Saturday 6 October 2012

सशांच्या वेशात हिटलरची पिलं!


परवा एक बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. कितीतरी वेळ अस्वस्थ वाटत होतं. आताही ती बातमी आठवली की मनाची तगमग होते.

'एफडीआय'च्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा अखेर काढून घेतला. त्यांनी टाटांच्या प्रकल्पालाही बंगालमध्ये असाच विरोध केला होता. त्याच आधारावर बंगालमधली अनेक वर्षांची कम्युनिस्टांची जुनी राजवट त्यांनी पार उखडून फेकली. प्रचंड बहुमतानं त्या बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यात. मध्ये अनेकदा रुसवेफुगवे झालेत, जळफळाट झाला पण त्यांनी केंद्र सरकारचा पाठिंबा मात्र काढला नव्हता. धमक्या देत गेल्या. वेळोवेळी सरकारही थोडंफार झुकत गेलं.. आणि संसारही सुरळीत राहिला.

पण यावेळी मात्र किराणा आणि चिल्लर गुंतवणुकीबाबत सरकारही ठाम होतं. ममता बॅनर्जीही ठाम राहिल्या. मुलायमसिंग यांनीही नेहमीप्रमाणे सौदेबाजीसाठी नाटकं केलीत आणि पुन्हा शेपटी घातली. हा घटनाक्रमच फार संतापजनक आहे. राजकारणामध्ये निर्लज्जपणा हा शब्दच मुळात स्वत:चा अर्थ हरवून बसलाय असे वाटते. भ्रष्टाचारानं बरबटलेले आणि सार्‍या जनतेला माहीत असलेले लुटारू जेव्हा नेते म्हणून टीव्ही चॅनलवरून वाट्टेल ते बरळतात तेव्हा या देशाचं पुढे नेमकं काय होणार हेच कळत नाही.

परसो..

एक पागल कुत्तेने

एक पूर्व मंत्रीको पाँचवीबार काटा

कुत्तेके बापने ये देखा

तो बेटेको जमकर डाटा

बोला, गधे..

नेताओंको काटनेका तेरा ये शौक

ऐसाही बढता जायेगा..

तो एकदिन.. तूभी..

इमानदारी छोडकर हराम की खायेगा!

पण मूळ विषय तो नाहीच. मी जो अस्वस्थ झालो त्याचं कारण वेगळं आहे. ती बातमीही वेगळी आहे.

यावेळी ममता बॅनर्जींनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. चिल्लर गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांचा ठाम विरोध आहे. त्यांच्याबाबतीत वैचारिक मतभेद असू शकतात; पण ममता बॅनर्जी यांच्या स्वच्छ प्रतिमेबद्दल मात्र कुणाचंही दुमत नाही; पण त्यांनी पाठिंबा काढला. त्या आता आपल्यासोबत नाहीत, हे दिसताच काँग्रेस सरकारने म्हणजे प्रामुख्यानं अतिशय प्रामाणिक, सज्जन, शांत, संयमी वगैरे वगैरे असल्याचा डांगोरा पिटणार्‍या मनमोहन सिंग यांच्या सरकारने चक्क ममता बॅनर्जी यांच्या खास सहकार्‍यांच्या विरुद्ध सीबीआयसारख्या संस्थांना सोडून दिले. लगेच त्यांच्या गैरव्यवहारांची म्हणे चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

अर्थात त्यांची चौकशी करण्याला काहीच हरकत नाही. गैरव्यवहार असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायलाच हवी.

पण मूळ प्रश्न असा आहे की, त्यांचे गैरव्यवहार असतील तर ते सरकारला पाठिंबा काढल्याबरोबरच लक्षात आले का? त्या आधी माहीत नव्हते का? आणि असतील तर मग सरकारने तेव्हाच कारवाई का केली नाही? म्हणजेच सरकारला पाठिंबा दिला तर तुम्ही कोणताही मोठा घोटाळा केला तरी सरकार पाठीशी घालायला तत्पर असते, असाच त्याचा अर्थ नाही का? असे किती घोटाळे सरकारने स्वत: दाबून ठेवलेले आहेत? ही मनमानी नव्हे का?

पंतप्रधान आणि मंर्त्यांनी संसदेमध्ये देशाशी प्रामाणिक राहण्याची आणि जनतेच्या हिताची काळजी वाहण्याची जी शपथ घेतली त्याचं काय? मोठमोठय़ा घोटाळय़ांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणे म्हणजे जनतेशी विश्वासघात नव्हे काय? देशाशी गद्दारी नव्हे काय? एखाद्या सोनाराला माहीत नसतानाही जर त्यानं चोरीचा माल खरेदी केला एवढय़ासाठी जेलमध्ये जावं लागते तर मग देशाला लुटणार्‍या लोकांना पाठीशी घालणार्‍या, त्यांना संरक्षण देणार्‍या नेत्यांना जेलमध्ये का टाकू नये? जनतेचा विश्वासघात करणे हा गंभीर गुन्हा नाही का? घोटाळेबाजांना पाठीशी घालणं हा देशद्रोह नाही का?

पक्ष कोणताही असो, काही अपवाद वगळलेत तर बहुसंख्य नेते एवढे निर्ढावलेले का आहेत? कायद्याची भीती राहिलेली नाही का? की आमची कायदा यंत्रणा- न्यायप्रक्रिया हीच मुळात कुचकामी ठरलेली आहे? की जनताच तशी आहे, याची खात्री या नेत्यांना पटलेली आहे?

एखाद्या काटरुनिस्टवर राष्ट्रद्रोहाचा खटला भरला जातो आणि खर्‍या देशद्रोहय़ांना मात्र मानसन्मान-मोकळं रान! खरंच देशात लोकशाही जिवंत आहे की हिटलरशाही पाय पसरतेय हळूहळू?

उभ्या शिवारात कशी सुरू झाली आणीबाणी

बंदी मैनेच्या गाण्याला, सुरू घुबडांची गाणी

काय चालले कळेना, रान गेले कोणा हाती

वाघिणीच्या दुधामध्ये कोण मिसळतो पाणी?

कायदे काय गरिबांसाठीच आहेत का? जेल काय फक्त सर्वसामान्य माणसांच्या छोटय़ा-मोठय़ा गुन्हय़ासाठीच बांधलेत का? 'देशद्रोह' हा शब्द आमच्या घटनेत आहे की नाही? त्याचा नेमका अर्थ कोणता? स्वार्थ आणि पक्षीय हित जोपासण्यासाठी अशा प्रकारचे गंभीर पाप करणार्‍यांना जनताही अशीच माफ करत राहणार का? न्यायालयाला डायरेक्ट हस्तक्षेप करता येणार नाही का?

आणि जनतेनं तरी किती दिवस शांत राहायचं? देशाची होत असलेली लूट मुकाटय़ानं पाहायची? पुढार्‍यांनी वाटेल तसा नंगानाच करायचा आणि आम्ही टाळ्य़ा वाजवायच्या, हे कधी तरी थांबणार की नाही? कधी तरी आमची मनं खर्‍या अर्थानं पेटून उठणार की नाही? की आम्हीच आमच्यावरचा विश्वास घालवून बसलो आहोत? आमचा पुरुषार्थ कुठं गेलाय?

पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि

पुन्हा माणसांची लढू या लढाई

मनाला पुन्हा धार लावू नव्याने

मनासारखे शस्त्र कोठेच नाही!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment