Saturday 6 October 2012

ठसन सावकाराची..
''काहो अजाबराव, कुठी निंगाले?''

''आखरात''

''आखरात कायले?''

''माह्या हाती टप्पर दिसत नाही काय तुमाले?''

''एका हाती टप्पर अन् दुसर्‍या हाती मोबाईल कायले?''

''मंधात कोणाचा फोन आला त् मोबाईल पाह्यजे, आपून हातचा मोबाईल सोडत नाही गुरुजी.. झुडपाआडी बसलो, तरी मोबाईल कानापाशीच असते, आमच्या घरी सार्‍या मेंबरपाशी मोबाईल आहे.. माह्याजोळ मोबाईल.. बायकोजोळ.. बुढय़ाजोळ''

''तुमची लक्षमी अशीच मोबाईल घेऊन गोदरीत जाते काय?''

''जाच लागते, दुसरा इलाज नाही''

''काय राज्या.. घरी तीन-तीन मोबाईल असून बाइले गोदरीत पाठोता? बायकोच्या आंगावर सत्तर हजाराचं सोनं घालता अन् गोदरीत धाडता? तुमाले योजनेतून संडास भेटला नाही काय?''

''तो काय कामाचा.. एक पोतं सिमेंट अन् पादुका भेटल्या, त्या पादुकाची पुंजा करू काय?''

''सरकारी काम असंच असते, सरकार कामापुरतं देते, बाकी आपल्यालेच बांधा लागते''

''मंग काय फायदा? सरकारले म्हना पुरा संडास बांधून द्या.. त्याच्यात टाइल टाकून द्या.. नळ लाऊन द्या.. लाइट लाऊन द्या..''

''सरकारचे इव्हाई आहा काय तुम्ही? सकाय तुम्ही सरकारले म्हनसान की आमाले हात धरून संडासात बसून द्या''

''मले संडासाचा वास सईन होत नाही गुरुजी.. लफाळात मस्त बसता येते.. जुन्या काळात संडास होते काय? राजे महाराजे लफाळात बसत''

''कशावरुन?''

''अमका राजा संडासात गेला असं कोन्या पुस्तकात लिहेल हाये काय? म्हनजे तो लफाळातच बसे, जुन्या काळापासून आखराचा वापर सुरू आहे''

''आखरात जा पण टप्पर घेऊन जाऊ नका, तुम्ही त् घरापासूनच काष्टा सोडत निंगता.. आता ग्रामपंचायत ठराव घेऊन टप्पर बंद योजना राबवनार आहे''

''हे योजना पटली नाही गुरुजी आपल्याले.. एकखेप तंबाखू बंद होईन.. बिळी बंद होईन पन् टप्पर बंद होते काय? हे बंद होयासारखी गोष्टच नाही, कारन की टपराशिवाय मानसाचं भागतच नाही''

''त्यासाठी म्हनतो की, घरी संडास बांधा''

''संडास एका दिवसात बांधतो पन् संडास बांधल्यावर मच्छर लय होतात, मच्छरापासून मलेरिया होते, डेंगू होते''

''संडास पद्धशीर बांधला की, मच्छर होत नाहीत, मच्छराच्या नावावर घरच्या बाइले उघडय़ावर पाठोता काय?''

''येटायातल्या सार्‍या बाया गोदरीतच जातात गुरुजी.. तुम्ही मले एकटय़ाले कसे म्हनून राह्यले?''

''मी सार्‍याइले म्हनतो, वरतून बिडीओ साहेबाचा आम्हाले आदेश आला की, गावातल्या लोकाइले संडास बांधासाठी उत्तेजन द्या''

''पैसे देते काय सरकार?''

''योजनेत तुमाले सबसीडी भेटते''

''तुमची गोष्ट खरी आहे पण घरातल्या संडासात माहा जीव कोंडते, बाहीर मोक्या मैदानात बसता येते, बसल्या बसल्या बिळी फुकता येते, मोबाईलवर गाने वाजोता येतात''

''मानूस कुठीसाई बसते पण बाईची पंचाइत होते ना, त्या दिवशी पेपरात बातमी आली की, आपल्या देशात सत्तर कोटी मोबाईल आहेत पण संडास फक्त अध्र्याच लोकाइच्या घरी आहे, तुम्ही दोन-दोन हजाराचे मोबाईल घेता, शंभर रुपये छटाकची क्रीम तोंडाले लावता मंग एक संडास बांधता येत नाही काय?''

''बांधता येते.. पण बांधीन कोन?''

''तुम्ही असे हात बांधून बसल्यावर घरातल्या बाया काय म्हनतीन? सकाय मी सार्‍या महिला मंडळाची एक मिटींग घेतो.. अन् त्याहिले सांगतो की, आपापल्या नवर्‍याले संडास बांधाले लावा.. त्याशिवाय नवर्‍याचा सैपाक करू नका''

''तुमची गोष्ट खरी आहे पण संडास बांधून बी उपयोग नाही'' ''काहून?''

''ज्याच्या घरी संडास आहे तोही आखरातच जाते''

''त्यासाठी ग्रामपंचायत ठराव घेईन.. जो आखरात गेला त्याले दंड होईन''

''अशा गोष्टीसाठी कोनी दंड भरते काय राज्या?''

''मंग तुम्हीच पाहाना.. आपल्या गावात येनारा रोड किती खराब करून ठेवला? मानसाले नाक दाबून चाला लागते''

''लायने पोट्टे बसतात रोडवर''

''मंग घरातच त्याहिची सोय केली त पोट्टे रोडवर बसतीन काय?''

''पोट्टे फार अचाट हायेत गुरुजी.. शाळेतून खिचळी खाऊन येतात अन् शाळेच्याच रस्त्यावर बसतात''

''शाळेच्या रस्त्यावर आम्ही बसू देत नाही कोनाले''

''शाळा दिवसा असते.. पोट्टे रात्री बसतात''

''हे असं रस्त्यावर बसनं बरोबर नाही.. गावात तरुण पोरी आहेत.. नवीन सुनवायर्‍या आहेत.. त्याहिची किती कानकोंडी होते याचा इचार करा''

''घरचा इचार पाहून सांगतो''

''तुमच्या बायकोचा विचार पक्काच आहे, बाया त्याचीच वाट पाहून राह्यल्या, तुम्ही बायकोसाठी साठ हजाराच्या बांगळ्या आनता अन् उलशाक गोष्टीसाठी भांडन करता''

''कोनाशी भांडलो मी?''

''काल तुम्ही पक्याशी भांडले नाही काय?''

''हाव राज्या'' ''कायच्याबद्दल भांडले?''

''काल माह्या घरची गोदरीत चालली होती, त्या पक्यानं चालता चालता माह्या बायकोवर तिरपी नजर टाकली, मले मोठी चढली.. म्हनून मी त्याच्याशी भांडलो''

''तुमच्या बायकोकडे कोनं पाह्यलं की तुमची मस्तकात जाते किनी? मंग एवढी ठसन आहे त् बायकोसाठी संडास बांधाव.. म्हनजे हे गोष्ट अशी झाली की ठसन सावकाराची अन् ओवायनी काचकोराची। मिशा पाह्यसान त तलवारीची धार..।

''आता तुमची गोष्ट पटली गुरुजी.. सकायच बांधतो संडास.. येतो गुरुजी आखरातून.. लय वाळखोळचे मिसकॉल येऊन राह्यले''

(लेखक हे नामवंत वर्‍हाडी कथाकार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9561226572
     

No comments:

Post a Comment