Monday 29 October 2012

'महाड सत्याग्रह' : राजकीय की सामाजिक?


महाडच्या चवदार तळय़ाचा सत्याग्रह हा सामाजिक होता, असेच आपण आजपर्यंत मानत आलो आहोत, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरी हा प्रश्न? अंगवळणी पडलेल्या आणि श्रद्धेय गोष्टींची चिकित्सा करणे जगाच्या पाठीवरल्या कोणत्याही व्यक्तीला मुळीच आवडत नसते. जोपर्यंत एखादी अंगवळणी पडलेली गोष्ट आचरणात आणताना त्याची सुरक्षितता धोक्यात येत नाही अथवा श्रद्धेय गोष्टी पाळताना त्याला धोका निर्माण होत नाही, तोपर्यंत तो अशी चिकित्सा करायला कधीच तयार नसतो.

60 प्रवासी घेऊन वाहतूक करणार्‍या कंडक्टर-ड्रायव्हरच्या हाती गाडीचे ब्रेक असतात. त्यामुळे तो प्रवाशांच्या इच्छेने नाही तर स्वत:च्या मर्जीप्रमाणे आपली बस कुठेही थांबवू शकतो. स्वातंर्त्य मिळाल्यानंतरही निजामी प्रदेशात, विदर्भात बसची खाजगी वाहतूक होती. एकदा मी माझ्या कुटुंबासह उनकेश्वर ते माहूर असा प्रवास करीत होतो. रस्त्यात वाईबाजार नावाचे गाव लागते. वेळ सायंकाळी साडेपाचसहाची होती. माहूर तिथून फार तर तासाभराच्या अंतरावर होते. बस वाईबाजार या गावात आली. सर्व प्रवासी उतरले. न उतरणार्‍यांपैकी मी आणि माझे कुटुंबीय तेवढे होतो. मला वाटले बहुधा वाईची माणसे उतरून गेली. आता माहूरची माणसे चढतील. पंधरा मिनिटे गेली, अर्धा तास गेला; पण बस एकाच जागी उभी. मी बसखाली उतरून ड्रायव्हर , कंडक्टरचा शोध घेऊ लागलो तर तेही कुठे दिसेनात. दीड तास झाला तरी बस एकाच जागी उभी. अखेर चौकशी केल्यावर कळले की, आज बाजारचा दिवस असल्यामुळे कंडक्टर ड्रायव्हर सिनेमा पाहायला गेले आहेत. आता रागवायचं तरी कुणावर आणि भांडायचं तरी कुणाशी? अखेर सिनेमा संपल्यावर कंडक्टर ड्रायव्हर आले आणि एकदाची बस मार्गी लागली. आज जर कंडक्टर ड्रायव्हर असं वागतो म्हणाले तर? त्यांना माहितंय त्यांची नोकरी जाईल. म्हणून हवी तेव्हा आणि वाटेल तिथे बस थांबवण्याचा हक्क अंगवळणी पडलेले कंडक्टर ड्रायव्हर आपली नोकरी जाईल, ही भीती निर्माण होताच, हा हक्क योग्य आहे की नाही याची चर्चा करायला तयार होतात. ही झाली अंगवळणी पडलेली गोष्ट. रस्त्यात हवे तिथे थुंकणे, रस्त्यावर खड्डे करून मंडप टाकणे, स्लीपर क्लासमध्ये झोपेची वेळ असली तरी अन्य प्रवाशांचा विचार न करता जोरजोरात गप्पा मारणे अशा अनेक गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की, आपला तो जणू हक्क आहे,असे समजूनच आपण वागत असतो.

हेच आपण श्रद्धेच्या बाबतही बोलू शकतो. अस्पृश्यांना मंदिरात येऊ न देणे, सार्वजनिक पाणवठय़ावर पाणी भरू न देणे ही धार्मिक बाब आहे, अशी आपली समजूत होती. त्यामुळे या श्रद्धेवर कुणी आघात केला तर आपण त्याला देहदंड देत असू. मुलामुलींची लग्ने कोणत्या वयात करावीत, याचा अधिकार संपूर्णपणे त्यात्या जातीसमूहाला होता. त्यामुळे त्यात कुणी हस्तक्षेप केला तर आम्हाला मुळीच खपत नसे. आजचा 'ऑनर किलिंग'चा मुद्दा असाच श्रद्धेचा मुद्दा आहे.

जोपर्यंत अंगवळणी पडलेल्या गोष्टींना अथवा श्रद्धेय गोष्टींना समूहाच्या अथवा राजकीय सत्तेचे संरक्षण असते,तोपर्यंत अशा गोष्टींची चिकित्सा करणे, अशा गोष्टी योग्य आहेत किंवा नाही हे ठरवणे, चर्चा करणे याची कुणालाच आवश्यकता वाटत नसते. निजामीच्या काळात गणपतीची मिरवणूक नेताना रस्त्यात मशीद लागली तर आवाज करायचा नाही. हा कायदा नव्हता;पण ही अंगवळणी पडलेली समजूत होती. त्यामुळे हिंदूंची संख्या या प्रदेशात 85 टक्के असली तरी मिरवणूक मशिदीजवळ आली की घोषणा, बॅण्डबाजे यांचे आवाज शांत होत असत.

नांदेड शहरात गुरू गोविंदसिंघांची समाधी आहे. या देवस्थानाला गुरुद्वारा म्हणतात. या गुरुद्वारा रस्त्यावर कुणीही तंबाखू खात नाही की सिगारेट ओढत नाही. कारण शीख धर्मात तंबाखू खाणे अथवा सिगारेट ओढणे या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. एक प्रसंग मला आठवतो. एक गृहस्थ या रस्त्यावरून सिगारेट ओढत चालला होता. बहुधा त्याला गुरुद्वारा पाहायचा होता; पण त्याला तो स्थानिक नियम माहीत नव्हता. त्याचं ते सिगारेट ओढत रस्त्यानं जाणं पाहून एका सरदारजीचा माथा खवळला. त्यानं मागून जाऊन त्याच्या पेकाटात एवढय़ा जोरात लाथ घातली की, तो आडवातिडवा होऊन रस्त्यावर खाली कोसळला; पण त्याला अशी लाथ का घातली हे विचारण्याची हिंमत मात्र कुणी दाखवली नाही. खरे तर तो रस्ता नगरपालिकेच्या मालकीचा होता; पण वर्दळ मात्र समाधीदर्शन घेणारांची असल्यामुळे त्या रस्त्यावर सिगारेट न ओढणे हीच सर्वाची श्रद्धा होती. रेल्वेत, बसमध्ये, प्लॅटफार्मवर सिगारेट ओढण्याला मज्जाव नसल्यामुळे अथवा त्या आड कुठलीही धार्मिक भावना अडसर ठरत नसल्यामुळे तिथे आपण बिनदिक्कतपणे सिगारेट ओढण्याचा आपला हक्क बजावू शकतो.

जोपर्यंत आपल्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी अथवा श्रद्धेय गोष्टी पाळताना आपली सुरक्षितता धोक्यात येत नाही. तोपर्यंत आपण बिनदिक्कतपणे त्या गोष्टी अमलात आणतो; पण जेव्हा श्रद्धा अथवा अंगवळणी पडलेल्या गोष्टी इतरांना अडचण निर्माण करू लागतात, तेव्हा समूह चिकित्सा करायला अथवा काय बरेवाईट आहे, याची चर्चा करायला तयार होतो आणि आपले हक्क जपण्यासाठी सत्तेचा वापर करू लागतो. कार्यालयीन वेळ असली तरी नमाज पडायला जाण्यावर बंदी नव्हती, अशा त्या काळात मुस्लिम नागरिक साहेबांना न विचारता निघून जात. तो त्यांचा हक्क होता; पण परिस्थिती बदलली. आता असे जाता येत नाही. जेव्हा रूढी अथवा श्रद्धा इतरांच्या हक्कांची पायमल्ली करू लागतात आणि दोन्ही गट तुल्यबळ असतात तेव्हा तह करणे, वाटाघाटी करणे याशिवाय अन्य पर्यायच उरत नाही.

