Thursday 18 October 2012

'आत्मभान' हे मानवाला मिळालेले विशेष वरदान


जड पदार्थापासून मानवापर्यंत जी पृथ्वीवर उत्क्रांती झाली तिचे स्थूल निरीक्षण करता असे म्हणता येईल, की सुरुवातीस अचेतन, अबोध, निरानंद असलेला निसर्ग सजीव रूप घेऊन अधिकाधिक सचेतन, अधिकाधिक संवेदनशील, ज्ञानी आणि अधिकाधिक आनंदी होत गेला. यापैकी 'आनंद' या शब्दाला अनेकांचा आक्षेप असू शकतो. कारण सजीवांच्या जीवनात धडपड, कष्ट, वेदना व दु:ख कदाचित आनंदापेक्षा अधिक आहेत. परंतु स्वाभाविक प्रेरणा तपासली असता ती आनंदप्राप्तीचीच आहे, असे म्हणावे लागेल. जगण्यात आनंद नसता किंवा अधिकाधिक आनंदप्राप्तीसाठी जगणे नसते, तर जगणे ही मूलभूत प्रेरणा म्हणून टिकू शकली नसती. आधुनिक मानवीमनाने बरीच विकृत वळणे घेऊन जगण्यातला नैसर्गिक आनंद गढूळ करून टाकला ही बाब वेगळी. परंतु आहार, निद्रा, मैथुनासारख्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याबरोबर जो भाव पशुपक्षी व निसर्गापासून अद्याप फार दूर न गेलेल्या मानवातही उमटतो तो आनंदाचाच असतो. इतकेच काय, लहान बालकेसुद्धा खूप भूक लागली नसेल, झोपेला आले नसतील व शारीरिक व्यथा/वेदना नसेल तर सर्वकाळ आनंदीच असतात.

विविध इंद्रियांकरवी स्वत:चे विविध पैलू जाणणे, स्वत:चाच विविध प्रकारे उपभोग घेणे हेही उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत राहिला. स्वत:चे रूप न्याहाळण्यासाठी त्याने सजीवांच्या रूपात दृष्टी विकसित केली. नाद ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, गंधासाठी नाक, चवीसाठी जीभ व आत स्रवणार्‍या ग्रंथी असे स्वत:चाच आस्वाद अनेक अंगांनी घेण्यासाठी निसर्ग सजीवसृष्टीच्या माध्यमातून उमलत गेला. विकसित होत गेला. स्वत:च स्वत:चा भक्षक रूपाने उपभोग घेत राहिला व स्वत:च स्वत:चे भक्षही झाला. सजीवांमध्ये उत्क्रांतिक्रमात विकसित होत गेलेल्या प्रत्येक इंद्रियाला आनंदाचीच ओढ असते. जे अन्न आनंद देत नाही ते जिभेला नकोसे वाटते. जो नाद आनंद देत नाही तो कानांना कर्कश वाटतो. जो स्पर्श पुलकीत करत नाही तो त्वचेला असह्य वाटतो. जे दृश्य आनंददायी नसते ते डोळ्यांना बघवत नाही.

असे म्हणतात, की सृष्टीमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते जाणण्याच्या साधनांचा विकासच उत्क्रांतिक्रमात निसर्ग करत आहे. इंद्रियांच्या विकासापाठोपाठ किंवा सोबतच मनही उगवले व विकसित झाले. उत्क्रांतीच्या वरच्या पातळीवरील मनुष्येतर प्राण्यांमध्ये भावभावना व विचार करण्याची क्षमता कमीअधिक प्रमाणात निश्चितच आढळून येते. परंतु मानवी पातळीवर उत्क्रांतीने झेप घेतली. त्यातून मनाचा भव्य व विविधांगी विस्तार जो झाला त्याने फारच वरचा टप्पा गाठला. आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) हा मानवात असलेला व मानवेतर पशूंमध्ये अभावाने आढळणारा विशेष गुण आहे.

मनुष्येतर प्राणी बहुधा त्यांच्या नैसर्गिक उपजत प्रेरणांनी संचालित असे जीवन जगतात. परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला मात्र उपजत प्रेरणा कमी व बुद्धी म्हणजेच शिक्षणकौशल्य व विचारक्षमता अधिक मिळाली. इतर प्राण्यांची पिले जन्मत:च किंवा जन्मल्यावर लवकरच स्वत:चे अन्न मिळविण्यास सक्षम होतात. इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत मानवाचे मूल मात्र सर्वाधिक काळ परावलंबी असते. परंतु त्यांचा मेंदू इतर सर्व प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मानवाच्या या परावलंबी बालकांच्या रक्षण-पोषणासाठी मानवाला सामूहिक जीवनपद्धतीचा अंगीकार करावा लागला. समूहाला भाषेची गरज असते. कारण भाषेशिवाय समूहातील व्यक्ती एकमेकांशी निगडित कसे राहणार? आधी इशार्‍यांच्या स्वरूपात असलेली भाषा हळूहळू ध्वनी, शब्द व वाक्यरूपात विकसित होत गेली. भाषेच्या विकासासोबतच विचारक्षमताही आपोआप विकसित होत गेली किंवा विचारक्षमतेमुळे भाषा विकसित होत गेली, असेही म्हणता येईल.

