Thursday 18 October 2012

गोठय़ातलं पशुधन


मृग नक्षत्राच्या पावसानंतर आता शेताशिवारात मागच्या बाजूने पेरणीच्या पेटय़ा असणारे ट्रॅक्टरच दिसतात सगळीकडे. जिथं दिवसचे दिवस पेरणी चालायची ते शेत आता काही तासातच पेरून होते आणि ट्रॅक्टर पुन्हा नवीन शेतकर्‍याच्या शेतात पेरणी करण्यासाठी उधळत, उडय़ा मारत जातो.

जशी शेताशिवारात तिफण दिसत नाही तसंच तिफणकर्‍यालाही आता महत्त्व उरलं नाही. पूर्वी गावागावांतून असे नावाजलेले नामांकित तिफणकरी असायचे. ते कसं दोरी टाकल्यासारखं सरकंतीर तास काढायचे. जसा तिफणकरी तसाच पेरकरीही. ज्याची चाडय़ावरची मूठ फणाच्या काकरात टोपल्यासारखी दाणे टाकायची आणि त्या तासातून हाताने अंतर मापून टोपणी केल्यासारखे कोमटे उगवायचे; त्याची आता गरज उरली नाही. कारण पेरणीयंत्राच्या पेटीतली पट्टी बरोबर विशिष्ट आकडय़ावर ठेवली की एकच हातोळी घेऊन दाणे पडत जातात आणि पेरणी सुबक होते.

माणसाच्या मनातली, हातातली कलात्मकता आणि सुबक कलात्मकता अशी यंत्राने हिरावून घेतली आणि शेताशिवारातल्या प्रत्येक कामात आता कसा एक अपरिहार्य असा कोरडेपणा आला. सर्जन संपलं आणि कोरडीठाक अशी यांत्रिकता आली. शेताशिवारात हजारो वर्षांपासून रूढ असणारे पारंपरिक औतं फाटे अशा कितीतरी वस्तू आता अडगळीत जाऊन पडल्या. मोडीत निघाल्या.

दरवर्षी ज्या तिफणीने आपण पेरणी करायचो ती तिफण कुठे उरली आता? त्या तिथं जांभळीच्या खोडाशी एक फणकट मोडलेलं. दुसरं घराच्या छपरावर. घरच्या वापरात अडचण येते म्हणून इथली उचलली तिकडे फेकली. तिकडची उचलली पुन्हा फेक फाक, अशी सारखी हेळसांड. उचला-खाचलीत तिची दांडी चघळ झाली, खडबड झाली. पण आता तिच्या नशिबात सुताराच्या कामठय़ावर नेऊन भरून घेणं नाही. जाडीत, जुपण्या-एठणात अडकून कधीच शेतावर पेरणी करणं नशिबात नाही. ज्यांनी कधी काळी तिचा शोध लावून पेरण्याचं नवं टेक्निक कृषी संस्कृतीत आणलं, तेही आता मोडीत निघालं. त्यांच्या नावासकट !

म्हणजे माणसाची सारखी प्रगल्भ होणारी बुद्धिमत्ता बदलत्या काळानुसार जुन्या बुद्धिमत्तेला मोडीत काढते. तसेच नवे साधनं जुन्या साधनांना. गेल्या 35 वर्षांच्या शेतीच्या अनुभवात मला जी कृषी औजारांची आणि विधी उपचारांची नावं माहीत झाली होती त्यातली कितीतरी आता मी विसरून जाणार. नव्याची माहिती होणार आणि माझ्या पुढच्या पिढीत तर नातवंडाच्या पुढे अशा काही नावांचा उल्लेख केला तर त्यांना काहीच नाही कळणार. खळय़ात उफणणी करण्यासाठी तिवा ठेवलेला असायचा. दिवसेंदिवस खळं केलं जायचं. असं मी बोललो तर त्यांना काहीच नाही कळणार.

