या गाजलेल्या कांदबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ, ता. मेहकर, जि. बुलडाणा

No comments:

Post a Comment