Saturday 6 October 2012

मनात साठविलेलं काहीही पुसलं जात नाही


मानवी मनाचा आवाका, खोली व व्याप्ती अतिप्रचंड असल्याचे आपण मागील लेखात पाहिले. एकतर जे गुणसूत्र जीन्स (सशपशी)च्या रूपात आपल्याला पितरांकडून मिळतात त्यातच पृथ्वीवरील सजीव उत्क्रांतीचे गडद अनुभव साठविलेले असतात. जे आपल्या मनात समाविष्ट होतात. शिवाय असे म्हणतात, की अगदी जन्मल्यापासून आपण डोळ्यांनी जे जे पाहतो, कानांनी जे जे ऐकतो, त्वचेने जे जे स्पर्श अनुभवतो, नाकाने जे जे वास घेतो व जिभेने ज्या ज्या चवी अनुभवतो ते सर्व काही आपल्या मनात साठविले जाते. काहीही पुसल्या जात नसतं. फक्त आपल्या जागृत मनाला त्यांची विस्मृती होते. मात्र सर्व आठवणी आपल्या सुप्त मनात साठविल्या जातात. याखेरीज सर्व वासना, भावना, विचार, कल्पनादेखील सुप्त मनात साठविलेल्या असतात. याचाच अर्थ, ज्याचे आम्हांला भान असते ते आमचे जागृत मन. हे आमच्या मनाचे समुद्रातून वर आलेल्या हिमनगांसारखे अगदी वरवरचे टोक असते आणि खाली पसरलेल्या अथांग सुप्त/ अवचेतन मनाचा आम्हांला पत्ताच नसतो. कदाचित आमच्या सुप्त मनाचा हा मोठा हिस्सा आतल्याआत मानवजातीच्या सामुदायिक सुप्त मनाशीही जोडलेला असू शकतो.

निसर्गाचे असेही स्वरूप आहे, जे आमच्या मर्यादित दृष्टीला दिसत नाही. दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानेच आमच्या दृष्टीचा विस्तार करून आम्ही सृष्टीच्या महाकाय व सूक्ष्म रूपाचे काही अंश पाहू शकतो. तार्किक बुद्धिमत्तेच्या/गणिताच्या साहाय्याने उर्वरित सृष्टीबाबत आडाखे बांधू शकतो. सृष्टीत असेही ध्वनी आहेत जे आमचे कान ऐकू शकत नाहीत. असे गंध आहेत ज्यांचा आमच्या नाकास पत्ता लागत नाही. भौतिक शरीराच्या या मर्यादा आहेत. आमचे डोळे अतितीव्र प्रकाशकिरणे सहन करू शकत नाहीत. आमचे कान तीव्र ध्वनिलहरी सहन करू शकत नाहीत. आमच्या जागृत मनालाही प्रकृतीने विस्मृतीचा वर दिलेला आहे अन्यथा ते मनातला प्रचंड गोंगाट सहन करू शकले नसते.

परंतु आमच्या जाणिवेच्या पलीकडे आमच्या सुप्त/अवचेतन मनात एक अशी आमच्या जागृतावस्थेपेक्षा ज्ञानी यंत्रणा निश्चितच कार्यशील असावी जी त्या सुप्तमनाच्या प्रचंड गोदामातून वेळोवेळी, सतत आमच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला साजेशा आठवणी, कल्पना, भावना, गुणी विचार हुडकून काढते व जागृतावस्थेकडे पाठवून देते. ही यंत्रणा आमच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेपण संघटित ठेवते. अशी यंत्रणा नसती तर आपण सर्व वेडे झालो असतो किंवा असेही म्हणता येईल, की ज्या मानवाच्या अवचेतन मनातील अशी निवड व संघटन करणारी यंत्रणा विस्कळीत होते, कमजोर होते अथवा नष्ट होते ते वेडे होतात. अशीच ज्ञानी यंत्रणा आमच्या देहाची निर्मिती, पोषण व विकासात गुंतलेली असल्याचे आपण पूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. ज्या यंत्रणेची संपूर्ण कार्यपद्धती आम्हांला अजून समजलेली नाही.

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, पिंड, व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे असते. ते त्याने निवडलेले नसते. त्याच्यात प्रवाहित झालेल्या पितरांच्या गुणसूत्रांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटा हिस्सा व्यापला असतो. पर्यावरण व संस्कारांनी आणखी एक छोटा हिस्सा तयार होतो. परंतु त्याला त्याच्या सख्ख्या भावंडांपासूनही वेगळे व्यक्तिमत्त्व, स्वभाव प्रदान करणारा व्यक्तीच्या स्वभावाचा मोठा हिस्सा कुठून व कसा निर्माण होत असेल? आणि कशासाठी?