हिंदू म्हणवून घेणार्‍या प्रत्येकालाच मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. श्रद्धेच्या अथवा रूढीच्या नावाखाली तुम्ही तो डावलू शकत नाही, अशी भूमिका घेत दोन तुल्यबळ गट जेव्हा परस्परविरोधी उभे राहिले तेव्हा भांडण मिटवायचे कसे? काळाराम मंदिराचा सत्याग्रह पाच वर्षे चालला. तर पंढरपूर मंदिराच्या प्रवेशासाठी गांधींनी मध्यस्थी केल्यानंतरही साने गुरुजींनी प्राणांतिक उपोषण सोडण्यास विनम्र नकार दिला. कायदा पाळावा तर धर्म बुडतो आणि धर्म राखावा तर हिंदू म्हणवून घेणार्‍या एका फार मोठय़ा समुदायाला मंदिर प्रवेशाचा हक्क नाकारावा लागतो. अशा संघर्षातून मग काही वाटाघाटी होतात, तह होतात आणि भांडण मिटवले जाते. आज तुम्ही कुठल्याही मंदिरात जा. प्रत्यक्ष मूर्तीपासून काही अंतरावर दानपेटींच्या अलीकडे गजांचा कठडा आढळून येईल. त्यामुळे सर्वाना दर्शन घेण्याची सोय झाली आणि धर्माचे पाविर्त्यही राखले गेले. कोणे एकेकाळी प्रसिद्ध अभ्यासक सोनोपंत दांडेकरांचा दांडा असेच या कठडय़ाबद्दल म्हटले जाई. एवढे अंतर राखून दर्शन घ्यावे ही सूचना सोनोपंत दांडेकरांची होती आणि आज जवळपास सर्वच मंदिरांत याच दांडा पद्धतीचे अनुकरण केले जाते.

खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा परस्परविरोधी श्रद्धा अथवा रूढी पाळणारे एकाच प्रदेशातले जाणीव जागृती झालेले लोक एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात तेव्हा काय करावे? अशा पळवाटा काढून तडजोडी कराव्यात की अन्य एखाद्या मार्गाचा अवलंब करावा? इ.स. 1789 मध्ये फ्रान्समध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली. एका प्रचंड सभेत फ्रान्समधल्या जनतेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यात जी कलमे होती, त्यातले एक कलम होते : 'सर्व माणसे जन्मत: समान दर्जाची आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाची राहतील.' 'दुसरे कलम होते वरील जन्मसिद्ध हक्क कायम राहावेत हाच राजकारणाचा अंतिम हेतू असला पाहिजे,' 'अखिल प्रजा ही सर्वाधिकारांची मायभूमी आहे. म्हणून धर्म अथवा राजकारणाच्या आधारावर हे व्यक्तीचे अथवा समुदायाचे अधिकार कुणालाही नाकारता येणार नाहीत, हे तिसरे कलम होते.' यासाठी कायदा हवा, तो तयार करण्याचा अधिकार जनतेला अथवा जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीला हवा आणि या कायद्याचा पाया समता असायला हवी, ही त्यापुढची कलमे होती. याच जाहीरनाम्याच्या आधारे पुढे फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. फ्रान्सचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून युरोपातली अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली.

हे सर्व सांगण्याचा हेतू एकच आहे. 1927 च्या महाडच्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच कलमांचा उच्चार करीत 'मनुस्मृतिदहन' केले.मग ही घटना राजकीय क्रांतीचा आरंभ नसून, ती केवळ समाजसुधारणेची बाब आहे, असे सगळेच का म्हणतात?

(लेखक हे नामवंत आंबेडकरी

विचारवंत व नाटककार आहेत.)

भ्रमणध्वनी - 9881230084

No comments:

Post a Comment