Thursday 18 October 2012

शेती निरक्षर 'विद्वान'


अक्षरांची ओळख आहे तो साक्षर आणि अक्षरांची ओळख नाही तो निरक्षर इथपर्यंत ठीक आहे. पण अक्षरांची ओळख आहे तो साक्षर, शिक्षित, सुशिक्षित, शिकला-सवरलेला ज्ञानी, पंडित हे शेपूट त्याला जोडल्या गेलं तर निरक्षर म्हणजे अज्ञानी, अडाणी हे लांच्छन त्यावर लावल्या गेलं. निरक्षर माणसंही ज्ञानी असू शकतात. याउलट चांगला, शिकला सवरलेला माणूसही अज्ञानी, अडाणी असू शकतो हे मात्र नाकारल्या गेलं.

एकदा मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या बीएसडब्ल्यू व एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करायला मला बोलावले होते. त्यावेळेस प्रस्तावना करताना एक जण म्हणाला, 'खेडय़ात राहणारी माणसं निरक्षर व अज्ञानी, अडाणी असतात.' माझ्या भाषणात मी त्यांना विचारले, 'तुम्हाला शेतीची ओळख आहे? शेतीत केली जाणारी नांगरणी, वखरणी, डवरणी, पेरणी, फवारणी, कापणी, मळणी, उभे तास, आडवे तास, निंदण, धुरा, खळे यातले तुम्हाला काय माहीत आहे? यातल्या कोणत्या गोष्टींशी तुमची ओळख आहे? अर्थात यातील कोणतीही गोष्ट त्यांना माहीत असणे शक्यच नव्हते. कारण त्यातील बहुतांश विद्याथी हायफाय, मॉड-पॉश घरातले होते. त्यांनी सुद्धा यातील कोणतीच गोष्ट आम्हाला माहीत नसल्याचे प्रांजळपणे मान्य केले. त्यावर मी म्हटले, 'जर अक्षर ओळख नसलेल्या समाजाला तुम्ही निरक्षर म्हणता आणि तो निरक्षर आहे म्हणून त्यांना अडाणी, अज्ञानी ठरवून मोकळे होता. त्याच नियमानुसार तुमच्या प्राध्यापकांसह तुम्हाला शेती ओळख नाही म्हणून मी तुम्हाला 'शेती निरक्षर' म्हटले आणि तुम्ही सर्व शेती निरक्षर आहात म्हणून तुम्हाला मी अडाणी, अज्ञानी, मागासलेले ठरविले तर ते योग्य ठरणार नाही का?' माझ्या या प्रश्नामुळे व त्यामागे दिलेल्या तर्कामुळे तेथे उपस्थितांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. परंतु माझे विधान कोणी खोडून काढले नाही.

अक्षर ओळख असलेला तो साक्षर, नसलेला तो निरक्षर. तसेच शेती ओळख नसलेला तो 'शेती निरक्षर' अशी संकल्पना कृषिप्रधान देशात का रूढ झाली नाही? सुशिक्षित समाजाला जे माहीत आहे ते 'ज्ञान' पण शेतीविषयक हीच माहिती नसेल तर ते 'अज्ञान' का मानल्या जात नाही? शेतकरी केवळ साक्षर नाही म्हणून त्यावर निरक्षर, अज्ञानी, अडाणीपणाचा ठपका ठेवणार्‍या शेती निरक्षरांना अज्ञानी, अडाणी का म्हणू नये? त्यांचे ज्ञान हे ज्ञानच व त्यांचे शेतीविषयक 'अज्ञान'ही ज्ञानच? हा कोणता न्याय आहे? तुम्हाला विमान चालविता येते, पण बैलबंडी चालविता येत नाही. तरी केवळ विमान चालविता येते म्हणून तुम्ही ज्ञानी. परंतु शेतकर्‍यांना बैलबंडी चालविता येते पण विमान चालविता येत नाही म्हणून शेतकरी अज्ञानी आणि अडाणी! हे दुहेरी मापदंड कोण ठरविणार? शेती निरक्षर अंगठेबहाद्दर विद्वान? का?

देशाला सुधारण्यासाठी निरक्षरांना 'साक्षर' करण्याचे अभियान मोठय़ा प्रमाणात राबविल्या गेले. ते योग्यही होते. देशाच्या विकासात निरक्षरता हा फार मोठा अडथळा आहे असे विद्वानांना वाटत होते. साक्षरता अभियानाने देशाचे कितपत भले झाले माहीत नाही, पण साक्षरता अभियान राबविणारे शेती निरक्षर हे शेती निरक्षर असण्यातच धन्यता वा मोठेपणा मानू लागले. त्यामुळे देशाची फार मोठी हानी झाली. हे तथाकथित 'विद्वान' मान्य करणार नाही, पण हे कटुसत्य आहे.

कृषिप्रधान देशाची ध्येय-धोरणे, योजना, नियोजन आखले शेतीविषयक ओ का ठो न कळणार्‍यांनी. देशाचे मानस ठरविणार्‍या सर्वच क्षेत्रात मोक्याच्या जागी, निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अशीच मंडळी आहेत. ज्यांचा शेतीशी कधीच संबंध आला नाही. निरक्षरांसाठी 'काला अक्षर भैस बराबर' ही म्हण जर लागू होत असेल तर शेतीविषयक निर्णय करणार्‍या नियोजनकर्त्यांसाठी 'शेती अक्षर भैस बराबर' होते हे कटुसत्य कधीतरी स्वीकारल्या जाणार आहे किंवा नाही हा खरा प्रश्न आहे.

