Saturday 6 October 2012

स्वामी चंद्रशेखर महाराज


माहा जलमगाव यवतमाय जिल्ह्यातलं बोरीअरब. हे त्याचं जुनं नाव. आता लोकं 'बोरी स्वामी चंद्रशेखर' म्हनतेतं. बाबावरची श्रद्धा. आमच्या गावात त्यायची समाधी हाय. मी महाराज असतानी त्यायले पाह्यलं होतं. ते काई अवलिया नोते, बुवाबाजी करनारे, अंगारे, धुपारे देनारे बुवा नोते तं एक सत्पुरुष संत होते. सन्यास्याचं जे व्रत अस्ते का कोनत्याचं गोठीचा संग्रह नोको. संसारी मानसा सारकं पुढची सोय म्हून काई जमवाजमव कर. आश्रम करा लागते असी भक्तापासी सूचना करून आपली सोय करून घे, असं त्यायनं आखरी पावतर केलं नाई. आमच्या येथील धनीक नरनारायनजी बाजोरिया यायच्या घराले मोठी वसरी होती तिथं एक

मोठा लाकडी तखतपोस होता, त्याच्यावर दिसा बाबाची वयकटी गोल गुंडायून राहे आन् त्याले टेकून ते बाहेर कुठी गेले नाईतं बसून राह्येत. आंगात काटनचा पांढरा चुस्त पायजमा, पांढराचं बंगाली सदरा, एक मोठा सेला, पायात लाकडी खडावा आन् एक पितयी लांबट बादलीच्या आकाराचं कमंडलू. ते बारायी मयने आंघोयीले नदीवर नाईतं, ओमबाबू बाजोरियाजी यायच्या गावापासच्या बगिच्यातल्या ईरीवर. तेचं कपडे वले करून धुऊन वायू घालाचे तवरीक सेला गुंडायाचा. कपडे वायले का आंगात घालून तकतपोसावर बसाले हजर. त्या कमंडलूचा उपेग आंघोय करतानी आंगावर पानी वताले आन् नंतर पानी प्याले. राती ते वयकटी आथरली का झाली झपाची सोय. मले हे लेयतानी एक आठोन झाली ते सांगतो.

जैनाचे एक महान ऋषी आनंदऋषी म्हनून होऊन गेले. सध्या त्यायचा अहमदनगरला आश्रम हाये. ऋषीजी असतानी त्यायचं नगरले परवचन असलं तं माहे बहीनजवाई वसंतराव आव्हाड न चुकता जाचे. त्यायनं सांगतलेला हा अनुभव. ऋषीजी परवचन चालू करतानी एक लवंग तोंडात टाकायचे आन् सुरवात करायचे. हे एका बाईच्या ध्यानात आलं तं ते दुसर्‍या दिसी समोर येऊन बसली आन् ऋषीजी आल्याबराबर लवंग समोर धरली. ती त्यायनं घेतली. मंग हे दोन दिस चाल्लं. तिसर्‍या दिसी ते बाई लवंगीची लहानसी डबीचं घेऊन आली. ती जसी डबी द्याले गेली ऋषीजी बोलले,''माई, संग्रहचं करायचा तर मग संन्यास कशाला घ्यायचा?'' चंद्रशेखरबाबाचं तसंच होतं. गरजेपरीस जादा नाई. सकायी आन् सांजच्याले जेवाले न्याची लोकं वाटचं पाहाचे. दोन वक्ताले जेवन आन् दोनचार खेपा च्या झालं मंग.

कवा कोनाले अंगाराधुपारा नाई, मंतरून पानी देन नाई. बस्स सत्संग. कोनं एकदोन रुपये ठेवलेचं तं लगे बाजूले उभ्या असलेल्याले सांगेत,''जारे पेढा लेके आ.'' त्यायच्या तिथं भाहेर दोनतीन कुतरे बसून रायेत, त्यायले तुकडे करून टाकेत. अखीन त्यायचा एक सभाव होता का फटू काढाचा म्हनलं का ते रागवेत. 'हम गये हो गया' असं त्यायचं म्हननं होतं. बाबाच्या भक्तापैकी दोघं एक न्यानेस्वर कावरे पाटील आन् दुसरे अमजदभाई यायनं ठरवलं का फटू तं काढाचा. त्यायनं त्यावक्ती बोरीले वगारे फटू वाले होते. त्यायले सारी योजना समजावून सांगतली. ओमबाबू बाजोरिया यायच्या वाडीत बाबा आंघोयीले जायेत. त्या वाडीत तवा फाटकापासून इहिरीच्या अलीकडं पावतर मेंदीचे होते का शोच्या झाडाचे दोनीकून ताटवे होते. पलीकडं झाडाच्या खाली यायनं बाज टाकून ठुली आन् आंघोय झाल्यावर्त बाजीवर बसवून आज इथं तुमची पूजा कराची हाय म्हून फुलं आनले. बाबा मस्त मांडी घातल्यावानी दोनी पाय जवय घेऊन बसले. हे दोघं त्यायच्या इकून तिकून बसून गोठी सांगाले लागले. फटूवाले वगारे ताटव्याच्या मांग बराबर कॅमेरा लावून बसून होते. त्यायनं महाराजाच्या ध्यानात येनार नाई अस्या हिसोबानं तो फटू काढला. तो फटू इतका सुदा निघला का आता तोच 'एकमेव' फटू हाय का ज्याच्यावून जयपूरवून आनलेली मूर्ती नंतर करून घेतली होती. अंजनीप्रसाद तिवारी यानं त्याची मोठी कापी करून समाधी मंदिरात ठुली हाय.

काई वर्सानी त्यायची तब्येत कमीजादा व्हाले लागली म्हून आता लोकायले तरास नोको म्हून ते त्यायच्या वयखीचा सावंगी पासी मठ होता तिथं निंघून गेले. गावकर्‍याले हे सुद नाई वाटलं म्हून एक मीटिंग घेऊन त्यायले इथं आनाचं ठरवून काईजनं सावंगीले गेले आन् आग्रवानं बाबाले घेऊन आले. लोकायनं सेवा केली आन् एका दिसी त्यायनं देह ठेवला. मंग मोठी सरगत निंघून ओमबाबूनं त्यायच्या वाडीतल्या एका आंगून देलेल्या जाग्यावर

समाधी देली. काई दिस समाधीचा चौथरा, त्याच्या बाजूले उभ्या चार बल्या, त्याच्यावर्त आडव्या चार बल्यावर चार टिनं, असी अवस्था काई वर्स तसीचं होती. पहिल्या पुण्यतिथीले मुलीच्या शायेसामोरच्या लफाडात हभप महादेव महाराज मसालेवाले बडनेरा यायचं तं दोनतीन वर्स हभप पांडुरंग महाराज सावया याचं किरतनं झालं. तवा कार्यकरमाचं रूपचं लहानसक होतं. दिवायीच्या आंधी येनारी एकादसीले पुण्यतिथी. त्या दिसी समाधीची पूजा, राती गावात किरतन, दुसर्‍या दिसी काल्याचं

समाधीवर किरतन. त्याले मोठय़ा मुस्कीलीनं पंदरा-इस लोकं जमेत. मंग न्यानेसर कावरे पाटील आन् माहे मोठे भाऊ लक्ष्मणराव बडे यायनं थो खर्च दोघायनं आपसात वाटून घ्याचं ठरोलं. त्याच्यात किरतनाच्या राती महाराज, भजनकरी यायचा एकदसीचा फराय आमच्या घरी तं दुसर्‍या दिसी काल्याच्या बास्ता या सार्‍यायचा महा परसाद न्यानेसर पाटील यायच्या इकडं. किरतनं आन् काल्याच्या किरतनाच्या वक्ती लागनार्‍या लाऊडस्पीकरची जबाबदारी उचलली अंबादास राजगुरे यानं. एक दिवस यायनं असं ठरोलं का ज्यायच्या नावानं लोकं नाव जाहीर झालं का जमाची गॅरंटी हाय, असं नाव होतं हभप मोतीराम महाराज कुंडकर आरनीपलीकडच्या अंजनखेडचे. वं. गाडगे महाराजासंग ते अनेक वर्स फिरले होते. त्यायच्या नावाच्यानं होनारी गर्दी आन् किरतनाच्या माध्यमातून हमखास होनारं समाजप्रबोधन यासाठी माहे मोठे भाऊ त्यायच्या गावाले जाऊन त्यायले इनंती केली का महाराज हो म्हनून आमचं काम सोपं करा. त्यायनं हो म्हनल्यावर्त दर सालचा होका देऊन नारय देला आन् सतत ईस-बावीस वर्स येऊन त्यायनयी देलेला सबद् खरा केला. त्यायचा मुक्काम आपल्या घरी राहे. त्याच्याच्यानं त्यायच्यासंग चर्चा होये आन् गाडगेबाबा संग ते राह्यल्यानं बरीचं माईती इचारता ये. दोनतीन वर्सानं मले बोरी सोडा लागली आन् दरसालची भेट खंडली किरतन गावात होत होतं, पन त्याचा आग्रव होता का किरतन समाधीसमोर झालं पाह्यजे. आता गावचं पुढं सरकलं, पन तवा समाधी भाहेर वाटे. आखरीले किरतन समाधी म्होर सुरू झालं. महाराज मंधातचं

समाधीचा इसय काढून टोच्या द्याले लागले आन् त्याचा परिनाम दिसाले सुरवात झाली. एकडाव लोकाच्या मनाचा कल झाला का मंग टाईम नाई लागत. तवाचे सरपंच यादवराव वानखडे आन् एमईसीबीचे इंजिनिअर दुर्गे सायेब यायच्या पुढाकारानं समाधीच्या चारीकून चार पिल्लरं आन् स्लॅब. मंग एपीएमसीचे तवाचे अध्यक्ष तुकारामजी पाटील यायनं मार्केटात येनार्‍या कापसाच्या एका गाडीवर एक रुपया ठुला तो कोनालेच अखरला नाई. आन् मंग जे समाधीचं रूप पालटत गेलं. अनेकाचे हात लागत गेले. रमेशबाबू बाजोरिया यायचायी बांधकामात सहभाग राह्यला आन् आज हाय ते वास्तू उभी झाली. एक दिवस होनारं किरतन आता सात दिवसाच्या सप्त्यात बदललं. दिवसा भागवत आन् राती महाराष्ट्रातले नामवंत किरतनकार हभप पंढरी महाराजाच्या ओयखीनं हजरी लावत हायेत. रोज संध्याकायी हरिपाठ आन् रविवारी सकायी नामजपाचा एक तासाचा कार्यकरम आन् महापरसाद हे गेल्या सोया वर्सापासून अखंड सुरू हाये. लहानपनापासून आमचा नातू विशाल बडे त्याच्या आबाजीसंग इथ हरिपाठाले येत गेला. त्याची गोडी वाढत गेली आन् तो पखवाज सिकला. आता सोताच्या अभ्यासातून वारकरी पंथाचा किरतनकार म्हून थो उभा होत हाये. हे सारं इथल्या संस्काराच्यानं हे तो मान्य क रतो. अंबादास राजगुरूने चालू केलेली सेवा परभाकर राजगुरे यवतमायले गेला तरी चालवत असून पल्र्हाद राजगुरेचे पोरं गणेश साऊंडच्या नावानं साऊंड आन् डेकोरेशनची सेवा देत हायेत. पह्यलेपासून गावात फिरून वर्गनी ना मागाची पद्धत अजूनयी सुरू असून लोकायच्या सहभागातून एवढा मोठा सप्ता पार पडतं हाये. नामजप चालू करनारे शेलोडीचे परसराम पाटील गेले, तुकाराम पाटील गेले आन् या सत्कार्यात सर्मपित भावनेनं सोताले झोकून देनारे डॉ. रेकवार गेले. मोठी पोकयी जरी झाली असली तरी ज्या श्रद्धेवर लोकं जमतात त्या बाबाचे आशीर्वाद हे कार्य करून घेन्यास समर्थ हायेत. अस्या उपक्रमाचा परभाव सार्‍या गावावर होत असते.

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत. 'बॅरिस्टर गुलब्या' हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9420551260
     

No comments:

Post a Comment