Wednesday 10 October 2012

जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे!


आठ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या आणि त्यानंतर तिचा अमानुष खून करणार्‍या सैतानाला केवळ 36 दिवसांत फाशीची शिक्षा ठोठावण्याचा निकाल ओरिसामधील संबलपूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला. ही निश्चितच त्या न्यायालयाबद्दल आदर आणि अभिमान वाटावी अशीच घटना आहे. तसेच इतर न्यायालयांनाही दिशा दाखविणारी घटना आहे. सामान्य माणसाचा न्यायालयावरील विश्वास अधिक दृढ करणारी ही घटना आहे.

तात्पर्य काय की, आमच्या कायद्यामधे सर्व प्रकारची तरतूद आहे. मात्र ते कायदे वापरणारी यंत्रणाच कुचकामी आहे. इतरही न्यायालयात असे असंख्य गुन्हे पल्रंबित असतील. त्यातील निकालाला पंधरा-वीस वर्षे का लागावीत? त्यातील न्यायाधीशांनीही असे खटले तातडीने का निकालात काढू नयेत? अशा पाशवी कृत्य करणार्‍या सैतानांनाही तारखावर तारखा का देण्यात याव्यात? न्यायाधीशांनाही काहीच भावना नसतील का? त्यांचेही मन कळवळत नसेल का? की तेही निष्पक्ष नाहीत? कुठल्यातरी दबावाला तेही घाबरत असावेत का? आणि असल्या गुन्हेगारांचे वकीलपत्र घेऊन स्वत:ची तुंबडी भरणारे वकीलही तारखावर तारखा घेऊन गुन्हेगारांना मदतच करीत नाहीत का? निरपराधांना सजा होऊ नये यासाठी वकिली करायची की गुन्हेगारांना वाचविण्यासाठी?

एकंदरीत कुणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही.

टी.एन. शेषण यांनी भंगारात पडलेला निवडणूक कायदा

तोफेसारखा वापरला. भलेभले बुरूज खिळखिळे करून टाकले होते. वाघ असल्याच्या तोर्‍यात धमाकूळ घालणार्‍यांच्यासुद्धा शेळ्या होऊन गेल्या होत्या. 'म्याऊ म्याऊ' करतानादेखील हे वाघ दहा वेळा विचार करायचेत! आता पुन्हा येरे माझ्या मागल्या!

या सार्‍या पाश्र्वभूमीवर देशात सध्या सुरू असलेल्या घटनांचा विचार करायला हवा!

सोनिया गांधी यांच्या विदेशी दौर्‍याचा आणि प्रामुख्याने आजारपणासाठी बाहेरच्या देशातील दौर्‍याचा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. त्यावर संस्कृती आणि सभ्यपणाच्या नावावर केवढी बोंबाबोंब सुरू झाली. मात्र त्यांच्याच पक्षातला एक जंतू 'मंदिरांच्या ऐवजी शौचालये महत्त्वाची' असं म्हणतो, तेव्हा हे 'सभ्यतेचे ठेकेदार' कुठल्या बिळात दडून बसतात? हा देश सर्वधर्म समभाव मानणारा देश आहे! प्रत्येक धर्माची स्वत:ची प्रतीकं आहे. पूजेच्या-प्रार्थनेच्या पद्धती आहेत. त्या सर्वाचा सारखाच आदर करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे त्या 'लाल दिव्यामधल्या' जंतूला कळत नाही का? त्यांच्या पक्षाच्या नेत्या या वेळी शांत का? या देशातील करोडो जनतेच्या आस्था आणि आदरस्थानांची निंदा नालस्ती करणार्‍यांनाही पोसलेल्या कुर्त्यासारखं गोंजारताना त्यांना काहीच वाटत नाही का? आणि जी व्यक्ती असल्या संवेदनशील विषयावरही काही बोलत नाही, आपल्या पाळीव मंर्त्याला साधा जाबही विचारत नाही त्या व्यक्तीला तिच्या आजाराचे बिल विचारल्यामुळे सार्‍या माणुसकीचाच अपमान झाल्याची कुणी ओरड करत असेल तर या देशातल्या जनतेची किंमत नेमकी काय समजायची?

खरं तर या विधानाची इतर धर्मीयांनीही निंदा करायला हवी होती. स्वत:ला विचारवंत-पुरोगामी म्हणविणार्‍यांनीही निषेध करायला हवा! मंदिर असो, मशीद असो, चर्च असो, गुरुद्वारा असो, बुद्धविहार असो की आणखी कोणतीही प्रार्थनास्थळं असो सर्वाना समान न्याय मिळायला हवा! मान राखायचा असेल तर सर्वाचा मान राखा. आणि हटवायची असतील तर सारीच हटवून टाका! कारण धर्माच्या आडून गैरफायदा घेणारेही सर्वत्र आहेत. आणि धर्माचा मानवजातीच्या कल्याणासाठी उपयोग करून आपलं अख्ख आयुष्य चंदनासारखं झिजविणारेही सर्वच धर्मात आहेत.

रॉबर्ट वढेराच्या संपत्तीबद्दल प्रश्न विचारून अरविंद केजरीवाल यांनीही पुन्हा तसाच प्रश्न निर्माण केलाय? जनतेने खरंच शांतपणे विचार करायला हवा! अनेक पक्षाचे नेते या प्रकरणी वढेरा यांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न करणार. कारण त्यांची स्वत:ची मजबुरी आहे. बहुतेक सारे मावसभाऊच आहेत. काही मोजके प्रामाणिक लोक अजूनही भारतीय राजकारणात आहेत जिवंत! पण ते आपापल्या राज्यात किंवा कोषातच गुंतून पडलेले आहेत. पण केजरीवाल यांचे मुद्दे गंमत म्हणून घेण्यासारखे नाहीतच!

केजरीवाल यांच्या पाठीमागे कोण आहेत? याला महत्त्व नाही. स्वत:चा पक्ष स्थापन करण्यासाठी ते वातावरण तयार करत आहेत, अशीही टीका काही महाभाग करत आहेत. त्यातही अर्थ नाही. मुळात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे खरे की खोटे हा प्रश्न आहे. हा दोन व्यक्तींमधला खाजगी व्यवहार नाहीच.

समजा रॉबर्ट वढेरा सोनिया गांधी यांचे जावई नसते तर डीएलएफ या कंपनीने त्यांना 50 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज दिले असते का? इतक्या स्वस्तात त्यांना घरे दिली असता का? किंवा राजकीय कनेक्शन नसलेल्या आणखी कुणाकुणाला या कंपनीनं अशी उदार मदत केली आहे हाही संशोधनाचा विषय नाही का?

अण्णा आणि केजरीवाल यांचा आधीचा प्रयोग फसला. त्यांच्या काही मुद्याबद्दल मतभेदही असू शकतात, पण सध्या त्यांनी सुरू केलेला मारा मात्र योग्य दिशेने आहे. त्यांनाही त्यांचा पक्ष स्थापन करण्याचा, वाढविण्याचा तेवढाच अधिकार आहे. आता त्यांच्या तोफाही सूर सापडल्यासारख्या मारा करत आहेत. माणुसकी आणि देश सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीने जे योग्य असेल त्याच्या पाठीशी जनतेने उभे राहायलाच हवे! केजरीवाल यांच्या पक्षाचाही लोकांनी विचार करायला काय हरकत आहे?

दिल्लीमध्ये गरिबाचे कापलेले विजेचे कनेक्शन जोडून केजरीवाल यांनी सामान्य माणसाची लढाई सुरू केल्याचा संदेश दिला! अण्णाही सामान्य माणसाचाच आवाज म्हणूनच पुढे आले होते! एकदा सामान्य माणसाच्या हातात देशाची सूत्रं द्यायला काय हरकत आहे? पण हे सर्वसामान्य माणसानं मनावर घेतलं पाहिजे. पक्का निर्धार केला पाहिजे. आणि सामान्य माणसासाठी सुरू झालेली लढाई प्रामाणिकपणे त्यांच्यासाठीच लढली गेली पाहिजे.

बघा..

वेळ अजूनही गेलेली नाही!

न्याय आतातरी सारखा पाहिजे

अन् सुदामासही द्वारका पाहिजे!

मी निघालो पुढे या क्षणापासुनी

जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे!

(लेखक हे नामवंत कवी, चित्रपटनिर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ' सखे-साजणी' हा त्यांचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे.)

भ्रमणध्वनी - 9822278988

No comments:

Post a Comment