निरक्षरांनी ते निरक्षर आहे हे मुकाटय़ाने व प्रांजळपणे मान्य तरी केले. त्यांनी हे मान्य केल्यामुळे साक्षरता अभियान राबविल्या जाऊ शकले. पण शेती निरक्षर एलीट समाज, तो शेती निरक्षर आहे हे मान्य तरी करेल का? तो ते मान्य करण्याचे तर सोडाच पण 'शेती निरक्षर' ही संकल्पना तरी तो स्वीकारेल का? कारण ज्ञानाचा ठेका आपल्याकडे आहे, आपण म्हणू ते ज्ञान, आपण म्हणू ते अज्ञान अशी ठाम समजूत या वर्गाची झाली आहे.

सर्वच क्षेत्रात शेती निरक्षरांचीच चलती असल्यामुळे शेतीवर जगणार्‍यांना आत्महत्या करायची पाळी आली आहे. ज्याने अन्नधान्य पिकविले त्याला काही विचार आहे, तो काही विचार करू शकतो, तो अन्नधान्यासोबतच विचारही देऊ शकतो, विचार पिकवू शकतो हेच मुळी 'विचारवंतां'नी नाकारले. अन्नधान्य पिकविणार्‍यांना 'विचार' पिकवायचा नाही आणि विचार सांगणार्‍यांनी अन्नधान्य पिकवायचे नाही अशी उघड-उघड फाळणी झाली आहे. या फाळणीतच आजच्याच नव्हे तर हजारो वर्षापासूनच्या शेती व शेतकर्‍यांच्या दुरवस्थेची बीजे पेरली आहेत. वेद सांगून ज्ञान पिकविणारा ब्राह्मण तो 'ज्ञानी', पण शेतात राबराबून अन्नधान्य पिकविणारा व फुकाचे ज्ञान सांगणार्‍या ब्राह्मणाच्या पोटाला अन्न देऊन जगविणारा अन्नदाता मात्र 'क्षुद्र' अशी विभागणी पिढय़ान्पिढय़ा सुरूच आहे. आज तिचा चेहरा व रूप फक्त बदलले आहे एवढेच!

प्रशासन, प्रसारमाध्यमे, साहित्य सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय या व अन्य सर्वच क्षेत्रात बहुतांश शेती माहीत नाही. या सर्वांवर शेतीची ओळख नसणार्‍या लोकांचेच प्राबल्य आहे. दुर्दैवाने हाच वर्ग सर्वाधिक शेतीविषयक मार्गदर्शन करीत असतो. शेतकर्‍यांना अज्ञानी समजून शेतीविषयक ज्ञान पाजत असतो. खर्‍या अर्थाने म्हणायचे झाल्यास शेतीविषयक अज्ञानी असलेले 'अडाणचोट' लोकच शेतीचे 'ज्ञान' असलेल्या 'ज्ञानयोग्या'ला बिनबोभाटपणे मार्गदर्शन करीत असतात.

अडाणचोटांचे मार्गदर्शन घेण्याची पाळी परिस्थितीने 'ज्ञानयोगी' शेतकर्‍यांवर आणली असेल तर आत्महत्येशिवाय शेतकर्‍यांसमोर तरी दुसरा कोणता पर्याय राहतो? वैद्यकीय क्षेत्रातले अजिबात ज्ञान नसलेला माणूस ऊठसूट ज्ञानाचे इंजेक्शन दिसेल त्याला टोचू लागला तर रोग्याला मरण्याशिवाय दुसरा काय उपाय शिल्लक राहतो? किंवा रेडेच ज्ञानदेवाला वेद शिकवू लागले तर ज्ञानदेवाचे अखेर काय होणार?

आयएएस अधिकारी असो, वृत्तपत्रातील संपादक वा पत्रकार असो, साहित्यिक असो वा अर्थशास्त्रज्ञ या व अन्य क्षेत्रातील नामांकितांना बहुतांश शेती कशाशी खातात हे माहीत नसते. तरीदेखील त्यावर त्यांचे 'तज्ज्ञ' म्हणविल्या जाणारे 'अज्ञ' मार्गदर्शन वा मतप्रदर्शन सुरूच असते. शेतीविषयक 'वास्तव'च जगासमोर या शिकल्या सवरलेल्या लोकांमुळे येऊ शकत नाही. ही शिकली सवरलेली मंडळी बर्‍याच वेळा शेती प्रश्नावर मात्र शिकून 'सरकल्या'सारखी करताना दिसतात.

शेती निरक्षर शिकल्या 'सरकलेल्यां'पासूनच शेतकर्‍यांना खरा धोका आहे. या शिकल्या सरकलेल्या शेती निरक्षरांसाठी 'साक्षरता' अभियान खरे तर तत्काळ राबविण्याची गरज आहे, पण हे होण्याची शक्यता नाही.

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment