Saturday 6 October 2012

प्रिय बापू, सप्रेम नमस्कार वि.वि.


प्रिय बापू,
स.न.
तुझी 143 वी जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी झाली. 'मी सव्वाशे वर्ष जगणार आहे' असं तू म्हणायचास. त्यावर 'सव्वाशे वर्ष तुम्हाला कोण जगू देतो?' असं नथुराम गोडसे जाहीरपणे म्हणायचा. तुझ्या मरण्यासाठी तर नथू (ह)रामी माणसांचे प्राण कंठाशी आले होते. त्यातूनच तुझ्या हत्येचे अनेक असफल तर 30 जानेवारी 1948 रोजी सफल प्रयत्न झाला. आगाखान पॅलेसमध्ये तू उपोषण सुरू केले तेव्हा तुझे प्राण केव्हा जातात याची विस्टन चर्चिलने आपले प्राण कंठाशी आणून वाट पाहिली. 'गांधी अजून का मेले नाहीत?' अशी तारेद्वारा विचारणा संबंधितांकडे चर्चिल करीत होता. पण तू मेला नाहीस नथुराम गोडसेनी मारूनही तू मेला नाही. विनोबा म्हणतात तेच खरं आहे. 'सज्जनांचा कधी मृत्यू होत नाही. ते सदाचे जिवंत असतात. आणि दुर्जन कधी जिवंत असतच नाही.'

एक गोष्ट स्पष्ट करतो. मी तुला एकेरीने संबोधतो आहे याचे कदाचित तुझ्या अनुयायांना आश्चर्य वाटेल, कदाचित ही बाब त्यांना खटकेलही, पण खरं सांगू देवाला आपण कधी अहो-जाहो करतो का? शंकराला शंकरराव, गणेशाला गणेशराव, किंवा विठ्ठलाला विठ्ठलराव म्हणत नाही. त्यांना आपण अरे-कारेच म्हणतो. त्याच नात्याने मी तुला एकेरीने संबोधित आहे.

तुझ्या सेवाग्राम आश्रमाला दरवर्षी अजूनही तीन तीन - चार चार लाख लोक भेट देऊन जातात. याचे आश्चर्य वाटते. तसा तू नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध नाहीस. 'मन्नत' मागणार्‍यांची इच्छापूर्ती करतोस अशीही तुझी ख्याती नाही. तुझ्या नावाशी अजूनपावेतो चमत्कार वगैरेही जोडल्या गेलेले नाहीत. अंगारे, धुपारे, गंडे, दोरे, ताईत तुझ्या नावाने दिले जातात असेही नाही. तुझ्या नावाने सेवाग्राम आश्रमात साधा प्रसादही वाटला जात नाही. बरं सेवाग्राम आश्रम म्हणजे काही प्रेक्षणीय स्थळही नाही. तिरुपती बालाजी, शेगाव, शिर्डी येथे भाविकांची गर्दी मी समजू शकतो. त्यांना त्यांच्याकडे काही मागायचे असते. तक्रारी, गार्‍हाणी, संकटे, अडीअडचणी सोडव म्हणून साकडे घालायचे तरी असते. पण तुझ्या आश्रमात हीच माणसं का येत असतील? नतमस्तक होत असतील याबद्दल माझ्या मनात कोडे आहे. त्यांना तू हवा आहेस का? पण त्यांच्या आचरणावरून तसेही वाटत नाही. मग नित्यनेमाने एवढय़ा मोठय़ा संख्येनी देशविदेशी लोक तुझ्या आश्रमाला का भेट देत असतील? हे कोडे मात्र सुटत नाही.