मानवेतर प्राण्यांना भोवतालच्या सृष्टीचे भान असते. परंतु स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे व स्वत:मधील वासना-भावना-इच्छा-विचार यांचे वेगळे भान त्यांना नसते. असे आत्मभान हे मानवाला मिळालेले विशेष वरदान म्हणता येईल. अर्थात, आधुनिक साहित्यात आत्मभान हा शाप मानणारा एक प्रवाह आहे. परंतु मनाने निरोगी असणार्‍या कोणत्याही मानवाला आत्मभान हे वरदानस्वरूपच वाटावे. आपणच आपल्याला आतूनबाहेरून पाहता येणे व आपण तसे पाहत आहोत किंवा पाहू शकतो याचीही स्वतंत्रपणे जाणीव असणे म्हणजे आत्मभान! स्वत:ला पाहणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा, वासना, विचार, भावना वगैरे न्याहाळता येणे व समजता येणे. अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे तर एखादी वासना देहात/मनात उत्पन्न होणे ही एक बाब व अशी वासना माझ्यात उत्पन्न झाली आहे हे समजणे व मी हे समजतो आहे याचेही भान असणे ही दुसरी बाब. पहिला प्रकार सर्व प्राण्यांत आढळेल. दुसरा प्रकार मात्र फक्त मानवांतच दिसून येतो.

भोवतालच्या सृष्टीला समजून घेण्यासाठी, अन्न मिळविण्यासाठी व प्रतिकूल निसर्गावर मात करण्यासाठी मानवाला उपजत प्रेरणांपेक्षा विचारशक्तीचा उपयोग अधिक करावा लागला. इतर प्राण्यांच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो, की या गोष्टींसाठी प्राण्यांना निसर्गानेच उपजत प्रेरणा (इन्स्टिक्ट) बहाल केल्या आहेत किंवा उत्क्रांतीच्या ओघात प्रत्येक प्राणिजातीच्या सामुदायिक प्रकृतीमध्ये त्या उपजत प्रेरणा विकसित होत गेल्या असाव्यात. मानवी मुलाला मात्र उपजत प्रेरणांच्या अभावी शिक्षणावर अधिक भर द्यावा लागतो. अगदी खाद्यपदार्थापासून हे शिक्षण सुरू होते. आपल्या देहाला पोषक खाद्य कोणते व घातक कोणते, याबाबत मानवेतर प्राणी जन्मत: अधिक समंजस असतात. मानवाचे मूल मात्र दिसेल ती वस्तू तोंडात टाकू पाहते. परंतु निरीक्षण, अनुभव-विश्लेषण, निष्कर्ष इ. पद्धतींनी मानवी बुद्धी विकसित होत गेली. निरीक्षण-विश्लेषण-तर्कसंगती-निष्कर्ष हे बुद्धीचे गुण आहेत. पूर्वग्रहरहित, अनाग्रही, शुद्ध विवेकशील विचार ( ठशरीेप) ही निसर्गाने मनाच्या स्वरूपात गाठलेली उत्क्रांतीमधील सर्वोच्च अवस्था आहे. परंतु ती अवस्था जरी निसर्गाला मानवी देहात गाठता येत असली तरी फारच तुरळक प्रमाणात ती मानवजातीत आढळते. याचे महत्त्वाचे एक कारण बहुधा असे असावे, की मानवाला उत्क्रांतीच्या आधीच्या टप्प्यांचेही ओझे वाहावे लागते. म्हणजे त्याची विवेकीबुद्धी त्याला काहीही सांगत असली तरी त्याचा पदार्थमय देह, त्या देहाच्या मर्यादा, त्या देहातील जगण्याची व पुनरुत्पादित होण्याची धडपड करत असलेला प्राण, त्या अनुषंगाने येणारे इच्छांचे, वासनांचे आवेग, नैसर्गिक उपजत प्रेरणेपासून काहीसे दुरावल्यामुळे दोलायमान असलेले, विकृतीकडे सहज झुकणारे व आत्मभानामुळे 'अहं'चा परिपोष करू पाहणारे मन हे इतर तत्त्व त्याला अन्यान्य दिशांनी ओढू पाहतात व या सर्वापासून तटस्थ होऊन जगता येणे दुष्कर वाटते. अनेक महामानवांनी मनाची अत्यंत विवेकशील बुद्धीचे वैभव प्रकट करणारी अवस्था निश्चितच गाठली आहे. मात्र देहाच्या प्राणिक वासना व भावभावनांच्या आणि मनबुद्धीच्या वेगवेगळ्या मागण्यांमध्ये संतुलन कसे साधावे, हा यक्षप्रश्न मानवजातीकडून अद्यापही उत्तराची अपेक्षा बाळगून आहे.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)
     

No comments:

Post a Comment