Sunday 7 October 2012

धर्मश्रद्धा आणि सांकेतिक आचार


मॅट्रिकमध्ये शिकत असताना मी शैला पत्की या माझ्या शाळेतील मैत्रिणीबरोबर 'वेडय़ाचं घर उन्हात' या नाटकात तिच्या भावाचं काम केलं. पुढे तिचा विवाह माझा कवी वर्गमित्र विजय निरखी याच्यासोबत झाला. ती आता सेवानिवृत्त शिक्षिका आहे. तेव्हा आजतागायत म्हणजे जवळपास पन्नास वर्षे होत आली आहेत या घटनेला. ती न चुकवता रक्षाबंधनाच्या दिवशी माझी आठवण करते आणि मीही न चुकता त्या दिवशी तिच्या घरी जाऊन राखी बांधून घेतो. या कृतीमुळे माझा उल्लेख कोणत्या शेलक्या विशेषणाने होतो त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पुढे प्राध्यापक झाल्यावर माझी एक मुस्लीम विद्यार्थिनी मला अनेक वर्षे राखी बांधत होती. मी आंबेडकरवादी. त्यात अनेक ठिकाणी भाषणे देत हिंडणारा प्राध्यापक. त्यामुळे एके दिवशी माझ्या एका पुरोगामी मित्राने मला प्रश्न विचारला, ''ही तुझ्या हातावर राखी..?'' त्याच्या विचारण्यात पुरेपूर खोच होती हे मी ओळखले. अशा खोचक प्रश्नांना उत्तरही खोचकच द्यायचे असते एवढे तर व्यावहारिक अनुभवावरून आपणास कळतेच. त्याच्या प्रश्नाला मी उत्तर दिले, ''हो, ही एका मुस्लिम बहिणीने बौद्ध भावाला बांधलेली राखी आहे.'' अर्थात या उत्तराने त्याचे समाधान झाले नाही. ते होणार नाही याची मला खात्रीच होती. आपल्या दैनंदिन आचरणात धार्मिक समजुती आणि धार्मिक रूढी दडलेल्या असतात अशी एक आपली ठाम समजूत असते. आता रक्षाबंधनापुरतंच बोलायचं तर हा सण काही मराठी माणसांचा नव्हे. पूर्वी उत्तर भारतापुरती मर्यादित असलेली ही प्रथा आता भारतभर रूढ झाली आहे, असे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारख्या संस्कृतीच्या थोर अभ्यासकानेच नमूद करून ठेवलं आहे. काही ठिकाणी पुरोहित यजमानांना राख्या बांधून दक्षिणा मिळवतात. मी शिक्षक असताना अनेक गरीब भिक्षुक आम्हांला राखी बांधून दोन रुपये दक्षिणा घेताना मी पाहिले आहेत. मी म्हणजे त्यांची कुणी बहीण व ते माझे भाऊ असा काही अर्थ तेथे रूढ नव्हता. मला राखी बांधणारी मुस्लीम विद्यार्थिनी आता खूप मोठी कार्यकर्ता आणि अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहे. डॉ. तस्नीम पटेल हे तिचे नाव. तिलाही या कृतीमुळे आपण आपला धर्म बुडवतो असे मात्र मुळीच वाटत नाही. चितोडची राणी कर्मवती हिने मोगल बादशहा हुमायून यास राखी बांधून आपल्या रक्षणाची अपेक्षा व्यक्त केली असाही एक इतिहास आहे. रक्षाबंधन हा एक सांस्कृतिक उपक्रम आहे. पण सर्वच सांस्कृतिक उपक्रमांचे आधार धर्मात शोधणे ही आपली प्रवृत्ती असून विविध जाती, पंथांच्या लोकांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी सगळय़ाच सांस्कृतिक उपक्रमांना धर्मात आधार आहे हे दाखवून देण्याची पद्धत आपल्या भारतीय समाजात नुसतीच रूढ नाही तर लोकप्रियही झालेली आहे. स्त्रीपुरुषांतील भेद स्पष्ट करण्यासाठी पुरुषाने केस कापावेत हे ठरले की जावळं काढणे हा विधी आहे, संस्कार आहे, ही समजूत रूढ करण्यात येते. हा संस्कार मुळातल्या वैदिकांचा. यज्ञात हवन करताना लांब केस ठेवणे गैरसोयीचेच; पण हा संस्कार बौद्धांनीही स्वीकारला आणि सोळा संस्कारांत तो जाऊन बसला; पण ब्राह्मण पुरुष पुरोहित असतो, स्त्री पुरोहित नसते. म्हणून स्त्रीचे केस (जावळं) काढण्याची आवश्यकता नाही; पण अनेक ब्राह्मणेतरात मुलींचेही जावळं काढतात हे आपणाला माहीत आहेच. शिकायचे तर लिपी आली पाहिजे. ती 'अ' पासून सुरू होते; पण धर्मश्रद्धेचा आधार देण्यासाठी पाटीवर आधी 'श्री' काढून मग शिकायला सुरुवात करायची ही समजूत रूढ केली जाते. कर्णभूषण घालण्याचा धर्माशी काय संबंध? पण मग 'कान टोचणे' हाही धार्मिक संस्कार होऊन जातो. कपडे घालण्याचा धर्माशी काय संबंध? पण बाळाला ज्या कुठल्या दिवशी प्रथमच कपडे घालायचे तो दिवस धर्मश्रद्धेने ठरवला जावा याची व्यवस्था होते. स्त्रीपुरुष संबंध ही जगातल्या सर्वच देशातल्या मानवी समूहाची एक महत्त्वाची गरज; पण ही गरज भागविण्यासाठी मुहूर्त ठरवायचा. त्यासाठी विशिष्ट कर्मकांड सुचवायचे आणि विवाह हाही एक धार्मिक संस्कार करायचा. आपल्या सर्वच संस्कारांच्या तळाशी आपल्या काही जैविक संरक्षणाच्या गरजा असतात. या गरजांचा आरंभ करण्यात एक स्वाभाविक कुतूहल असते आणि त्या गरजा भागविण्यासाठी काही एक रूढी निर्माण करण्यात दोन प्रेरणा प्रबळपणे काम करतात. आपण ज्या कुठल्या समूहाचे आहोत त्याच्याशी समरूप होण्यात कळप म्हणून आपले संरक्षण होते. पुढे या संरक्षणाची जबाबदारी पक्की व्हावी म्हणून नैतिक बंधनाची निर्मिती होऊ लागते. या बंधनाची देखरेख करण्यातून अर्थार्जन होणार असेल तर पुरोहितवर्ग मग अशा गोष्टींचे उगम धर्मात कसे आहेत हे सांगू लागतो. सकाळी स्नानानंतर देव, पितर व ऋषी यांना तर्पण करून दुपारी रक्षाबंधनाचा विधी करावा असे शास्त्र आहे. ही राखी अक्षता, मोहर्‍या व सोने एकत्र बांधून तयार करतात. मूळ रूढींना धर्मशास्त्रात सरते करून घेताना सोयीनुसार बदल केले जातात. सोने मिळत नाही, मग दोरा हळदीत भिजवला की सोन्याचा पिवळा रंग आला असे गृहीत धरायचे आणि हेही कष्ट नको असतील तर बाजारात उपलब्ध असलेल्या राख्यांवर भागवायचे. आर्थिक कुवत आणि सौंदर्यदृष्टी वाढवणार्‍या सामग्रीचा वापर करायचा. एवढे सर्व सोयीनुसार बदल जेव्हा स्वीकारले जातात तेव्हा मूळच्या आचरण संकेताला धर्मश्रद्धेचा आधार बाहेरून चिकटवला गेला आहे हे सहज ओळखता येते.

एकदा राखी बांधून बहिणीने भावाला वचनात बांधून घेतल्यावर पुन्हापुन्हा दरवर्षी राखी का बांधावी? एकदा देवा ब्राह्मणासमक्ष पत्नी म्हणून स्वीकार केला. तिचे मंगळसूत्र दरवर्षी आपण रिन्यू कुठे करतो का? रक्षाबंधन दरवर्षी का? याचेही स्पष्टीकरण देण्यासाठी एखादी देवासुरद्वंदाची कथा मग त्या आचाराला जोडली जाते आणि हा आमचा आचारधर्म असेही सांगितले जाते. भविष्योत्तर पुराणात अशी एक कथा सांगण्यात आली आहे. असुरांनी इंद्रास पराभूत केले. इंद्राणीने त्याच्या उजव्या हातावर राखी बांधली. त्या राखीच्या प्रभावामुळे पुढे असुरांची दाणादाण उडाली. हा राखीचा प्रभाव वर्षभर टिकणार असल्याचेही शुक्राचार्यांनी सांगितले. त्यामुळे असुर त्या संधीची वाट पाहत वर्षभर थांबले.

शक्तीचे स्थानांतर होत असते ही समजूत आदिम युगापासून चालू असून अशा समजुतींना यात्वात्मक श्रद्धा असेही म्हणतात. असे अनेक यात्वात्मक संकेत आपल्या दैनंदिन जीवनात रूढ आहेत. दृष्ट लागल्यानंतर कोंबडीचे पिलू अथवा अंडे बाळावरून उतरविणे ही अशीच यात्वात्मक समजूत. अशा या यात्वात्मक रूढींचा धर्मात

समावेश केलेला असला तरी त्या धर्मश्रद्धा नव्हेत. अनाकलनीय गूढ शक्तींचे आकलन करून घेताना आदिम मानवी समूहाने निर्माण केलेल्या या समजुती होत. काळाच्या ओघात या समजुती वेगवेगळय़ा पद्धतीने विकसित होत असतात. परस्परसंबंध सबळ करण्यासाठीही अशा समजुती उपयुक्त ठरतात. म्हणून अशा आचरणातील व्यर्थता लक्षात आली तरी लोक मात्र हा आचारधर्म पाळतात. म्हणूनच आजही बाळास दृष्ट लागते ही श्रद्धा कायम आहे आणि ती काढण्यासाठी काही संकेतात्मक आचरण केले जाते; पण दृष्ट लागली म्हणून आधुनिक आई दवाखान्यात जायचे टाळते असे मात्र नाही. त्यामुळे दृष्ट काढणे यामुळे खूप मोठी हानी होते आणि आपण प्रतिगामी ठरतो असा भयगंड बाळगण्याचे काहीच कारण नाही. जसे यात्वात्मक श्रद्धेबाबत तसेच प्रतीकात्मक पद्धतीने मानवी संबंध जपावेत म्हणून पाळल्या जाणार्‍या आचरणाबाबतही आपण भयगंड बाळगता कामा नये. परिचित माणसाची भेट झाली की, आपणास आनंद होतो. हा आनंद कुणी 'नमस्कार' म्हणून, कुणी 'गुडमॉर्निग' म्हणून तर कुणी 'सलाम वालेकुम' म्हणून व्यक्त करतो. म्हणून 'नमस्कार' म्हटल्यावर कुणी हिंदू ठरत नसतो किंवा 'सलाम' केल्यामुळे कुणी मुसलमान ठरत नसतो. मी माझ्या महाविद्यालयात रुजू झालो त्या वेळी अनेक मुलं मला व्हरांडय़ातून जातायेता 'जयभीम'म्हणत असत. त्या वेळी काही हिंदू प्राध्यापकांना दचकल्यासारखं व्हायचं. एकानं तर हे बोलून दाखवायचं धाडस केलं. तेव्हा मी एवढंच म्हणालो, ''मी नमस्कार केला तर मी हिंदू असल्याचं समाधान तुम्हांला मिळतं का?'' तसं असेल तर बौद्ध मुलांना 'जयभीम' म्हणताना प्रथमच आपण या मध्यमवर्गीयांच्या कॉलेजमध्ये विनासंकोच बुद्ध म्हणवून घेण्याचं समाधान मिळवू द्या ना? त्यात तुमचं काय नुकसान होतंय. नंतर मात्र माझे सगळेच सहकारी प्राध्यापक अभिवादनाचा एक निरुपद्रवी संकेत म्हणून माझ्या 'जयभीम'कडे पाहू लागले.

आपला देश विविध जातीजमातींचा आणि विविध उपासनापद्धती करणार्‍यांचा आहे. त्यामुळे अभिसरणाच्या काळात असे घडतच असते. याबद्दल कुठला भयगंड कुणी बाळगता कामा नये. अर्थात हे सर्व संकेत पाळताना कोणते निरुपद्रवी आहेत आणि कोणते आघातजन्य आहेत याचा समाज विचार करतो. तेवढा आपण केला की पुरे. असाच एक प्रसंग सांगून मी हे टिपण संपवतो. तिलावत नावाच्या माझ्या प्राध्यापक मित्राच्या लग्नातली गोष्ट. आम्ही सर्व मित्र एकाच दस्तरखानवर बसून जेवत होतो. माझ्या बाजूला माझा बालमित्र एल. डी. जहागीरदार हा आमच्या प्राध्यापक संघटनेचा खूप मोठा नेता आणि जन्मब्राह्मण मित्र तर दुसर्‍या बाजूला संस्कृत पाठांतर भन्नाटपणे म्हणून दाखवणारा प्रा. पठाण हा मित्र होता. जहागीरदारच्या ताटात वाढण्यासाठी एक वाढपी आला. तो त्याच्या ताटात बिर्याणी वाढणार तोच पठाण त्या वाढप्यावर जवळपास ओरडलाच, ''चल निकल आगे!'' वाढपी पुढं निघून गेला. त्यानंतर दुसर्‍या वाढप्याने माझ्या आणि जहागीरदारच्या ताटात व्हेज पुलाव टाकला आणि तो पुढे गेला; पण या प्रकाराने माझा जहागीरदार मित्र काहीसा गोंधळून गेला. तो पठाण का रागावला म्हणून विचारू लागला. त्याच्या बाजूच्याने सांगितले, ''सर, ओ डिश आपकी नहीं थी, वो बडे की थी'' आणि सगळे हसले. आता आपणाला ती डिश नाकारावी म्हणजे आपण काय लहान आहोत? आपणही बडेच आहोत ना? असा काहीसा भाव जहागीरदारच्या मनात होता. मी त्याला जेवण झाल्यावर 'बडे का' या शब्दाचा सांकेतिक अर्थ सांगितला तेव्हा तोही मोकळेपणानं हसला. पण एका दस्तरखानवर बसून जेवले म्हणून आपण धर्म बाटला असे त्याला वाटले नाही की त्याच्या ताटात बडे की बिर्याणी पडता कामा नये याची काळजी घेणार्‍या पठाणलाही 'पडू देत त्याच्या ताटात' म्हणजे तोही मुसलमान होईल असेही वाटले नाही. अभिसरण प्रक्रियेत धर्मश्रद्धा कशाला म्हणतात आणि आचरणाचे औपचारिक संकेत कोणते असतात हे सामान्य माणसांना नक्कीच कळत असतं. म्हणून तर 'तीळगूळ घ्या, जयभीम बोला' असे सांगून तीळगूळ देणारे विद्यार्थी मित्रही मला भेटतात.

(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084
     

No comments:

Post a Comment