तसे तर तू म्हणजे विसाव्याच काय पण एकविसाव्या शतकालाही पडणारं कोडे आहेस. एका बाजूला विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ थोर पुरुष म्हणून जग तुझी निवड करते. आईन्स्टाईनसारखा माणूस, 'तुझ्यासारखा हाडामांसाचा माणूस प्रत्यक्षात होऊन गेला यावर पुढील पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही,' अशी प्रतिक्रिया नोंदवून ठेवतो. जगातील जवळपास 147 देशांमध्ये तुझा पुतळा उभारला जातो. त्यात तुला आयुष्यभर साम्राज्यवादाचा दलाल म्हणणार्‍या कम्युनिस्ट विचारसरणीच्या देशांचाही समावेश असतो. एका विदेशी माणसाला तुझ्यावर सिनेमा काढावासा वाटतो. तो काढतो आणि जगभर तो तुफान चालतो. हिंदीमध्येही 'लगे रहो मुन्नाभाई'सारखा सिनेमा निघतो आणि तुझ्यामुळे तो हिट होतो. तुझ्या साहित्याची विक्री आजही जगभर तडाख्याने होताना दिसते. त्यातही हिटलरच्या जर्मनमध्ये तर ती अधिकच होते. तू कधी संपल्यासारखा वाटतो पण कधी मार्टिन ल्युथर किंगच्या रूपात अवतरतो. तर कधी नेल्सन मंडेलाला आधाररूप ठरतो. अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्राचे अध्यक्ष बराक ओबामांचे प्रेरणास्थान बनून तू जिवंत होतो. अमेरिकेतील द्राक्षबाग मजुरांची संघटना चालविणार्‍या सिझर चावेझ या नेत्यामध्ये तू कधी झळकून जातो. तर म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आयुष्यभर संघर्षरत असलेल्या स्यू कीला तुझंच पाठबळ मिळतं. 'कबरीतही मी गप्प बसणार नाही व आपल्यालाही गप्प बसू देणार नाही,' हे वचन लोकांना तू दिले असते. ते वचन पाळताना तू आजही जाणवतो.

तुझ्या वाटय़ाला जगभराचे पराकोटीचे प्रेम जसे आले तसेच तुझी कायम निंदानालस्ती व द्वेष करणारेही होतेच. खरेतर आत्यंतिक प्रेम व काही मुठभरांचा आत्यंतिक द्वेष या कात्रीमध्ये तू अडकलेला दिसतो. या आत्यंतिक द्वेषाचीच परिणती तुझ्या खुनामध्ये झाली. तू मेलास या आनंदात काहींनी पेढेही वाटले तर दुसर्‍या बाजूला तुझ्या मृत्यूनंतर आता जगण्यातच 'राम' उरला नाही असे म्हणत आत्यंतिक निराशेपोटी त्या काळात आत्महत्या करणारेही काही कमी नव्हते. तुझ्यापाशी 'मॅजिक'आहे पण 'लॉजिक'नाही असे नाक मुरडणारेही होते. पण तुझ्या मॅजिक आणि लॉजिकने सारा देश भारावून गेला होता हेही तेवढेच खरे. तुझ्या मागे अक्षरश: जनसागर फुटायचा तर तुझ्या विरोधकांच्या मागे जनसागर आटायचा. तुझ्यावर टीकाही झाली ती अशीच टोकाची. हिंदुत्ववाद्यांनी तुला हिंदूद्रोही ठरवीत मुस्लिमधार्जीना म्हटले तर मुस्लिम लीग तुला मुस्लिम द्वेष्टा व हिंदूधार्जीना ठरवून मोकळी झाली. म्हणजे एकाच वेळेस तू हिंदुत्ववाद्यांसाठी मुस्लिमधार्जीना तर मुस्लिम लीगसाठी हिंदूधार्जीना ठरतो. यात नेमका तू असतोस तरी कोण? असलाच तर तू केवळ माणूसधार्जीना असतोस. जात, धर्म, भाषा, प्रांत, देश यांच्या बंधनापलीकडे जाऊन तू केवळ माणसांवर प्रेम करणारा असतोस. या देशात नेता कोणताही असो, त्याने तत्त्वज्ञान भले काहीही सांगितलेले असो त्याला त्यांच्या अनुयायांनी अखेर जातीमध्येच जेरबंद केलेले दिसते. पण तुझ्याबाबतीत अजूनपावेतो असे घडले नाही. तू एवढा मोठा झालास की कोणत्याही जातीत, धर्मात एवढंच काय पण एका देशातसुद्धा तू मावला नाही. तू झाला तो एकदम जागतिकच. त्याशिवाय काय जगभरातील बहुतांश देशात तुझे पुतळे उभारले गेले?

खरेतर विषय सुरू होता तुझ्यावरील टोकाच्या टीकेचा. साम्राज्यवादी ब्रिटिशांसाठी तू नंबर एकचा शत्रू असतो. म्हणूनच विस्टन चर्चिल 'गांधी अजून का मेले नाहीत?' अशी विचारणा करून तुझ्या मरण्याची वाट पाहत असतो. पण त्याच वेळेस कम्युनिस्टांसाठी तू साम्राज्यवाद्यांचा दलाल असतो. प्रतिगाम्यांसाठी तू कडवा पुरोगामी असतो, तर पुरोगामी तुला प्रतिगामी ठरवून मोकळे होतात. काहींना तू बुरसटलेल्या विचारसरणीचा वाटतोस तर काहींना तू अतिप्रगत वाटतोस म्हणून झेपत नाही. संघर्षवादी म्हणविणारे तुला मिळमिळीत समन्वयवादी ठरवून मोकळे होतात, तर अँनी बेझंटसारख्या बाईला तू केवळ विध्वंस करणारा अराजकतावादीच वाटतो. या देशातील सर्वसामान्य जनतेसाठी तू कट्टर देशप्रेमी असतोस तर सावरकर बंधू बाबाराव सावरकरांसाठी तू देशद्रोही असतोस. तुझ्या विरोधासाठी मवाळ गोखले अनुयायी, जहाल टिळक अनुयायी, अँनी बेझंटबाईंची होमरूल लीग, भास्कर जाधवांचे ब्राह्मणेतर, हेडगेवारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉ. आंबेडकरांचे अनुयायी, कम्युनिस्ट पक्ष असे सर्व एरवी परस्परांचे हाडवैरी तुझ्याविरोधात मात्र एक होताना दिसतात. तू कोणत्याच चौकटीत बसत नव्हतास हीच त्या त्या काळच्या चौकटच्या बादशहांची तुझ्याविषयी तक्रार होती.

खरेतर तू आणि तुझा विचार यातील तू आम्हाला हवासा वाटतोस, पण तुझे विचार झेपत नसल्यामुळे तू नकोसाही होतोस. म्हणजेच एका वेळेस तू कधी हवाहवासाही वाटतोस आणि तेवढाच नकोसाही. तू जेव्हा दंगलीच्या पाश्र्वभूमीवर नोवाखाली मध्ये जातोस तेव्हा तू हिंदूंना हवाहवासा वाटतोस. पण तेवढाच मुस्लिमांना नकोनकोसा होतोस. तोच तू बिहारच्या दंगली शमविण्यासाठी जातोस तेव्हा तू हिंदूंना नकोसा होतोस आणि मुस्लिमांना एकदम हवाहवासा वाटू लागतो. हिंदू-मुस्लिम दोघेही जेव्हा परस्परांच्या नरडीचा घोट घेत असतात तेव्हा तू मध्ये पडतोस. तेव्हा तर तू दोघांनाही नकोसा होतोस. पण ह्याच दंगली शमविण्यासाठी तू प्राणांतिक उपोषणाला बसतोस तेव्हा आश्चर्यकारकपणे तू मरू नये असे दोघांनाही अंत:करणापासून वाटतं. तू त्यांना एकदम हवासा वाटतो. मलाच नाही तर सार्‍या जगाला आजही तू तेवढाच हवाहवासा वाटतो आणि तेवढाच नकोनकोसाही. तसे नसते तर आजही तुझ्या आश्रमात लाखोंच्या संख्येनी दरवर्षी लोक आले नसते. तुझे पुतळे जगात सर्वत्र बसविल्या गेले नसते. तुझ्या साहित्याची विक्री जगभरात तडाख्याने आजही होत आहे. तू हवासा वाटतो म्हणूनच ना? पण हे सर्व होत असतानाच त्याच माणसांकडून तुझ्या मूल्यांची, विचारांची तेवढीच पायमल्लीही होताना दिसते. त्याचा अर्थ काय? तुझ्या मार्गाने चालणे तसे कठीणच. आम्ही त्यातही मार्ग काढलाच.

रस्त्यांनाच तुझी नावं दिली. महात्मा गांधी मार्ग. तेवढाच त्या मार्गावरून चालताना तुझ्या मार्गाने चालतोय याचा आनंद आणि समाधान. तुझ्या विचाराने, तुझ्या मार्गाने चालणे कठीण तर धावणे तर अवघडच. आम्ही त्यातूनही मार्ग शोधला. पैशावरच तुझी प्रतिमा छापली. सर्व नोटांवर तुझा फोटो. आम्ही पैशामागे तर धावतोच आहोत आणि पैशावर तर तुझा फोटो आहे. म्हणजेच तुझ्याच तर मागे आम्ही धावत आहोत. दक्षिण

आफ्रिकेतल्या लढाईच्या विजयानंतर 'इंडियन ओपीनियन'मध्ये तू लेख लिहिला होतास. त्यात म्हटले होते, 'कष्ट पाम्या विना कृष्ण कोने मळ्या!' अर्थात कष्टाशिवाय कृष्ण कोणाला मिळाला? आम्हालाही कृष्ण हवाच आहे. पण कष्टाशिवाय. म्हणूनच मग आम्ही असे मार्ग शोधतो. मार्गालाच तुझे नाव दिले म्हणजे तुझ्या मार्गावरून चालण्याचे समाधान आणि पैशावरच तुझे फोटो छापले म्हणजे तुझ्या पाठोपाठ धावण्याचेही समाधान. पैशाचा लोभही आहे आणि सत्याग्राहाचा स्वीकार हे कदापि शक्य नाही. हे तर तू अनेकवेळा म्हणालास. आम्हालाही ते कळतं पण वळत नाही. समजतं पण उमजत नाही.

तुझ्या मूल्यांच्याच बाबतीत बोलायचे झाले तर सत्य, प्रेम, अहिंसा, विश्वास, प्रामाणिकता सर्वानाच हवी आहे. जगात असा कोण आहे ज्याला प्रेम नकोय, द्वेष हवाय? जगात असा कोण आहे ज्याला इतरांनी त्याच्याशी खोटं बोललेलं आवडतं? स्वत:पुरता विश्वास, प्रामाणिकता जगात कोणाला नको आहे? कोणाला दुसर्‍याच्या बंदुकीच्या गोळीने मरावं असे वाटेल? कोणालाच तसे वाटणार नाही आणि इथेच खरा पेच आहे. तू सांगितलेले सत्य, प्रेम, करुणा, क्षमा, अहिंसा, विश्वास, प्रामाणिकता मला माझ्यापुरती हवी आहे आणि या सार्‍या मूल्यांचा तू प्रतिनिधी होतास म्हणून तुही मला हवासा आहे. पण तुझी हीच मूल्ये मी इतरांसाठीही लावावी असा प्रश्न येतो, त्याचा तू आग्रह धरतोस तेव्हा तू मात्र नकोसा होतोस. माझ्या बाबतीत सत्य, प्रेम, अहिंसा, शांती, विश्वास, प्रामाणिकता हे सर्व मला हवे तेव्हा तू माझा असतो. पण हेच इतरांच्या बाबतीत तू द्यायला सांगतोस तेव्हा तू नकोसा होतोस. यालाच तू साधन आणि साध्य म्हटले. धोर्त्याचे कलम लावले तर मोगरा फुलत नाही. प्रेम हवे असेल तर प्रेम पेरावे लागेल. सत्य हवे असेल तर त्याचीच कास धरावी लागेल. इथेच तुझे आणि आमचे जमत नाही. आम्हाला प्रेम तर हवे आहे पण द्वेषाची पेरणी करून. आम्हाला अहिंसा तर हवी आहे, पण हिंसेचा मार्ग पत्करून. पण तुला एक सांगतो, जोपर्यंत जगाला प्रेम, सत्य, अहिंसा, विश्वास, शांती, क्षमा, प्रामाणिकता हवी आहे तोपर्यंत तुला मरण नाही. हे मात्र चिरंतन सत्य आहे. तुझ्यासारखी माणसं कधीच मरत नसतात. पूर्वीही नाही आणि आताही नाही.

तुला विनम्र अभिवादन

तुझा

(लेखक शेतकरी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

भ्रमणध्वनी - 9822587842

No comments:

Post a Comment