कोणकोणत्या जिनसा असतील त्या? की अजून दहा वर्षानी त्यांना अस्तित्वच राहणार नाही. मी थोडावेळ डोळे लावून घेतले. तसतशी एक-एक वस्तू माझ्या डोळय़ासमोर तिच्या जन्मापासून, तिच्या कार्यकारण भावासह येत राहिली. मी मनाच्या हाताने त्या वस्तूंना घोळवत राहिलो.

जसे औतंफाटे किंवा कृषिसाधनं बहुतांशी लाकडांपासून निर्माण होत होते. तसेच त्याच्या गोठय़ातील पशुधनसुद्धा त्यांना अनेक वस्तूंची निर्मिती करण्यासाठी उपयोगी येत असायचं. गोठय़ातले बैल उन्हाळय़ात नांगर-वखर ओढायचे. पावसाळय़ात तिफण आणि हंगामात वहीत वाही करायले डवरे-ताशे. गोठय़ातील गाय त्याला घरासाठी दूध दुभतं द्यायची. गोर्‍हे पुढच्या कुणबिकीत बैल व्हायचे. हे झालं त्यांच्या जिवंत असतांनाचं शेतकरी कुटुंबासाठीचं योगदान. मात्र मेल्यावरही त्यांचे अनेक अवयव शेतकर्‍यांच्या कुणबिकीत उपयोगी येत रहायचे. त्यामुळेच आदिम अवस्थेपासून विकसित होत होता. माणसाने आपल्या भोवतालची जी जनावरे माणसाळवली त्यात गायी-बैलांचा क्रमांक अत्यंत वरचा आहे. त्यांच्यावाचून शेती केलीच जाऊ शकली नसती. म्हणून कृषी संस्कृतीच्या विकासाचे सर्व श्रेय शेतकर्‍यांच्या गोठय़ात त्याच्या दाराशी असणार्‍या गायी-बैलांना दिले जाते. असा हा बैल शेतकर्‍यापेक्षाही अधिक श्रम करून त्याचे घर धनधान्याने भरून ठेवतो. नांगर, वखर, बैलगाडी, किन्ही, फर्राट, तिफण, डवरे, गाडी अशा कितीतरी औताफाटय़ाच्या आणि इतर कामासाठी बैलाचा उपयोग केला जातो. आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे खळय़ातल्या कणसाची किंवा ओंब्याची मळणी.

खुरवतीसाठी बैलाचाच उपयोग. बैलांच्या गळय़ात दोर बांधून तयार केलेली माळची माळ मेढीभोवती खळय़ात वतरुळाकार फिरवली जायची. तेही तोंडाला मुसके बांधून. बैलाच्या पायखुरांचा स्पर्श ज्वारी, गहू इ. धान्याला झाल्यामुळे त्या धान्यात आपोआपच औषधी गुणधर्म येतो. धान्य टिकवून ठेवावे लागते. त्यात कीड, आळी होत नाही असा समज शेतकरी कुटुंबात असायचा.

जन्मभर घरधन्यासाठी राबणार्‍या या बैलांच्या शेपटीच्या केसांपासून औताफाटय़ासाठी दोरखंड तयार केले जाते. त्यातील एक महत्त्वाचे दोरखंड म्हणजे केसाळी. बैलाच्या शेपटीच्या टोकाला सतत लांबच लांब केस फुटत राहतात. पावसाळय़ाच्या दिवसात त्याला झिंझोल्डे लागतात. म्हणून शेतकरी बैलाच्या शेपटय़ांचे हे केस कात्रीने कापून घेतो. त्या केसांना शेपाळी असे शेतकर्‍याच्या खास शैलीत म्हटले जाते. शेपाळीचे कापलेले केस शेतकरी कुटुंब वाया जाऊ देत नाही किंवा फेकून देत नाही, तर त्या केसाच्या लडय़ा करून त्या घमेल्यातल्या पाण्यात भिजत घालतो. लडय़ांना मऊपणा यावा म्हणून एकावर एक थर घालण्यापूर्वी त्या थरावर गोडे तेल टाकतो. त्यामुळे या केसांना मऊपणा येतो. घमेल्यात तयार झालेल्या या शेपाळय़ांच्या लगद्याला नंतर तो काडीभोवती गुंडाळून त्याचे सूम तयार करतो.

झडीच्या दिवसात फुरसतीच्या वेळी या सुमाला आट घालून, पीळ देऊन, काडीभोवती गुंडाळून त्याची गुंडाळी तयार केली जाते. या सुमापासून मग केसाळी नावाचे खास दोरखंड चोपट तयार केले जाते. पेरणीच्या चाडय़ाला या केसाळीपासून तयार केलेलीच दोरी असावी असा संकेत होता. कारण पेरणी सुरू असताना पाऊस पडला तर तागाची दोरी आवळून येते आणि तिफणीवर बांधलेल्या चाडय़ाचा तोल ढळतो असे त्यामागचे मुळात कारण असावे.

शेतकर्‍यांच्या गोठय़ातील गाय किंवा बैल म्हातारपणात गळून मेला तर त्याचा मृतदेह गावातल्या चांभाराला दिला जातो. मात्र त्या मृत जनावराच्या बदल्यात वादी मागितली जाते. वादी म्हणजे गुराच्या चामडय़ापासून तयार केलेला बहुउपयोगी असा दोरच असतो. त्याचा उपयोग ऐठण तयार करण्यासाठी केला जातो.

शेतावर वखर, तिफण किंवा डवरे सुरू असतात त्यावेळी औताची दांडी आणि दोन्ही बैलांच्या गळय़ात अडकवलेली जाडी यांचा समन्वय साधण्यासाठी जुंपणे जुंपावे लागते. दांडीवरून जाडीवर किंवा जाडीवरून दांडीवर जो दोर बांधला जातो तो साधा ताग बटीपासून बनवलेला दोर असेल तर काचून-काचून तुटून जातो. मात्र या वादीचे ऐठण असेल तर खापकाचणी पडत नाही.

तसाच बैलाच्या चामडीपासूनच तयार केलेल्या या वादीचा उपयोग बैलगाडीच्या धुर्‍यावर जो 'जू' बांधला जातो त्याच्यासाठीसुद्धा केला जातो. धुर्‍याच्या टोकावर बांधलेल्या जुवाला हालू डोलू न देण्याचे काम ही वादी करत असते. वादीवरून कृषी संस्कृतीत एक म्हणसुद्धा प्रचलित आहे. 'वादीसाठी गाय मारू नाही' म्हणजे छोटय़ा गोष्टीच्या फायद्यासाठी मोठय़ा गोष्टीचा नाश करू नये.

आपल्या गोठय़ातील बैलाचा मृत्यू होणे हे शेतकर्‍याला घरातल्या माणसाच्या मृत्यूएवढेच दु:ख देते. मात्र त्या बैलांची शिंगे कापून घ्यायला तो विसरत नाही. या शिंगाच्या पोकळ वाळल्या टोकापासूनच मग पेरणीसाठी चाडय़ाखाली ज्या नळय़ा वापरल्या जातात त्या नळय़ाच्या टोकाशी आणि फणाच्या वर जो सांधा साधला जातो ते साधण्याचे काम हे शिंगट करते.

असं हे शेतकर्‍यांच्या घरचं पशुधन. जिवंतपणी जसं त्याच्या उपयोगी येत होतं तसंच मेल्यावरही त्याच्या अवयवापासून शेतकर्‍याला साधन बनवायला उपयोगी येत होतं. मात्र आता हळूहळू खेडय़ातील पशुधन कमी होत आलं आहे. ज्या कुणबिकीत सहा-सहा बैलं असायचे त्याच्या दावणीला आता एकही बैल नाही. शेतात ट्रॅक्टरच्या रूपाने आलेल्या यांत्रिकीकरणामुळे पशुधनासंबंधीचा ओलावाच कमी झाला आहे.

(सदानंद देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक असून 'बारोमास', ' तहान' या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या आहेत.)

मु.पो.जानेफळ, ता. मेहकर, जि.बुलडाणा

No comments:

Post a Comment