मानवीमनाला म्हणजे जागृत मनाला बुद्धीची संगत लाभली आहे. अमूर्त स्वरूपात विचार करण्याची क्षमता हे बुद्धीचे एक लक्षण आहे. आमची भाषा हे या गुणाचे उत्तम उदाहरण आहे. 'राम' ही दोन अक्षरे खरेतर नुसत्या रेघोटय़ा आहेत. परंतु ती दोन अक्षरे एकत्र वाचली अथवा ऐकली, की आमच्या कल्पनेत धनुर्धारी, एकवचनी, एकपत्नीव्रती, त्यागी, पराक्रमी असा अवतारी पुरुष उभा ठाकतो. त्या दोन अक्षरी रेघोटय़ा म्हणजे त्या महामानवाचे अमूर्त रूप ठरतात. अमूर्त विचार करण्याच्या या क्षमतेने तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व गणितासारख्या शास्त्रांच्या रूपाने अतिउंच भरार्‍या मारल्या असून मानवाचा फार मोठा भौतिक व सांस्कृतिक विकास साधला आहे.

भोवतालच्या वस्तूंची, घटनांची परस्पर संगती लावण्याचा व कारणे आणि परिणामांची संगती लावण्याचा प्रयत्न करणे हेही बुद्धीचे लक्षण मानले जाते. तसेच तर्काद्वारे निवाडा करणे, योग्य-अयोग्य ठरविणे, नियोजन करणे, शिकणे हीदेखील बुद्धीची कामे मानली जातात. आमच्या सचेतन, जागृत मनाच्या धारणा, पूर्वग्रह, श्रद्धा, संस्कार, आम्ही ज्या पाळत आलो त्या परंपरा व सामाजिक संस्थात्मक रचना यांना जाणीवपूर्वक बदलविण्याची क्षमता बुद्धी आम्हांला प्रदान करते. परंतु अवचेतन मनाला व आमच्यातील वासनांना, भावनांना, कल्पनांना जोश, आवेश, आवेग पुरविणार्‍या प्राणाला नियंत्रित करणे बुद्धीला फारसे जमत नाही. एकतर उत्क्रांतीत त्यांचे स्थान बुद्धीच्या अगोदरचे असल्यामुळे जोमदार, आवेशपूर्ण, आवेगी व भरदार अशा नाटय़पूर्ण प्राणिक मनाची आम्हांला चटक लागलेली आहे किं वा त्याचेच दुसरे रूप म्हणजे हताश, उदास, खिन्न व भकास जे असते त्याचेही आमच्या अवचेतन मनाला मोठे आकर्षण असते. (त्यामुळेच बेगम अख्तर, तलत महमूद, मेहदी हसन किंवा गुलाम अलींनी सुरेल, पण उदास स्वरात गायलेल्या उर्दू शायरांच्या पराभूत मनोवृत्तीच्या गजला क्रांतिकारकांनादेखील आवडतात.) बुद्धीमध्ये असा आवेग अथवा हताशपणा नसल्यामुळे ती योग्य-अयोग्याचा निवाडा अधिक चांगला करू शकते. पण त्यासाठी तिला अधिकाधिक सचेतन होत जाणार्‍या मनाची व बलवान परंतु शांत प्राणाची साथ मिळावी लागते.जाणीव हा आमच्या अस्तित्वाचा आणखी वेगळाच घटक असावा. जाणीव (उेपीलर्ळेीीपशी) ही स्वतंत्र वस्तू नसून मेंदूच्या माध्यमातून घडणारी एक प्रक्रिया आहे असे बहुतांश वैज्ञानिक मानतात. प्राण-मन-बुद्धी यांचेदेखील प्रक्रियांच्या स्वरूपातच विश्लेषण व अध्ययन करण्याकडे विज्ञानाचा कल आहे.

परंतु एक गंमत म्हणून आपण एक प्रयोग करून पाहू शकतो. बाहेरच्या जगातून चित्त काढून स्वत:वर केंद्रित करून पाहावे. त्यासाठी पद्मासनासारखे कठीण आसन लावून बसण्याची गरज नाही. परंतु मन सैरभैर होऊ नये अशा तत्पर सुखासनात साधी मांडी घालून जरी एकाग्रतेने स्वत:कडे पाहत राहिलो तरी आपली जाणीव ही शरीराच्या सर्व अवयवांमध्ये, मनाच्या भावनांमध्ये, विचारांमध्ये वगैरे पसरली, विखुरली असल्याचे लक्षात येते. दोन्ही स्तनाग्रांना जोडणार्‍या रेषेच्या मध्यभागी अथवा टाळूवर चित्त एकाग्र करत राहिलो तर हळूहळू ही विखुरलेली, पसरलेली जाणीव त्या ठिकाणी एकवटू लागते. ती आपल्याला हळुवारपणे छातीत खोलवर अथवा टाळूच्या वर ढकलू पाहते. तिचे स्वतंत्र अस्तित्व तर जाणवतेच, परंतु ही जाणीव जेव्हा पलटून स्वत:लाच निरखू लागते तेव्हा एक विशेष आनंद शरीरात, मनात पसरू लागतो. हा अनुभव मानवजातीसाठी नवीन नसून लक्षावधी मानवांना जाणिवेची अशीच अनुभूती वेगवेगळ्या काळी व स्थळी झालेली आहे.

(लेखक हे नामवंत विधिज्ञ आहेत.)

No comments:

Post a Comment